डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

72 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर

‘शाळा-कॉलेजात असताना दिसणारी गटबाजी, दादागिरी, उथळपणा, अन्याय व संधी नाकारली जाणे हे सर्व प्रकार आपण मोठे झाल्यावर अनुभवाला येणार नाहीत असे आपल्याला वाटत असते. पण तुम्ही राज्य विधिमंडळात जाता, तिथेदेखील मूर्खपणा व क्षुद्रपणा पहायला मिळतो. मग तुम्ही संसदेत जाता आणि जी-20 शिखर परिषदेलाही, पण तिथेही तुमच्या लक्षात येते की, आपण शाळा-कॉलेजच्या वातावरणातच आहोत.’ ओबामांचे हे निरीक्षण व भाष्य मर्मभेदी आहे. आठ वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वावरलेल्या व आख्खे जग पालथे घातलेल्या नेत्याचे हे मत आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरीही ओबामा आशावादी आहेत. त्यासंदर्भात ‘काळाचा किती मोठा पट तुम्ही स्वत:समोर ठेवता, यावर तुम्ही किती आशावादी किंवा निराशावादी आहात हे ठरते,’ हे त्यांचे विधान कोटेबल कोट म्हणावे असे आहे.

साधनाच्या मागील दोन व प्रस्तुत एक अशा तीन अंकांमध्ये विशेष महत्त्वाचे असे तिघांचे लेखन प्रत्येकी तीन भागांत प्रसिद्ध केले आहे. बराक ओबामा व सूरज येंगडे यांच्या मुलाखती आणि सुहास पळशीकर यांचे भाषण. या तिघांचेही हे दीर्घ लेखन प्रत्येकी तीन भागांत छापावे लागले ते केवळ पानांची मर्यादा व अधिकाधिक वाचकांकडून वाचले जावे म्हणून. परंतु यातील प्रत्येकाचे तिन्ही भाग एकत्र वाचायला हवेत, किंबहुना तिघांचेही लेखन एकाच वेळी वाचायला हवे. तिघांच्याही दृष्टिकोनात थोडासा फरक आहे, मात्र तिघांचेही विवेचन व विश्लेषण परस्परांना पूरक म्हणता येईल असे आहे. असे व इतके की, या तिघांच्या लेखनाचा एक विशेष अंक होऊ शकला असता. अर्थातच हे लेखन जास्तीचे गंभीर-वैचारिक असल्याने कोणत्याही चांगल्या वाचकांना काहीसे ‘जड’ वाटणार आहे. पण त्यांचा विषय आणि त्यातील आशयाचा रोख, कोणत्याही राष्ट्राच्या लोकशाही वाटचालीसंदर्भात चिंतनीय म्हणावा असा आहे. अधिक महत्त्वाचे म्हणजे भारतीय प्रजासत्ताक 72 व्या वर्षात पदार्पण करीत असताना तो आशय भारतीय नागरिकांना अंतर्मुख करायला लावणारा आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करणारे तीन खंड लिहिण्याचा संकल्प केला आहे, त्यातील पहिला खंड गेल्या महिन्यात ‘द प्रॉमिस्ड लँड’ या नावाने प्रकाशित झाला आहे. त्या पुस्तकाच्या निमित्ताने ‘द अटलांटिक’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली मुलाखत मोठा परिप्रेक्ष्य वाचकांच्या समोर उभा करते. ओबामा यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील चार वर्षांत जे कारनामे केले, त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे. 

वस्तुत: आफ्रो-अमेरिकन वंशाचे ओबामा राष्ट्राध्यक्ष म्हणून आठ वर्षे राहिल्यानंतर अमेरिकेने एका नव्या पर्वात प्रवेश केला आहे, असे मानले जात होते. मात्र त्यांच्यानंतर ट्रम्प यांना अध्यक्षपदावर निवडले जाणे हा खूपच मोठा धक्का होता, अमेरिकेसाठी आणि जगासाठीही. त्याहून मोठी कमाल अशी की, नंतरच्या चार वर्षांत ट्रम्प यांनी केलेले वर्तन व व्यवहार अनेकानेक प्रकारचे उल्लंघन करणारे होते आणि तरीही अमेरिकन लोकशाही ते सर्व सहन करीत राहिली. ट्रम्प यांची अरेरावी शेवटपर्यंत इतकी राहिली की, जगाच्या इतिहासात कोणत्याही लोकशाही राष्ट्रातील राज्यकर्त्यालाही लाजवणारी होती. ‘निवडणुकीचे निकाल विरोधात गेले तर ते मी मानणार नाही’, अशी उघड धमकी त्यांनी निवडणुकीच्या आधीच दोन-चार महिने द्यायला सुरुवात केली. नंतर ‘निवडणुकीत माझा पराभव झालेलाच नाही’ असे ते शेवटपर्यंत म्हणत राहिले. त्यानंतर अमेरिकन संसदेवर हल्ला करण्यासाठीची चिथावणी त्यांनी आपल्या समर्थकांना दिली. 

अखेरीस, ‘नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधीला मी हजर राहणार नाही’, असे बेधडकपणे सांगून त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. हे सारे एकापेक्षा एक निर्लज्ज प्रकार ‘आता आणखी किती घसरण बाकी राहिली’ असे वाटायला लावणारे होते. सव्वादोनशे वर्षांचा लोकशाही इतिहास असणाऱ्या आणि मागील पाऊणशे वर्षे जगातील सर्वांत मोठी महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत हे घडणे, हे कमालीचे आश्चर्यजनक होते. जॉर्ज बुश (ज्युनिअर) यांनी खूप अरेरावी केली म्हणून, ‘ओबामा का निवडून आले’ याचे कारण ‘ते बुश नाहीत म्हणून’ असे सर्वत्र मानले गेले होते. मात्र आता बायडेन का निवडून आलेत, याचे कारण सांगताना ‘ते ट्रम्प नाहीत म्हणून’ असा सूर कुठेही ऐकिवात नाही. इतके ट्रम्प यांनी अति केले आहे आणि तरीही बायडेन काठावरचे बहुमत घेऊन आले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर ट्रम्प व बायडेन हे केवळ प्रतिनिधी आहेत, त्या-त्या प्रकारच्या जनमानसाचे. म्हणजे खरा बिघाड झालेला आहे तो जनमानसात आणि म्हणून एका मर्यादेनंतर ट्रम्पसारख्यांना दोष देता येत नाही. त्यांना निवडून देणाऱ्या व दीर्घ काळ चालवून घेणाऱ्या जनतेलाच त्यासाठी दोषी धरावे लागेल. पण मुख्य मुद्दा उपस्थित होतो तो असा की, हा प्रकार जगातील सर्वाधिक बलाढ्य लोकशाही राष्ट्राबाबत होत असेल तर ही प्रक्रिया किती दीर्घकालीन असेल आणि अन्य राष्ट्रांच्याही अंतरंगात किती मुरलेली असेल! ही प्रक्रिया अद्याप कोणालाही उलगडून दाखवता आलेली नाही आणि बराक ओबामा यांनीही तशी कबुली या मुलाखतीत दिली आहे. ओबामा यांनी आपल्या मुलाखतीत मांडलेली कित्येक निरीक्षणे चकित करणारी आहेत. मात्र त्यातही सर्वाधिक चकित करणारे आहे त्यांच्या मुलाखतीतील शेवटच्या प्रश्नाचे उत्तर! 

ते म्हणतात, ‘शाळा-कॉलेजात असताना दिसणारी गटबाजी, दादागिरी, उथळपणा, अन्याय व संधी नाकारली जाणे हे सर्व प्रकार आपण मोठे झाल्यावर अनुभवाला येणार नाहीत असे आपल्याला वाटत असते. पण तुम्ही राज्य विधिमंडळात जाता, तिथेदेखील मूर्खपणा व क्षुद्रपणा पहायला मिळतो. मग तुम्ही संसदेत जाता आणि जी-20 शिखर परिषदेलाही, पण तिथेही तुमच्या लक्षात येते की, आपण शाळा-कॉलेजच्या वातावरणातच आहोत.’ ओबामांचे हे निरीक्षण व भाष्य मर्मभेदी आहे. आठ वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वावरलेल्या व आख्खे जग पालथे घातलेल्या नेत्याचे हे मत आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरीही ओबामा आशावादी आहेत. त्यासंदर्भात ‘काळाचा किती मोठा पट तुम्ही स्वत:समोर ठेवता, यावर तुम्ही किती आशावादी किंवा निराशावादी आहात हे ठरते,’ हे त्यांचे विधान कोटेबल कोट म्हणावे असे आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे ज्या प्रकारच्या मूल्यांचा पुरस्कार करतात, त्यात धर्म, वंश, अर्थ, राष्ट्र यांचे वर्चस्व या ना त्या प्रकारे गृहीत धरलेले आहे. आणि ते वर्चस्व राजकारणाच्या माध्यमातून प्रस्थापित करता येते हे उघड आहे. या पार्श्वभूमीवर सूरज येंगडे या तरुण अभ्यासकाची मुलाखत लक्ष्यवेधी आहे. नांदेड ते हॉर्वर्ड व्हाया इंग्लंड व दक्षिण आफ्रिका, असा वेगवान प्रवास त्याने मागील केवळ दहा वर्षांत केला आहे. जातीसंस्था हे केंद्र मानून प्रस्थापित व्यवस्थांना त्यांनी खडे सवाल विचारले आहेत, त्यांची उत्तरे देणे भल्याभल्यांना अडचणीचे वाटणारे आहे. जगाचा खूप मोठा पट समोर असणाऱ्या सूरजने या मुलाखतीत प्रामुख्याने भारतीय समाजजीवन समोर ठेवले आहे. मात्र त्याच्या विवेचन-विश्लेषणातही काळाचा खूप मोठा पट अंतर्भूत आहे. त्यामुळे ओबामा यांनी आपल्या मुलाखतीत ज्या विषयाला बाजूला ठेवले आहे किंवा ओझरता स्पर्श केला आहे, त्या विषयाचे दालन उघडणारी व त्यातील अन्यायग्रस्त परिस्थितीकडे लक्ष वेधणारी सूरजची मुलाखत आहे.

सुहास पळशीकर यांचे भाषण वरील दोघांच्या मुलाखतींना भारतीय संदर्भात पुढे घेऊन जाणारे आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक असलेल्या पळशीकरांनी तो विषय लोकशाहीच्या भोवती फिरणारा आहे असे सूचित केले आहे. आणि म्हणून ‘लोकशाहीची वाटचाल : जागतिक आव्हानाचा क्षण’ हा त्यांच्या भाषणाचा विषय अधिक गांभीर्याने घ्यायला हवा. जागतिक स्तरावर लोकशाहीसाठी काय स्वरूपाची आव्हाने आहेत, हे सांगताना ‘आगामी दशक लोकशाहीच्या ओहोटीचे असणार आहे’ असे भाकित त्यांनी केले आहे. आगामी काळात ‘लोकशाहीबद्दल कोणीही वाईट बोलणार नाही, पण लोकशाहीचा अर्थ बदलून ती आतून पोखरण्याचे प्रयत्न होतील’ ही भीती व्यक्त केली आहे. मात्र हे रोखण्यासाठी कोणतेही ठोस उत्तर दिसत नाही, हेही त्यांनी स्पष्टच नोंदवले आहे.

वरील तिघांच्याही लेखनातील मध्यवर्ती सूर ‘एकूण जगाचे मानस चिंताजनक आहे’ असाच आहे. त्यामुळे, अमृतमहोत्सवाच्या जवळ आलेले भारतीय प्रजासत्ताक राखण्यासाठी व अधिकाधिक उन्नत करण्यासाठी कधी नव्हे इतके सावध होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. म्हणजे सव्वादोनशे वर्षांच्या लोकशाहीनंतरही बलाढ्य अमेरिकेची अशी अवस्था होत असेल, तर पाऊणशेच्या उंबरठ्यावरील भारतीय लोकशाहीला भविष्यात किती तरी गंभीर धोक्याचा सामना करावा लागू शकतो, असाच या सर्व विवेचनाचा सांगावा आहे.

Tags: बराक ओबामा आंतरराष्ट्रीय राजकारण international politics america jo biden donald trump suraj yengade obama inteview barak obama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके