डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पत्रकारितेतील नीतिमूल्यांचे प्रतिबिंब

भारतात इंग्रजी पत्रकारितेचा इतिहास सव्वादोनशे वर्षांचा आहे, आणि मराठी पत्रकारितेलाही आता 190 वर्षांची परंपरा आहे. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर या वीस वर्षांच्या तरुणाने ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. केवळ 34 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री यांना  मराठी पत्रकारितेचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी ठेवलेली ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नावे इतकी समर्पक आहेत की, कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील व कोणत्याही भाषेतील पत्रकारितेची मूलतत्त्वे याच दोन शब्दांत सांगता येतील. आणि याच पार्श्वभूमीवर प्रस्तुत अंकातील तीन मुलाखतींकडे पाहिले तर यामधून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब निश्चित दिसेल. एवढेच नाही तर, एका मर्यादित अर्थाने हा अंक म्हणजे एक छोटा आरसा आहे असेही वाटू शकेल. अर्थातच, गांभीर्याने पत्रकारिता करू पाहणाऱ्या कोणालाही या मुलाखतींमधून ठोस दिशा सापडून किती दूरवरचे दिसेल याबाबतचा दावा आम्ही करू इच्छित नाही, पण कोणत्या दिशेने जाऊ नये, हे यातून ठळकपणे पुढे आले आहे हे मात्र निश्चित!

महात्मा गांधी यांची हत्या झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी साने गुरुजींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. उपोषणाच्या चौदाव्या दिवशी त्यांनी दोन पानांचे सायंदैनिक सुरू केले, त्याचे नाव ठेवले कर्तव्य! मात्र चार महिन्यांनंतर ते बंद पडले. त्यानंतर दोनच महिन्यांनी (15 ऑगस्ट 1948 रोजी) त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले, ते गेली सात दशके अखंड प्रकाशित होत आहे. आणि  गेल्या वर्षी  (9 ऑगस्ट 2019 रोजी) ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल सुरू केले, त्याला आता एक वर्ष झाले आहे. म्हणून कर्तव्यचा पहिला वाढदिवस आणि साधनाचा 73 वा वर्धापनदिन एकत्रित कसा साजरा करता येईल, हा विचार मागील तीन-चार महिने मनात घोळत होता. मात्र अनपेक्षितपणे उद्‌भवलेले आणि अद्याप न संपलेले कोरोना संकट लक्षात घेता, कोणताही कार्यक्रम करायचा नाही असे ठरवले. त्याऐवजी आजच्या वर्तमानाला भिडता येईल व मूलभूत म्हणावे असे काही आपल्या वाचकांसमोर सादर करावे हा विचार पुढे आला, त्यातून प्रस्तुत अंक आकाराला आला आहे.

वस्तुतः गेल्या वर्षी 20 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यान देण्यासाठी एन.राम  यांना पुणे शहरात बोलावले होते, तेव्हाच त्यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत तेव्हा नुकतेच सुरू झालेल्या ‘कर्तव्य’वर इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करायची आणि त्यानंतर लगेच येणाऱ्या साधना दिवाळी अंकात त्या मुलाखतीचा अनुवाद प्रसिद्ध करायचा असे मूळ नियोजन होते. मात्र मुलाखत आमच्या अपेक्षेपेक्षा सखोल व विस्तृत झाली आणि मग ती इंग्रजीत शब्दांकन, मराठी अनुवाद व व्हिडिओ एडिटिंग करून यू-ट्यूबवर अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र तिन्ही कामे उपलब्ध वेळेत उत्तम प्रकारे होऊ शकणार नव्हती, म्हणून त्या मुलाखतीची प्रसिद्धी पुढे ढकलली. दिवाळीनंतर असा विचार मनात आला की, ही एकच मुलाखत काही तरी निमित्त करून स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यापेक्षा, आणखी दोन संपादकांच्या अशाच दीर्घ मुलाखती करता आल्या तर ‘कर्तव्य’वरून आठवडाभर क्रमशः प्रसिद्ध करता येतील आणि साधनाचा स्वतंत्र अंकही काढता येईल. त्याच वेळी शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या दोघांची नावे समोर आली. मग फर्नांडिस यांची मुलाखत जानेवारीमध्ये घेण्यात आली. त्यानंतर शेखर गुप्ता यांची मुलाखत घ्यायची आणि एप्रिलमध्ये अंक प्रसिद्ध करायचा असे ठरवले. मात्र कोरोना संकट उद्‌भवले आणि ते काम मागे पडले. म्हणून 9 ऑगस्ट व 15 ऑगस्ट अगदी दृष्टीच्या टप्प्यात आले तेव्हा या मुलाखतींची हॅट्रिक साधायलाच हवी असे वाटले. मग तातडीने चक्र फिरवले आणि कुमार केतकर यांच्यामार्फत शेखर गुप्ता यांना विनंती करून ती मुलाखतही घेण्यात आली.

या तीन मुलाखती इंग्रजीतून घेणे, त्यांचे शब्दांकन करणे आणि मग अनुवाद करणे असे तीन टप्पे होते. हे सर्व काम चार तरुणांनी केले आहे. यातील एन.राम यांची प्रत्यक्ष भेटून पुणे शहरात मुलाखत घेणे आणि नरेश फर्नांडिस यांची मुलाखत फोनवरून घेणे आणि त्या दोन्ही मुलाखतींचे शब्दांकन करणे, हे सर्व काम संकल्प गुर्जर या तरुणाने त्या-त्या वेळीच करून ठेवले होते. मात्र शेखर गुप्ता यांची मुलाखत व्हिडिओ कॉलद्वारे घेणे आणि तिचे शब्दांकन करणे, हे काम जायली वाव्हळ या तरुणीने गेल्या आठवड्यातील अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे एन.राम व शेखर गुप्ता यांच्या मुलाखतींचे अनुवाद प्रभाकर पानवलकर या तरुणाने आठ दिवसांत पूर्ण केले, तर नरेश फर्नांडिस यांच्या मुलाखतीचा अनुवादही सुहास पाटील या तरुणाने पाच दिवसांतच केला आहे. या मुलाखती घेण्याची संकल्पना व सर्वसाधारण रुपरेषा जरी आम्ही दिली असली तरी, सर्व प्रश्न तयार करणे आणि मुलाखतींची कार्यवाही संकल्प व जायली यांनीच पार पाडली आहे. त्याचप्रमाणे अनुवादाचे कामही प्रभाकर व सुहास यांनी केले आहे. हे सर्व ठळकपणे अधोरेखित करण्याचे कारण, हे तपशील सांगितले नाहीत तर कोणाही प्रगल्भ वाचकांच्या ते लक्षातही येणार नाही, इतके हे काम परिपक्व झाले आहे.

एन.राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तीन संपादक मुलाखतींसाठी का निवडले आणि त्यांच्या मुलाखतींचा फोकस थोडा-थोडा वेगळा का ठरवला याची चांगली कल्पना या मुलाखती वाचून येईलच. पण इथे आमचे मानस थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पहिला मुद्दा हा होता की, पत्रकारितेला असलेले वैश्विक परिमाण लक्षात घेता तिन्ही संपादक इंग्रजीतील घ्यावेत. दुसरा मुद्दा होता, तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे म्हणता येतील असे घ्यावेत. तिसरा मुद्दा, तिघेही वेगवेगळ्या माध्यमांत काम केलेले असावेत. आणि चौथा मुद्दा होता, तिघांच्याही दृष्टिकोनांत काहीअंशी फरक असेल, मात्र ते प्रभावशाली असावेत आणि पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी त्यांची बांधिलकी पक्की असावी. त्यातून पटकन समोर आलेली ही तीन नावे आहेत.

एकूणात विचार करता, भारतातील सर्वोत्कृष्ट इंग्रजी वृत्तपत्र म्हणून 142 वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’चा उल्लेख करावा लागेल, असे आम्हाला वाटते. म्हणून या वृत्तपत्राची मालकी ज्या अय्यंगार कुटुंबाकडे मागील 115 वर्षांपासून आहे, त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले एन.राम यांच्याच तोंडून त्या वृत्तपत्राची महती नेमकी कशात दडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दुसरे, राजकीय भूमिका सातत्याने घेणे आणि त्याचा प्रभाव पडत राहणे या बाबतीत तरी ‘इंडियन एक्सप्रेस’अव्वल नंबरवर आहे, तिथे शेखर गुप्ता तब्बल दोन दशके मुख्य संपादकाच्या भूमिकेत राहिले आहेत; शिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात दशकभर ‘इंडिया टुडे’ या पाक्षिकात व गेल्या चार वर्षांत ‘द प्रिंट’ या डिजिटल पोर्टलवर केलेले कामही लक्षणीयच आहे. त्यामुळे त्यांनी त्या तिन्ही टप्प्यांवर केलेली पत्रकारिता समजून घेणे, कमालीचे रोचक असणार हे उघड होते. आणि डिजिटल पोर्टल हे माध्यम भारतात अद्याप बाल्यावस्थेत असले तरी, मागील साडेसहा वर्षे ‘स्क्रोल’ हे पोर्टल सर्व बाजूंनी क्रमाक्रमाने विकसित होत राहिले आहे, त्यामुळे त्याचे संपादक नरेश फर्नांडिस यांच्याकडून हे नवे माध्यम समजून घेणे आवश्यक वाटले.

एन.राम हे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत, शेखर गुप्ता यांनी पासष्टी पार केलेली नाही आणि नरेश फर्नांडिस हे पन्नाशीच्या दरम्यान आहेत. म्हणजे मर्यादित अर्थाने का होईना तिघे तीन पिढ्यांचे आहेत. अनुक्रमे चेन्नई, दिल्ली, मुंबई या तीन महानगरांत त्या तिघांनी काम केले आहे, देशाच्या तीन टोकांवर असलेल्या या महानगरांतील वास्तव्याचा त्यांच्या जडण-घडणीवर व दृष्टिकोनांवर काहीएक परिणाम निश्चित झालेला असणार.

मात्र तिघेही पुरोगामी व सेक्युलर आहेत आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात. आणि  म्हणून बरेच मंथन होईल, पण  तिघांच्या मुलाखतीतून एकसंध व मूलभूत म्हणावे असे काही बाहेर येईल हे उघड होते. आणि ते आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आले आहे. इतके की, एकाच अवाढव्य व प्राचीन वृक्षाच्या तीन मोठ्या फांद्या आहेत, असे सुखद आश्चर्य या मुलाखती वाचून आम्हाला वाटले. मात्र खंत वाटावी असे आश्चर्य हे आहे की, या तिघांच्याही इतक्या दीर्घ व या प्रकारच्या मुलाखती इंग्रजीमध्ये अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अन्य भाषांमध्येही झालेल्या असण्याची शक्यता कमी आहे.

भारतात इंग्रजी पत्रकारितेचा इतिहास सव्वादोनशे वर्षांचा आहे, आणि मराठी पत्रकारितेलाही आता 190 वर्षांची परंपरा आहे. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर या वीस वर्षांच्या तरुणाने ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. केवळ 34 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री यांना  मराठी पत्रकारितेचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी ठेवलेली ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नावे इतकी समर्पक आहेत की, कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील व कोणत्याही भाषेतील पत्रकारितेची मूलतत्त्वे याच दोन शब्दांत सांगता येतील. आणि याच पार्श्वभूमीवर प्रस्तुत अंकातील तीन मुलाखतींकडे पाहिले तर यामधून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब निश्चित दिसेल. एवढेच नाही तर, एका मर्यादित अर्थाने हा अंक म्हणजे एक छोटा आरसा आहे असेही वाटू शकेल. अर्थातच, गांभीर्याने पत्रकारिता करू पाहणाऱ्या कोणालाही या मुलाखतींमधून ठोस दिशा सापडून किती दूरवरचे दिसेल याबाबतचा दावा आम्ही करू इच्छित नाही, पण कोणत्या दिशेने जाऊ नये, हे यातून ठळकपणे पुढे आले आहे हे मात्र निश्चित!

हा अंक प्रसिद्ध होत असताना, साधनाला सात दशकांची देदीप्यमान परंपरा बहाल करणाऱ्या पूर्वसुरींची आठवण आम्हाला तीव्रतेने येणे साहजिक आहे. साने गुरुजींनी साप्ताहिक सुरू केल्यावर दोन वर्षांच्या आतच जगाचा निरोप घेतला. त्यानंतर यदुनाथ थत्ते, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या संपादकांनी एस.एम. जोशी व अन्य विश्वस्त आणि अनेक लहान-थोरांच्या साह्याने साधनाला सुवर्णमहोत्सवापर्यंत आणले. त्यानंतरचे दीड दशक डॉ.नरेंद्र दाभोलकरांची होती, त्याच काळात त्यांनी साधनाची अमृतमहोत्सवी वाटचाल सहज होईल अशी उभारणी केली. हे सर्वच संपादक ‘लार्जर दॅन लाईफ’ म्हणावे असे होते. त्यांनी साधनाची ओळख वैचारिक व ध्येयवादी नियतकालिक अशी करून दिली. विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध करण्याला प्राधान्य दिले. साधनाची भूमिका भारतीय संविधानातील मूल्यांचा परिपोष करणारी राहील याची काळजी घेतली. अर्थातच, यामुळे साधनाला राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आणि वैचारिक वर्तुळात विश्वासार्हता प्राप्त करून दिली. हे साप्ताहिक आता 72 वर्षांचे झाले आहे. यातील तब्बल अर्धा कालखंड म्हणजे 32 वर्षे (1949 ते 1981) यदुनाथ थत्ते यांनी साधनाची धुरा खांद्यावर घेतली होती. साधनाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांचे योगदान सर्वाधिक आहे. म्हणून तीन संपादकांच्या मुलाखतीचा हा अंक यदुनाथांच्या स्मृतीला अर्पण करीत आहोत.

आणखी दोन वर्षांनी साधना साप्ताहिक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या काळासाठी आमच्या मनात अनेक योजना आहेत. साप्ताहिकाचे मागील बारा वर्षांचे डिजिटल अर्काइव्ह तयार झाले आहे, अतिशय सुलभ व जलद अशी त्याची रचना आहे. केवळ अभ्यासकांसाठी नाही तर, कोणाही सर्वसामान्य वाचकाला ते विशेष उपयुक्त ठरते आहे. याच प्रकारचे अर्काइव्ह आधीच्या साठ वर्षांचे तयार केले तर खूप मोठा व मौलिक दस्तावेज सर्वांसाठी खुला होणार आहे, ते महत्त्वाकांक्षी काम आगामी दोन-तीन वर्षांत मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे. साधना प्रकाशन आता पुन्हा नवे रंग-रूप धारण करीत आहे, त्यात e books , audio books  यांची भर पडत राहणार आहे. त्यामुळे साधना प्रकाशनाची स्वतंत्र वेबसाईट येत्या डिसेंबरमध्ये येणार आहे. ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवर इंग्रजी विभाग व ऑडिओ/व्हिडिओ यांचे प्रमाण वाढणार आहे. याशिवाय कुमार वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘विद्यार्थी साधना’ हे डिजिटल पोर्टल आणि कदाचित स्वतंत्र मासिक सुरू करण्याची कल्पना विचाराधीन आहे. (साने गुरुजींनी 1928 ते 30 या काळात विद्यार्थी हे मासिक चालवले होते.) अर्थातच, हे सर्व काम करताना ध्येयवादी पत्रकारितेचा वारसा आणि पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचा आरसा समोर ठेवायला हवा, याबाबत आमच्या मनात शंका नाही. गुणात्मक व संख्यात्मक या दोन्ही प्रकारची वाढ होत असेल तरच ‘विकास’ ही संज्ञा बहाल करता येते, अशी आमची धारणा आहे. आणि ध्येयवाद व व्यावसायिक नीतिमूल्ये परस्परपूरक आहेत, यावर आमचा दृढ विश्वास आहे...!

 (या तीनही मुलाखती इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी kartavyasadhana.in/ ला भेट द्या.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. test- 17 Aug 2020

    test

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात