Diwali_4 ‘कालपरवा’ची चार वर्षे
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

रामचंद्र गुहा यांची डझनभरापेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील काहींच्या विविध भाषांत आवृत्त्या आल्या आहेत. मात्र Politics and Play हा स्तंभ अन्य पाच भाषांतील प्रत्येकी एका नियतकालिकातून प्रसिद्ध होत असला तरी, त्यातील निवडक लेखांचे पुस्तक पहिल्यांदा मराठीत येत आहे. म्हणजे ‘कालपरवा’ हे गुहा यांच्या कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद नसून, स्वतंत्र पुस्तक आहे.

मागील दहा वर्षांपासून गोविंद तळवलकर साधना साप्ताहिकात नियमितपणे लिहितात. चार वर्षांपूर्वी त्यांचा मेल आला, ‘रामचंद्र गुहा यांचा Politics and Play या शीर्षकाचा पाक्षिक स्तंभ The Telegraph या दैनिकात चालू आहे. तो स्तंभ मराठीतही प्रसिद्ध व्हावा अशी त्यांची इच्छा आहे, मी त्यांना ‘साधना’चा पर्याय सुचवला आहे.’ त्या मेलबाबत डॉ.नरेंद्र दाभोलकरांना सांगितले तेव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘तळवलकर सूचवताहेत आणि गुहा तयार आहेत, या दोन्ही गोष्टी साधनासाठी पुरस्कारासारख्याच आहेत.’ अर्थातच आम्ही होकार कळवला. त्यानंतर डिसेंबर २०१२पासून गुहांचा तो स्तंभ ‘कालपरवा’ या नावाने साधनात सुरू झाला, मागील चार वर्षे साधनाचा सर्वाधिक वाचकप्रिय स्तंभ म्हणून त्याचेच नाव घ्यावे लागते.

गुहा यांचा स्तंभ साधनात सुरू होतोय, ही बातमी सांगितल्यावर साधनाच्या विश्वस्त व सहसंपादक राहिलेल्या ८०च्या घरात असलेल्या कुमुद करकरे हरखून गेल्या. कारण गुहांच्या लेखनाच्या त्या जबरदस्त चाहत्या होत्या. त्यामुळे नियोजित स्तंभातील सर्व लेखांच्या अनुवादाची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे मागून घेतली. दीड वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंतच्या अडीच वर्षांत ‘कालपरवा’ सदरातून ५५ लेख प्रसिद्ध झाले, ते सर्व लेख कुमुदताईंनीच अनुवादित केले. त्यातील निवडक २५ लेखांचे हे पुस्तक आहे. ‘गुहांच्या या सदराचा अनुवाद करण्यामुळे, माझे शेवटचे दिवस छान जात आहेत,’ असे त्या वारंवार बोलून दाखवत असत. परंतु हे पुस्तक पहायला त्या आता नाहीत.

डिसेंबर २०१२ ते मे २०१५ या अडीच वर्षांच्या काळातील निवडक लेखांचे हे पुस्तक आहे. त्यानंतरच्या दीड वर्षात, या सदरातील लेखांचे अनुवाद तिघांनी (अशोक वाडीकर, संकल्प गुर्जर, विनोद शिरसाठ) केले. आणखी वर्षभराने साधनातील ‘कालपरवा’ सदर पाच वर्षांचे होईल तेव्हा, म्हणजे जानेवारी २०१८मध्ये अलीकडच्या अडीच वर्षांतील निवडक लेखांचे पुस्तक ‘कालपरवा : भाग २’ या नावाने प्रसिद्ध होईल.

रामचंद्र गुहा यांची डझनभरापेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील काहींच्या विविध भाषांत आवृत्त्या आल्या आहेत. मात्र Politics and Play हा स्तंभ अन्य पाच भाषांतील प्रत्येकी एका नियतकालिकातून प्रसिद्ध होत असला तरी, त्यातील निवडक लेखांचे पुस्तक पहिल्यांदा मराठीत येत आहे. म्हणजे ‘कालपरवा’ हे गुहा यांच्या कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद नसून, स्वतंत्र पुस्तक आहे. कालपरवा सदरातील लेखांची निवड या पुस्तकासाठी करताना, क्रिकेटवरचे लेख वगळले आहेत. शिवाय, काही घटना-प्रसंगांच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांचे संदर्भ काळ उलटल्यानंतर कमी होतात किंवा विस्मृतीत जातात, म्हणून त्या प्रकारचे लेख बाजूला ठेवले आहेत. तसे करणे काहीसे जड गेले, पण पुस्तक आटोपशीर व्हावे यासाठी २५ लेख ही मर्यादा आम्ही स्वत:हून आखली होती.

इतिहास, राजकारण, समाजकारण, पर्यावरण आणि क्रिकेट या पाचही क्षेत्रांत संशोधनपर तरीही ललितरम्य लेखन  करणे हा रामचंद्र गुहा यांचा सर्वांत महत्त्वाचा गुणविशेष आहे. इतिहास जिवंत करून वर्तमानाशी त्याचे धागे जुळवणे किंवा जुळू शकणारे धागे दाखवणे ही त्यांची खासियत आहे. याचा प्रत्यय या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचताना येईल.

सर्व स्तरातील, भिन्न अभिरूची असलेल्या वाचकांना हे लेख विशेष भावले आहेत. सामान्यत:, सदरातील लेखांची कव्हरस्टोरी करण्यासाठी नियतकालिकाचे संपादक नाखूष असतात, परंतु गुहांच्या लेखाबाबत तसे करता येणे खूपच अवघड जात राहिले, कारण त्यातील बहुतांश लेख इतिहासाला जिवंत करून वर्तमानाला समजून घेण्यासाठी विशेष उपयुक्त ठरतात. म्हणूनच मागील चार वर्षांत साधनाच्या सर्वांत जास्त कव्हरस्टोरीज गुहा यांच्या लेखांवरच आहेत. गेल्या वर्षी १३ जिल्ह्यांच्या ठिकाणी साधनाच्या वाचकांचे मेळावे झाले, त्या सर्व ठिकाणी सर्वांत वाचकप्रिय सदर म्हणून ‘कालपरवा’चाच उल्लेख होत राहिला. इतक्या सातत्याने इतके वाचनीय लेखन करीत राहणे ही अत्यंत कठीण बाब असते, परंतु गुहांचे लेखन वाचताना ते काम फार सोपे असावे असे भासते.

रामचंद्र गुहा यांच्या लेखनातून पुढे येणारी भूमिका साधना साप्ताहिकाच्या राजकीय, सामाजिक भूमिकेशी अत्यंत सुसंगत असल्याचा प्रत्यय पुन:पुन्हा येत राहिला. म्हणूनच साधनाच्या कार्यक्रमांना गुहा यांना बोलावण्यासाठी मागील दोन वर्षे आम्ही प्रयत्नशील होतो आणि अर्थातच वाचकांनाही त्यात विशेष रस होता. या पार्श्वभूमीवर गुहांचे साधनाच्या कार्यक्रमांना येणे केवळ साधनासाठी नाही तर एकूणच पुरोगामी वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाची घटना होती.

गुहांच्या लेखनातील सर्वाधिक अनुकरणीय बाब कोणती, हा प्रश्न अलीकडच्या काळात अनेक विचक्षण वाचकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटीत विचारला आहे. त्याचे उत्तर इथे सांगितले पाहिजे. साधी- सोपी व प्रवाही भाषा वापरणे, लेखनात मुद्यांची उधळण न करणे, शेरेबाजीला थारा न देणे, पुराव्यासह आपला मुद्दा नेमकेपणाने पुढे मांडणे, या पद्धतीमुळे गुहांचे लेखन समोरच्या वाचकांच्या विचारप्रक्रियेला आवाहन करते, आव्हानही देते. परिणामी, कन्व्हिंसिंग या प्रकारातील ते लेखन बनते, अशा लेखनाचा प्रतिवाद करता येणे अत्यंत अवघड असते.

‘कालपरवा’ या पुस्तकाचे प्रास्ताविक

Tags: विनोद शिरसाठ कुमुद करकरे रामचंद्र गुहा गोविंद तळवलकर कालपरवाची चार वर्षे संपादकीय The Telegraph Politics and Play Book prolouge vinod shirsath column writing Kumud Karkare Coverstories Collam Writing stambh Ramchandra Guha Govind Talwalkar Kalparavachi Chaar varsh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात