डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जागतिक वारशाला उजाळा देण्यासाठी...

आश्चर्य हे आहे की, या देशात मार्क्सवादी व साम्यवादी असणारे व त्याप्रमाणे कार्य करणारे अनेक लहान मोठे राजकीय पक्ष आहेत. त्या विचारांचा व कार्याचा वारसा सांगणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना आहेत. काही अभ्यासक संशोधक व त्यांचे गट (थिंक टँक) आहेत. त्यापैकी कोणीच कसे लेनिन 150 साजरी करण्यासाठी धडपडताना दिसले नाही? असाच प्रकार चार वर्षांपूर्वी कार्ल मार्क्स यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष आणि दोन वर्षांपूर्वी रशियन राज्यक्रांतीचे शताब्दी वर्ष आले आणि गेले तेव्हाही झाला होता. 

व्यक्ती , संस्था, संघटना, घटना  यांना पन्नास, पंचाहत्तर, शंभर, सव्वाशे, दीडशे , दोनशे वर्ष पूर्ण होतात तेव्हा ते साजरे करण्याचा प्रघात जगभर आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार व कार्य यांची चर्चा चिकित्सा करता येते, त्यांची कालसुसंगतता वा कालबाह्यता अधोरेखित करता येते. वर्तमानाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते उपयुक्त ठरते. व्यक्तीच्या हयातीत तिची पंचाहत्तरी हा मोठा उत्सव होऊ शकतो, कारण तोपर्यंत जाणतेपणाचे अर्धशतक तिने पूर्ण केलेले असते आणि दरम्यान आयुष्य अखेरच्या टप्प्यावर आलेले असते. व्यक्तीची जन्मशताब्दी येते तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्यमापन चांगल्या प्रकारे करता येते, त्यानंतर मात्र त्या व्यक्तीचे स्मरण कमी कमी केले जाते. अगदी थोडे अपवाद असे निघतात की, त्यांची सव्वाशेवी व दिडशेवी जयंती पूर्वीइतकीच किंवा अधिक मोठ्या प्रमाणात उत्साहाने व उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते. आधुनिक भारतात अशी स्वीकारार्हता महात्मा गांधी यांच्या वाट्याला आली, याचा अनुभव आपण गेल्या दोन वर्षात घेतला. आणि असाच किंबहुना अधिक उत्कटतेचा अनुभव 2041 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत येणार हे निश्चित!

गांधी 150 हे वर्ष एक-दिड वर्ष आधीच सुरू झाले आणि ते संपून सहा महिने झाले तरी, काही ना काही कार्यक्रम व उपक्रम देशभरात व जगातील अनेक देशांत चालू आहेत.

गांधीजींचे 150 वे जयंती वर्ष सुरू झाले त्यानंतर सातच महिन्यांनी, रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिन यांचे 150 वे जयंती वर्षही सुरू झाले, आणि 22 एप्रिल 2020 रोजी ते समाप्त होत आहे.  मात्र त्याची भारतात तरी कुठेही चर्चा झाल्याचे ठळकपणे दिसले नाही. हे खरे आहे की, तो रशियन होता, कम्युनिस्ट होता, हिंसक मार्ग अवलंबून क्रांती करणारा नेता होता, त्यामुळे भारतातील मोठ्या जनसमुहात त्याला विशेष स्थान नव्हते, असलेच तर ते नकारात्मक होते. शिवाय, गांधी व आंबेडकर यांनी मानवी जीवनाच्या अनेक अंगाना स्पर्श केलेला होता, तसे लेनिन यांच्याबाबत तितकेसे म्हणता येत नाही. त्यामुळे, लेनिन 150 मोठ्या प्रमाणात देशभर साजरी न होणे समजू शकते. पण आश्चर्य हे आहे की, या देशात मार्क्सवादी व साम्यवादी असणारे व त्याप्रमाणे कार्य करणारे अनेक लहान मोठे राजकीय पक्ष आहेत. त्या विचारांचा व कार्याचा वारसा सांगणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना आहेत. काही अभ्यासक संशोधक व त्यांचे गट (थिंक टँक) आहेत. त्यापैकी कोणीच कसे लेनिन 150 साजरी करण्यासाठी धडपडताना दिसले नाही? असाच प्रकार चार वर्षांपूर्वी कार्ल मार्क्स यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष आणि दोन वर्षांपूर्वी रशियन राज्यक्रांतीचे शताब्दी वर्ष आले आणि गेले तेव्हाही झाला होता. 

मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही टीका करण्यासाठी किंवा लेनिन कालबाह्य झाले हे सांगण्यासाठी तरी आताचे निमित्त का निवडले नाही? म्हणजे तीस वर्षांपूर्वीपर्यंत (लेनिन यांच्या मृत्यू नंतर 65 वर्षे पर्यंत) जगातील एका मोठ्या राजकीय प्रवाहाचा नायक असलेला हा नेता, आता कालबाह्य झालेला आहे हे सांगण्यासाठी तरी! किंवा आजच्या जगालाही आकर्षक वाटू शकेल व मार्गदर्शक ठरू शकेल असे लेनिन यांच्या विचार-कार्यात काहीही नाही, हे अधोरेखित करण्यासाठी तरी लेनिन 150 साजरी व्हायला हवी होती. असो.

आम्ही काही लेनिन यांच्या विचार-कार्याचे समर्थक, चाहते वा पुरस्कर्ते नाही. मात्र विसाव्या शतकातील जगात अत्यंत प्रभावी (कदाचित सर्वाधिक) ठरलेल्या विचारसरणीचा सर्वाधिक मोठा नेता, अशी लेनिन यांची ओळख आहे हे तर उघड आहे. मानवी जीवनाच्या कक्षा रुंदावण्याचे काम या विचारसरणीने  केले आहे, हेही कोणाला नाकारता येणारे नाही. आणि या विचारसरणीबाबत कमी अधिक तीव्र मतमतांतरे असतील तरी, त्यांचे असे योगदान जगभरातील मानवजातीला आहेच आहे! म्हणून असा विचार केला की,  150 निमित्ताने लेनिन यांचे व्यक्तिमत्त्व, विचार व कार्य या संदर्भात आपल्या वाचकांना वेगळे असे काय देता येईल? अर्थातच , लेनिन व त्यांचे कार्य यांच्या संदर्भात चिक्कार मजकूर पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. त्यांच्या बाजूचा व त्यांच्या विरोधातलाही! त्यामुळे त्यातलेच काही पुन्हा देण्यात अर्थ नाही. दुसरा भाग असा की, लेनिनचे समर्थक व विरोधक यांना लिहायला सांगून कितपत नवे हाती लागेल याची शंका आहे. त्यातूनच अशी कल्पना आली की, लेनिन यांनी स्वतःविषयी लिहिलेले किंवा त्यांच्याविषयी एखाद्या समकालीन मोठ्या लेखकाने लिहिलेले, पण मराठीत तरी फारसे पोहचलेले नाही असे काही लेखन अनुवाद करून देता येईल का? तसा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एक आश्चर्यकारक गोष्ट पुढे आली. ती अशी की, मॅक्झिम गॉर्की या जगविख्यात लेखकाने लेनिन यांच्यावर लिहिलेला एक दीर्घ लेख आहे. ‘लेनिनच्या सहवासातील दिवस’ हाच तो लेख.

लेनिनचा मृत्यू 1924 मध्ये झाला, त्यानंतर सहा वर्षांनी लिहिलेला हा लेख आहे. हा लेख त्यावेळी मूळ रशियनमध्ये लिहिला गेला, नंतर इंग्रजीत पुस्तिका रूपाने अनुवादित झाला. मात्र ही पुस्तिका आजही इंग्रजीतील कोणत्याही प्रकाशाकाकडे उपलब्ध आहे असे दिसत नाही. (इंटरनेटवरून घेतलेला सर्व ठिकाणांचा शोध ही आमची मर्यादा लक्षात घ्यावी.) मराठीत या पुस्तिकेचा अनुवाद पूर्वी कधी झाला होता का आणि तो कोणी प्रकाशित केला होता का, याचाही शोध घेतला. तिथेही कुठे आढळले नाही. अर्थातच, आमचा शोध कमी पडलेला असू शकतो. या संदर्भात अधिक तपशील कोणी पुरवले तर साधनाच्या पुढील अंकात तशी दुरुस्ती नोंदवू.

गॉर्कीच्या या छोट्या पुस्तिकेचा किंवा दीर्घ लेखाचा अनुवाद वाचताना काही मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे या लेखनात काळाचे सर्व संदर्भ नेमकेपणाने दिलेले नाहीत आणि हे लेखन अनेक तुकडे जुळवल्यासारखे आहे. दुसरे म्हणजे मूळ रशियनचे इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत असा हा अनुवाद असल्याने, व्यक्ती व स्थळांची नावे आणि क्वचित इतर काही शब्द यांचे उच्चार वेगळे असू शकतात. तिसरे म्हणजे एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या  शतकाचा पूर्वार्ध या काळातील रशिया व युरोप येथील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक स्थिती यांची किमान तोंडओळख नसेल, तर यातील बरेच वर्णन व भाष्य कळायला अडचण येऊ शकते. 

तरीही हा लेख एका बैठकीत वाचावा असा आहे. याचे एक कारण गॉर्की हा मुळात ललितलेखक असल्याने त्याची वर्णनात्मक शैली व निरीक्षणे आपल्यापुढे तो काळ व लेनिन यांची दृश्ये तुकड्या-तुकड्यांत पण प्रभाविपणे उभी करतात. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, गॉर्की हा केवळ  मोठा लेखक नव्हता, तर लेनिनचा काही प्रमाणात सहकारी होता. चळवळीत काम करणाराही होता. लेनिनला 54 वर्षांचे आयुष्य (1870 ते 1924) लाभले , तर गॉर्कीला 68 वर्षांचे आयुष्य (1868 ते 1936 ) लाभले. त्या दोघांची पाहिली भेट 1902 ला झाली आणि लेनिनच्या मृत्यूपर्यंत त्या भेटी अधूनमधून होत होत्या. म्हणजे त्यांना परस्परांचा सहवास लाभला तो वीस बावीस वर्षांचा. त्यांची पहिली भेट लंडन येथे झाली तेव्हा गॉर्की यांची ‘आई’ (नंतर जगप्रसिद्ध झालेली ) ही  कादंबरी प्रकाशित झालेली होती, आणि रशियातून हद्दपार केलेला क्रांतिकारक म्हणून लेनिन युरोपात वावरत होता.

लेनिनचा आयुष्यातील एकूण काळ कुठे, कसा व किती गेला यावर नजर टाकली तर लक्षात येते, वयाच्या पंचविशीपर्यंत ते रशियात होते, त्यानंतर सैबेरियात तीनेक वर्षांची हद्दपारी. त्यानंतर (मधला काही काळ रशियात येणे सोडले तर) 1917 ला रशियन राज्यक्रांती झाली, तोपर्यंत म्हणजे दीड दशक तरी ते युरोपातील ब्रिटन, जर्मनी, इटली इत्यादी देशात क्रांतीची पूर्वतयारी किंवा पक्षकार्य करीत होते. क्रांतीनंतर रशियाचा सर्वोच्च नेता व त्या सरकारचा प्रमुख म्हणून लेनिन आले ते वयाच्या केवळ 47 व्या वर्षी.. गॉर्की यांनीही लेखक व चळवळीचा क्रांतीचा समर्थक/सहानुभूतीदार म्हणून काम केले, पण त्यांच्याही आयुष्यातील बरीच वर्षे युरोपातील विविध देशांत गेली. क्रांतीच्या आधी व नंतरही...

लेनिन व  गॉर्की यांना परस्परांचे मोठेपण मान्य होते, पण ते  समविचारी नव्हते. दीर्घकाळ सहवासात राहूनही ते परस्परांचे मित्र झाले असे कितपत म्हणता येईल याची शंका आहे. त्यामुळे  गॉर्की यांच्या या लेखात बऱ्यापैकी तटस्थता आहे. भारावलेपणही आहेच आहे. यातून लेनिन अंतर्बाह्य कळण्यासाठी उपयोग होणार नाही, पण तसा तो कळला पाहिजे अशी इच्छा वाचकांच्या मनात निश्चित उत्पन्न होईल. आणि लेनिनचे जीवन व कार्य समजून घेण्यासाठी, नवे वाचकही उद्युक्त होतील यात शंका नाही. हा संपूर्ण लेख या अंकात प्रसिद्ध करण्याचा हाच खरा (व माफक) उद्देश आहे.

गॉर्की यांचा हा संपूर्ण लेख इतका मोठा (साधारणतः 15 हजार शब्द) आहे की, हा  घेतला तर साधनाचा एक नियमित अंक पूर्ण होईल हे स्पष्ट होते. मात्र हा लेख समजून घेण्यासाठी पूरक ठरेल असा एक लेख समाविष्ट करणे आवश्यक वाटत होते. तो लेख लिहिणारी व्यक्ती लेनिन, रशियन राज्यक्रांती, साम्यवाद यांचा अभ्यास असलेली, काळाच्या संदर्भात व  जागतिक परिप्रेक्षात पाहणारी आणि भारताच्या काल-आज-उद्या बद्दल निश्चित अशी भूमिका असणारी असावी अशी अपेक्षा होती. त्यासंदर्भात पटकन समोर आलेले नाव होते कुमार केतकर. त्यांनी लिहिलेला या अंकातील लेख त्या अपेक्षेला पूर्णतः उतरला आहे, एवढे सांगितले म्हणजे पुरे !

वस्तुतः  साधनाचा लेनिन 150 हा अंक फक्त या दोन लेखांचाच करायचा हे तीन महिन्यांपूर्वी ठरवले होते आणि त्याप्रमाणे आता होत आहे. मात्र या अंकाच्या प्रकाशनाचे निमित्त करून, तीन-चार वैचारिक प्रवाहांचे प्रतिनिधी आमंत्रित करून 22 एप्रिल रोजी एक परिसंवाद पुणे येथे आयोजित करायचा विचार, मागील महिन्यात आकार घेत होता. मात्र कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ती कल्पना बाजूला सारावी लागली. पण हरकत नाही. आणखी तीनच वर्षांनी लेनिन यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्यावेळी अधिक भरीव असे काही करता येईल. लुई फिशर यांनी लिहिलेले ‘लाईफ ऑफ लेनिन’ हे आठशे पानांचे इंग्रजी पुस्तक त्यावेळी साधना प्रकाशनाकडून मराठीत आणण्याची पूर्वतयारी आम्ही सुरू केली आहे.

Tags: लेनिन 150 संपादकीय कम्युनिस्ट रशिया लेनिन lenin communist rasia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके