Diwali_4 नोबल आणि नोबेल अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

नोबल आणि नोबेल अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन

वस्तुतः या पुस्तकावर अर्थशास्त्रातील व त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तीच तेवढे अधिकारवाणीने व नेमकेपणाने लिहू शकतील. त्यातील खरी सौंदर्यस्थळे अधोरेखित करू शकतील, त्यातील मर्यादा वा दोषही दाखवू शकतील. जनरॅलिस्ट लोक फार तर यातील प्रत्येक प्रकरणावर परिचयपर म्हणावा असा स्वतंत्र लेख लिहू शकतील. तसा एक लेख यातील ‘स्थलांतर’ या प्रकरणावर पुढील अंकात प्रसिद्ध करणार आहोत. मात्र आज इथे केवळ अंगुलीनिर्देश करायचा आहे तो त्या दोघांच्या दृष्टिकोनांकडे. या पुस्तकातील प्रास्ताविक, पहिले प्रकरण (Make Economics Great Again)  आणि निष्कर्ष सांगणारे परिशिष्ट (Good and Bad Economics)  या तिन्हींवर काळजीपूर्वक नजर टाकली तरी त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसू शकते.

गेल्या वर्षीचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अभिजित बॅनर्जी व एस्थर डफ्लो या दोघांना देण्यात आले. अभिजित हे मूळचे भारतीय तर एस्थर या फ्रेंच. अभ्यासाच्या निमित्ताने ते एकत्र आले आणि नंतर पतिपत्नी झाले. तळागाळातील समूह हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आणि behavioural economics त्यांच्या विशेष आवडीचा प्रांत. भारत, फ्रान्स येथे त्यांच्या संशोधनाचा कालखंड जास्त असला तरी विकसनशील देशांच्या आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यात त्यांना विशेष रस. मानवी वर्तनाशी संबंधित अर्थकारण जास्त अभ्यासल्यामुळे असेल किंवा अंगभूत वृत्ती म्हणून असेल, ते दोघेही अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही नम्र (नोबल) आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वी Poor Economics नावाचे पुस्तक लिहिले होते, ते खूप नावाजलेही गेले होते. पण गेल्या वर्षी आलेले त्यांचे Good Economics for Hard Times हे पुस्तक मात्र विशेष गाजते आहे.

तीनशे पानांच्या या पुस्तकाच्या नावातूनच वाचकांचा असा समज होतो की, आत्ताचा काळ कठीण आहे आणि तो सुधारण्यासाठी चांगले अर्थशास्त्र काय असू शकते, हे या पुस्तकातून  सांगितले आहे. हा समज अगदीच चुकीचा ठरत नाही, पण ते सांगताना लेखकद्वयांची भूमिका अनाग्रही आहे. किंबहुना आपला सभोवताल समजून घेण्याची आहे, समजावून देण्याची आहे. तर मानवी स्थलांतर, उद्योग व्यापार, मानवी वर्तन, पर्यावरण, आर्थिक वाढ, करपद्धती, तंत्रज्ञान, शासनाचा हस्तक्षेप एवढेच निवडक विषय केंद्रस्थानी ठेवून यातील प्रकरणे लिहिली गेली आहेत. ते दोघे जरी अर्थशास्त्रज्ञ असले आणि त्यांचे सर्वच लेखन संशोधनावर आधारित असले तरी हे पुस्तक ॲकॅडेमिक पद्धतीचे नाही. त्यामुळे सध्याच्या काळाबद्दल कुतूहल असणाऱ्या जनरॅलिस्ट वाचकांसाठी ते चांगलाच बौद्धिक आनंद देणारे आहे. अर्थात त्यासाठी बरेच संदर्भ माहीत असण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. या पुस्तकात जागोजागी  भरपूर उदाहरणे येतात, ती सामान्यतः रोचक आहेत, पण ज्यांना मूळ विषय थेट समजून घेण्याची सवय असते त्यांना ही पद्धती अडथळा निर्माण करणारी वाटू शकते. शिवाय, जगभरातील विविध अभ्यासकांनी केलेले संशोधन या पुस्तकात विवेचन विश्लेषणासाठी वापरले आहे (यामुळे संदर्भसूची 75 पानांची झाली आहे), तो प्रकारही वाचनाची गती कमी करणारा ठरू शकतो. पण तरीही या पुस्तकाला भिडायला हवे.

वस्तुतः या पुस्तकावर अर्थशास्त्रातील व त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तीच तेवढे अधिकारवाणीने व नेमकेपणाने लिहू शकतील. त्यातील खरी सौंदर्यस्थळे अधोरेखित करू शकतील, त्यातील मर्यादा वा दोषही दाखवू शकतील. जनरॅलिस्ट लोक फार तर यातील प्रत्येक प्रकरणावर परिचयपर म्हणावा असा स्वतंत्र लेख लिहू शकतील. तसा एक लेख यातील ‘स्थलांतर’ या प्रकरणावर पुढील अंकात प्रसिद्ध करणार आहोत. मात्र आज इथे केवळ अंगुलीनिर्देश करायचा आहे तो त्या दोघांच्या दृष्टिकोनांकडे. या पुस्तकातील प्रास्ताविक, पहिले प्रकरण (Make Economics Great Again)  आणि निष्कर्ष सांगणारे परिशिष्ट (Good and Bad Economics)  या तिन्हींवर काळजीपूर्वक नजर टाकली तरी त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसू शकते.

चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश लेखकाने ‘हार्ड टाइम्स’ नावाची कादंबरी पावणेदोनशे वर्षांपूर्वी लिहिली होती, त्या काळात ‘आहे रे आणि नाही रे’ वर्गातील दरी कमालीची वाढली होती. तिचा संदर्भ देऊन आताचा काळ किती व कसा कठीण आहे हे सांगताना, लेखकद्वय आजच्या काळाचा उल्लेख ‘ध्रुवीकरणाचे युग’ असा करतात. त्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, ‘डाव्या व उजव्या विचारप्रवाहांमधील दरी इतकी रुंदावली गेली आहे की, लोकशाही व वादसंवाद यांचे स्थान धोक्यात आले आहे. डाव्या व उजव्या प्रवाहांच्या परस्परांवरील टीकेला केवळ कर्कशपणा, आक्रस्ताळेपणा, शिवीगाळ असे स्वरूप आले आहे. आकडे फेकले जातात, तथ्ये तपासली जात नाहीत. आणि आपल्या विरोधकांविषयी किमान पातळीवरही आदर निर्माण व्हायचा असेल, तर ते काय म्हणत आहेत हे समजून घेणे ही पूर्वअट असते. म्हणजे तथ्ये तपासून व त्यांचा अन्वय लावून दुसरी बाजू काय म्हणते आहे, हे समजून घ्यायला हवे आणि मग असहमती व्यक्त करायला हवी, त्याबाबत ठाम राहायला हवे. पण हे घडून येण्यासाठीचा अवकाशच झपाट्याने आकुंचन पावत आहे.’ यासंदर्भात ते अमेरिकेतील डेमोक्रॅट व रिपब्लिक या दोन राजकीय पक्षांमध्ये किती मोठे अंतर पडले आहे, हे उदाहरणासह सांगतात. एका पक्षातील 80 टक्के लोकांचे मत दुसऱ्या पक्षाबद्दल नकारात्मक आहे.

हे पुस्तक का लिहावेसे वाटले याबाबत सांगताना ते म्हणतात, ‘ओबामा कालखंडानंतर अमेरिकेसह जगातील अनेक देशांत एकाधिकारशाहीवादी नेते सत्तास्थानी आले. म्हणजे गेल्या पाच-सहा वर्षांत. या काळात काय चुकीचे घडते आहे हे सांगण्यासाठी आणि काय चांगले घडत आले आहे, याची आठवण करून देण्यासाठी आम्ही हे पुस्तक लिहिले.’ त्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, ‘त्यासाठी आम्ही योग्य आहोत म्हणून हे पुस्तक लिहिले असे झालेले नसून, सभोवतालची चर्चा पाहवत/ऐकवत नाही म्हणून हे लिहिले आहे.’

खालावत जाणाऱ्या अर्थकारणाचा उल्लेख ते आजच्या जगापुढील सर्वांत मोठे आव्हान असा करतात, स्पेस ट्रॅव्हल आणि कॅन्सर यांच्यापेक्षा कठीण असेही नोंदवतात. आताच्या अर्थकरणामुळे चांगले जीवनमान व उदारमतवादी लोकशाही धोक्यात आली आहे असे त्यांना वाटते. त्यावर भाष्य करताना ते म्हणतात, ‘हे अर्थकारण सुधारण्यासाठी आपल्याकडे साधनसंपत्ती भरपूर आहे, पण कल्पनांची कमतरता आहे. अशा कल्पना ज्यांच्या साह्याने असहमती व अविश्वास यांच्या कुंपणावरून उडी मारता येईल.’ ही उडी कशी मारता येईल याबाबत ते सुचवतात, ‘जगातील सर्वोत्तम मनांनी (मार्इंड हाच शब्द त्यांनी वापरलाय, ब्रेन नाही), सरकारे आणि नागरी समाज यांच्यासोबत काम करायला हवे.’

पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे? राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ आणि नागरी समाज या तिन्हींच्या आताच्या परस्पर-संबंधावर या दोघांनी केलेले भाष्य चिंता करावी अशी आहे. इंग्लंडमध्ये 2011 मध्ये झालेला एक अभ्यास आणि या दोघांनी अमेरिकेत 2017 मध्ये केलेला अभ्यास असे सांगतो की, ‘जनतेचा सर्वांत जास्त विश्वास परिचारिकांवर (84 टक्के) आहे तर सर्वांत कमी विश्वास राजकीय नेत्यांवर (20 टक्के) आहे. अर्थतज्ज्ञांचा क्रमांक शेवटून दुसरा आहे (25 टक्के). अर्थतज्ज्ञ आपापल्या प्रारुपाला व अभ्यासपद्धतीला इतके चिकटून बसलेले असतात की, विज्ञान कुठे संपते आणि तत्त्वप्रणाली (आयडिऑलॉजी) कुठे सुरू होते, याबाबत त्यांचे भान सुटते. दुसऱ्या बाजूला राजकीय नेते त्यांच्यावर आदळलेली परिस्थिती आणि जनतेचा राग, संताप, अपेक्षा यांच्या दुष्ट वर्तुळातून बाहेर पडू शकत नाहीत.’

असो. तर अशा या पुस्तकाचा संपूर्ण भर आहे तो नव्या कल्पना उदयाला येण्यावर, त्यानुसार आर्थिक धोरणे आखण्यावर, त्यावर स्थळ काळाप्रमाणे बदल करण्यावर! आणि म्हणूनच रघुराम राजन यांनी या पुस्तकावर अभिप्राय देताना म्हटले आहे- ‘आर्थिक धोरणांवर वादसंवाद करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शिका म्हणून हे पुस्तक वापरायला हवे.’ आणि पुढे जाऊन या दोन लेखकांविषयी ते म्हणतात, ‘आपल्याला असायला पाहिजे होते पण मिळाले नाहीत, असे हे शिक्षक आहेत.’ म्हणून यांच्या दृष्टिकोनाची किंमत अधिक!

Tags: नोबेल विजेते अर्थतज्ञ संपादकीय विनोद शिरसाठ गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम्स vinod shirsath nobel economist noble poor economics Good Economics for Hard Times editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात