Diwali_4 दलवाईंची ‘रमा’ मेहरुन्निसा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

दलवाईंची ‘रमा’ मेहरुन्निसा

शमसुद्दीन तांबोळी यांनी मेहरुन्निसाभाभींविषयी बोलताना, सावित्रीबाई फुलेंची आठवण होत असल्याचे सांगितले. तर रझिया पटेल यांनी ‘कस्तुरबा गांधी यांच्याशी भाभींचे नाते सांगता येईल’ असा उल्लेख केला. आणि अन्वर शेख म्हणाले, ‘‘हमीदभाई गेल्यानंतर, ‘मेहरुन्निसा भाभींनी रमाबाई रानडे यांच्याप्रमाणे काम केले पाहिजे’ अशी इच्छा ए.बी.शहा यांनी व्यक्त केली होती.’’

८ जून २०१७ रोजी सकाळी साडेअकरा वाजता मेहरुन्निसा दलवाई यांचे पुणे येथे निधन झाले. गेल्याच महिन्यात त्यांनी ८८ व्या वर्षात पदार्पण केले होते. मृत्यू  झाला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या नॉर्मल होत्या. त्यांचे नेहमीचे वास्तव्य मुंबईत असले तरी चार- दोन महिन्यातून एकदा त्या पुण्याला येत असत. पुण्यातील त्यांच्या घरी राहत असत. आताही त्या आठ-दहा दिवसांसाठी आल्या होत्या आणि भेटीगाठी चालू होत्या. ८ जूनला सायंकाळी त्या साधना कार्यालयात गप्पा-चर्चा करण्यासाठी राजू बहाळकर यांच्यासोबत येणार होत्या, पण दुपारी बहाळकरांचा फोन आला, दु:खद बातमी आहे... आणि मग भाभींच्या अंत्यदर्शनाला निघण्याची तयारी करावी लागली.

हमीद दलवाईंनी मृत्युपत्रात लिहून ठेवले होते की, ‘माझ्या शरीराचे दहन करण्यात यावे’. आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी गोविंद तळवलकर, ए.बी.शहा, वसंत नगरकर व शरद पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. निर्णयाची अंमलबजावणी झाली, पण तेव्हा मोठाच गहजब झाला होता. हमीदभाईंनी तो समाजमनाला दिलेला मोठाच धक्का होता. त्यामुळे भाभींनी स्वत:चा निर्णय बराच आधी घेऊन ठेवला होता : दहन नाही आणि दफनही नाही, देहदान! तो निर्णय त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना, तीन नातवंडांना, नातलगांना आणि कार्यकर्त्यांनाही सांगून ठेवला होता. त्यामुळे देहदानाच्या अंमलबजावणीसाठी कसलाही अडथळा आला नाही. हडपसर (पुणे) येथील साने गुरुजी रुग्णालयात त्याच दिवशी सायंकाळी, मेहरुन्निसाभाभींचा देह सुपूर्द करण्यात आला. अंत्यदर्शनाला हुसेन व शमा दलवाई, रुबिना व इला या दोन मुली, नातवंडे व अन्य नातलग आणि अनेक कार्यकर्ते-नेते येऊन गेले. तेव्हा, शंभर वर्षे जगण्याची  इच्छा कालपर्यंत व्यक्त करणारी बाई आज सकाळी अचानक निघून गेली, अशी भावना सर्वांच्या मनात होती. बहुतेकांच्या मनात ‘शोक’ कमी आणि ‘असे मरण यावे’ ही भावना जास्त होती.

त्यानंतर दोन दिवसांनी श्रद्धांजली सभा झाली. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिट्यूट, राष्ट्र सेवादल, एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि साधना साप्ताहिक यांनी ही सभा आयोजित केली होती. अनेक समविचारी संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आले होते. सव्वादोन तास चाललेल्या त्या सभेत शंभरेक लोक उपस्थित होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांच्या प्रास्ताविकाने प्रारंभ तर युवक क्रांती दलाचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांच्या भाषणाने सभेचा समारोप झाला. राजेंद्र बहाळकर यांनी सभेचे संचलन केले. दरम्यान सय्यदभाई, विलास वाघ, अन्वर राजन, अन्वर शेख, रझिया पटेल, हमीद दाभोलकर, विवेक पुरंदरे, अरुणा तिवारी, भा.ल.कोरगावकार, मानव व राणी (भाभींची नातवंडे) यांची मनोगते झाली.

शमसुद्दीन तांबोळी यांनी मेहरुन्निसाभाभींविषयी बोलताना, सावित्रीबाई फुलेंची आठवण होत असल्याचे सांगितले. तर रझिया पटेल यांनी ‘कस्तुरबा गांधी यांच्याशी भाभींचे नाते सांगता येईल’ असा उल्लेख केला. आणि अन्वर शेख म्हणाले, ‘‘हमीदभाई गेल्यानंतर, ‘मेहरुन्निसा भाभींनी रमाबाई रानडे यांच्याप्रमाणे काम केले पाहिजे’ अशी इच्छा ए.बी.शहा यांनी व्यक्त केली होती.’’ त्यावेळी उपस्थितांच्या मनात आणखी काही जोड्या येऊन गेल्या असतील. आणि त्यापैकी सर्वांशीच कमी-अधिक नाते मेहरुन्निसा यांचे दाखवता येईल. पण ए.बी.शहांचे भाकित बऱ्याच अंशांनी खरे ठरले असे म्हणावे लागते.

न्या.म.गो.रानडे यांचा मृत्यू १९०१ मध्ये झाला.  त्यावेळी रमाबाई ३८ वर्षांच्या होत्या, त्यांनी नंतरची २४ वर्षे रानड्यांचा वारसा सांगत सार्वजनिक काम केले. त्याचप्रमाणे हमीदभाई गेले तेव्हा ४७ वर्षांच्या असलेल्या मेहरुन्निसा यांनी, नंतरची ४० वर्षे दलवाईंचा वारसा सांगत काम केले. रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ आणि मेहरुन्निसा दलवाई यांचे ‘मी भरून पावले आहे’ ही दोन पुस्तके एकत्र वाचली तर, तपशीलाचे खूपच जास्त फरक असूनही आंतरिक ऊर्मीचे व उर्जेचे साम्य त्या दोघींमध्ये बरेच जास्त असल्याचे लक्षात येईल. न्या. रानडे गेल्यानंतर स्वत:मधील आंतरिक शक्तीचा साक्षात्कार रमाबाईंना झाला आणि तसाच प्रकार दलवाई गेल्यानंतर मेहरुन्निसाभाभींच्या बाबतीतही झाला. न्या. रानड्यांपेक्षा रमाबाई २१ वर्षांनी लहान होत्या, तर हमीदभाईंपेक्षा मेहरुन्निसा दोन वर्षांनी मोठ्या होत्या. रमाबाईंचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी झाला तर मेहरुन्निसा यांचा विवाह त्या काळाच्या मानाने खूपच उशिरा म्हणजे २७ व्या वर्षी झाला. रमाबाई पूर्णत: निरक्षर होत्या, त्यांना रानड्यांनी पुढे शिकवले. मेहरुन्निसा यांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले होते, दलवाईंनी त्यांना मराठीकडे वळवले... परंतु या दोघींनीही पतीच्या निधनानंतर आपापल्या क्षमतेनुसार केलेले कार्य स्त्री-स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारेच होते.

हमीद दलवाई यांच्या विचारांना व त्यांच्या कृतिकार्यक्रमांना अनेक पुरोगामी संस्था-संघटनांप्रमाणेच साधना साप्ताहिकाचाही खंबीर पाठिंबा होता. त्यांचा पहिला कथासंग्रह (लाट) १९६१मध्ये साधना प्रकाशनाकडूनच आला होता. त्यांचे बरेच वैचारिक लेखन साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले होते. १९५७ ते ७७ अशी वीस वर्षे साधनाने हमीदभाईंना बळ पुरवले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांत, दलवाईंचे व त्यांच्याविषयीचे जे काही लेखन साधनाने प्रसिद्ध केले व काही कार्यक्रम घडवून आणले, त्यामागचा उद्देश दलवाईंच्या विस्मृतीत चाललेल्या वारशाला उजाळा देणे हाच होता! ती प्रक्रिया ‘पुनर्भेट हमीद दलवाईंची’ या विशेषांकापासून सुरू झाली. नंतर ‘जमीला जावद’ हा असंग्रहित कथांचा संग्रह प्रकाशित केला, ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक मराठीत आणले. मग ‘इस्लामचे भारतीय चित्र’ आणि ‘मी भरून पावले आहे’ या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आणल्या. आणि आता ‘कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा’ व ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’ ही असंग्रहित लेखांची दोन पुस्तके या महिन्यात येत आहेत. बालकुमार व युवा अंकांतूनही दलवाईंचे लेखन नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करता आला..

गेल्या वर्षीचा महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कारही हमीद दलवाईंना (मरणोत्तर) दिला गेला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात चिपळूणला एक कार्यक्रम झाला. आणि दलवाईंच्या ४०व्या स्मृतिदिनी कालच्या ३मे रोजी दिवसभराचे चर्चासत्रही पुणे शहरात झाले. दरम्यान विशेषांकाचे व पुस्तकांचे प्रकाशन समारंभही घडवून आणले होते. त्यासाठी रामचंद्र गुहा, दिलीप पाडगांवकर, डॉ.जब्बार पटेल असे राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर बोलावले गेले होते.

हमीदभाईंच्या विस्मृतीत चाललेल्या वारशाला उजाळा  देण्याच्या मागील दोन वर्षांतील या सर्व खटाटोपात, दोन धोके काही हितचिंतकांकडून सातत्याने व्यक्त केले जात होते. एक म्हणजे- सर्वसामान्य मुस्लिम लोकांशी सुधारणांविषयी बोलायचे असेल तर हमीदभाईंचे नाव घेणे कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरते. दुसरे म्हणजे, हमीदभाईंचे विचार पुढे आणण्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलित दिल्यासारखे होईल. या दोन्ही प्रकारच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही असे नाही. पण ‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ या आगरकरांच्या बाण्याप्रमाणे हमीदभाईंचे कार्य होते. आणि कोणत्याही समाजसुधारकाने आपल्या कार्यामध्ये स्वत:च्या समाजाची परखड चिकित्सा व कठोर टीका केलेलीच आहे. किंबहुना अशा लहान-थोरांनाच ‘समाजसुधारक’ हे बिरूद लावले  जाते. टीका व चिकित्सा यांच्या मार्गाने न जाणाऱ्या, पण समाजासाठीच कार्य करणाऱ्या अन्य महनीयांना ‘समाजसेवक’ किंवा ‘समाजनेते’ असे संबोधले जाते.

या तीनही प्रकारच्या लोकांची गरज प्रत्येक समाजाला सर्वच काळात राहिली आहे. परंतु आपल्याच समाजातील (जातीतील, धर्मातील) लोकांच्या रूढी-परंपरांविरुद्ध लढणाऱ्यांची संख्या विद्यमान काळात तुलनेने कमी दिसते आहे. आणि म्हणूनच हमीद दलवाई यांच्यासारख्या समाजसुधारकांचा वारसा जपण्याची व वृद्धिंगत ठेवण्याची  जास्त गरज आहे. या पार्श्वभूमीवर, ‘ते’ दोन्ही प्रकारचे धोके पत्करण्याचे आणि संभाव्य टीका गृहीत धरून काम करण्याचे बळ साधनाला मिळाले, त्याचे मुख्य कारण मेहरुन्निसा दलवाई यांचा खंबीर पाठिंबा हेच होते. आता हा दुवा निखळला.

Tags: हमीद दलवाई दलवाई मेहरुन्निसा एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन राष्ट्र सेवादल हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिट्यूट मुस्लिम सत्यशोधक मंडळ mehrunissa dalwai Raziya Patel Shamsuddin Tamboli S.M.Joshi Socialist Foundation Rashtra Sevadal Hamid Dalwai Islamic Research Institute Muslim Satyashodhak Mandal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात