Diwali_4 मोदींच्या कर्तबगारीकडे कसे पाहावे?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

मोदींच्या कर्तबगारीकडे कसे पाहावे?

गुजरात मुळातच पुढारलेले राज्य आहे, गुजराथी माणसांच्या अंगात उद्योजकता भिनलेलीच आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर गुजरात राज्य सतत उद्योग-व्यापाराच्या बाबतीत तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर राहिलेले आहे. अशा गुजरात राज्याला नरेंद्र मोदींनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने पहिल्या क्रमांकावर आणले आहे हे खरे, पण गुजरातमधील दंगलीमुळे देशभरातील मुस्लिम समाजात आपल्या एकूणच राज्य व्यवस्थेविषयी जो संदेश गेला तो भयानक आहे. गुजरातमध्ये अमानुष हत्याकांडांना साथ देणारा माणूस मुख्य मंत्रिपदावर इतका दीर्घकाळ राहतो; त्याला रोखण्याची क्षमता त्याच्या पक्षात, विरोधी पक्षांत, इथल्या केंद्र शासनात, न्यायव्यवस्थेत व प्रसारमाध्यमात ही नाही. उलट त्या राज्यात तो प्रचंड लोकप्रियता टिकवून आहे, विकासपुरुष म्हणून त्याचा उदो-उदो होत आहे, ही बाब देशभरातील मुस्लिमांना गेली सात-आठ वर्षे रोज सलत असणार. म्हणजे मोदींनी गुजरातचा विकास केला, पण राष्ट्राच्या एकात्मतेला तडे दिले.

गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथे ‘व्हायब्रंट गुजरात: 2009’ ही दोन दिवसीय परिषद झाली. ही परिषद मुख्यत: उद्योजकांसाठी होती. गुजरातमध्ये गुंतवणूक करत असलेल्या किंवा करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी त्यात सहभाग घेतला. रतन टाटा, अंबानी बंधू, कुमारमंगलम बिर्ला, सबीर भाटिया, बी.एन.कल्याणी, आर.एन.धूत, बी.के. गोएंका इत्यादी भारतातील प्रमुख उद्योगपतींचा त्यात समावेश होता. याशिवाय छत्तीसगड व कर्नाटक या(भाजपची सत्ता असलेल्या) राज्यांचे उद्योगमंत्री, केनयाचे पंतप्रधान व उपपंतप्रधान, इटलीचे कृषिमंत्री, सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री, श्रीलंकेचे पर्यटनमंत्री, युगांडाचे उद्योगमंत्री आणि जपान, नामिबिया, युगांडा व मंगोलिया या देशांचे भारतातील उच्चायुक्तही उपस्थित होते. जपान तर अधिकृतपणे या परिषदेत सहभागी झाला होता. या परिषदेत कोण सहभागी नव्हते याची बरीच मोठी यादी देता येईल; पण विद्यमान केंद्रीयमंत्री व भाजपाचे केंद्रीय नेते हजर नव्हते. ही परिषद गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांच्या भोवती फिरत राहिली. या बड्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘उद्योग, कृषी व सेवा या तीनही क्षेत्रांच्या विकासावर गुजरात सरकारचा भर राहील. उद्योजकांनी लहान व मध्यम स्वरूपाचे उद्योग आणावेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. याबाबत इटली व जपानयांच्या कडून शिकावे, कारण त्यांनी या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. सध्याच्या जागतिक आर्थिक संकटाचे रूपांतर संधीत करावे. त्यासाठी रेस ही चतु:सूत्री (RACE : Lower Risk, Alertness of Govt., Low Cost, High Efficiency) आम्ही वापरू. विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेतच, पण यापुढे 200 ते 400 चौ.किमी.चे विशेष औद्योगिक क्षेत्र (SIZ) निर्माण करण्यावर भर दिला जाईल. गुजरातचा विकास, गुजरातसाठी उत्तम प्रशासन आणि गुजरातची सुरक्षितता हेच माझे तत्त्वज्ञान आहे आणि त्यासाठी मला धर्मनिरपेक्षतेच्या प्रशस्तिपत्राची गरज वाटत नाही.

एकूणच परिषदेच्या आयोजनामुळे व विशेषत: मोदींच्या प्रभावामुळे भारतातील बहुतांश उद्योगपती भारावून गेले. रतन टाटा म्हणाले, ‘मी या ठिकाणी आहे, याचा मला विशेष आनंद होतो आहे. आम्ही पश्चिम बंगालमधील (सिंगूर येथील) नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये हलवला. या संपूर्ण प्रकरणाच्या कार्यवाहिला शासकीय स्तरावर सामान्यत: तीन ते सहा महिने लागतात, पण मोदींमुळे ही सर्व प्रक्रिया केवळ तीन दिवसांत पार पडली. आम्ही आणखी 21 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत.’

मुकेश अंबानी म्हणाले, ‘रिलायन्सने आतापर्यंत गुजरातमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ती आणखी वाढवली जाणार आहे.’ परिषदेत सहभागी झालेल्या सर्व उद्योजकांनी मिळून पावणेतीन लाखकोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातमध्ये करण्याचे आश्वासन दिले. आगामी काही वर्षांत आणखी दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त झाली. त्यामुळे आठ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे सांगितले गेले.

या परिषदेच्या यशामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील सर्वांत कार्यक्षम मुख्यमंत्री असा त्यांचा गौरव झाला. त्यांनी गुजरातला विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आणले. गुजरातचा आर्थिकविकास दर 11 टक्यांपेक्षा जास्त वाढवला. त्यामुळे मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा अशी अपेक्षा अनिल अंबानी व सुनील मित्तल यांनी उघडपणे व्यक्त केली, इतर उद्योजकांनीही अप्रत्यक्षपणे तसेच सूचित केले.

या परिषदेमुळे मोदींचे उद्योग-वर्तुळातील वजन तर वाढलेच, पण ते भाजपामधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांच्या बरेच पुढे निघून गेले आणि ‘अडवाणींनंतर मोदी’ असे चित्र निर्माण झाले. अडवाणीही म्हणाले, ‘मोदींचा भाजपाला अभिमान वाटतो. गेल्या 60 वर्षांत मोदींइतके प्रेम आणि द्वेष इतर कोणाच्या ही वाट्याला आलेले नाही.’ हे सांगताना अडवाणी सूचित करतात की 60 वर्षांपूर्वी असे प्रेम-द्वेष गांधींच्या वाट्याला आले.

मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील खासदार अब्दुल्ला कुट्टी यांनी ही मोदींचे कौतुक केले आहे. ‘मोदी फॅसिस्ट आहेत, पण त्यांचे विकासाचे मॉडेल पक्षाने स्वीकारावे’ असे ते म्हणाले, म्हणून माकपने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना अब्दुल्ला कुट्टी यांनी पक्षालाच आवाहन केले, ‘मोदींचा विकासाचा चेहरा आणि त्यांचे धर्मांधतेचे राजकारण वेगळे करावे. कारण स्टॅलिननेही भांडवलशाही-साम्राज्यवादी अमेरिकेचे विकासाबाबत अनुकरण करावे असे सांगितले होतेच.’ शेवटी माकपने या अब्दुल्ला कुट्टींची ‘मॅड’ अशी संभावना करून पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर अब्दुल्ला कुट्टी म्हणतात, ‘मला मॅड म्हणणाऱ्यांना अल्ला क्षमा करणार नाही.’

गुजरात विधानसभेतील विरोधीपक्षनेते शक्तीसिंग गोहेल यांनी मोदींची तुलना ‘सत्यम’ फेम रामलिंगम राजू यांच्याशी केली आहे. काहीबुद्धिवाद्यांनी इतिहासाचा असा दाखला दिला आहे की, जर्मनीत हिटलरचा उदय होत होता, तेव्हा तिथले उद्योजक हिटलरचे व त्याच्या धडाकेबाज कार्यशैलीचे असेच कौतुक करत होते. गुजरातच्या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या न्यायाधीशांनी मोदींची तुलना निरोशी केली आहे. (रोम जळत होते तेव्हा निरो फिडेल वाजवत होता.) तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी  ‘राजधर्म का पालन करना होगा’ आणि ‘बाहर केलोगों को क्या मुँह दिखाऊँ?’ असे जाहीरपणे मोदींना उद्देशूनच म्हटले होते. मराठीतील ज्येष्ठ साहित्मिक तेंडुलकरांनी, ‘माझ्या हातांत पिस्तुल दिले तर मी मोदींना पहिली गोळी घालेन' असे म्हटले होते. अमेरिकेने मोदींना अद्यापही व्हिसा दिलेला नाही. मुंबईवरील हल्ल्याला लष्करी जवान प्रत्युत्तर देत होते, तेव्हा त्या ठिकाणी जाऊन पाकिस्तानला धडा शिकवामला पाहिजे असे सांगणारे आणि हल्ल्यात बळी पडलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करणारे पहिले नेते मोदीच आहेत; पण ती मदत व त्यांची भेट हेमंत करकरेंच्या पत्नीने तत्काळ नाकारून मोदींविषयीच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मोदींच्या कर्तृत्वाची तिसरी बाजू अधिक लेशदायक आहे. गुजरात दंगलीत मुख्य मंत्रिपदावर असलेल्या मोदींनी पक्षपाती वर्तन केले किंबहुना प्रशासनाला हाताशी धरून मुस्लिम कुटुंबांचा अतोनात छळ केला. याबाबत सर्व स्तरांतून ओरड होत असूनही त्यावेळी भाजपात शक्तिशाली असलेले पंतप्रधान वाजपेयी मोदींना हटवू शकले नाहीत. तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम, द्रमुक या आघाडीतील पक्षांनी आक्षेप घेतले,पण नंतर झालेल्या निवडणुकांत मोदींनी दोन तृतियांश बहुमताने विजय मिळवला. बहुतांश प्रसारमाध्यमे विरोधात असूनही मोदींनी दुसऱ्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेससारखा पक्ष, विरोधी पक्ष असताना आणि नंतर सत्तेत आल्यावरही मोदींचा प्रभाव कमी करू शकला नाही. न्यायालयीन खटले दाखल झाले, चौकशी आयोग नेमले गेले तरीही मोदींच्या मुख्य मंत्रिपदाला धक्का बसला नाही.

म्हणजे तेव्हा या सर्वांना मोदी पुरून उरले आणि आता विकास पुरुष म्हणून पुढे येत आहेत. पर्यायाने भारतातील इतर राज्यांतील नवमध्यमवर्गालाही मोदींचे आकर्षण वाटू लागले आहे. अर्थात, यात मोदींच्या कार्यक्षमतेपेक्षा आपल्या सभोवतालच्या नेत्यांच्या अकार्यक्षमतेचा राग जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या कर्तबगारीकडे कसे पहावे, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनातही घर करू लागला आहे.

गुजरात मुळातच पुढारलेले राज्य आहे, गुजराथी माणसांच्या अंगात उद्योजकता भिनलेलीच आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर गुजरात राज्य सतत उद्योग-व्यापाराच्या बाबतीत तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर राहिलेले आहे. अशा गुजरात राज्याला नरेंद्र मोदींनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने पहिल्या क्रमांकावर आणले आहे हे खरे, पण गुजरातमधील दंगलीमुळे देशभरातील मुस्लिम समाजात आपल्या एकूणच राज्य व्यवस्थेविषयी जो संदेश गेला तो भयानक आहे. गुजरातमध्ये अमानुष हत्याकांडांना साथ देणारा माणूस मुख्य मंत्रिपदावर इतका दीर्घकाळ राहतो; त्याला रोखण्याची क्षमता त्याच्या पक्षात, विरोधी पक्षांत, इथल्या केंद्र शासनात, न्यायव्यवस्थेत व प्रसारमाध्यमात ही नाही. उलट त्या राज्यात तो प्रचंड लोकप्रियता टिकवून आहे, विकासपुरुष म्हणून त्याचा उदो-उदो होत आहे, ही बाब देशभरातील मुस्लिमांना गेली सात-आठ वर्षे रोज सलत असणार. म्हणजे मोदींनी गुजरातचा विकास केला, पण राष्ट्राच्या एकात्मतेला तडे दिले. बरोबर 59 वर्षांपूर्वी भारत हे राष्ट्रप्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. तेव्हा सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, न्याय, समानता व बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प केला गेला. त्या संकल्पाच्या दिशेने आपला प्रवास ‘स्लो बट स्टेडी’ चालू आहे. पण या दीर्घकालीन प्रवासाला गतिमान करण्याची गरज असताना त्याला खिळ घालण्याचे काम नरेंद्र मोदींकडून झाले. ‘धर्मनिरपेक्षतेच्या प्रशस्तिपत्राची मला गरज नाही’ असे ते आजही मोठ्या अभिमानाने सांगतात. म्हणून त्यांच्या कर्तबगारीचे मूल्यमापन करताना व्यापक व दीर्घकालीन दृष्टिकोनातूनच विचार करावा लागेल. सारांश, मोदींनी गुजरातला चार पावलेपुढे नेले पण भारताला दोन पावले मागे खेचले. असा नेता राष्ट्रीय स्तरावर हवा म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल.

Tags: बी.के. गोएंका आर.एन.धूत बी.एन.कल्याणी सबीर भाटिया कुमारमंगलम बिर्ला अंबानी बंधू रतन टाटा व्हायब्रंट गुजरात: 2009 भाजप नरेंद्र मोदी गुजरात vibrant gujrat gujrat narendra modi editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात