डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

लॉकडाऊन करावे लागण्याचा खरा अर्थ

आणि अशा या टप्प्यावर जीवनव्यवहार पुन्हा सुरळीत करायला हळूहळू सुरुवात आणि त्याच वेळी चौथा लॉकडाऊन, अशी अपरिहार्यता वाट्याला आली आहे. परस्परपूरकही आणि परस्परविरोधीही वाटावी अशी विचित्र परिस्थिती. आता कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू या आकड्यांचे कोणालाही फार काही वाटेनासे झाले आहे. त्यासंदर्भातील बातम्या व भाकिते यांच्याकडे लक्ष जाईनासे झाले आहे. प्रसारमाध्यमे फार आश्वस्त करू शकत नाहीत हे स्पष्ट झाले. परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारे कितपत सक्षम ठरतील, याबाबत खात्री वाटेनाशी झाली आहे. जागतिक स्तरावरही आश्वस्त व्हावे असे घडताना दिसत नाही. उलट किंचित भीती ही आहे की, अमेरिका व चीन यांच्यातील कुरबूर टोकाला जाऊन काही अघटित तर घडणार नाही ना? काही देशांनी थोडी वेगळी रणनीती अवलंबल्यामुळे ते बऱ्या स्थितीत आहेत असे चित्र पुढे येत आहे, पण त्यामुळे आनंदित व्हावे इतका विश्वास निर्माण होत नाहीये. एकंदरीत काय तर, कोरोनासह जीवनव्यवहार सुरू करायची तयारी सुरू झाली आहे, प्रजेची आणि राज्यकर्त्यांचीही!

ऑक्सफर्ड, केंब्रिज व तत्सम प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दकोषांच्या दरवर्षी नव्या आवृत्त्या येतात. त्यात, काही नवे शब्द समाविष्ट केले जातात, म्हणजे काय तर अन्य काही भाषांमधील ज्या शब्दांचा वापर त्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाला असेल ते शब्द सामावून घेतले जातात. शिवाय, त्या वर्षी जगभरात सर्वाधिक वापरला गेलेला इंग्रजी शब्द कोणता, हेही जाहीर केले जाते. तर, आणखी सात महिन्यांनी त्या शब्दकोषांच्या नव्या आवृत्त्या येतील, तेव्हा ‘टाळेबंदी’ हा शब्द कदाचित त्यांनी समाविष्ट करून घेतलेला असेल आणि ‘लॉकडाऊन’ हा या वर्षी सर्वाधिक वापरला गेलेला इंग्रजी शब्द म्हणून घोषित झालेला असेल.

कोरोना संकटामुळे संपूर्ण भारत देशाने लॉकडाऊनचा अनुभव सलग 50 दिवस घेतला. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी विशिष्ट वेळेपुरते किंचित शिथिलीकरण सोडले, तर संपूर्ण देशातील व्यवहार व आदान-प्रदान बंद ठेवण्याची ज्ञात इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. पाश्चिमात्त्य जगातील अनेक प्रगत देश हैराण झालेले असताना आणि हे संकट गुणाकाराच्या वेगाने घोंगावत आहे असे दिसत असताना, भारताने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय 24 मार्च रोजी जाहीर केला. (तेव्हा भारतात कोरोनाने नुकताच प्रवेश केला होता.) त्याकडे कोरोना रोखण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाहिले जाणे साहजिक होते. त्यानंतर पुढील 21 दिवस, कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू याबाबत भारताचे आकडे अन्य देशांच्या तुलनेत नगण्य म्हणावेत असेच होते. त्या वेळी असेही सांगितले जात होते की, तपासण्या व चाचण्या कमी झालेल्या आहेत म्हणून हे आकडे कमी आहेत. पण ते मान्य करूनही एकूण जनमत असेच होते की, लॉकडाऊनचा निर्णय योग्य आहे. जगभरातील तज्ज्ञांकडूनही तशीच पावती मिळत होती. परिणामी, आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे कौतुक होत होते. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक होत होते. आपले राज्यकर्ते कसोटीच्या प्रसंगी धोरणी पद्धतीने वागतात, असा सर्वसाधारण सूर होता आणि जनमानसात चिंतेचे वातावरण असले तरी असमाधानाचे चित्र नव्हते.

लॉकडाऊनचा दुसरा कालावधी 19 दिवसांसाठी जाहीर झाल्यावर मात्र अस्वस्थता आकार घेऊ लागली. मजूर व कामगार यांचे आधीच्या लॉकडाऊनमध्ये जे काही हाल झाले त्याची तीव्रता अधिक प्रमाणात अधोरेखित होऊ लागली. त्याचे बरेच विदारक चित्र क्रमाक्रमाने पुढे येऊ लागले. आणि मग केंद्र व राज्य सरकारे यांच्याबाबत नाराजीचे सूर उमटू लागले. कोंडून घेण्यासाठी घर आणि उपजीविकेसाठी आवश्यक शिल्लक आहे, अशा लोकांसाठी दुसरा कालावधीही सुसह्य राहिला. पण ज्यांच्याकडे त्या दोन्ही सुविधा नाहीत त्यांचे हाल मात्र उग्र रूप धारण करू लागले. आणि तशात लॉकडाऊनचा तिसरा कालावधी (14 दिवस) सुरू झाला. या काळात मात्र सर्व स्तरांवरील खदखद बाहेर पडू लागली. कामगार व नोकरवर्गाला आगामी काळातील रोजगार व वेतन यांची चिंता अधिक भेडसावू लागली. उद्योगक्षेत्राला आपला डोलारा कसा सावरला जाणार याची काळजी वाटू लागली. शेतकरी वर्गासमोर आपल्या शेलमालाच्या मुळात विक्रीची व त्याला मिळणाऱ्या भावाची गत काय होणार हा प्रश्न उभा ठाकला. राज्यकर्त्या वर्गाला आर्थिक स्थिती पूर्वपदावर कशी आणायची याचे उत्तर कळेनासे झाले. त्यातच भर म्हणजे लॉकडाऊनच्या या तिसऱ्या काळात, भारतातील कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू हे दोन्ही आकडे मोठ्याच गतीने वाढत चालले. शिवाय स्थलांतरित मजुरांचे हाल अधिकाधिक चव्हाट्यावर येऊ लागले. या सर्वांची परिणती केंद्र व राज्य सरकारे यांच्याविषयी, सर्वसाधारण जनतेला वाटत असलेली सहानुभूतीची किंवा आपुलकीची भावना झपाट्याने कमी होऊ लागली, तिची जागा असंतोषाचे घ्यायला सुरुवात केली.

आणि अशा या टप्प्यावर जीवनव्यवहार पुन्हा सुरळीत करायला हळूहळू सुरुवात आणि त्याच वेळी चौथा लॉकडाऊन, अशी अपरिहार्यता वाट्याला आली आहे. परस्परपूरकही आणि परस्परविरोधीही वाटावी अशी विचित्र परिस्थिती. आता कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू या आकड्यांचे कोणालाही फार काही वाटेनासे झाले आहे. त्यासंदर्भातील बातम्या व भाकिते यांच्याकडे लक्ष जाईनासे झाले आहे. प्रसारमाध्यमे फार आश्वस्त करू शकत नाहीत हे स्पष्ट झाले. परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारे कितपत सक्षम ठरतील, याबाबत खात्री वाटेनाशी झाली आहे. जागतिक स्तरावरही आश्वस्त व्हावे असे घडताना दिसत नाही. उलट किंचित भीती ही आहे की, अमेरिका व चीन यांच्यातील कुरबूर टोकाला जाऊन काही अघटित तर घडणार नाही ना? काही देशांनी थोडी वेगळी रणनीती अवलंबल्यामुळे ते बऱ्या स्थितीत आहेत असे चित्र पुढे येत आहे, पण त्यामुळे आनंदित व्हावे इतका विश्वास निर्माण होत नाहीये. एकंदरीत काय तर, कोरोनासह जीवनव्यवहार सुरू करायची तयारी सुरू झाली आहे, प्रजेची आणि राज्यकर्त्यांचीही!

अशा पार्श्वभूमीवर मागे वळून पाहिले आणि एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला तर काय दिसते... प्रश्न असा की, संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागणे याचा खरा अर्थ काय? कोरोनामुळे देशभरात मिळून 900 रुग्ण व 20 मृत्यू अशी स्थिती होती तेव्हाच 130 कोटी लोकसंख्येचा हा अवाढव्य देश संपूर्ण बंद करावा लागणे याचा अर्थ काय? देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांत, कित्येक जिल्ह्यांत आणि हजारो खेडेगावांत कोरोनाने प्रवेश केलेला नसतानाही ते सर्व तब्बल 21 दिवस बंद याचा अर्थ काय? किंबहुना  कोरोनाची लागण काही ठरावीक शहरे व काही हजार व्यक्ती इतकी मर्यादित असताना, उर्वरित प्रदेशांत संपूर्ण जनजीवन ठप्प का? या देशातील काही कोटी लोकांना डोक्यावर छप्पर नाही आणि काही कोटी लोकांना रोजचे काम नसेल तर पोटाची गरज भागवता येत नाही, अशी स्थिती असताना त्या सर्वांना ‘जिथे आहात तिथेच पुढील 21 दिवस थांबा’ असा आदेश येणे याचा अर्थ काय? एवढेच नाही तर तो आदेश त्यानंतर दोन वेळा वाढवला जाऊन, 50 दिवसांपर्यंत तशीच स्थिती ठेवावी लागणे याचा अर्थ काय? यामुळे अभूतपूर्व महामंदीचा सामना करावा लागणार हे कळत असूनही संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागणे याचा अर्थ काय?

अर्थातच,  याचे अनेक अर्थ निघतात. पहिला अर्थ असा निघतो की, विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी कोरोना विषाणू रोखण्यासाठी पुढील काही महिने (कदाचित काही वर्षे) उपाय सापडणार नाही असा मिळणारा संदेश. दुसरा अर्थ, सुप्त अवस्थेत असलेला हा विषाणू प्रचंड वेगाने फैलावत जाणार आणि मृत्यूचे तांडव (नृत्य?) सुरू राहणार ही भीती. तिसरा अर्थ, तशा परिस्थितीत लागण व मृत्यू रोखण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा तुटपुंजी ठरणार याची खात्री. चौथा अर्थ, कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आपली जनता काटेकोर पालन करणार नाही याचीही पुरेपूर खात्री. पाचवा अर्थ, अर्धवट वा निराधार बातम्या आणि अतिरिक्त घबराट पसरवणाऱ्या अफवा यांचा मारा प्रसारमाध्यमांकडून होणार म्हणजे होणार. आणि असेच आणखी काही अर्थ सांगता येतील.

या सर्वांतून तीन निष्कर्ष निघतात. एक- निसर्गचक्रातून उद्‌भवलेल्या अभूतपूर्व अशा जागतिक संकटाचा सामना करण्यासाठीदेखील मानवी समूह पुरेसे शिस्तबद्ध वागू शकत नाहीत, म्हणजे त्यांचे सुसंस्कृत होणे खूपच बाकी आहे. दोन- अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था यांचे पुरेसे विकेंद्रीकरण झालेले नाही, अन्यथा असे रोगापेक्षा इलाज भयंकर या स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागले नसते. तीन- अंतिमतः मानवी संस्कृतीचा विकास होण्यासाठी विज्ञानच सर्वाधिक महत्त्वाची व कळीची भूमिका बजावत आले आहे, म्हणून विज्ञानाच्या सार्वत्रिक प्रसाराची आवश्यकता आहे.

सारांश, कोरोनानंतरच्या जगाची पुनर्बांधणी करायची असेल तर वरील तीन निष्कर्ष समोर ठेवूनच वाटचाल करायला हवी, भले धिम्या गतीने पण निश्चिंतपणे!

Tags: लॉकडाऊन कोरोना संपादकीय विनोद शिरसाठ sampadakiy editorial covid 19 corona lockdown vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात