डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गांधीजी खरोखरच 120 वर्षे जगले असते तर काँग्रेसचे विसर्जन झालं असतं का, तो कृती-आराखडा प्रत्यक्षात आला असता का आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेप्रमाणे भारत खरोखरच स्वतंत्र झाला असता का, हा वादाचा विषय होऊ शकतो, पण तो कृती आराखडा निव्वळ कल्पनाविश्वातला नव्हता, हे आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

8 ऑगस्ट 1942 च्या 'चले जाव' ठरावावरील ऐतिहासिक भाषणाचा शेवट करताना गांधीजी म्हणाले होते, "मित्रांनो, मी मरावयास उत्सुक नाही. जगता येईल तेवढे जगण्याची माझी इच्छा आहे. मी 120 वर्षे तरी जगेन असे मला वाटते. एवढया अवधीत हिंदुस्थान स्वतंत्र झालेला असेल. मी स्वतः इंग्लंड किंवा अमेरिका हे देश स्वतंत्र आहेत असे मानीत नाही."

या भाषणानंतर बरोबर पाच वर्षांनी भारत ब्रिटीश सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला; पण गांधीजींच्या कल्पनेनुसार स्वतंत्र झाला नाही. त्यांची स्वातंत्र्याची कल्पना व्यापक होती. '15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं ते राजकीय स्वातंत्र्य आहे. सामाजिक, आर्थिक व नैतिक स्वातंत्र्य मिळवण बाकी आहे’, असंच गांधीजी मानत होते. ही उर्वरित स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काय करता येईल, याचाच विचार ते 15 ऑगस्ट 1947 नंतरच्या साडेपाच महिन्यांच्या काळात करत होते. विशेष म्हणजे त्यांची हत्या झाली त्याच दिवशी 30 जानेवारी 1948 रोजी सकाळी त्यांनी 'काँग्रेसने काय केले पाहिजे' या शीर्षकाखाली एक कृती आराखडा तयार केला होता. 'ब्रिटिशांच्या तावडीतून देशाला मुक्त करणं, राजकीय स्वातंत्र्य मिळवणं, हे राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट होतं: ते साध्य झालं असल्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करावे', हा त्या कृती-आराखड्यातला सर्वात महत्त्वाचा भाग होता. भारतातील सात लाख खेड्यांत सामाजिक, आर्थिक व नैतिक स्वातंत्र्य आणण्यासाठी काँग्रेसने आपलं रूपांतर 'लोक सेवक संघात' करावे, हा त्या आराखड्यातला दुसरा महत्त्वाचा भाग होता.

सत्तेवर राहण्यासाठी राजकीय पक्षांना परस्परांशी स्पर्धा करावी लागते, त्यामुळे राजकीय पक्ष सामाजिक, आर्थिक व नैतिक स्वातंत्र्य आणण्यासाठी फार काही करू शकत नाहीत, असा विचार त्यामागे होता. सत्तेबाहेर राहून 'लोक सेवक संघ' हे काम करू शकेल, असा त्यांचा हृढ विश्वास होता... गांधीजी खरोखरच 120 वर्षे जगले असते तर काँग्रेसचे विसर्जन झालं असतं का, तो कृती-आराखडा प्रत्यक्षात आला असता का आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेप्रमाणे भारत खरोखरच स्वतंत्र झाला असता का, हा वादाचा विषय होऊ शकतो, पण तो कृती आराखडा निव्वळ कल्पनाविश्वातला नव्हता, हे आपल्या सर्वच राजकीय पक्षांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आजचं भारतीय जनमानस राजकीय पक्षांकडून फारशा अपेक्षा बाळगत नाही, यातच गांधीजींचे द्रष्टेपण दिसून येतं.

गांधीजी गेले त्यालाही आता 58 वर्ष झालीत. त्यावेळची काँग्रेस आता राहिली नाही. पण त्यांचाच वारसा सांगणाऱ्या आजच्या काँग्रेसचे महाअधिवेशन गेल्या आठवड्यात हैद्राबाद येथे पार पडलं. त्या अधिवेशनातील नेत्यांची व कार्यकर्त्यांची भाषणं ऐकून वाटतं... बहुतेक काँग्रेसवाले सोनिया, राहुल, प्रियांका यांच्या पायाशी निष्ठा वाहण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे त्यांना गांधीजींच्या काँग्रेसच्या विसर्जनाची व 'लोक सेवक संघ' स्थापन करण्याच्या कृती आराखड्याची आठवण करून देण्यातही अर्थ नाही. आजच्या काँग्रेसचे विसर्जन करण्याची कविकल्पना प्रत्यक्षात अवतरली तरी त्यातून निर्माण होणारा ‘लोक सेवक संघ' गांधीजींच्या कल्पनेप्रमाणे 'स्वतंत्र भारत' निर्माण करू शकत नाही... पण गांधीजींनी सात लाख खेड्यांविषयी उपस्थित केलेला प्रश्न तर अधिकाधिक उग्र बनत चालला आहे... त्यामुळे लोक सेवक संघाची आवश्यकता 1948 पेक्षाही आज जास्तच जाणवते आहे. असा 'लोक सेवक संघ' स्थापन करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी आज गांधीजींच्या ताकदीचा नेता नाही, याचं दुःख नाही; पण तशी इच्छाशक्ती असणारे लोक एकत्र येऊन काम करू शकत नाहीत, हे मात्र वेदनादायक आहे.

Tags: राष्ट्रीय कॉंग्रेस स्वातंत्र्य महात्मा गांधी संपादकीय साप्ताहिक साधना national congress india independence mahatma Gandhi editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके