Diwali_4 जडत्व हटले, चैतन्य येणार?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

जडत्व हटले, चैतन्य येणार?

काँग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत दिले आणि शरद पवार व अन्य लहान-मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे भाजपविरोधात मोठी आघाडी उभी राहण्याची शक्यता वाढू लागली. परंतु त्यानंतर आणखी एक छोटी कलाटणी मिळाली, जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी काँग्रेस व भाजप यांना पर्याय देऊ शकणाऱ्या तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करण्याची तयारी दाखवली.

ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता हटवून भाजपने सत्ता स्थापन केली, तेव्हा भाजपच्या भारतविजयाची चर्चा शिगेला पोहोचली. कारण आजघडीला देशभरातील 21 राज्यांत भाजपची सत्ता आहे. अशा प्रकारचे वर्चस्व काँग्रेस पक्षाला पं.नेहरू व इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातच प्रस्थापित करता आले होते. परिणामी मोदी-शहा या जोडीला रोखणे आता अवघड असून, भाजपचा 2019 चा लोकसभा निवडणूक विजय निश्चित झाला आहे अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्या विजयाला जेमतेम आठवडाभरही उलटत नाही तोच, चर्चेची दिशाच बदलून गेली आहे. आंध्र प्रदेशातील तेलगु देसम पार्टी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होती, परंतु आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून किंवा ते निमित्त करून त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आधी केंद्र सरकारमधून तेलगु देसमच्या मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगणे, नंतर रालोआमधून बाहेर पडणे आणि त्यानंतर थेट केंद्र सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याची तयारी करणे, इतके सारे पाच-सात दिवसांत घडून आले. तेलगु देसमचे 16 खासदार आघाडीतून बाहेर पडल्याने आणि शिवसेनेचे 18 खासदार सतत काठावर असल्याच्या अविर्भावात असल्याने, भाजपचे लोकसभेतील संख्याबळ साध्या बहुमतापासून दोन-चार जागांनीच जास्त आहे हे सर्वांच्या लक्षात आले. तेव्हा भाजप व मोदी-शहा ही जोडी आपण समजतो तितकी शक्तिशाली नाही, हे साधेच सत्य पुन्हा समोर आहे. त्यानंतर लगेचच दिल्लीत भरलेले काँग्रेसचे महाअधिवेशन चर्चेत आले. पक्षाच्या अध्यक्षपदावर राहुल गांधी आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असल्याने, काही जुने पायंडे मोडीत काढून तरुण रक्ताला पुढे करण्याची भाषा सुरू झाली. त्यातच मनमोहनसिंग, चिदंबरम व सोनिया गांधी यांच्या आक्रमक भाषणांमुळे काँग्रेसचे जडत्व हटत असल्याचे चित्र निर्माण झाले.

काँग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत दिले आणि शरद पवार व अन्य लहान-मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे भाजपविरोधात मोठी आघाडी उभी राहण्याची शक्यता वाढू लागली. परंतु त्यानंतर आणखी एक छोटी कलाटणी मिळाली, जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी काँग्रेस व भाजप यांना पर्याय देऊ शकणाऱ्या तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करण्याची तयारी दाखवली. एकंदरीत विचार करता, ‘राजकारणात एक आठवडा हा खूप मोठा कालावधी असतो’ या गृहितकाची प्रचिती पुन्हा एकदा आली. लोकसभा निवडणुका मुदतीनुसार होणार असतील तर आणखी बरोबर एक वर्ष बाकी आहे. आणि त्यासाठीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे हे चिन्ह आहे. म्हणजे काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांना जे ‘जडत्व’ आले होते, ते आता हटत आहे असे दिसते आहे. पण चैतन्य येणार का, हा खरा प्रश्न आहे. लोकशाहीच्या वाढीसाठी व विकासासाठी विरोधी पक्षांमध्ये असे चैतन्य येणे आवश्यक आहे. देशातील लोकशाहीवादी जनता त्या चैतन्याच्या प्रतीक्षेत आहे.         

Tags: निवडणूक विरोधी पक्ष संपादकीय विनोद शिरसाठ opposition virodhipaksha sampadakiy editorial vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात