Diwali_4 नक्षलवादाचे आव्हान पेलवणार तरी कसे?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

नक्षलवादाचे आव्हान पेलवणार तरी कसे?

नक्षलवादाने प्रभावीत असलेल्या क्षेत्रात काम करायला नोकरदार,स्वयंसेवी संस्था व उद्योग-व्यापार करू इच्छिणारे लोक तयार करणे हे मोठेच आव्हान ठरणार आहे. हे आव्हान पेलवण्यासाठी त्याभागातील पोलिस-दल कार्यक्षम असले पाहिजे. पण परिस्थिती नेमकी उलटी आहे. अकार्यक्षम, भ्रष्ट किंवा नको असलेले अधिकारी व पोलिस अशा भागात पाठवले जातात. आणि जे कोणी नक्षलवाद्यांशी मुकाबला करू इच्छितात त्यांच्या हाती पुरेसे शस्त्र नसणे इथपर्यंत बिकट अवस्था केली आहे. आणि त्यामुळेच 15 पोलिस मारले गेल्यानंतर 1500 पोलिस पाठवण्याची नामुष्की सहन करावी लागली, म्हणजे भारतीय लोकशाहीला सर्वांत गंभीर अंतर्गत धोका नक्षलवादापासून आहे, हे वास्तव या हल्ल्याने पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे आले आहे.

1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी या खेड्यात उगम पावलेला ‘नक्षलवाद’ देशभरातील जवळपास 150 जिल्ह्यांसाठी मोठीच समस्या बनला आहे. प.बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांतील डोंगराळ, दुर्गम व जंगल प्रदेशात तर या समस्येने फारच उग्र स्वरूप धारण केले आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती पोलीस स्टेशनच्या 15 पोलिसांना जवळपास 150 नक्षलवाद्यांनी घेराव टाकून ठार केले आणि आता त्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने 1500 सशस्त्र पोलिसांचा ताफा गडचिरोली नजिकच्या जंगलात रवाना केला आहे. अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार करणारे जमीनदार,सावकार, प्रशासकीय, अधिकारी, पोलीस, राजकीय नेते यांच्यावरच हे हल्ले होत आहेत असा एक समज आहे, पण सामान्य जनतेवर दहशत बसविण्यासाठी, लुटमार करण्यासाठी व तस्करी करण्यासाठी होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण यात अधिक आहे. सुरुवातीला ‘वर्गसंघर्षाचा लढा’ असे याला संबोधले गेले, पण त्याला आता ‘टोळीवर्चस्वाचा लढा’ असे स्वरूप आले आहे. त्यामुळेच नक्षलवाद हा अंतर्गत सुरक्षितता व विकास यांच्या मार्गातील मोठाच अडथळा बनला आहे. गडचिरोली पोलिसांवरील हल्ल्याला निमित्त काय होते? या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘सावरगाव ते कोटगुल’ मार्गावरील पुलाचे बांधकाम चालू आहे, ते काम त्वरीत थांबवावे यासाठी तेथील ट्रॅक्टर व रोलर नक्षलवाद्यांनी जाळून टाकले. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले होते. 

अगदी अशिक्षित आदिवासींपासून उच्चशिक्षित कॉस्मोपॉलिटन तरुणांपर्यंतचे काही हजार लोक व्यवस्था उलथवून टाकण्याच्या मृगजळामागे धावत आहेत असे गेली चाळीस वर्षे बोलले जात आहे. पण मार्क्स, लेनिन, माओ यांचे वर्ग संघर्षाचे अर्धे-कच्चे विचार घेऊन चारू मुजुमदार व कनू सन्याल यांनी लावलेल्या विषवृक्षाची फळे आता सर्वदूर पसरली आहेत. हे असे का झाले, याबाबतचा विचार आतापर्यंत खूप मांडला गेला, पण त्यानुसार कृती झाली नाही. पर्यायाने आज विविध राज्य सरकारे व केंद्र सरकार यांना एकत्र येऊन ठोस व प्रभावी कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नक्षलवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास शक्य तितक्या वेगाने करीत राहणे आणि त्या भागातील पोलिस दल अधिक सक्षम व भक्कम बनवत राहणे अशा दुहेरी मार्गाने धावावे लागेल. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी आणि उद्योग व व्यापार असा हा दीर्घकालीन प्रवास विकासासाठी करावा लागणार आहे. पण भौगोलिक परिस्थितीच्या मर्यादा,प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता व पायाभूत सुविधांचा अभाव हे तेथील विकासाच्या मार्गातील अडथळे ठरणार आहेत.

त्यातच भर म्हणजे नक्षलवादाने प्रभावीत असलेल्या क्षेत्रात काम करायला नोकरदार,स्वयंसेवी संस्था व उद्योग-व्यापार करू इच्छिणारे लोक तयार करणे हे मोठेच आव्हान ठरणार आहे. हे आव्हान पेलवण्यासाठी त्याभागातील पोलिस-दल कार्यक्षम असले पाहिजे. पण परिस्थिती नेमकी उलटी आहे. अकार्यक्षम, भ्रष्ट किंवा नको असलेले अधिकारी व पोलिस अशा भागात पाठवले जातात. आणि जे कोणी नक्षलवाद्यांशी मुकाबला करू इच्छितात त्यांच्या हाती पुरेसे शस्त्र नसणे इथपर्यंत बिकट अवस्था केली आहे. आणि त्यामुळेच 15 पोलिस मारले गेल्यानंतर 1500 पोलिस पाठवण्याची नामुष्की सहन करावी लागली, म्हणजे भारतीय लोकशाहीला सर्वांत गंभीर अंतर्गत धोका नक्षलवादापासून आहे, हे वास्तव या हल्ल्याने पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे आले आहे.

Tags: nakshalvadgrasta bhag नक्षलवादग्रस्त भाग kanu sanyal कनू सन्याल charumujumdar चारू मुजुमदार nakshalvadi halle नक्षलवादी हल्ले police thar पोलीस ठार shanora धानोरा gadchiroli गडचिरोली nakhslabadi नक्षलबाडी nakashalvad नक्षलवाद नक्षलवादाचे आव्हान पेलवणार तरी कसे?nakhalvadache avhan pelvanar tari kase? weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात