Diwali_4 कल्पना सरोज यांचे मनोगत
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘तहेलका’ या इंग्रजी साप्ताहिकाने 23 फेब्रुवारीचा अंक महिला विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला आहे. भिन्न स्तरातील व भिन्न क्षेत्रांतील 25 महिलांची मनोगते असलेल्या त्या अंकात कल्पना सरोज या 54 वर्षीय महिलेचे मनोगतही आहे. खालच्या वर्गातील तरुणांना स्वबळावर उभे करण्याच्या कार्यासाठी त्यांना अलीकडेच ‘पद्मश्री’ सन्मान देण्यात आला. काहीही भाष्य न करता, या महिलेचे ‘तहेलका’मधील मनोगत अनुवाद करून देत आहोत... संपादक

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात माझा जन्म झाला. माझे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. मला दोन भाऊ होते आणि दोन लहान बहिणी. त्या काळात घरात तरुण मुलगी ही तिच्या आई- वडिलांना विषाची गोळी वाटत असे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मला शिक्षण सोडावे लागले आणि बाराव्या वर्षी माझे लग्न करून दिले गेले. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असलेल्या मुलाबरोबर. मी त्याच्याबरोबर मुंबईला आले, पण नवऱ्याकडच्या लोकांनी माझा छळ सुरू केला. ते मला नियमितपणे उपाशी ठेवत असत आणि सतत मारहाण करीत. सहा महिन्यानंतर माझे वडील आले तेव्हा ते मला ओळखूच शकले नाहीत इतकी शरीराने मी खंगले होते. वडील मला घरी घेऊन गेले, पण सभोवतालचे लोक बोट दाखवू लागले. ‘सासरकडून परत आलीय म्हणजे हिचीच काहीतरी चूक असणार.’ असे म्हणू लागले. त्यामुळे आता जगण्यात काही अर्थ नाही असे मला वाटू लागले. आपण शिक्षण घेऊ शकत नाही आणि लग्नही टिकवू शकत नाही असे वाटल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून मी वाचले. तेव्हा लोक म्हणू लागले, ‘तिला कशाच्या तरी बाबतीत अपराधी असल्याची भावना असणार, म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.’ मी एक बळी आहे, पण मलाच दोषी ठरवण्यात येत आहे असे लक्षात आल्यावर मी ठरवलं, हे होऊ द्यायचं नाही. मग मी पुन्हा शाळेत जाऊ लागले. नववीपर्यंत शिकले आणि कामाच्या शोधात मुंबईला गेले, गिरणीत काम मिळवले. माझ्या वडिलांनी आपल्या मुलींना एकटीने घराबाहेर कधी जाऊ दिले नव्हते, त्यामुळे त्यांना ते मान्य नव्हते. पण मी त्यांना सांगितले, ‘मला जाऊ द्या, नाहीतर मी आत्महत्या करीन.’

मुंबईत आल्यावर मी दोन रुपये रोजंदारीने टेलरिंग काम करू लागले. दोनेक वर्षांनी माझ्या वडिलांची नोकरी गेली आणि आमचे कुटुंबच मुंबईला आले. त्यानंतर माझी लहान बहीण आजारी पडली आणि गेली, कारण आम्ही तिला आवश्यक ते उपचार देऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘केवळ रोजीरोटीसाठी कमावणे पुरेसे नाही.’ मग मी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून कर्ज घेतले आणि फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. असेच कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय करायला दलित समाजातील लोकांना मी पाठबळ देणे सुरू केले. त्यानंतर इतर अनेकांची मदत घेऊन, मागासवर्गीय समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी राष्ट्रीय एकता युवा मंचाची स्थापना केली.

हळूहळू लोक माझ्याकडे ‘समस्या सोडवणारी’ म्हणून पाहू लागले. दरम्यान भाडेकरू सोडत नसलेली एक वादग्रस्त जागा मी विकत घेतली. गुंड लोकांनी मला मारून टाकण्याची धमकी दिली. पण बंदुकीचे लायसन्स मिळवून मी त्यांचा सामना केला. आता मी माझ्या संरक्षणासाठी सोबत बंदूक ठेवते, कारण मला असे वाटते की, मीच माझ्यासाठी लढले पाहिजे...

त्यानंतर मी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि साखरेच्या गिरणीत गुंतवणूक केली. 2000 साली तांब्याच्या तारा बनवणारी कमानी ट्युब्ज ही कंपनी (त्या कंपनीच्या कामगार युनियनच्या आग्रहास्तव) चालवायला घेतली. ती कंपनी तोट्यात चालली होती आणि अनेक कायदेशीर अडचणीतही सापडली होती. पण कंपनीच्या कामगारांचा रोजगार मला महत्त्वाचा वाटत होता. म्हणून मी इतक्या वर्षांत संबंध आलेल्या बांधकाम व अन्य व्यावसायिकांकडून पैसे उभारले आणि त्या कंपनीची देणी चुकवायला सुरुवात केली. आता कंपनी थोडी नफ्यातही आली आहे, पुढील काही वर्षांत तिची भरभराट होईल.

स्त्रिया फार काही करू शकत नाहीत अशी टीका करणारे खूप लोक भेटले, पण खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे सहकारीही मला मिळाले. मी खंबीरपणे उभे राहायचे ठरवले तेव्हा माझ्या कुटुंबाला दोन वेळा पोटभर जेवण मिळावे यापेक्षा जास्त अपेक्षा माझी नव्हती. त्यानंतर जे काही मिळाले ते मी केलेल्या कठोर कष्टाचा भाग आहे. मला शिक्षण नाकारण्यात आलं होतं, माझ्या मुलीला मी ते दिलं, ती आता परदेशात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. मी दिवसातले 15 तास काम करताना तहानभूक विसरते. मी मोठी होत असताना अन्नाची कमतरता होती... आता अन्न खूप आहे, पण खायला वेळ नाही.

Tags: स्त्री पद्मश्री महिला दिन तहेलका संपादकीय Women’s Day Padmashri Tehelka 8 March Sadhana Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात