डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्माच्या आणि जातीच्या नावाने मते मागणे किंवा त्याच कारणासाठी अन्यधर्मीय आणि अन्यजातीय समाजाबद्दल विद्वेष फैलावणे हे आमच्या मते बेकायदा आहे, घटनेविरुद्ध आहे. यदाकदाचित काही न्यायमूर्तींचा निर्णय यापेक्षा वेगळा असेलही, पण तेवढ्याने या अपप्रचाराचे समर्थन होऊ शकणार नाही. तो भारतीय समाजाच्या सामूहिक नीतिमत्तेचा अवमान आहे. आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने कमालीचा विघातक आहे. धार्मिक दुराभिमानाने रंगलेल्या भिंती हा आपल्या भविष्यावर काळा कलंक मात्र आहे. निवडणूक संपेल, प्रचाराची पत्रके फाटून नाहीशी होतील आणि भिंतीही कदाचित पूर्ववत दिसू लागतील, पण यामुळे झालेल्या जखमांचे व्रण लवकर बुजणार नाहीत आणि विचारी राष्ट्रवाद्यांच्या मनावरचे ओरखडे पुसले जाणार नाहीत याचे दु:ख वाटते.

हा अंक वाचकांच्या हाती पडेल तोपर्यंत निवडणुकीचा निकालही लागलेला असेल. प्रचाराची धूळ खाली बसलेली असेल, हे वेगळे सांगावयास नकोच. जय कोणाचा, पराजय कोणाचा, जयपराजयांमागची कारणे काय किंवा त्यांचा भारतीय राजकारणावरचा परिणाम कोणता याचा ऊहापोह नंतर करता येईल. तो होणे आवश्यकही आहे. आज आम्हांला चर्चा करायची आहे ती आपल्या लोकशाही राष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या ज्या पद्धती निर्माण होत आहेत त्याबद्दल. या दृष्टीने गेल्या काही दिवसांतील वस्तुस्थितीचे चित्र पाहिले तर ते भयंकर आहे, लज्जास्पद आहे असेच म्हणणे भाग पडते.

निवडणूक म्हणजे एक युद्ध आहे आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असे अनेक मंडळी प्रतिपादन करीत असतात. पण निवडणूक हे बिलकूल युद्ध नाही. परस्परांच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या पक्षांना भारतीय राष्ट्राचे सार्वभौमत्व, लोकशाही प्रणालीवर अढळ विश्वास, धर्मजातिनिरपेक्ष समाजरचनेची संकल्पना, सर्वधर्मसमभाव अशी काही मूल्ये समानच आहेत आणि असली पाहिजेत. या दृष्टीने सर्व पक्ष एका फळीतच आहेत यात शंका नाही. म्हणून हे युद्ध नव्हेच, असले तर केवळ लाक्षणिक अर्थाने. या गोष्टीचे भान सुटून बेताल आणि आक्रस्ताळा प्रचार करणे हे सर्वस्वी गर्हणीय आहे. उदाहरणार्थ, आपले हिंदुत्व कितीही गौरवाने मिरवले तरी त्या गर्वाचा ताप इतर धर्मीयांना होणार नाही, अल्पसंख्यांकांच्या मनात भीतीचे वायगोळे येणार नाहीत खबरदारी घेतलीच पाहिजे. अशी खबरदारी घेणे तर सोडाच, उलट हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्या बाष्कळ आणि पोकळ घोषणा करीत भाजप आणि शिवसेनेचे नेते राणाभीमदेवी भाषणे करीत मोकाट सुटले होते. हे सौम्यपणे सांगायचे तर अविचारी बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.

धर्माच्या आणि जातीच्या नावाने मते मागणे किंवा त्याच कारणासाठी अन्यधर्मीय आणि अन्यजातीय समाजाबद्दल विद्वेष फैलावणे हे आमच्या मते बेकायदा आहे, घटनेविरुद्ध आहे. यदाकदाचित काही न्यायमूर्तींचा निर्णय यापेक्षा वेगळा असेलही, पण तेवढ्याने या अपप्रचाराचे समर्थन होऊ शकणार नाही. तो भारतीय समाजाच्या सामूहिक नीतिमत्तेचा अवमान आहे. आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने कमालीचा विघातक आहे. धार्मिक दुराभिमानाने रंगलेल्या भिंती हा आपल्या भविष्यावर काळा कलंक मात्र आहे. निवडणूक संपेल, प्रचाराची पत्रके फाटून नाहीशी होतील आणि भिंतीही कदाचित पूर्ववत दिसू लागतील, पण यामुळे झालेल्या जखमांचे व्रण लवकर बुजणार नाहीत आणि विचारी राष्ट्रवाद्यांच्या मनावरचे ओरखडे पुसले जाणार नाहीत याचे दु:ख वाटते. 

एकूण निवडणूक प्रचाराची वट्टात किंमत किती? ती अनेकशे कोटींत मोजावी लागेल. गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या पक्षांनी कोट्यवधी रुपये गटारगंगेला अर्पण करून कोणाचे कोटकल्याण साधले कोणास ठाऊक! मोटारी, जीप्स, ट्रक्स, ट्रॅक्टर्स मिळेल ते वाहन दौडवून पक्षीय प्रचाराचे भोंगे वाजवीत आणि इतरांच्या नावाने बीभत्स शिमगा करीत पोरेटोरे भटकत होती. त्यांचे घसे थंड करण्यासाठी लक्षावधी रुपयांची शीतपेये, पोटोबाची सोय करण्यासाठी भोजनभत्ते, जोरात ओरडण्यासाठी रोजगार हमी अशा सर्व मार्गानी वारेमाप उधळपट्टी चालू होती. पण हे पुरेसे नाही म्हणून की काय, गावगन्ना प्रचंड फलक उभारून त्या फलकांवर नेते आणि उमेदवार यांच्या तकलादू पण उत्तुंग प्रतिमा लावून, सुतारांकरवी कमानी उभारून, बॅनर आणि पोस्टर यांचा सुकाळ करून, मांडव घालून, रंगरंगोट्या करून, प्रचारकांना फेटे किंवा टोप्या घाऊक प्रमाणात बहाल करून पैशाची अक्षरशः नासाडी करण्यात आली. यातही कहर म्हणजे वर्तमानपत्रांतील जाहिराती. या निवडणुकीत त्यांचे प्रमाण बेसुमार वाढले होते. भरमसाट दराने छापलेल्या या जाहिराती म्हणजे वृत्तपत्रांना हजारो रुपयांची खैरात, हे खरे आहे. पण त्यांचा उपयोग काय? आत्मस्तुतीचे खडे बोल वाचणे ही भिकार करमणूक तेवढी जनसामान्यांच्या वाट्याला आली. उमेदवाराने खर्च किती करावा, यावर कायद्याचा अंकुश आहे.

पण त्याचे भान ठेवणारे उमेदवार औषधालाही सापडणार नाहीत. फक्त जाहिरातींचा खर्च मोजला तरी तो शासनाने दिलेली मर्यादा ओलांडून जाईल. या जाहिरातबाजीत सर्वच पक्ष सामील झाले होते. पण मग ज्याच्याजवळ गडगंज पैसा असेल तो अधिक जाहिरातबाजी करणार हे ओघानेच आले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा-शिवसेना युती यांनी वृत्तपत्रांच्या खात्यात अधिक भरणा करावा हे स्वाभाविकच आहे. जाहिरातीच्या मजकुरात तारतम्य पाळले जाईल याचाही भरवसा कोणी धावा? कळस म्हणजे केशरी, पांढरा, हिरवा हे रंग काँग्रेसचेच कसे हे सांगण्यासाठी कवित्व करताना काँग्रेसच्या एका जाहिरातीत निळे अशोकचक्रही पक्षासाठीच बळकावण्यात आले होते. श्री. वारद असते तर त्यांनी कोर्टात खेचले असते. अजूनही कोणाला खेचता येईलही.

एकविसाव्या शतकाचे कानोसे आपण सारेच घेत असल्यामुळे व्हीडिओ कॅसेट आणि ऑडिओ कॅसेट अशा नव्या तंत्रांचा अवलंब करणे क्रमप्राप्तच झाले. या कॅसेट्सचा निर्मितीखर्च अवाढव्य नसला तरी त्यांचे गावोगाव प्रदर्शन मांडण्यासाठी लक्षावधी रुपये लागतात. काँग्रेससारख्या धनदांडग्या पक्षाला इथे कसली कमतरता नाहीच.

ही सगळी आपली लोकशाही बालवयात असल्याचीच लक्षणे समजावी का? लोकशाही म्हणजे सामंजस्य न सोडता वादविवाद करून निर्णय घेण्याची राज्यप्रणाली. हे जर खरे असेल तर निवडणुकीतही मर्यादशील, समंजस वादविवादाचीच अपेक्षा आहे. दूरदर्शन सारखे माध्यम या दृष्टीने अनेक प्रगत राष्ट्रांत उपयोगी पडते. अगदी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच व्यासपीठावरून आपली परस्परविरोधी मते जनतेपुढे ठेवतात. इंग्लंड आणि जपानसारख्या देशांत मतदान किती शांतपणे होते हे आपण आता दूरदर्शनवर पाहू शकतो. याउलट आपल्याकडे पडत चाललेल्या प्रथा आहेत. वादसंवादाऐवजी भडक भाषणे, शिवराळ भाषा यांवर सगळी मदार. या कामी शिवसेनेचा अर्थात पहिला नंबर. खुद्द सेनापतींनीच शिमगा एक पंधरवडा आधी साजरा केला! त्यांच्या शिव्या छापण्याएवढ्या फुल्या आमच्या मुद्रणालयात नाहीत!

आता काय, व्हायचे ते होऊन गेले, म्हणून निवडणुकीसंबंधीचा विचार दप्तरी दाखल करण्याची गरज नाही. विचार करायचा तो दीर्घ भविष्यकाळ डोळ्यांसमोर ठेवूनच केला पाहिजे. अलाणे आमदार, फलाणे नामदार येतील आणि जातील. पण लोकशाही ' आसूर्यचंद्र नांदो' हे म्हटलेच पाहिजे, आणि हे मनापासून आपण म्हणणार असलो तर योग्य विचार करण्यासाठी पुढल्या निवडणुकीचा मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

Tags: दूरदर्शन काँग्रेस जाहिरातबाजी अल्पसंख्यांक हिंदुत्त्व शिवसेना भाजप सर्वधर्मसमभाव प्रचार पद्धती लोकशाही निवडणूक Doordarshan Congress Advertisement Minority Hinduttva Shivsena BJP Religion Agnostic Election Campaigns Democracy Election weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके