Diwali_4 महायज्ञ आणि शपथग्रहण
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आपण महिलांच्या प्रश्नांकडे किती ढोबळपणे आणि बालिशपणे पाहतो, हे या शपथ प्रकरणानं समोर आणलं आहे. शपथ देणारे हे महाविद्यालयातील एक पुरुष प्राध्यापक आहेत. हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच होता की प्राचार्य-प्राध्यापकांनी मिळून घेतला होता, हे कळावयास मार्ग नाही. पण ज्या कोणा प्राध्यापकानं शपथ दिली, त्यालाच या प्रश्नाला सामोरं जाण्याची वेळ आली. खरं तर ही जबाबदारी प्राचार्यांसह सगळ्यांचीच आहे. यासदंर्भात महाविद्यालयाला प्रखर टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे प्राचार्यांनी माफी मागितली, असे नंतरच्या बातमीवरून दिसते. पण झाले ते बरे झाले नाही, हास्यास्पद झाले सगळे. हा मजकूर लिहीत असताना बातमी आली की, या प्रकरणासंदर्भात प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना संस्थेने निलंबित केले आहे. म्हणजे चर्चा करूनच संबंधितांनी निर्णय घेतलेला असावा, असा तर्क करायला जागा आहे.

दि. 14 आणि 15 फेब्रुवारी 2020 रोजीच्या वर्तमानपत्रातील दोन बातम्या लक्षवेधी  होत्या, विचाराला प्रवृत्त करणाऱ्या होत्या. बातम्या शिक्षणक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे दुर्लक्षित करण्यासारख्या नव्हत्या. नोंद घ्यायला हवी, असेच या बातम्यांचे स्वरूप होते.

दि. 14 फेब्रुवारीची बातमी पुण्यातील एका खासगी  विद्यापीठाच्या संदर्भात होती. विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार करण्याच्या आणि आताच्या वातावरणात या संस्काराचा अनुकूल परिणाम होण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यापीठातील धुरिणांनी महायज्ञ आयोजित केला होता. गेल्या तीन वर्षांपासून या महायज्ञाचे आयोजन केले जाते. या वर्षी साधारणतः आठ दिवस हा सोहळा चालणार होता. त्यासाठी मागील आणि विद्यमान सरकारमधील नेते, मंत्री यांना पाचारण करण्यात आले होते. काही महायज्ञाच्या प्रारंभी आले होते, उर्वरित नंतर येणार होते. एकूण, हे सगळे आपल्या राजकीय संस्कृतीला साजेसेच होते. यापैकी कोणीही महायज्ञाचे आयोजन अप्रस्तुत आहे, असे म्हटल्याचे ऐकिवात नाही. यातही नवल वाटावे असे काही नाही; उलट एखाद्याने असा प्रश्न उपस्थित केला असता, तर आश्चर्य वाटले असते. म्हणजे राजकीय नेते किती लोकानुनय करतात, हेही नेहमीप्रमाणेच निदर्शनास आले. बोलावणारे आणि येणारे सारखेच. एकाच बौद्धिक पातळीवरचे.

दि.15 फेब्रुवारीची बातमी अमरावतीच्या वार्ताहराने दिलेली आहे. चांदूरबाजार येथील एका महिला महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवायोजनेचे एक शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात राज्यशास्त्राच्या एका प्राध्यापक महोदयाने विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. नंतर सगळ्या विद्यार्थिनींना रांगेत उभे करून या प्राध्यापकाने ‘आम्ही प्रेमविवाह करणार नाही अशी’, शपथ दिली. या सगळ्या घटनेला हिंगणघाट येथील महिला प्राध्यापकावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या घटनेची पार्श्वभूमी होती. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला. संवेदनशील नागरिक बधिर झाले. यापुढे असे काही होऊ नये- किमान आपल्या विद्यार्थिनींबाबत तरी होऊ नये, अशी भावना या शपथग्रहण समारंभाप्रसंगी आयोजकांनी गृहीत धरली होती.

मुळात हिंगणघाटची बातमी नीट वाचली तर असे लक्षात येते की, पीडित प्राध्यापक महिला ही एकतर्फी प्रेमाची बळी ठरली आहे. प्रेमाला तिची संमती नव्हती. पण आरोपीचा आग्रह होता आणि पीडितेचा नकार होता. नकार पचवता न आल्यामुळे आरोपीने विकृत द्वेषमूलतेने तिला पेट्रोल टाकून पेटविले. त्यामुळे ‘मी प्रेमविवाह करणार नाही’, ही शपथ मुलींना देण्यामागे जे गृहीतक होते, तेच मुळात चुकीचे होते. मुळात शपथ देणं किंवा घेणं याला कर्मकांडाचे रूप आले आहे. आपले राज्यकर्ते सत्तास्थापनेवेळी शपथ घेतात आणि त्यांच्या वर्तन-व्यवहारावरून त्या शपथेचं पुढं काय होतं, हे आपण पाहत आलो आहे. अशी उदाहरणे अनेक सांगता येतील.

फक्त मुलींनाच अशी शपथ का दिली, मुलांनाही द्यायला हवी होती, असा एक युक्तिवाद समोर येतो. त्याचं उत्तर संबंधित कॉलेजकडून देण्यात येऊ शकतं की, ‘महिला महाविद्यालय असल्यामुळं मुलींना शपथ दिली, मुलांना देणं शक्य नव्हतं.’

आपण महिलांच्या प्रश्नांकडे किती ढोबळपणे आणि बालिशपणे पाहतो, हे या शपथ प्रकरणानं समोर आणलं आहे. शपथ देणारे हे महाविद्यालयातील एक पुरुष प्राध्यापक आहेत. हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच होता की प्राचार्य-प्राध्यापकांनी मिळून घेतला होता, हे कळावयास मार्ग नाही. पण ज्या कोणा प्राध्यापकानं शपथ दिली, त्यालाच या प्रश्नाला सामोरं जाण्याची वेळ आली. खरं तर ही जबाबदारी प्राचार्यांसह सगळ्यांचीच आहे. यासदंर्भात महाविद्यालयाला प्रखर टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे प्राचार्यांनी माफी मागितली, असे नंतरच्या बातमीवरून दिसते. पण झाले ते बरे झाले नाही, हास्यास्पद झाले सगळे. हा मजकूर लिहीत असताना बातमी आली की, या प्रकरणासंदर्भात प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना संस्थेने निलंबित केले आहे. म्हणजे चर्चा करूनच संबंधितांनी निर्णय घेतलेला असावा, असा तर्क करायला जागा आहे.

अतिउत्साहातच आणि सारासार विचार न करता हा निर्णय घेतला गेला. मुलींना गृहीत धरणे, त्यांच्या भल्याचाच विचार आपण करीत आहोत, असा देखावा यात दिसतो. पण हा देखावा आहे. असे कळत-नकळतही त्यांना वाटत नाही. यातून दिसतो तो फाजील विश्वास. यावरून शिक्षणक्षेत्रातील एकूणच वैचारिक पातळी कशा रीतीने घसरली आहे, त्याचे प्रातिनिधिक उदाहरण समोर आले. शिक्षक- मग ते माध्यमिक अथवा महाविद्यालयीन स्तरावरील असोत- त्यांनी केवळ आपल्या विषयात गती मिळवणे अभिप्रेत नाही. ते तर असावेच, पण त्यासोबतच त्यांच्याजवळ एक व्यापक सामाजिक भान असणे गरजेचे आहे. हे भान अचानक किंवा तत्काळ येत नाही; त्यासाठी समाजातील विविध स्तरांतील, वेगवेगळ्या समूहांच्या संदर्भात आस्था असावी लागते. त्यासाठी, वाचन, निरीक्षण, चिंतन, व्यासंग याची जोड देऊन सामाजिक प्रश्नांची गुंतागुंत समजून घ्यायची तयारी असावी लागते.

केवळ आपला प्रदेश वा जिल्हा किंवा आपली जात आणि त्याभोवतीचा समाज एवढ्यातच गुंग राहून चालत नाही. स्वतःला मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या या सामाजिक प्रश्नांसोबत जोडून घ्यावे लागते. समाजातील अनेक घटक आज शिक्षकांवर- विशेषतः महाविद्यालयीन शिक्षकांवर- रोष व्यक्त करताना दिसतात, याची अनेक कारणे असली तरी, हा घटक केवळ आत्ममग्नतेकडे झुकलेला आहे, हेही एक कारण त्यामागे असू शकते.

शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मभान प्राप्त होते, त्याला प्रश्न पडतात; किंबहुना, पडायला हवेत. शिक्षणामुळेच व्यक्तीची व्यक्तिमत्त्व म्हणून जडण-घडण होते. शिक्षणाचा हेतूच तो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील आणि अनेकांनी त्याचसाठी शिक्षणसंस्था स्थापन केल्या. पूर्वसुरी असलेले म.जोतीराव फुले आणि राजर्षी शाहूमहाराजांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. पण आज-काल शिक्षणक्षेत्रात जे काही चालले आहे, ते बरे नाही. आजच्या शिक्षणसंस्था भरकटल्या आहेत. हे भरकटणे काहींच्या बाबतीत जाणीवपूर्वक आहे, तर काहींच्या नकळत. महायज्ञ करणाऱ्या विद्यापीठाची कृतीही जाणीवपूर्वक (काहींना मान्य नसेल तरीही) आहे. चांदूररेल्वे येथील महाविद्यालयाची कृती ही भावनेच्या भरात झालेली दिसते. या दोन्ही घटनांचा अन्वयार्थ लावणे गरजेचे आहे.

क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेवेळी भारतीय संघ जिंकावा म्हणून भारतात ठिकठिकाणी लोकांनी यज्ञ केले होते. त्याचा काय परिणाम झाला, हे आपण जाणतोच. साधा प्रश्न असा पडतो की, आजच्या बदलत्या काळात खरोखरच महाविद्यालय अथवा विद्यापीठांना महायज्ञ करायची गरज आहे? त्यामागील हेतू खरोखर सफल होतो? होत असेल तर त्याचे दृश्य परिणाम काय? ते कसे आणि किती उपयुक्त आहेत? त्याबद्दल ही मंडळी वस्तुनिष्ठपणे का बोलत नाहीत? की, कोणा तरी बाबा-महाराजांच्या नादी लागून ही थेरं त्यांनी सुरू केली आहेत? शिक्षणसंस्थाचालक किंवा तत्सम उद्योग असणाऱ्यांनी खोऱ्यानं पैसा जमा केला आहे. किंबहुना, याच हेतूमुळे या संस्थांचं त्यांनी व्यापारीकरण सुरू केलं आहे.

व्यापारीकरणात नफेखोरीला प्राधान्य असतं. ते अधिकाधिक कसं वाढेल, इकडे त्यांचं लक्ष असतं. या प्रक्रियेत आपलं बाजारमूल्य कसं वाढेल, इकडे त्यांचा कल असतो. त्यातून नफेखोरी वाढत जाते आणि विवेकाला मूठमाती दिली जाते. या नफेखोरीतून असुरक्षितता वाढत जाते आणि त्यातून ही कर्मकांडं उभी राहतात. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थाचालक तर आपल्या वाढदिवशी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध करतात. सरकार कोणत्याही पक्षाचे असो- हे लांगूलचालन करायला कमरेत वाकून उभे. शिक्षणाच्या नावाखाली धंदा. कितीही लवचिक होण्याची त्यांची तयारी. हे पाहून शिसारी येते.

1993 या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी महाराष्ट्रातील राज्यपाल महोदयांनी सर्व विद्यापीठांना एक आवाहन केलं होतं. त्याच्या आधारे महाराष्ट्रातील कॉलेजात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह वरुणराजाची प्रार्थना कॉलेजच्या आवारात रांगेत उभे राहून केली होती. त्या वेळी प्रस्तुत लेखक ज्या कॉलेजात नोकरी करीत होता, तेथील प्राचार्यांनी याबाबत मत विचारले होते. तेव्हा काही क्षणात या प्रार्थनेचं आवाहन धुडकावून लावलं. परिणामी, आमच्या कॉलेजात ही प्रार्थना झाली नाही. जिल्हाभरातील कॉलेजांत ती झाली आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. याबाबत डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यपाल कार्यालयाला त्यावेळी धारेवर धरले होते. त्यांच्या ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या पुस्तकात यासंबंधीचा तो लेख प्रसिद्ध झालेला आहे.

शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी काळाच्या पुढे पाहायचे असते, की प्रतिगामी परंपरांच्या स्मृती जागवायच्या असतात? काळाची उलटी चक्रे जर शिक्षणक्षेत्रात कोणी फिरवत असेल तर त्यांना तत्कालिक समाधान मिळेल, पण काळ माफ करणार नाही. काळ इतका निष्ठुर असतो की, तो परंपरेचे गोडवे गात नाही, तर येणाऱ्या युगाचे गीत गात असतो. ही गीतं ऐकण्याची तयारी ठेवणं, हे शिक्षणक्षेत्रांचं काम असतं.

डॉ. मनोहर जाधव

Tags: शपथ महायज्ञ मनोहर जाधव संपादकीय manohar jadhav editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात