आता आणीबाणीचे 40 वे स्मृतिवर्ष साजरे करीत असताना, केंद्रीय सत्तेवर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याने अनेकांच्या मनात शंका-..."> आता आणीबाणीचे 40 वे स्मृतिवर्ष सा...">
डिजिटल अर्काईव्ह (2012-2020)

आता आणीबाणीचे 40 वे स्मृतिवर्ष साजरे करीत असताना, केंद्रीय सत्तेवर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याने अनेकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी तर ‘आणीबाणी लागू होण्याचा धोका संपलेला नाही’ असे म्हटले आहे. आणि सर्वांच्या नजरेतून सुटलेली गोष्ट ही आहे की, 21 जूनला सोनिया गांधी एक आठवड्यासाठी परदेशी रवाना झाल्याची छोटी बातमी आली असून, राहुलही त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे, असे त्या बातमीत म्हटले आहे. याचा अर्थ, आणीबाणीचे 40 वे वर्ष देशभर साजरे केले जात असताना, काँग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतात जाणीवपूर्वक थांबणार नाहीत.

समकालीन भारतीय राजकारणाचे अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या मते, गेल्या 65 वर्षांत भारताची लोकशाही दोन वेळा रुळावरून घसरली. पहिल्यांदा आणीबाणी लागू झाली तेव्हा आणि नंतर बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा. म्हणजे काँग्रेस व भाजप या दोनही पक्षांनी देशाच्या लोकशाही-वाटचालीवर एकेक काळा डाग निर्माण केलेला आहे. दि. 25 जून, 1975 च्या मध्यरात्री भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली, त्या घटनेला आता बरोबर 40 वर्षे झाली आहेत. आणीबाणी 19 महिने टिकून राहिली आणि त्या काळात देशाचे संपूर्ण समाजजीवन ढवळून निघाले. भारताचे प्रजासत्ताक रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना ती आणीबाणी लागू झाल्याने, भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर काळाकुट्ट डाग पडला.

आता आणीबाणीचे 40 वे स्मृतिवर्ष साजरे करीत असताना, केंद्रीय सत्तेवर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याने अनेकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी तर ‘आणीबाणी लागू होण्याचा धोका संपलेला नाही’ असे म्हटले आहे. आणि सर्वांच्या नजरेतून सुटलेली गोष्ट ही आहे की, 21 जूनला सोनिया गांधी एक आठवड्यासाठी परदेशी रवाना झाल्याची छोटी बातमी आली असून, राहुलही त्यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे, असे त्या बातमीत म्हटले आहे. याचा अर्थ, आणीबाणीचे 40 वे वर्ष देशभर साजरे केले जात असताना, काँग्रेसचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतात जाणीवपूर्वक थांबणार नाहीत. हा अंक 23 जूनला छापायला जात असल्याने, काँग्रेसकडून आणीबाणीविषयी अधिकृतपणे काय प्रतिक्रिया येणार आहे, हे समजलेले नाही. पण आणीबाणीचे समर्थन काँग्रेसने जाहीरपणे करण्याचे सतत टाळले आहे. आणखी अडीच वर्षांनी म्हणजे 6 डिसेंबर, 2017 रोजी, अशीच अडचण भाजपची होणार आहे; कारण त्या वेळी बाबरी मशीद विध्वंसाचा रौप्यमहोत्सव साजरा होईल. (त्या घटनेच्या वेळी अडवाणींच्या रथाचे सारथ्य करणाऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी हे एक होते.) आणीबाणीच्या काळात व्यक्तीच्या व माध्यमांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. त्या वेळी साधना साप्ताहिकाची कामगिरी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात सर्वोत्तम राहिली आहे आणि साधनाचा सर्वाधिक झळाळता कालखंड आणीबाणी-पर्वातलाच आहे. त्यामुळे साहजिकच, साधनाचा एक संपूर्ण अंक आणीबाणीची आठवण जागवणारा काढणे आवश्यक वाटले. पण गेल्या 40 वर्षांत आणीबाणीविषयी सर्वत्र व साधनातही इतके काही लिहून आले आहे; बोलले गेले आहे की, नव्याने व नवीन असे काय व किती सांगणार? म्हणून या अंकात वैशिष्ट्यपूर्ण चारच लेख घेतले आहेत.

आणीबाणी लागू झाल्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगातून पंतप्रधान इंदिरा गांधींना जे पत्र लिहिले होते, त्याचा संपूर्ण अनुवाद त्या वेळीच साधनात प्रसिद्ध झाला होता; ते पत्र या अंकात पुनर्मुद्रित केले आहे. आणीबाणीचे समर्थन करणारांचे व जयप्रकाशांच्या संदर्भात आक्षेप घेणारांचे सर्व मुद्दे या पत्रात खोडून काढलेले आहेत. दुसरा पुनर्मुद्रित केलेला लेख आहे; साधनाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका राहिलेल्या सदानंद वर्दे यांचा. तो लेख साधनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखातून त्यांनी आणीबाणीच्या काळातील साधनाचे मूर्तिमंत रूप उभे केले आहे. आम्हाला खात्री आहे, हे दोन्ही लेख वाचताना बहुतांश वाचकांच्या अंगावर रोमांच येतील. इंदिरा गांधींचे माध्यम सल्लागार राहिलेले व अत्यंत आतल्या गोटातील समजले जाणारे एच.वाय.शारदाप्रसाद यांच्या ‘The Book I won’t Be Writing’ या पुस्तकातील दोन छोटे लेख, अनुवाद करून प्रसिद्ध करणे आवश्यक वाटले. कारण या लेखांमधून एक ‘इनसायडर’ माणूस, ‘आऊटसायडर’ झाल्यानंतर वीस-पंचवीस वर्षांनी (आयुष्याच्या अखेरीस) आणीबाणीकडे व जयप्रकाशांकडे कसे पाहतो, ते अतिशय नेमकेपणाने व मार्मिक पद्धतीने आले आहे. वैचारिक तटस्थपणाचे उत्तम नमुने म्हणून हे दोन लेख दाखवता येतील. (खरे तर ते संपूर्ण पुस्तक अशाच प्रकारच्या लेखांनी भरलेले आहे.) शेवटचा लेख प्रा.प्रतापसिंह साळुंके यांचा आहे आणि फारशा चर्चिल्या न जाणाऱ्या व सर्वसामान्यांपासून बऱ्याच अपरिचित असलेल्या न्यायव्यवस्थेकडे एक चिकित्सक दृष्टिक्षेप यात टाकलेला आहे.   मागील 40 वर्षांत, आणीबाणीचे समर्थक व विरोधक यांच्या भूमिका बदलल्यात, अशी उदाहरणे फार कमी आहेत. म्हणजे त्यावेळी ज्यांनी आणीबाणीच्या समर्थनाची भूमिका घेतली, त्यांनी नंतर ते समर्थन चूक होते असे म्हटल्याचे फारसे ऐकिवात नाही. आणि उलटही खरे आहे. त्यावेळी ज्यांनी आणीबाणीला विरोध केला, त्यापैकी क्वचितच काही लोकांनी नंतर आणीबाणी योग्य किंवा अपरिहार्य होती असे म्हटले आहे. या संदर्भात, साधनाच्या सर्व संपादकांना व धोरणात्मक निर्णय घेणारांना आणीबाणी ही एक ‘ब्लंडर मिस्टेक’ होती, असेच वाटत आले आहे. त्या कालखंडाचे व निर्माण झालेल्या परिस्थितीचे अनेक वेळा पुनरावलोकन केल्यानंतरही आमचे तेच मत कायम आहे. त्यामुळे पुन्हा तशी परिस्थिती आली तर साधनाची भूमिका काय राहील? अर्थातच, आपले अस्तित्व पणाला लावून साधना आणीबाणीविरोधात लढत राहील! त्यामुळे आता प्रश्न एवढाच उरतो की, त्यावेळी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय का झाला आणि त्याची जबाबदारी कोणकोणत्या घटकांकडे जाते. अर्थातच, इंदिरा गांधी व त्यांच्या सभोवतालचे कोंडाळे हे त्याबाबत सर्वाधिक दोषी आहे. नंतर जबाबदारी येते ती काँग्रेस पक्षाची, आणि त्यानंतर न्यायसंस्था व माध्यमे यांची. पण सारांश निघतोय तो एवढाच की, त्यावेळी देशातील घटनात्मक संरचनाच खूप कमजोर झालेली होती आणि सर्व प्रमुख संस्थांचा पाया खिळखिळा झालेला होता. त्याची पाळेमुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अडकलेली होती. म्हणजे 1971 चे बांगला देश युध्द, 1972 चा दुष्काळ आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये विशेषत: पाकिस्तान व बांगलादेश यांच्या सर्वोच्च नेत्यांना फाशी किंवा हत्याकांड, यामुळे भारतभरात अस्वस्थता होती. इंदिरा गांधींना असुरक्षित वाटण्यामागेही शेजारी देशांमधील परिस्थितीचा काहीअंशी वाटा होताच. अमेरिका व रशिया या दोन महासत्तांमधील सुप्त संघर्षाची किनारही त्या स्फोटक परिस्थितीला होतीच!

मागील चार-पाच वर्षांत, म्हणजे 2011 च्या अण्णा हजारेप्रणित दिल्लीतील जनलोकपाल आंदोलनापासून भारताची परिस्थिती अनेकांना आणीबाणीपूर्व कालखंडासारखी, म्हणजे सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धासारखीच वाटत आली आहे. 2009 मध्ये केंद्रात जे सत्तांतर झाले व त्यात काँग्रेसचा जो मानहानीकारक पराभव झाला, त्याचे काहीअंशी साम्य 1977 च्या निवडणुकीशी दाखवणारेही लोक आहेत. आणि इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात ‘एकाधिकारशाही’ प्रवृत्ती व अन्य काही गुण-अवगुण दाखवून तुलना करणारे अभ्यास-विश्लेषकही आहेत. त्यात आता अडवाणींच्या विधानामुळे ‘धोका संपलेला नाही’ हा इशारा पोहोचलेला आहे. या पार्श्वभूमीवर आणीबाणीचे स्मरण करताना, या देशातील संस्थात्मक व घटनात्मक संरचना याबाबत अधिक जागरूक व कृतिशील राहण्याची गरज आहे. आणीबाणीसारखे टोकाचे निर्णय घेतले जातात आणि संपूर्ण देशात राबवले जातात, तेव्हा ते सहजासहजी व अचानक घडून येत नाहीत हा संदेश सर्वत्र पोहोचविणे गरजेचे आहे. विशेषत: नव्या पिढीपर्यंत त्याची जाणीव-जागृती झाली पाहिजे. या देशातील 18 ते 35 या वयोगटातील लोकसंख्या अर्ध्या अब्जाहून अधिक आहे, हा मुद्दा लक्षात घेतला तर त्याची आवश्यकता नेमकेपणाने पटू शकेल. कारण ही सर्व तरुणाई आणीबाणीनंतर जन्माला आलेली आहे, बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचीही कल्पना या तरुणाईला नाही. स्वाभाविकच, काँग्रेस व भाजप या दोनही मोठ्या व प्रमुख पक्षांचा खरा परिचय या नव्या पिढीला नाही. त्यापेक्षाही खेदजनक हे आहे की, या तरुणाईसमोर तिसरा पर्याय (अरविंद केजरीवालचा अपवाद वगळता) नव्याने दिसलेला नाही. सारांश, आजच्या सर्व पुरोगामी व्यक्ती-संस्था-संघटना-पक्ष यांच्यापुढचे सर्वांत मोठे आव्हान या तरुणाईशी संवाद साधण्याचे आणि त्यांच्या ॲस्पिरेशन्स (आशा-अपेक्षा-आकांशा) समजून घेण्याचे आहे आणि दुसरे मोठे आव्हान आहे, अर्थकारण व आंतरराष्ट्रीय राजकारण याबाबत अधिक साक्षर होऊन- झालेल्या, होत असलेल्या व येऊ घातलेल्या बदलांचे आकलन करून घेण्याचे! ही दोन्ही आव्हाने परस्परपूरक आहेत, त्यामुळे त्या आव्हानांना एकाच वेळी भिडावे लागणार आहे. म्हणजे पुरोगामी शक्तींचे खरे यश त्यांना सत्ताधारी होता येते की नाही आणि राजकीय ताकद किती वाढते यात नसून, या देशाची लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी किती परिणामकारकपणे काम करता येते, यात दडलेले आहे. सफलता-विफलता याबाबतची जयप्रकाश नारायण यांची भूमिका आणि एच.वाय.शारदाप्रसाद यांनी यश-अपयशाची केलेली मांडणी समजून घेतली तरी, पुरोगामी शक्तींना ‘आपले यश’ नेमके कशात आहे, हे लक्षात येईल.

Tags: 40 वर्षांनी आणीबाणी पाहताना इंदिरा_गांधी भारतीय लोकशाही आणीबाणी साधना_संपादकीय Indira_Gandhi democracy Indian politics the_emergency Sadhana_editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात