डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नरसिंह राव यांची जन्मशताब्दी वर्षभर साजरी व्हायला हवी...

मात्र त्या सर्व निर्णयांकडे नरसिंह राव हे एक प्रक्रिया म्हणूनच पाहत होते. मागील काही हजार वर्षे चालत आलेला हा जनप्रवाह आहे आणि पुढील हजारो वर्षे तो चालत राहणार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या-त्या प्रसंगी निर्धार व उत्कटता आणि त्याचबरोबर तटस्थता व अलिप्तता असा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला असावा. परिणामी तत्त्व आणि व्यवहार अशी निवड करायची वेळ आली तेव्हा त्यांनी काही वेळा तत्त्वाच्या तर काही वेळा व्यवहाराच्या बाजूने कौल दिला असावा. त्यांनी एनडी टीव्हीवर मे 2004 मध्ये शेखर गुप्ता यांना दिलेल्या दीर्घ मुलाखतीत त्यांच्या या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते. तेव्हा त्यांना सत्तेपासून दूर होऊन आठ वर्षे झाली होती, काँग्रेस पक्षाने अनौपचारिकरीत्या तरी बाहेर काढले होते, अनेक न्यायालयीन खटल्यांचे निकाल लागून त्यांची त्यातून सुटका झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेली ती शेवटची मुलाखत ठरली.

भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी आंध्र प्रदेशात/आताच्या तेलंगणा राज्यात झाला. हा अंक प्रसिद्ध झाला त्याच दिवशी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला. त्या दिवशी देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये नरसिंहराव यांना अभिवादन केले आणि ‘अतिशय कठीण काळात त्यांनी देशाचे नेतृत्व केले’ असा गौरव केला. त्याच दिवशी भारतील सर्व भाषांमधील प्रमुख दैनिकांमध्ये पूर्ण पान जाहिरात करून, ‘तेलंगणा राज्याचे सुपुत्र’ असे संबोधून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांना अभिवादन केले. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनीही टि्वट करून राव यांचे स्मरण केले. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात वावरलेल्या कोणत्याही व्यक्तीचे जन्मशताब्दी वर्ष अनेक कारणांमुळे महत्त्वाचे असते. त्या व्यक्तीच्या विचारांचे व कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी हा सर्वोत्तम कालखंड असतो. या पार्श्वभूमीवर नरसिंह राव यांचेही मूल्यमापन आगामी वर्षात व्हावे अशी अपेक्षा करणे आहे.

जून 1991 ते मे 1996 अशी पाच वर्षे ते देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर ते आठ वर्षे ते हयात होते, पण राजकारणात सक्रिय नव्हते. म्हणजे त्यांची राजकीय कारकीर्द संपली त्याला आता पावशतक पूर्ण होत आहे. वय वर्षे 70 ते 75 या काळात त्यांनी देशांचे नेतृत्व केले. त्याआधी जवळपास दोन दशके केंद्रीय स्तरावर वावरताना गृह, परराष्ट्र, मनुष्यबळ विकास इत्यादी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. त्याच्या आधीची तीन दशके ते आंध्रप्रदेश राज्यात कार्यरत होते आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास त्यांनी केला होता. त्याच्याही आधी म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता, काही काळ पटवारी (तलाठी) म्हणून काम केले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या ‘आऊट इनसायडर’ या पुस्तकात स्वतःच्या प्रवासाचे वर्णन From Patwari to Prime Minister, no celebration at any stage असे केले आहे.  तर मुद्दा असा की, त्यांनी आपल्या प्रवासातील कोणत्याही नव्या टप्प्याचे सेलिब्रेशन केले नाही, पण आपण आता तरी करायला हवे. कारण त्यातून मागील तीन दशकांचा देशाचा प्रवास समजून घेण्यासाठी बरेच उपयुक्त असे काही मिळू शकते.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहायचे ठरवले, मात्र काँग्रेसचा नवा अध्यक्ष व नवा पंतप्रधान ठरवण्याचे काम त्या वेळी सोनिया गांधीच करणार होत्या. तेव्हा के.नटवर सिंग यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, ‘पी.एन.हक्सर यांच्या सल्ल्यानुसार सोनियांनी आधी शंकरदयाळ शर्मा यांची निवड केली होती. मात्र त्या वेळी उपराष्ट्रपती असलेल्या शर्मा यांनी पंतप्रधानपद हे पूर्णवेळेचे काम आहे आणि वाढते वय व प्रकृती यामुळे ते स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला होता. त्यानंतर हक्सर यांच्याच सल्ल्यानुसार नरसिंह राव यांना निरोप पाठवण्यात आला. आणि मग सामानाची आवराआवर करून हैदराबादला स्थायिक होण्यासाठी निघालेल्या राव यांनी तो निर्णय रहित करून, पुढील पाच वर्षे दिल्लीतच थांबण्याचा निश्चय केला.’

राव पंतप्रधान झाले त्या वेळी देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठीही अभूतपूर्व परिस्थिती होती. कारण देश आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर होता, भाजपाच्या धार्मिक राजकारणाने कळस गाठलेला होता. देशात तिसऱ्या प्रवाहाचे व  प्रादेशिक स्तरांवरील अनेक पक्ष फोफावत चालले होते. सोव्हिएत युनियनचे विघटन नुकतेच झाले होते आणि आखाती युद्धाचा हादरा अर्ध्याहून अधिक जगाला बसला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी समीकरणे उदयाला येणार होती. त्यातच भर म्हणजे अल्पमतात (लोकसभेतील  बहुमतापासून 25 जागा दूर) असलेले सरकार त्यांना चालवायचे होते. काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांना सांभाळून सत्ता राबवायची होती.

त्या सर्व प्रक्रियेत अनेक उलाढालींचा सामना करीत नरसिंहरावांनी पूर्ण पाच वर्षे सरकार चालवले. ‘आर्थिक सुधारणांचे उद्‌गाते’ हे बिरूद आज त्यांच्या नावावर नोंदवले जाते आहे खरे, पण त्या वेळी आणि नंतरही दशकभराहून अधिक काळ त्यासाठी त्यांना अनेकांकडून ‘खलनायक’ ठरवले गेले. बाबरी मशीद पाडली गेली ती भाजप व संघ परिवारातील संघटनांनी, पण त्यांच्या वर्तनाला रावांची निष्क्रियता किंवा मूकसंमती कारणीभूत ठरली, असे आजही समजले जाते. त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी कहर केला होता. काँग्रेस पक्षातून मोठ्या नेत्यांची अभूतपूर्व गळती झाली तीही त्यांच्याच काळात. ती एकूण गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर मती गुंग होण्याचीच शक्यता अधिक!

मात्र त्या सर्व निर्णयांकडे नरसिंह राव हे एक प्रक्रिया म्हणूनच पाहत होते. मागील काही हजार वर्षे चालत आलेला हा जनप्रवाह आहे आणि पुढील हजारो वर्षे तो चालत राहणार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या-त्या प्रसंगी निर्धार व उत्कटता आणि त्याचबरोबर तटस्थता व अलिप्तता असा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला असावा. परिणामी तत्त्व आणि व्यवहार अशी निवड करायची वेळ आली तेव्हा त्यांनी काही वेळा तत्त्वाच्या तर काही वेळा व्यवहाराच्या बाजूने कौल दिला असावा. त्यांनी एनडी टीव्हीवर मे 2004 मध्ये शेखर गुप्ता यांना दिलेल्या दीर्घ मुलाखतीत त्यांच्या या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते. तेव्हा त्यांना सत्तेपासून दूर होऊन आठ वर्षे झाली होती, काँग्रेस पक्षाने अनौपचारिकरीत्या तरी बाहेर काढले होते, अनेक न्यायालयीन खटल्यांचे निकाल लागून त्यांची त्यातून सुटका झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेली ती शेवटची मुलाखत ठरली.

त्यानंतर सहाच महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. पण आपण अर्थमंत्री या नात्याने थेट राजकारणात आणले ते मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झालेले त्यांना पाहायला मिळाले. अर्थात त्याकडेही त्यांनी अलिप्तपणेच पाहिले असणार. मनमोहन यांना ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असे संबोधले गेले, पण त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर नरसिंह रावसुद्धा ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरच म्हणावे लागतील, पण रावांनी ते मान्य केले नसते. मनमोहन यांना रावांनी थेट अर्थमंत्री पदावर आणले, यात अनेकांना जुगार किंवा अपघात किंवा योगायोग वाटत असला तरी, राव यांना तसे वाटले नसणार. कारण 1970 ते 90 अशी दोन दशके इंदिरा व राजीव पंतप्रधान असताना मनमोहन हे त्यांच्या निकटच्या वर्तुळात होते. त्यामुळे, त्यांचे अर्थमंत्री म्हणून निवडले जाणे व पंतप्रधान होणे हा एका प्रक्रियेचाच भाग आहे, असेच राव म्हणाले असतील.

एवढेच कशाला, 1991 मध्ये आर्थिक सुधारणा किंवा उदारीकरण पर्व या देशात अवतरले हा अपघात नाही तर, अनेक वाटा-वळणे व खाच-खळगे असलेल्या लांबलचक प्रक्रियेचा भाग आहे, असे राव यांनी त्या शेवटच्या मुलाखतीत निःसंदिग्धपणे सांगितले आहे. त्याची तर्कशुद्ध कारणमीमांसाही केली आहे. ‘आपण चालत असतो त्याची अशी काही गती असते, पण आपण ज्या रस्त्यावरून चालत असतो त्या रस्त्याला ही स्वतःची अशी गती असते; त्यामुळे 1991 मध्ये गतिमान रस्त्यावर वळण आले म्हणून आम्हीही वळलो,’ असे फिलॉसॉफिकल उत्तर त्यांनी दिले होते. एवढेच नाही तर, ‘हा तोच रस्ता आहे ज्यावरून नेहरू चालले आहेत’ असेही स्पष्टपणे सांगून ते पुढे म्हणाले, ‘हाच रस्ता भारताला पुढे पुढे घेऊन जाईल.’

‘भारताच्या भविष्याबद्दल मी अजिबात चिंतित नाही,’ असा विश्वासही त्या वेळी जवळपास राजकीय हद्दपारीचे जीवन व्यतीत करीत असलेल्या राव यांनी व्यक्त केला होता. म्हणूनच तो विश्वास व त्या धारणा यांचा शोध घेण्यासाठी तरी त्यांची जन्मशताब्दी विविध कार्यक्रम व उपक्रम यांद्वारे साजरी व्हायला हवी आहे. पण प्रश्न असा आहे की, काँग्रेस पक्षामध्ये वरपासून खालपर्यंत नाकर्तेपणा व नतद्रष्टेपणा पुरेपूर मुरलेला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी नेहरूंचे सव्वाशेवे जयंतीवर्ष व पन्नासावे स्मृतिवर्ष साजरे केले नाही आणि तीन वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दीही साजरी केली नाही. त्यामुळे ते नरसिंह रावांचे काय करणार?

Tags: नरसिंह राव जन्मशताब्दी संपादकीय vinod shirsath editorial narasimh rao weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Sachin Jagtap- 10 Jul 2020

    NarsinhaRao, History will remember him forever.

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात