डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उत्तरप्रदेशातील उटपटांगगिरी

भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी करताना कांशीराम यांनी काँग्रेसला विचारलेही नाही. मध्यंतरी मुलायमसिंग यांनी कॉंग्रेसबरोबर युती करण्याची तयारी दर्शवली, परंतु ते होऊ शकले नाही. राष्ट्रपती राजवटीची मुदत एकसारखी वाढविणे इष्ट नव्हते.

उत्तर प्रदेशातील राजकीय अनिश्चितता संपून अखेर बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आणि मायावती या मुख्यमंत्री झाल्या. बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांनी 'मनुवादा' चे निर्मूलन करण्यासाठी बहुजन समाज पक्ष स्थापन केला. 'बम्मन ठाकूर बनिया चोर, उनको मारो जूते चार' ही त्यांच्या पक्षाची घोषणा आहे, परंतु भाजपला ती घोषणा ऐकू येत नाही. मागील वेळी समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव आणि कांशीराम यांनी हातमिळवणी करून सरकार बनविले होते. त्या वेळी कांशीराम हे भारतीय जनता पक्षाला दलितांचा एक नंबरचा शत्रू मानत होते. पुढे मुलायमसिंग आणि मायावती यांची भांडणे झाली आणि अखेर ते शासन कोसळले. त्यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केली परंतु त्यांना बहुमत मिळू शकले नाही.

आता भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी करताना कांशीराम यांनी काँग्रेसला विचारलेही नाही. मध्यंतरी मुलायमसिंग यांनी कॉग्रेसबरोबर युती करण्याची तयारी दर्शवली, परंतु ते होऊ शकले नाही. राष्ट्रपती राजवटीची मुदत एकसारखी वाढविणे इष्ट नव्हते. असे असले तरी भाजप-बसप युती हा भारतीय राजकारणातील संधिसाधूपणाचा आणखी एक आविष्कार असून ‘राजकीय पक्ष म्हणजे सत्तालोलुपता’ अशी जनमानसातील भावना दृढ करणारी एक स्वार्थपरायण राजकीय खेळी भाजपने खेळलेली आहे. 

आम्हाला वाईट इतकेच वाटते की अधिकारग्रहणानंतर तेराव्या दिवशी पंतप्रधानकीचा राजीनामा देताना ज्या अटलबिहारी वाजपेयींनी वैचारिक निष्ठेचे डिंडिम वाजविले होते त्यांनीच पुढाकार घेऊन ही अनिष्ट युती घडवून आणली. अर्थात् यापेक्षा मुलायमसिंग व काँग्रेस यांची युती वेगळ्या प्रकारची ठरली असती असे आम्हांला मुळीच वाटत नाही. उत्तर प्रदेशच्या आजच्या अवस्थेस मुलायमसिंग मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोनही राज्यांमध्ये जवळपास अराजक अवस्था निर्माण झाली असून यावरील पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे या दोनही अवाढव्य राज्यांचे विभाजन करणे हा आहे. 

उत्तर प्रदेशात उत्तराखंडाची मागणी मान्य करून ते वेगळे राज्य करावे. नंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश अशी आणखी विभागणी करून सध्याच्या उत्तर प्रदेशाऐवजी तीन राज्ये निर्माण केली पाहिजेत. बिहारमधील झारखंडाची मागणी मान्य करून बिहार, बंगाल आणि ओरिसा या भागांतील सर्व आदिवासी जिल्हे एकत्र करून विशाल झारखंड निर्माण केला पाहिजे. हे करण्याची हिंमत आजच्या केंद्र शासनात नाही. इंद्रजित गुप्ता हे गृहमंत्री असताना त्यांनी असे महत्त्वपूर्ण बदल करण्याचे धाडसी पाऊल टाकावयास हवे होते. परंतु त्यांनी आमचा पूर्ण अपेक्षाभंग केला आहे. 

मध्यंतरी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी, त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केंद्र शासनात सामील न होण्याचा निर्णय घेऊन फार मोठी ऐतिहासिक चूक केली असे उद्गार काढले होते. ज्योती बसू यांना पंतप्रधान करण्याची विश्वनाथ प्रताप सिंग यांची सूचना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने फेटाळून एका अर्थाने पलायनवादी भूमिकाच घेतली. सध्याचे केंद्र शासन आपली निश्चित प्रतिमा जनमानसावर उमटवू शकलेले नाही आणि तसे काही घडण्याची शक्यताही दिसत नाही. एका बाजूस डावे व उजवे कम्युनिस्ट आणि अर्थमंत्री चिदंबरम् यांचे मूलभूत धोरणविषयक मतभेद आहेत आणि देवेगौडा यांना दोघांनाही आवरता येत नाही. 

दुसरीकडे मुलायमसिंग हे त्यांचे पक्षातील व उत्तर प्रदेशातील महत्त्व वाढविण्यासाठी बेछूटपणे वागत आहेत आणि देवेगौडा त्यांनाही आवरू शकत नाहीत. देवेगौड़ा यांच्या असहाय अवस्थेमुळे दिल्लीमध्ये सध्या अफवांचे वारेमाप पीक आलेले आहे. पंतप्रधान देवेगौडा है एका वेळी चंद्रशेखर यांना नेते मानत असत. अलीकडे पंतप्रधान देवेगौडा हे भोंडशी येथे जाऊन चंद्रशेखर यांना भेटत असतात अशी एक वार्ता मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती. या वार्तेच्या आधारे चंद्रशेखर आणि शरद पवार हे दोन जुने मित्र पुन्हा एकत्र येत असून राजकारणाच्या फेरजुळणीचे नवे डावपेच सुरू झाले आहेत अशी एक अफवा पसरली होती. 

आम्हांला या संधिसाधू कारवायांमध्ये रस वाटत नाही, कारण अशा राजकारणातून गोरगरीब जनतेचे हित साधले जाण्याची सुतराम शक्यता नाही. या देशातील राजकारणाचा समतोल टिकविण्याची जबाबदारी प्रामुख्याने काँग्रेस पक्षावर होती. परंतु त्या पक्षातील कल्पनाथ राय या माजी मंत्र्यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली; माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी कट करून झारखंड मुक्ती मोर्च्याच्या खासदारांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये दिले असे माफीचा साक्षीदार झालेल्या एका खासदाराने न्यायासनासमोर सांगितले; सुखराम यांच्यावर खटला भरण्यास राष्ट्रपतींना परवानगी द्यावी लागली आणि शीला कौल, सतीश शर्मा यांनाही अल्पावधीत पोलीस कोठडीत जावे लागले हे आता स्पष्ट होऊ लागले आहे - यांमुळे काँग्रेस पक्षाबद्दल लोकांच्या मनात तिटकाऱ्याचीच भावना दृढ झाली आहे. 

त्यामुळे या पक्षातील अनेक आमदार पक्षांतर करतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उत्तर प्रदेशात काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि शंकरराव चव्हाणांचे एका वेळचे कडवे समर्थक बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांच्या मुलाला शिवसेनेत पाठवून मंत्री बनविले. ही घटनाही बोलकी आहे. अशा राजकीय कोलांट-उड्यांतून काही व्यक्तींचा तात्कालिक स्वार्थ साधला जाईल परंतु त्यामुळे राजकारणाचा अधःपात अधिक वेगाने होऊ लागेल. 

एकूण अवनत दशेचेच प्रतिबिंब उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्ष-भाजप युतीत पडलेले आहे. यातून राजकारणातील गुन्हेगारी वाढत जाणार हे उघड आहे. या गुन्हेगारीशी दोन हात करण्याकरिता परिवर्तनवादी तरुण कार्यकर्ते कोणता पवित्रा घेतात यावरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांनी ही ताकद दाखविली नाही तर मात्र भारतीय जनतेच्या हालअपेष्टा वाढत जातील हे निश्चित.

Tags: भारतीय जनता पक्ष बहुजन समाज पक्ष उत्तरप्रदेश संपादकीय editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके