डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सत्तेशिवाय जनतेत घुसून काम करण्याची सवय सुटून बराच काळ लोटला आहे. या सर्वांबरोबरच सद्यपरिस्थितीतील एक निर्णायक महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीचे राजकारण करत असताना जी उदार मानसिकता दाखवावी लागते त्याचा काँग्रेस पक्ष संस्कृतीत अभाव आहे. पश्चिम बंगालमध्ये गेली वीस वर्षे कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) स्वबळावर सरकार बनवू शकते. तरीही ते नेहमी आवर्जून अन्य डाव्या पक्षांना सत्तेत सोबत घेतात.

महाराष्ट्रदेशी सध्या दोन चर्चा जोरात आहेत. वरुणराजा कोणत्या विभागात, कोणाच्या शेतात बरसणार ही एक आणि मतदारराजा प्रसन्न अंतःकरणाने कोणाचे मळे फुलविणार ही दुसरी. पावसाचे मॉडेल काही प्रमाणात विकसित झालेले आहे. अलीकडे-पलीकडे पण यावर्षी एकूण सरासरी एवढा पाऊस नक्की होईल असा दिलासा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ देत आहेत. मतदारराजाच्या कृपादृष्टीबद्दल मात्र आशाळभूतपणे राजकीय मंडळी बोलत असली तर त्यात आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. लोकसभेच्या तडाख्यातून ती अजून पुरती सावरलेली नाहीत.

निवडणूक यशाबाबतच्या संभाव्य शक्यतेत महाराष्ट्रात सर्वांत आघाडीवर शिवसेना आहे. तरुणांची फळी, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आणि स्वतः सत्तेपासून दूर राहण्याच्या वृत्तीचा करिष्मा, जात-पात न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याची धमक या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. युतीत असलेल्या भाजपचेही अनेक ठिकाणी मजबूत संघटनात्मक जाळे आहे. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या मर्यादित प्रभावाचा उपयोगही त्यांना मराठवाडा विदर्भातील काही मतदारसंघांत होईल.

याचा अर्थ सर्वकाही आलबेल आहे असे नाही. नेतृत्वाची सुप्त तीव्र स्पर्धा तर शिवसेनेत आहेच; परंतु खरी अडचण आहे ती सामान्य शिवसैनिक आणि पक्षाचे पहिल्या फळीचे नेतृत्व यामध्ये पडलेल्या अंतराची. बाहेर येत नसले तरी शिवसेनेत गटबाजी आहे. नेत्यांचे स्वतःचे हितसंबंध तयार झाले आहेत. बघता बघता चाळीस वर्षांच्या झालेल्या शिवसेनेला वयापरत्वे थोडे शैथिल्यही आहे. मनोहर जोशींचा पराभव केला याबद्दल निवडून आलेले उमेदवार श्री. एकनाथ खडसे यांनी शिवसैनिकांचे खास आभार मानले ते वास्तवदर्शी आहे. मुंबईतला मराठी माणूस, महाराष्ट्रातला श्रमजिवी याला शिवसेनेने अडचणीत साथ दिली नाही अशी भावना वाढती आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गिरणगावातून मराठी माणूस हळूहळू पण पद्धतशीरपणे परागंदा झाला, त्याबद्दल शिवसेनेने ना काही केले, ना महाराष्ट्रातील दुष्काळाच्या खाईत तडफडणाऱ्या ग्रामीण बांधवांना काही दिलासा दिला. बाळासाहेब ठाकरे ही चूक आता 'जय जवान', 'जय किसान' याबरोबर 'जय कामगार' ही घोषणा देऊन आणि सत्तेवर येताच शेतकऱ्यांना वीज बिल आणि कर्ज माफी देण्याची घोषणा करून सुधारण्याची धडपड करीत आहेत. भाजपला तर लोकसभा निवडणुकीत बसलेल्या दणक्यानंतर अजून सूरच सापडलेला नाही. शरद जोशींचा प्रभाव अजूनही निवडणूक रिंगणात कधी सिद्ध झालेला नाही.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढवण्याची भाषा करत आहे. दिल्लीतील पक्षांचेच सरकार महाराष्ट्रात आले तर राज्यातील जनतेला फायद्याचे ठरेल हा मुद्दा ते प्रचाराचा करतील. त्यासोबत सोनिया गांधींच्या नैतिक असणाऱ्या (वा निदान दिसणाऱ्या) निर्णयाचा लोकांवर पडलेला काही प्रभाव, महिला मतदार सोनिया गांधींच्याकडे पाहून त्या पक्षाला मते देण्याची शक्यता, मुस्लिम मतदारांचे पाठबळ, पक्षाची पारंपरिक मते यांमुळे काँग्रेस पक्षात आत्मसंतुष्टता जाणवते.

आमच्या मते काँग्रेस पक्ष भ्रमात वावरत आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लोक अजिबात समाधानी नाहीत. अंतर्गत गटबाजी ही पक्षाची खासियत जिल्हाजिल्ह्यांत आजही कायम आहे. सत्तेशिवाय जनतेत घुसून काम करण्याची सवय सुटून बराच काळ लोटला आहे. या सर्वांबरोबरच सद्यपरिस्थितीतील एक निर्णायक महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीचे राजकारण करत असताना जी उदार मानसिकता दाखवावी लागते त्याचा काँग्रेस पक्ष संस्कृतीत अभाव आहे. पश्चिम बंगालमध्ये गेली वीस वर्षे कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) स्वबळावर सरकार बनवू शकते. तरीही ते नेहमी आवर्जून अन्य डाव्या पक्षांना सत्तेत सोबत घेतात. रालोआने केन्द्र सरकार चालविताना घटक पक्षांना महत्त्वाची खाती देण्याबद्दल जेवढी समज दाखवली ती देखील जवळपास सर्व महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणाऱ्या केन्द्रातील सत्तारूढ काँग्रेस पक्षाने दाखवली नाही. राज्यातील काँग्रेस पक्ष याच मानसिकतेची री ओढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यानंतर लोकसभेच्या 30 ते 35 जागा मिळण्याची वल्गना केली गेली. त्याचे काय झाले? तसे का झाले? ते टाळावयास काय करावयास हवे? याचे भान काँग्रेस पक्षाकडे दिसत नाही.

महाराष्ट्रात आजही सर्वदूर प्रभाव असलेला काँग्रेसचा नेता शरद पवार हेच आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण पक्षाची त्यांना प्रगल्भ जाण आहे. 'शेती खाते घेऊन ग्रामीण भागाला न्याय देण्याच्या शक्यतेत मी आहे', हा संदेश ते आणि त्यांचा पक्ष लोकांना पोचविण्याचा प्रयत्न करतील. आपापले बालेकिल्ले समर्थ सांभाळत हुकमीपणे निवडून येणारे शिलेदार त्यांच्याकडे आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसलाही अडथळ्यांची बरीच शर्यत पार करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर मोहरे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात आहेत असा लोकांना संशय आहे. सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा सोडल्यानंतर वेगळा पक्ष कशासाठी याचे तर्कसंगत उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. मातब्बर मानल्या जाणाऱ्या सत्तेत पदे भूषविणाऱ्या अनेक मोहऱ्यांना लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या आमदारकीच्या मतदारसंघांत मतांची बरीच पिछाडी पचवावी लागली आहे, हे लक्षण ठीक नाही. शरद पवारांच्या तब्येतीबाबतचे प्रश्नचिन्ह ही अडचण व प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची युती झाल्यास बंडखोरी रोखणे अवघड नव्हे अशक्य होईल हा धोकाही आहेच.

यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इतके पक्ष आहेत की अशी गोंधळाची परिस्थिती यापूर्वी कधीही झालेली नव्हती. बहुजन समाजपार्टी सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे. मराठा सेवा संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा असलेली शिवराज्य पार्टी ही सर्व ठिकाणी मैदानात येणार आहे.

राष्ट्रीय समाज पार्टी किमान दोनशे जागा लढविणार आहे. समाजवादी पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे विविध गट अशाच पावित्र्यात आहेत. प्रथम पडण्यासाठी, मग पाडण्यासाठी व .नंतर निवडून येण्यासाठी या क्रमाचे भान ठेवून पण निवडणुकीत उतरत रहावे ही नवी रणनीती बनली आहे. बऱ्याचदा यासाठी संबंधितांना पुरवठा होणारा पैसा हा अचंबित करणारा वाटतो.

तत्त्वसैद्धांतिक व संघटनात्मक आकार असलेली डावी आघाडी 80 जागा लढवेल आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) स्वतंत्रपणे 100 जागा लढवेल असे त्यांनी जाहीर केले आहे. 
सत्ताकेंद्रांचे आकर्षण इतक्या प्रमाणात व इतक्या प्रभावीपणे वाढले आहे की कोणाची सत्ता व कशासाठी सत्ता हे प्रश्न बाजूलाच पडले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला सत्तेवर येण्यापासून रोखावे असे आमचे मत आहे. काँग्रेसवाल्यांनी पाच वर्षांत काय दिवे लावले आहेत? हा प्रश्न खराच आहे. काँग्रेस पक्षांनी भाजप या शिवसेने बरोबर आपापल्या सोयीनुसार अनेक जिल्हा परिषदेत सत्तेची शय्यासोबत निलाजरणेपणे केली आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतरही ती चालू आहे. तरीही काँग्रेस व डावे यांनी शहाणपण दाखवावे आणि केंद्रासारखीच परिस्थिती राज्यात निर्माण करावी असे आमचे आवाहन आहे. जनता दल, शेकाप, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांनी गंभीरपणे विचार केला तर त्यांच्या निवडून येणाऱ्या एकूण जागा वीसच्या पुढे जात नाहीत. त्याच्या दुप्पट म्हणजे चाळीस जांगा त्यांना सोडण्याचा शहाणपणा काँग्रेसने दाखवावा, अन्य पक्षांशीही बोलावे. उरलेल्या जवळपास 220 जागांवर राजकीय पक्कतेने जागा वाटप करावे, एकत्रित प्रचार करावा, बंडखोरी कठोरपणे रोखावी. गेली वीस वर्षे युतीतील पक्ष महाराष्ट्रात जे करत आहेत ते यांना का जमू नये?

मात्र ते जमले नाही तर मग मतदारराजाने पाठवलेला पाऊस आपल्या मतपेटीत आलाच नाही म्हणून त्याला दोष न देता स्वतःच्या कपाळकरंटेपणाला बोल लावावा.
 

Tags: जनसमुदाय कोणाला मत देणार हे अनिश्चित अन्य दल राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस शिव-सेना भा. ज. प. युती # महाराष्ट्रातील राज्यातील चुनाव आणि विभिन्न राजनीतिक दलांची अनिश्चित स्थिती not known Public support – Whom Other parties NCP Congress BJP-Shiv Sena combined # Maharashtr’s Assembly election and the complicated status of different parties weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके