डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजकीय सौदेबाजी आणि निष्ठावंतांचा बळी

नगरचे डॉ. एस्. टी. महाले हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हिरीरीने भाग घेतला. आणीबाणीत त्यांनी एकोणीस महिने कारावास भोगला. आजवर डॉक्टर महाले यांनी पक्षाकडे काही मागितले नाही. तन-मन-धन दिले. यावेळी त्यांनी उभे रहावे असा निष्ठावान कार्यकत्यांनी आग्रह धरल्यावर त्यांनी उभे राहण्याचे मान्य केले. असे असताना डॉ. महाले यांना डावलून काँग्रेसमधून नव्याने आलेले अरूण जगताप यांना तिकिट देण्यात आले. जनता दलातील ज्या संधिसाधू नेत्यांनी या कारवाया केल्या, त्यांच्या वागण्यास मृणालताई आणि डॉ. काळदाते यांनी संमती दिली याचे आम्हाला दुःख होते.

केंद्रामध्ये राष्ट्रीय आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जनता दलाला भारतीय राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त होणे अपरिहार्य होते आणि ते घडले हे योग्यच झाले. पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग, यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने गेल्या दोन महिन्यात जी पावले टाकली आहेत ती स्वागतार्ह आहेत. देशापुढील महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी देशातील सर्व पक्षांचे सहकार्य मिळविण्याचे आणि त्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे जे प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत ते खासच स्तुत्य आहेत. यामुळे देशातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या असून, लोकमत जनता दलाला अधिकाधिक अनुकूल होत आहे. याचाच परिणाम म्हणजे काँग्रेसमधील असंतुष्टांचा लोंढा जनता दलाकडे वळला आहे. सत्ता व संपत्ती हेच उद्दिष्ट ठेवून राजकारण करणारी अनेक मंडळी जनता दलात प्रवेश करू लागली आहेत.

लोकशाही पद्धतीने कार्य करणाऱ्या पक्षाला कोणाला नाकारता येत नाही हे खरे आहे. कार्यकत्यांचे पक्ष-केडर पार्टी- म्हणून जे राजकीय पक्ष कार्य करतात त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. पक्षात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यास अनेक दिवस उमेदवारी करावी लागते. त्यांच्या कसोट्या घेतल्या जातात. नंतरच त्यांना प्रवेश दिला जातो.कम्युनिस्ट पक्षाची ही कार्यपद्धती आहे. जनता दल असे वागू शकणार नाही. लोकशाही संकेताप्रमाणे कोणालाही या पक्षात सामील होता येते. परंतु सामील होण्याची सवलत वेगळी आणि एकदम अधिकारपद देणे किंवा निवडणुकीस उभे करणे वेगळे. शालिनीताई पाटील आणि बाबासाहेब भोसले यांना काँग्रेसमध्ये कोणतेच स्थान उरले नसल्यामुळे ते जनता दलात आले. त्यांचे जनता दलात ज्या रितीने स्वागत करण्यात आले, ते आम्हाला आणि सर्वसामान्य माणसालाही आक्षेपार्ह वाटते.

विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मृणालताई गोरे यांनी या मंडळींचे मनःपूर्वक स्वागत केले, त्यावेळी आम्ही अवाक् झालो. मृणालताईंची जनमानसात जी प्रतिमा आहे ती तत्त्वाबाबत तडजोड न करणाऱ्या लढाऊ नेत्या अशी आहे. त्यांनीच तत्त्वभ्रष्टांना पाठिंबा दिला आणि त्या प्रांताध्यक्ष असतानाच शालिनीताईंना जनता दलातर्फे उभे करण्यात आले ही तत्त्वच्युती नाही का? 

गेल्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी जी राजकीय सौदेबाजी जनता दलाने महाराष्ट्रात केली, त्याची दोन तीन उदाहरणे दिली तरी त्यावरून हे वीष अल्पकाळात जनता दलात कसे भिनले आहे ते कळून येईल. अहमद झकेरिया हे इंदिरा काँग्रेसचे विद्यमान आमदार. त्यांनी तिकिटासाठी काँग्रेसकडे अर्ज केला. निवडणूक मंडळासमोर त्यांनी मुलाखतही दिली. त्यांना तिकिट नाकारण्यात येताच त्यांनी जनता दलाकडे तिकिट मागितले आणि त्यांना ते तात्काळ देण्यात आले. अशा संधिसाधू व्यक्तींना तिकिटे देऊन जनता दल स्वतःचीच बदनामी करीत आहे. शालिनीताई आणि अहमद झकेरिया यांना तिकिट देताना जनता दलाच्या कोणी प्रभावी वा निष्ठावान कार्यकर्त्यांनी या मतदासंघात तिकिट मागितलेच नव्हते म्हणून हा निर्णय घेण्यात आला असे समर्थन देण्यात आले. हे समर्थन लंगडे आहे. परंतु नगर शहरात असेही समर्थन करता येणार नाही. 

नगरचे डॉ. एस्. टी. महाले हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हिरीरीने भाग घेतला. आणीबाणीत त्यांनी एकोणीस महिने कारावास भोगला. आजवर डॉक्टर महाले यांनी पक्षाकडे काही मागितले नाही. तन-मन-धन दिले. यावेळी त्यांनी उभे रहावे असा निष्ठावान कार्यकत्यांनी आग्रह धरल्यावर त्यांनी उभे राहण्याचे मान्य केले. असे असताना डॉ. महाले यांना डावलून काँग्रेसमधून नव्याने आलेले अरूण जगताप यांना तिकिट देण्यात आले.

जनता दलातील ज्या संधिसाधू नेत्यांनी या कारवाया केल्या, त्यांच्या वागण्यास मृणालताई आणि डॉ. काळदाते यांनी संमती दिली याचे आम्हाला दुःख होते. डॉ. महाले यांच्यासारखा निष्ठावान कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही. ती त्यांनी करूही नये, परंतु जनता दलाने त्यांना डावलून स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेतले आहे. जन्मभर नगर काँग्रेसमधील एका गटाचे हस्तक म्हणून वावरणाऱ्या एका नेत्याचा यात विजय झाला आहे. 

धुळे शहरात श्रीमती विजया चौक या अनेक वर्षे प्रभावीपणे कार्य करीत आहेत. मृणालताई अध्यक्ष असताना स्त्रियांना प्रतिनिधत्व मिळेल असे वाटत होते. धुळ्याच्या विजया चौक यांच्यासारख्या झुंजार महिलेस निवडणुकीत तिकिट मिळावयास हवे होते, परंतु जनता दलाच्या धुळे जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय सौदेबाजी करून विजयाबाईंना डावलले आहे. असे संधिसाधू नेतृत्व जनता पक्षास लाभल्यावर मृणालताईंनाही काही दिवसात अध्यक्षपद सोडावे लागेल अशी आम्हाला भीती वाटते. भारतीय जनता पक्ष या पक्षात इतरांपेक्षा अधिक शिस्त आहे, परंतु या पक्षाने महाराष्ट्रात शिवसेनेचे मांडलिकत्व पत्करून स्वतःचे हसे करून घेतले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघावर कितीही दुगाण्या झाडल्या तरी भाजपचे महाजन त्या हिंदू पतिव्रतेच्या सोशिकपणाने झेलतात. महाजन एकच प्याल्यातील सिंघूप्रमाणे बाळासाहेबाचे पाय धरून 'कशि या त्यजू पदाला' हे पद आळवीत आहेत. याचा परिणाम म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. जनुभाऊ काळे आणि त्यांचे सहकारी यांनी बंडखोरी करून पक्षाचा राजिनामा दिला आहे. संधिसाधू राजकारणासाठी ज्या अनिष्ट तडजोडी भाजप करीत आहे, त्यामुळे जनुभाऊच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.

काँग्रेसमधील बंडखोरीबद्दल बोलायलाच नको. मागे यशवंतराव चव्हाण यांनी 1962 च्या निवडणुकीपूर्वी प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील अनेकांना सत्तेचे अमिष दाखवून काँग्रेसमध्ये आणले. यशवंतरावांचे वारस शरद पवार यांना त्यांच्या पक्षातील अनेकजण फुटके जहाज सोडणाऱ्या उंदराप्रमाणे जनता दलात जात असल्याचे पाहावे लागत आहे, हा एक दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. तिरपुडे आणि डॉ. झकेरिया हे उमेदवार-निवड समितीचे सदस्य होते. तेच आता शरद पवारांच्याविरुद्ध बंडखोरी करून उठले आहेत.

काँग्रेसमधील अन्य बंडखोरीचा पाढा वाचणे हा केवळ कालापव्यय होईल. शरद पवार यांनी आणीबाणीत इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. नंतर बंडखोरी करून पुलोद मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर काही वर्षे विरोधी पक्षाचे कातडे पांघरून जहालपणाचा आव आणला. पुन्हा काँग्रेसप्रवेश केला आणि राजीव गांधींशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन मुख्यमंत्रिपद मिळविले. अशा पक्ष-बदलू नेत्याच्या पक्षाच्या चिरफळ्या केव्हा तरी उडणारच. महात्मा गांधींना नैतिक तत्वांचा आचार करण्यासाठी काँग्रेसचे विसर्जन हवे होते. शरद पवार राजकीय अनीती हे सूत्र ठेवून, काँग्रेसचे विसर्जन घडून आणणार असा रागरंग दिसत आहे. 

या सर्व काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी घेतलेली प्रखर तत्त्वनिष्ठ व पुरोगामी भूमिका हा आम्हाला आशेचा किरण वाटतो. शरद जोशी यांनी शिवसेनेचे सत्यस्वरूप जनतेपुढे स्पष्ट शब्दात मांडले असून, हिंदुत्वाची आवई उठवून शिवसेना झुंडशाही माजवीत आहे हे निर्भयपणे सांगितले आहे. भाजपच्या स्वाभिमानशून्य भूमिकेवरही शरद जोशी यांनी तडाखा हाणला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे, ही शरद जोशींची भूमिकाच समाजपरिवर्तनास पोषक आहे. संधिसाधू राजकीय पुढाऱ्यांपेक्षा शरद जोशी अगदी वेगळ्या तऱ्हेने वागत आहेत आणि पुरोगामी शक्तींना बळ प्राप्त करून देण्यासाठी शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे, याबद्दल आम्ही शरद जोशींना मनःपूर्वक धन्यवाद देतो.

तरुण कार्यकर्त्यांच्या मनावर ध्येयवादाचा संस्कार असे नेतेच करू शकतात. राजकीय सौदेबाजीतून तात्पुरता स्वार्थ साधला जाईल, परंतु समाजहित साधून समाजात परिवर्तन करावयाचे असेल तर तत्त्वनिष्ठ भूमिकाच घेतली पाहिजे. प्रा. मधू दंडवते हे तत्त्वनिष्ठ नेते आहेत. अर्थमंत्रीपद सांभाळताना त्यांनी महाराष्ट्रातील संधिसाधू नेत्यांना कानपिचक्या दिल्या पाहिजेत. जनता दलाची झपाट्याने ' काँग्रेस ' होत आहे. हा अधःपात थांबला पाहिजे. राजकीय सौदेबाजी करून तत्त्वांचा आणि निष्ठावान कार्यकत्यांचा बळी देणारा पक्ष देशाला कधीही योग्य दिशा देऊ शकणार नाही.

Tags: धुळे शहर  शेतकरी संघटना जनता दल जनुभाऊ काळे आणीबाणी शरद जोशी प्रा. मधू दंडवते डॉ. एस्. टी. महाले dhule shahar farmers organization Janata dal janubhau kale emergency sharad joshi prof. madhu dandavate dr.s.t. mahale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके