डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्मरण, सर्वेक्षण, आणि संकल्प

एसेम जोशींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्ताने एक मोठा संकल्प मेळावा नुकताच संपन्न झाला. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी त्याला हजेरी लावली. समाजातील वेगवेगळ्या क्रियाशील संघटनांना एका व्यापक चळवळीचा भाग म्हणून एकत्र गुंफून घेतले तर त्याचा परिणाम सामाजिक चळवळ दृढ करण्यात होईल असा विचार या मेळाव्यात मांडला गेला.

एस. एम. जोशींच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एस. एम. जोशी फौन्डेशनचे अध्यक्ष श्री. नानासाहेब गोरे आणि त्यांचे सहकारी यांनी 'संकल्प मेळावा' आयोजित करण्यात मोठेच औचित्य दाखविले. स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग, अर्थमंत्री प्रा. दंडवते, नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण हेगडे, मुख्यमंत्री शरद पवार आदी नेतेही आले ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु हे घडलेच असते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने विचारवंतांचे चर्चासत्र दीड दिवस घेण्यात आले हे योग्यच झाले. परंतु अशी चर्चासत्रेही अनेक होतात. आमच्या मते एस. एम. च्या स्मृतीस अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग क्रियाशील कार्यकर्त्यांनी पुढील काही वर्षांत करावयाच्या कामाचा संकल्प करून प्रतिज्ञाबद्ध होणे हाच आहे. एस. एम. जोशींच्या पहिल्या स्मृतिदिनाला मुख्यतः महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरीलही एसेम बरोबर विविध क्षेत्रांत काम केलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हे अपेक्षितच होते. परंतु तरुणांनी आपापले संकल्प जाहीर केले याचे आम्हांला अधिक समाधान वाटते. 

मुस्लिम सत्यशोधक समाजाचे श्री. राजन अन्वर म्हणाले, 'जातीयवादी मुस्लिम नेत्यांच्या पकडीतून मुस्लिम समाजाची मुक्तता करणे आवश्यक आहे आणि ते काम आम्ही करू. समान नागरी कायद्याचा मसुदा घेऊन मुस्लिम समाजात लोकशिक्षण करण्याचे काम आमची संघटना करील'. हा संकल्प जेव्हा त्यांनी जाहीर केला तेव्हा आम्हाला अतिशय समाधान वाटले. श्रीमती विजया चौक यांनी समाजवादी महिला सभेतर्फे परित्यक्ता महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्याचा संकल्प जाहीर केला. आपल्या पुरुषप्रधान समाजात हे काम किती कठीण आहे याची आम्हांला कल्पना आहे. विजयाताईंनी व्यक्त केलेला निर्धार ऐकताना हाच एसेमचा मार्ग होता ही जाणीव मनात पुन्हा तीव्रतेने झाली.

श्रीमती अंजली सोमण यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धांमुळे स्त्रियांचा प्रश्न अधिक बिकट होत आहे, हे सांगून या संदर्भात स्त्रियांच्या प्रश्नाबाबत जागृती करण्याचा संकल्प सांगितला. सामाजिक कार्याला लोकशाही समाजवादी विचारांचे अधिष्ठान असले पाहिजे हा अंजली सोमण यांचा विचार आम्हाला अत्यंत स्वागतार्ह वाटतो. छात्र भारतीचे प्रा. सुभाष वारे यांनी दलित, आदिवासी आणि कष्टकरी विद्यार्थ्यांची संघटना करून या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करतानाच आपल्या समाजातील समता आंदोलन बळकट करण्याचा केलेला संकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 

राष्ट्र सेवा दलामार्फत येत्या दीड वर्षात एक हजार समता शिबिरे घेतली जाणार आहेत. हे आणि अन्य संकल्प ऐकताना प्रा. मधू दंडवते यांच्या भाषणातील मौलिक विचार येथे पुन्हा सांगणे आम्हाला आवश्यक वाटते. प्रा. दंडवते म्हणाले, “समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी आदींनी मूल्यांच्या आधारे विचारांची जोपासना करून एकत्र काम केले. या नेत्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते परंतु राष्ट्रीय प्रश्नावर त्यांनी सहमतीने काम केले. संघर्ष करतानाच विधायक कार्यही त्यांनी महत्वाचे मानले. या मार्गानेच तरुण कार्यकर्त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि लोकशाही समाजवाद भारतात रुजविला पाहिजे." 

या संकल्प मेळाव्यात आणि चर्चासत्रात तरुणांच्या काही संघटनांनी भाग घेतला. तरी महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत काम करणारे तरुणांचे आणखीही अनेक गट आहेत. एस. एम. जोशी सोशलिस्ट फौन्डेशनने या सर्व क्रियाशील संघटनांना एकत्र आणून एक व्यापक व्यासपीठ निर्माण केले पाहिजे. या प्रत्येक संघटनेची स्वायत्तता मान्य करावी. दैनंदिन काम करताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असावे. या सर्व संघटनांना जोडणारा दुवा लोकशाही समाजवाद हाच असावा. या विविध संघटनांमध्ये ध्येयवादी कार्यकर्ते आहेत. ते निष्ठापूर्वक वर्षानुवर्षे काम करीत आहेत. परंतु त्यांच्या कामाची अलग अलग बेटे आहेत. एका व्यापक चळवळीचा भाग म्हणून त्यांना एकत्र गुंफून घेतले तरच त्यांचे काम अधिक प्रभावी होईल आणि जनमानसावर त्यांच्या कामाचा इष्ट तो परिणाम होईल.

स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी देशभर विखुरलेले विधायक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघटनांत काम करणारे कार्यकर्ते आणि राजकीय आघाडीवर सतत संघर्ष करणारे कार्यकर्ते एका व्यापक चळवळीचे घटक म्हणून काम करीत असल्यामुळे त्यांना साफल्य मिळाले. त्यांच्या कामात अडचणी होत्या. अनेकांना अनेकदा अपयशही आले, परंतु स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून आपण काम करीत आहोत ही जाणीव सर्वांना असल्यामुळे ते कधी खचून गेले नाहीत. आज वेगवेगळ्या ठिकाणी नेटाने काम करणारे कार्यकर्ते आमच्या पिढीतील कार्यकर्त्यांपेक्षा यत्किंचित कमी नसले तरी त्यांच्या अडचणी अधिक मोठ्या आहेत. एक तर स्वकीयांच्या विरुद्ध लढा करणे फार कठीण असते. त्यामुळे सामाजिक समतेच्या चळवळींना प्रस्थापितांचा सतत विरोध होतो आणि आपल्या परंपरावादी आणि स्थितिशील समाजात परिवर्तनाची हेटाळणी केली जाते. तसेच सत्ता व संपत्ती यांचे स्तोम प्रचंड प्रमाणावर माजले असल्यामुळे आणि भ्रष्टाचाराने समाजजीवन पोखरले असल्यामुळे ध्येयवादी व्यक्तींना पावलोपावली ठेचा खाव्या लागतात. याला उत्तर म्हणून सर्व परिवर्तनवाद्यांची एक चळवळ उभी राहिली पाहिजे. या संदर्भात श्री. नानासाहेब गोरे यांनी संकल्प मेळाव्यात सुरुवातीस केलेले भाषण- जे आम्ही गेल्या अंकात छापले आहे- ते मार्गदर्शक आहे. खंबीर वैचारिक भूमिका आणि या भूमिकेशी सुसंगत असे आचरण या दोन गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याने कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, हा विचार नानासाहेबांनी सुस्पष्टपणे मांडला आहे.

संकल्प मेळाव्याच्या शेवटी सर्वांनी जी प्रतिज्ञा केली ती आम्ही छापलीच आहे. कालच्या मेळाव्यासाठी पुण्याला येऊ न शकलेले अनेक निष्ठावान कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. येत्या महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही प्रतिज्ञा घ्यावी आणि त्याप्रमाणे आचरण करावे अशी आमची अपेक्षा आहे. एस. एम. जोशींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

Tags: राष्ट्र सेवा दल एस एम जोशी समाजवाद rashtra seva dal s m joshi socialism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके