डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बदलत्या संदर्भात महाराष्ट्र दिन व कामगार दिन

मे दिन म्हणजे आर्थिक समतेसाठी करावयाच्या संघर्षाचा दिन असे मर्यादित उद्दिष्ट आम्हाला मान्य नाही. आर्थिक आणि सामाजिक समता या भारताच्या आजच्या परिस्थितीत अविभाज्य आहेत. किंबहुना आजवर उपेक्षित राहिलेल्या सामाजिक समतेच्या चळवळीस मे दिनाच्या निमित्ताने अग्रस्थान द्यावयाचा निर्णय आर्थिक समतावाद्यांना घ्यावा लागेल.

1 मे हा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन. या दिवशी अनेक स्मृती जागृत होतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 105 हुतात्म्यांची आठवण होते आणि त्यानंतर मराठी जनतेने निर्धाराने दीर्घकाळ चालविलेला लढाही आठवतो. संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष करीत असताना हा लढा केंद्राच्या विरोधी आहे, गुजराती अगर कानडी जनतेच्या विरोधात नाही, ही जाणीव मराठी जनतेत सतत जागृत ठेवण्याचे कार्य एस. एम. जोशी आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अन्य नेत्यांनी केले. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंडित नेहरू आले असताना समितीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वाटेवर वाईपासून पसरणीच्या घाटापर्यंत झालेले प्रचंड निदर्शन आणि या निदर्शनांचा पं. नेहरूंच्या मनावर झालेला परिणाम, या स्मृतीही आज जागृत होतात. 

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाल्यामुळे त्रिभाषिक मुंबई राज्यात इंग्रजीला जे अवास्तव महत्त्व होते ते कमी झाले. विधिमंडळाचा सर्व कारभार आता मराठीतूनच चालतो आणि त्यामुळे ग्रामीण भागातून येणारे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतात. भाषावार राज्य पुनर्रचनेमुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत व लोकाभिमुख बनली आहे. असे असले तरी शिक्षणक्रमात मराठीचे स्थान लक्षणीय असावयास हवे आणि पदवी परीक्षेपर्यंत मराठी हेच शिक्षणाचे माध्यम असावे, हे समाजधुरीणांना मान्य असूनही प्रत्यक्षात तसे झालेले नाही. या अंकात 75 वर्षांपूर्वी एका ध्येयवादी अध्यापकाने मराठी माध्यमासाठी केलेल्या कार्याचा परिचय करून देणारा लेख आम्ही दिला आहे, तो याच उद्देशाने. एका वेळी महाराष्ट्र हा भारताचा खड्ग-हस्त आहे असे आपण म्हणत असू. परंतु आज सेनेतील अधिकाऱ्यांची आणि जवानांची संख्या पाहिल्यास हा दावा आपल्याला करता येणार नाही. 1965 व 1971 च्या युद्धात सेनेतील पंजाबी जवानांनीच मोठे बलिदान करून भारताचा खड्ग-हस्त पंजाब आहे हे दाखवून दिले. महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुण सेनादल, नौदल आणि वायुदलात गेले पाहिजेत, असे महाराष्ट्र दिनी तीव्रतेने वाटते.

महाराष्ट्र हा समाजवाद निर्माण करण्याच्या भारतातील प्रक्रियेस गती देईल, असे आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत म्हणत होतो. महाराष्ट्रातील ट्रेड युनियन्स संघटित आहेत, बलवान आहेत, याचे आम्हाला समाधान वाटते. पण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात आज समाजवादाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करणारी ट्रेड युनियन चळवळ आहे का? या संदर्भात ट्रेड युनियन चळवळीतील एक ज्येष्ठ नेते श्री. भाऊ फाटक यांचा या अंकातील लेख खासच उद्बोधक वाटेल. समाजवादाची घोषणा करताना असंघटित कामगार आणि शेतमजूर यांना अग्रस्थान दिले पाहिजे हा नानासाहेब गोरे यांनी आपल्या लेखात मांडलेला विचार आणि असंघटित कामगारांचा लढा नेटाने चालविणारे डॉ. बाबा आढाव यांचा लेख कामगार दिनाच्या निमित्ताने आम्ही वाचकांसमोर ठेवीत आहोत.

जनतेच्या विचारांना आणि प्रयत्नांना त्यामुळे दिशा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. या उद्देशानेच 'संयुक्त महाराष्ट्र: स्वप्न आणि वास्तव’ या एस. एम. जोशीच्या ‘संयुक्त महाराष्ट्र: काल आणि आज’ या पुस्तकात 1988 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचे या अंकात आम्ही पुनर्मुद्रण केले आहे. आजवर आर्थिक समतेसाठी लढा झाला. आता त्याला सामाजिक समतेच्या लढ्याची जोड मिळत आहे. या लढ्यात स्त्रियांना न्याय्य हक्क मिळण्यासाठी चाललेल्या संघर्षास अग्रस्थान असले पाहिजे. अशा चळवळीतील एक कार्यकर्त्या निशा शिवुरकर यांचा परित्यक्त स्त्रियांसंबंधीचा लेख म्हणूनच आम्ही या अंकात दिला आहे.

मे दिन म्हणजे आर्थिक समतेसाठी करावयाच्या संघर्षाचा दिन असे मर्यादित उद्दिष्ट आम्हाला मान्य नाही. आर्थिक आणि सामाजिक समता या भारताच्या आजच्या परिस्थितीत अविभाज्य आहेत. किंबहुना आजवर उपेक्षित राहिलेल्या सामाजिक समतेच्या चळवळीस मे दिनाच्या निमित्ताने अग्रस्थान द्यावयाचा निर्णय आर्थिक समतावाद्यांना घ्यावा लागेल. आपल्या समाजातील दलितांचा आणि भटक्या विमुक्तांचा लढा याकडे मे दिनाच्या निमित्ताने लक्ष वेधले गेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष आणि म. फुले यांचे निर्वाण शताब्दी वर्ष या निमित्ताने या प्रश्नाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. या अंकात या विषयावरील लेख वेळेवर मिळू न शकल्यामुळे छापणे शक्य झाले नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

महाराष्ट्र-दिन आणि मे दिन साजरा करीत असताना देशापुढील महत्त्वाच्या समस्येचे भान असलेच पाहिजे. काश्मीर समस्येने आज उग्र रूप धारण केले आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तेथे देशविघातक कृत्ये करणाऱ्यांचा बीमोड झाला पाहिजे असेच सर्व भारतीयांना वाटते. देशाचे तुकडे होणे आणि एखादा भाग देशापासून फुटून निघणे ही कल्पनाही कोणी सहन करणार नाही, अशी देशभक्तीची भावना प्रकट झाली पाहिजे. त्याचबरोबर हा प्रश्न का व कसा निर्माण झाला हेही समजून घेतले पाहिजे. यासाठीच या प्रश्नाची ऐतिहासिक माहिती देणारा कुमुद करकरे यांचा लेख आणि राष्ट्र सेवादलातर्फे नुकतेच काश्मीरला जाऊन आलेले श्री. भाई वैद्य यांचा लेख, हे आम्ही दिलेले आहेत.

राष्ट्राच्या जीवनात ध्येयांच्या कक्षा सतत विशाल होत असतात. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. कामगार चळवळीने काही न्याय्य हक्क प्रस्थापित केले. आता समताधिष्ठित, एकात्म भारत निर्माण करण्याच्या ध्येयासाठी नवे संघर्ष दीर्घ काल करावे लागणार आहेत. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा आजचा महाराष्ट्र दिन आणि मे दिन साजरा करताना, आपल्या सर्वांच्या मनात प्रबल झाली पाहिजे.

Tags: असंघटित कामगार समाजवाद कामगार दिन महाराष्ट्र दिन unorganized labour socialism labour day Maharashtra day weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके