डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘आरटीआय’चा संदर्भ असलेली तीन पुस्तके

ही तीनही पुस्तके आता एकत्र प्रकाशित करून, या विषयाचे महत्त्व अधोरेखित करीत आहोत. विशेषत: सध्याच्या अस्वस्थ काळात आणि चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून माहिती आयुक्तांचे वेतन व त्यांचा कालावधी  यासंदर्भात कायद्यात केलेली दुरुस्ती पाहता, या विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरजही आहे.  यापैकी ‘कहाणी माहिती अधिकाराची’  या पुस्तकात 1990 नंतरच्या तीस वर्षांच्या काळात अरुणा रॉय व  त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा दस्तावेज आहे. हा ऐवज माहिती अधिकाराच्या संदर्भात अधिक जाणून  घेण्यासाठी तर उपयुक्त आहेच;  पण त्याची अधिक उपयुक्तता आहे- सामाजिक चळवळी व आंदोलने कशी चालवली  जावीत,  त्याला किती विविध आयाम असतात, त्यासाठी किती सखोल व व्यापक तयारी करावी लागते,  त्यासाठी  किती जास्त चिकाटी व संयमाची आवश्यकता असते,  हे सर्व नव्याने समजून घेण्यासाठी! 

हिरकमहोत्सवानंतरच्या बारा वर्षांत साधना साप्ताहिकाचे सहाशे अंक प्रकाशित झाले आहेत. त्यातील अनेक  अंकांचे वाचकांकडून भरपूर कौतुक झाले असले तरी, आम्ही मात्र फक्त सहा अंकांनाच ‘अप्रतिम’ हे लेबल लावले  आहे. ते लेबल पहिल्यांदा लावले तो अंक म्हणजे ‘दलपतसिंग येती गावा’  हा 1 मे 2010 चा विशेषांक.  महाराष्ट्र  राज्याच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होत होती,  तेव्हा साधनाचा तो विशेषांक आला होता. त्याच्या आधीच्या वर्षी  साधना दिवाळी अंकात,  राजा शिरगुप्पे यांनी लिहिलेला ‘शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची’  हा पन्नास  पानांचा रिपोर्ताज प्रसिध्द झाला होता आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तोच धागा पुढे घेऊन  जाणाऱ्या दमदार विषयाच्या शोधात आम्ही होतो आणि नेमके त्याचवेळी ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक आले होते.  माहितीचा अधिकार देणारा कायदा कसा अस्तित्वात आला याची झलक दाखवणारे ते नाटक होते. दरम्यान,  तो  कायदा अस्तित्वात येऊन पाच वर्षे झाली होती आणि त्याभोवती दरारायुक्त वलय निर्माण झाले होते. ते नाटक आम्ही  दोनेक आठवड्यांच्या कालावधीत तीन वेळा पाहिले आणि मग क्रमाक्रमाने एकेक टप्पा पुढे जात विशेषांकच आकाराला आला. ते नाटक अफलातून तर होतेच,  पण त्याहून अधिक अफलातून होती त्या नाटकाच्या निर्मितीची  प्रक्रिया! 
    
त्याबाबत बऱ्यापैकी विस्ताराने त्या अंकाच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे. पण त्यात न सांगितलेल्या दोन गोष्टी इथे सांगणे आवश्यक वाटते. एक- ‘या वर्षीचा 1 मे विशेषांक कशावर काढताय?’ असा प्रश्न काही हितचिंतक वाचक त्या दरम्यानच्या  काळात विचारत होते. त्याला ‘दलपतसिंग येती गावा या नाटकावर’,  असे उत्तर आमच्याकडून दिले जायचे. तेव्हा  काहीशा चमत्कारिक नजरेने प्रतिप्रश्न यायचा, ‘काय,  महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या समाप्तीचा अंक नाटकावर?’  तेव्हा आमचे उत्तर,  ‘होय,  राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी इतका चांगला विषय दुसरा मिळाला नसता.’  असे  असायचे. दुसरी गोष्ट अशी की, त्या विशेषांकाचे प्रकाशन त्यावेळचे राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या  हस्ते साधना कार्यालयाच्या सभागृहातच केले होते. आणि त्यानंतर त्यांना माहिती आयुक्ताचे अनुभव लिहिण्याची विनंती केली होती. तेव्हा त्यांनी लिहिलेला पाच हजार शब्दांचा अप्रतिम लेख त्यानंतरच्या साधना दिवाळी अंकात प्रसिध्द केला होता. (मागील बारा वर्षांत सहा हजार लेख साधनातून प्रसिध्द झाले,  त्यातील अनेक लेख गाजले असले  तरी शंभरेक लेखांनाच ‘अप्रतिम’ हे लेबल आम्ही लावतो.) असो. तर साधनाचा तो अप्रतिम अंक पुस्तकरूपाने आज ना उद्या आणायचा असा विचार मनात होताच,  पण त्यासाठी  योग्य निमित्त मिळत नव्हते. अखेर ते मिळाले... 2018 च्या अखेरीस अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले  ‘द आरटीआय स्टोरी’  हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले. पण त्यानंतरच्या सात-आठ महिन्यांतही त्याची मराठी आवृत्ती  आल्याचे दिसले नाही. म्हणून ते पुस्तक साधना प्रकाशनाकडून मराठीत आणायचे,  त्याच्या प्रकाशनासाठी अरुणा रॉय  यांना बोलवायचे आणि त्याच वेळी ‘दलपतसिंग’चा विशेषांक पुस्तकरूपाने आणायचा असे ठरवले होते.  त्यानंतर अवधूत डोंगरे या तरुणाने ‘द आरटीआय स्टोरी’  या चारशे पानांच्या पुस्तकाचा अचूक व प्रवाही अनुवाद  (कहाणी माहिती अधिकाराची) अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केला. त्यामुळे 12 जानेवारी 2020 रोजी,  त्या पुस्तकाचे  प्रकाशन पुणे येथील पत्रकार भवनच्या सभागृहात करण्याचे ठरवले आहे. 
    
त्या पुस्तकाचे प्रकाशन नाटकातील   दलपतसिंग व अलकाताई (राजकुमार तांगडे व वीणा जामकर) यांच्या हस्ते आणि अर्थातच नाटकाचे लेखक व  दिग्दर्शक (मकरंद साठे व अतुल पेठे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. शिवाय,  अरुणा रॉय यांची मुलाखत वीणा  जामकर घेणार आहेत. आणि म्हणून दलपतसिंगवरील विशेषांकाचे पुस्तकही त्याच कार्यक्रमात प्रकाशित करीत  आहोत. यात आणखी एक छोटी पण महत्त्वपूर्ण भर टाकली आहे,  ती म्हणजे दलपतसिंग या नाट्यसंहितेचे पुस्तकही  याचवेळी साधना प्रकाशनाकडूनच आणत आहोत. म्हणजे माहिती अधिकाराचा संदर्भ असलेली तीन पुस्तके एकाच  वेळी प्रकाशित होत आहेत.  ही तीनही पुस्तके आता एकत्र प्रकाशित करून, या विषयाचे महत्त्व अधोरेखित करीत आहोत. विशेषत: सध्याच्या अस्वस्थ काळात आणि चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून माहिती आयुक्तांचे वेतन व त्यांचा कालावधी  यासंदर्भात कायद्यात केलेली दुरुस्ती पाहता, या विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरजही आहे.  यापैकी ‘कहाणी माहिती अधिकाराची’  या पुस्तकात 1990 नंतरच्या तीस वर्षांच्या काळात अरुणा रॉय व  त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा दस्तावेज आहे. हा ऐवज माहिती अधिकाराच्या संदर्भात अधिक जाणून  घेण्यासाठी तर उपयुक्त आहेच;  पण त्याची अधिक उपयुक्तता आहे- सामाजिक चळवळी व आंदोलने कशी चालवली  जावीत,  त्याला किती विविध आयाम असतात, त्यासाठी किती सखोल व व्यापक तयारी करावी लागते,  त्यासाठी  किती जास्त चिकाटी व संयमाची आवश्यकता असते,  हे सर्व नव्याने समजून घेण्यासाठी! 
       
देवडुंगरी हे राजस्थानातील  लहान गाव ते नवी दिल्लीतील केंद्र सरकार असा पट या पुस्तकातून उलगडत जातो आणि त्यामुळे प्रचंड गुंतागुंत लक्षात येते, तशीच ‘केल्याने होत आहे रे’ हा संदेशही मिळतो. अरुणा रॉय यांच्या लढ्यावर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिण्याचे काम मराठीतील महत्त्वाचे नाटककार मकरंद साठे यांच्याकडे आले होते. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष त्या लढ्याच्या ठिकाणी जाऊन सहअनुभूती घेऊन आणि  लढ्याचा अभ्यास करून ती पटकथा लिहिली,  पण काही कारणांमुळे तो चित्रपट येऊ शकला नाही. नंतर त्या पटकथेचे  झालेले रूपांतर म्हणजे ‘दलपतसिंग येती गावा’  हे नाटक.  हे नाटक अतुल पेठे यांनी जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावात जाऊन तेथील तरुणांना हाताशी धरून कसे  उभे केले याची कहाणी सांगणारा तो विशेषांक म्हणजे ‘नाट्यनिर्मितीची प्रक्रिया’ हे आता येत असलेले पुस्तक.  वरील तिन्ही पुस्तके वाचणारांना सार्वजनिक जीवनातील एक मोठे व महत्त्वाचे दालन उघडल्यानंतर जे काही दिसते तसा अनुभव येईल,  आपले आकलन बरेच पुढे सरकल्याची प्रचिती येईल! 

Tags: Avdhoot Dongare Rajkumar Tangade Atul Pethe Makarand Sathe Aruna Roy RTI story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात