डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सानप वस्ती ते सार्क विद्यापीठ

सहा वर्षांपूर्वी साधनाने ‘भारताचे शेजारी’ हा विशेषांक काढला होता, डॉ.मनीषा टिकेकर त्या अंकाच्या अतिथी संपादक होत्या. त्या अंकात ‘सार्क’मधील आठ देश आणि चीन व म्यानमार हे आणखी दोन शेजारी अशा एकूण दहा देशांतील समाज व तेथील राज्यव्यवस्था यांच्यावरील दीर्घ लेख होते. त्या विशेषांकाची पुरवणी म्हणून या युवा अभिव्यक्ती अंकाकडे पाहता येईल.

साधना साप्ताहिक ६० वर्षांचे झाले तेव्हापासून बालकुमार दिवाळी अंक नियमितपणे प्रकाशित करायला सुरुवात झाली. त्या अंकाला सातत्याने मिळत गेलेले यश (सरासरी साडेतीन लाख प्रती) लक्षात घेऊनच, साधनाच्या ६६ व्या वर्षापासून युवा दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला... आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्याच (२०१४) युवा दिवाळी अंकाला उत्तम यश (पाऊण लाख प्रती) मिळाले. युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल अशा प्रकारचे लेखन त्या अंकात विविध क्षेत्रांतील नामवंतांनी केले होते. पण त्यावेळीच आम्ही ठरवले होते की, युवकांच्या लेखनाचा युवा अभिव्यक्ती अंक काढायचा... आणि त्याप्रमाणे १२ जानेवारी या युवक दिनाचे निमित्त साधून हा अंक तयार केला आहे.

युवा अभिव्यक्ती अंकाची रचना ‘जनरल’ नको तर थीम बेस्‌ड असली पाहिजे, तरच तो अधिक परिणामकारक होईल असा विचार पुढे आला. आणि त्यातूनच, सार्क विद्यापीठात शिकलेल्या आठ देशांतील आठ युवकांचे लेख असलेला अंक ही कल्पना सुचली. अर्थातच त्याला संकल्प गुर्जर हा आमचा तरुण मित्र कारणीभूत ठरला आहे. गेल्या पाच वर्षांत (अडीच वर्षे पुण्यात व अडीच वर्षे दिल्लीत असूनही) संकल्प सातत्याने व चढत्या क्रमाने साधनाच्या संपर्कात आहे. त्याने तीन वर्षांपूर्वी साधनातून लिहिलेले ‘हिरवे पान’ हे एकपानी सदर विशेष गाजले होते. त्याशिवाय मुलाखत, अनुवाद, पुस्तक परीक्षणे या स्वरूपाचे लेखनही त्याने साधनासाठी अधूनमधून केले आहे. त्याच्या सार्क विद्यापीठातील वास्तव्याचे वृत्तांत नियमितपणे कळत असल्यानेच केवळ या अंकाची कल्पना सुचली. मुळात सार्कमधील राष्ट्रे भारताचे शेजारी आहेत.

या देशांतील मुले पदवीनंतर सार्क विद्यापीठात शिकण्यासाठी दिल्लीत येतात, दोन वर्षे राहतात, त्यानंतर पुन्हा आपापल्या वा अन्य देशात जातात. म्हणजे या दोन वर्षांच्या काळात, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रदेश व संस्कृतीतून आलेली मुले-मुली एकत्र येतात तेव्हा काय घडते? ते कसे सामोरे जातात, नव्या व अचानक बदललेल्या परिस्थितीला? त्यांच्यातील संघर्ष व समन्वय कसे घडून येतात? त्यांच्यात परिवर्तन काय व कसे होते? असे काही कवडसे पकडता यावेत इतकाच माफक हेतू हा अंक काढण्यामागे होता आणि तो आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साध्य झाला आहे. या अंकाची कल्पना सांगितल्यानंतर, पुढचे सर्व काम संकल्पनेच केले आहे. म्हणजे लेखकांची निवड करणे, त्यांच्याकडून लेख मिळवणे, त्या सर्व लेखांचे अनुवाद करणे इत्यादी...

या अंकात लेखन केले आहे त्या आठही तरुण मुलांचा मराठी भाषेशी अजिबातच परिचय नाही, म्हणून त्यांच्यासाठी इंग्रजीतील ई अंक पीडीएफ स्वरूपात द्यावा असा विचार मनात आला. पण अंकाचा सर्व मजकूर हातात आल्यावर असेही वाटले की, या इंग्लिश अंकाच्याही काही प्रती छापून घेऊन वितरित करता आल्या तर साधनाच्या अनेक वाचकांना ते अधिक आवडेल. कारण असे कितीतरी साधनाचे हितचिंतक आहेत, ज्यांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या युवकांचा (इंग्रजी माध्यमातून शिकलेले असल्याने) मराठी वाचनाशी फारसा संबंध नाही. म्हणून या अंकाची छापील इंग्रजी आवृत्तीही उपलब्ध करून देत आहोत.

सहा वर्षांपूर्वी साधनाने ‘भारताचे शेजारी’ हा विशेषांक काढला होता, डॉ.मनीषा टिकेकर त्या अंकाच्या अतिथी संपादक होत्या. त्या अंकात ‘सार्क’मधील आठ देश आणि चीन व म्यानमार हे आणखी दोन शेजारी अशा एकूण दहा देशांतील समाज व तेथील राज्यव्यवस्था यांच्यावरील दीर्घ लेख होते. त्या विशेषांकाची पुरवणी म्हणून या युवा अभिव्यक्ती अंकाकडे पाहता येईल. शिवाय, सहा महिन्यांपूर्वी ‘दोन प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं’ (अतिथी संपादक- नामदेव माळी) हा अंक साधनाने प्रकाशित केला आहे.

त्या अंकात, सांगली जिल्ह्यातील समडोळी व सानप वस्ती या दोन छोट्या गावांतील दोन प्राथमिक शिक्षकांनी लिहिलेले दीर्घ लेख आहेत. त्या अंकाशीही, या युवा अभिव्यक्ती अंकाचे नाते सांगता येईल. सानप वस्ती किंवा समडोळीची मुले सार्क विद्यापीठात जाऊ शकतात, असा विश्वास या अंकातून निर्माण होऊ शकतो. आठ देशांतील आठ मुलांची ही अभिव्यक्ती वाचून देश आणि धर्म यांच्यापेक्षा भाषा आणि संस्कृती यांचे मोल अधिक आहे, असा निष्कर्ष काढता येईल... आणि इथून-तिथून मानवजात एकच आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.     

Tags: मनीषा टिकेकर सार्क देश संपादकीय dr. manisha tikekar sadhana visheshank diwali ank saarc countries editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके