डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो

आम्हांला हवे तर स्वप्नाळू समजा पण स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारताचे जे स्वप्न स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आम्ही रोमांचित होऊन पाहिले ते आमच्या डोळ्यांपुढे आजही तरळते आहे. म्हणून तर त्या स्वप्नातला बलसागर भारत साकार केव्हा होईल याची तळमळ गणराज्यदिनी विशेष उत्कटतेने लागते. पुरेसे सुखाचे भौतिक जीवन जेथे प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहे; जिथे नित्य नव्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तरुण मने स्पंदन पावत आहेत; जिथे निरागस मोकळे बाल्य आहे, पुरुषार्थी युवा जीवन आहे आणि कृतार्थ समाधानी वृद्धत्व आहे; जिथे सर्वाभूती निर्वैर समभाव आहे असा सर्वांगी समृद्ध आणि समर्थ प्रजासत्ताक भारत जगातल्या प्रबळ आणि प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत एक दिवस नक्की बसणार आहे ही आमची आशा अमर आहे. वर्तमान परिस्थितीची आच आम्हांला अधिक लागते याचे कारण तरी ही आशाच!

गणराज्याचा हा चाळिसावा वर्धापनदिन. आज आठवण होते पहिल्या काही गणराज्यदिनांची. लोकांच्या उत्साहाला तेव्हा नुसते उधाण यायचे. शेपन्नास तरुणतरुणींच्या पाच-सातशे तरी टोळ्या जल्लोष करीत मुंबईसारख्या शहरातून रात्रभर फिरत असायच्या. महानगरातल्या उत्तुंग आणि विशाल इमारतींवरून लक्षावधी दिव्यांची रोषणाई होई. ती पाहण्यासाठी अवघा लोकसागर काही वेगळ्याच धुंदीमध्ये उचंबळताना पाहायला मिळे.

का हरपले ते दिवस? कसा मावळला सारा उत्साह, सारा उल्हास? आपल्या स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक महान राष्ट्राविषयीचा तो ओसंडणारा अभिमान का विरून गेला एकाएकी? ‘दीप लागले असंख्य भरतभूमिमंदिरी, जनतेच्या अंतरी' असे ज्या प्रकाशाचे कवींनी कौतुक करावे तो दिसामासांनी फिका फिका होत जाऊन आज जाणवेनासाच व्हावा अशी दुर्दशा आपल्या वाट्याला का आली? 

या प्रश्नाचे उत्तर काय आहे? केवळ पहिलावहिला उत्साह पुढे टिकत नाही एवढेच? ते काय केवळ आरंभशूरत्व होते? आरंभीचा आनंद पुढे न टिकायला तो काही लग्नाबिग्नाचा वाढदिवस नव्हे. काटकसरीसाठी रोषणाई बंद केली म्हणून सगळा समाज आपली कळा घालवून बसला का? या संभाव्य उत्तरांतली कोणतीही उत्तरे पुरेशी नाहीत. खरी गोष्ट वेगळीच आहे आणि तिचे दुःख शब्दांनी व्यक्त करणे शक्य नाही. आपले राष्ट्र स्वतंत्र झाले, आपली घटना सिद्ध झाली आणि आपण आपल्याला ती अर्पण केली. या काळात जी स्वप्ने भारतीय जनतेने पाहिली होती, ती प्रामक ठरावी अशा पद्धतीने आपल्या देशातील शासनकर्त्यांनी राष्ट्रसंसाराचा गाडा चालवल्यामुळे जनतेच्या उत्साहाच्या भरतीच्या लाटा ओसरल्या. प्रतिवर्षी त्या अधिकाधिक माघार घेत गेल्या आणि आता ओहोटीच्या वेळी उजाड, निष्प्राण झालेल्या पुळणीसारखे गणराज्याचे चित्र लोकांना दिसत आहे. न अन्न, न वस्त्र, न निवारा अशा भुकेल्या अनिकेत माणसाने कसला उत्सव करावा? कोट्यवधी माणसे निरक्षर, अडाणी राहिली आहेत. त्यांच्या ठायी राज्य कुणाचे आले,कसले आले याची जाणीव काय म्हणून जागी असावी? वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार माजला आहे. धनदांडगे आणि मदोन्मत्त सर्रास अत्याचार करीत आहेत आणि वर निर्दोष म्हणून मिरवत आहेत, 'येथून तेथून सगळे चोर आहेत... राज्य कोणाचेही येवो, सब घोडे बारा टक्के' अशी जेथे सार्वत्रिक भावना आहे तेथे आमच्या स्वतंत्र, सार्वभौम, गणतंत्राचा जयजयकार करण्यासाठी उत्साह आणि उल्हास कोठून शिल्लक राहणार?

आपल्या सार्वभौम, स्वतंत्र आणि समर्थ प्रजासत्ताक राष्ट्राचा अभिमान ज्यांच्या हृदयात ओसंडून वाहतो त्याच आणि फक्त त्याच राष्ट्रांत उत्स्फूर्त उत्सवाची अपेक्षा प्रतिवर्षी पुरी होऊ शकते. एरवी सरकारी शिस्तीसाठी बंद गळ्याचा राष्ट्रीय पोषाख करून येणाऱ्या मूठभर अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची मरतुकडी कर्मकांडी झेंडावंदने आणि निर्णयाचे स्वातंत्र्य ज्यांना नाही अशा अजाण बालकांच्या पेंगुळलेल्या मिरवणुकी याशिवाय आपल्या देशात दुसरे काय घडू शकणार? नेमेचि येणारे पुरस्कार आणि पारितोषिके, प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून होणारे पदवीदान आणि शाळांतून किंवा गरीब वस्त्यांतून होणारे खाऊवाटप याच्या पलीकडे आमच्या उत्सवप्रियतेची लाट उसळावी कशी?अनेक क्षेत्रांत गेल्या चाळीस वर्षांत भले प्रगती झालेली असो, खाणाऱ्या तोंडांची संख्या अशी काही झपाट्याने वाढत गेली आहे की, प्रत्येकाच्या वाट्याला येणारे त्या प्रगतीचे लाभ तुटपुंजे आहेत हे म्हणणेही अतिशयोक्तीचे वाटावे. भरमसाट वेगाने होणारे शहरीकरण, अन्नाशिवाय तडफडणारे लक्षावधी भुकेकंगाल, गजबज आणि घाण, कळाहीन बाजारू सांस्कृतिक(?) कार्यक्रम असल्या वातावरणात आनंदाचे स्वाभाविक झरे आटत जातात. जनजीवनात आलेल्या ओहोटीचे म्हणूनच कोणालाही आश्चर्य वाटायला नको.

केंद्रात सत्तापालट झाला म्हणजे काही जादू होईल आणि हे चित्र बदलेल, असे थोडेच आहे? फिरून एकवार वातावरणावर आनंदाचे शतरंग उधळावे, फिरून एकदा लोकसागराच्या उत्साहाला भरती यावी अशी जर आपण आकांक्षा धरणार असलो तर हे आकांक्षास्वप्न पुरे होण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. मतांच्या लोभाने होणाऱ्या मतलबी राजकारणाची जागा प्रामाणिक, मूल्याधिष्ठित राजकारण घेणार आहे का? ध्येयवाद नावाचे हरपलेले श्रेय आपल्या देशातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला पुन्हा गवसणार आहे का? भारतीय समाजाचे जीवन नासून टाकणाऱ्या जातीयतेच्या विषावर एकात्मतेचा उतारा आपण देणार आहोत का? धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद, वंशभेद अशा अनेक भेदांनी तडे पाडलेली एकसंध भारतीयत्वाची प्रतिमा आपण निष्ठेने पुनरुज्जीवित करणार आहोत का? आपल्या जीवनातील सगळी अभद्रता मावळून ज्ञानविज्ञान, करुणा आणि सामाजिक न्याय यांचा प्रकाश जेव्हा भारतभर पडेल तेव्हा प्रजासत्ताक दिनच काय पण येणारा प्रत्येक दिवसच उत्सवाचा वाटेल. 

विचारांचे असे थैमान गणराज्यदिनाचा उत्सव साजरा करतेवेळी मनात चालावे याचा आम्हाला खेद होतो. खरे म्हणजे आमच्या देशाची स्थिती वर उल्लेखल्याप्रमाणे असली तरीही असा सोनियाचा दिवस आला की स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकाचा अभिमान मनात जागा झाल्याशिवाय राहत नाही. आम्हांला इतिहासपूजक म्हणा हवे तर, पण भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि प्रजासत्ताकासाठी. ज्यांनी ज्यांनी बलिदान केले, स्वार्थत्याग केला त्यांच्या विषयीची कृतज्ञता अंतरंगात दाटून येते. भारताला नवी भीमस्मृती देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषाची आठवण होतेच पण त्याबरोबर ज्यांनी न्यायासाठी आणि समतेसाठी आयुष्याच्या मशाली पेटवल्या त्या सर्वच समाजगुरूंची नावे आमच्या अंतश्चक्षूंसमोर झळकत राहतात. आम्हांला हवे तर स्वप्नाळू समजा पण स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारताचे जे स्वप्न स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आम्ही रोमांचित होऊन पाहिले ते आमच्या डोळ्यांपुढे आजही तरळते आहे. म्हणून तर त्या स्वप्नातला बलसागर भारत साकार केव्हा होईल याची तळमळ गणराज्यदिनी विशेष उत्कटतेने लागते. पुरेसे सुखाचे भौतिक जीवन जेथे प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहे; जिथे नित्य नव्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तरुण मने स्पंदन पावत आहेत; जिथे निरागस मोकळे बाल्य आहे, पुरुषार्थी युवा जीवन आहे आणि कृतार्थ समाधानी वृद्धत्व आहे; जिथे सर्वाभूती निर्वैर समभाव आहे असा सर्वांगी समृद्ध आणि समर्थ प्रजासत्ताक भारत जगातल्या प्रबळ आणि प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत एक दिवस नक्की बसणार आहे ही आमची आशा अमर आहे.

वर्तमान परिस्थितीची आच आम्हांला अधिक लागते याचे कारण तरी ही आशाच! भ्रष्ट आणि नतद्रष्ट राजवट संपून नव्या राजकीय पर्वाचा शुभारंभ आमची आशा अधिक पल्लवित करतो. मात्र नव्या शासनामुळे नवा समाज अस्तित्वात येईल, असला भाबडा विश्वास आम्हांला नाही. भाग्यविधाते असतात ते लोक, ते आपण, कोणतेही शासन नव्हे. हे खरे नसेल तर गणराज्य, लोकतंत्र, प्रजासत्ताक हे शब्द निव्वळ पोकळ बुडबुडे ठरतील. आमची ही दृढ श्रद्धा आहे की आपणच आपल्याला गणराज्याची घटना दिलेली आहे. त्या घटनेविरुद्ध जाऊन जातिवाद, धर्मवेड अशा कोणत्याही संकुचित भावनेच्या वर्तुळात आम्ही मंत्रमुग्ध विषारी नागासारखे बंदिस्त राहणार नाही. खलिस्तानची मागणी आणि काश्मीरमध्ये चाललेला धर्मवडा धुमाकूळ यांचा निषेध जरूर केला पाहिजे; पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, जे कोणी हिंदुराष्ट्राची कल्पना जनतेसमोर उच्च रवाने मांडत आहेत तेही सारे खलिस्तान आणि आझाद काश्मीरचे पाठिराखेच ठरतात. ज्यांना हिंदुराष्ट्र हवे आहे, त्यांना खलिस्तानलाही विरोध करता येणार नाही, या देशाचा आत्मा उदार आहे, व्यापक आणि विशाल आहे, याचा आम्हाला कदापि विसर पडणार नाही. भारतीय जनता हीच भारतीय राष्ट्राची प्राणशक्ती आहे. तीच जनतंत्र भारताला चैतन्य देईल आणि तीच त्याचे उज्ज्वल भवितव्य साकार करील. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

Tags: हिंदुराष्ट्र काश्मीर खलिस्तान डॉ. आंबेडकर एकात्मता ध्येयवाद सार्वभौम प्रजासत्ताक महान राष्ट्र गणराज्य Hindurashtra Kashmir Khalistan Dr. Aambedkar Solidarity Heroism Sovereign Republic Great Nation Republic weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके