धर्माची ठेकेदार मंडळी जेव्हा धडधडीत अन्यायाविरुद्ध अगतिक ठरतात तेव्हा कायद्याचा आधार शोधण्यावाचून पीडितांना गत्यंतर राहत नाही. कायद्याइतकेही संरक्षण द्यायला जो धर्म असमर्थ ठरतो तो आपली उपयुक्तताच गमावून बसतो. धर्म जोवर दुर्व्यवहार थांबवण्याऐवजी नुसतीच उच्च तत्त्वे घोषवीत राहतो तोवर त्याची सांभाळणूक करणे अशक्य आहे. अस्पृश्यता निवारण धमनि होत नाही हे पाहिल्यावर साने गुरुजींनी प्राण पणाला लावले. मुस्लिम स्त्रियांचा मूक आक्रोश त्यांच्या कानी पडला असता तर त्यांच्यासाठीदेखील प्राण पणाला लावायला साने गुरुजींनी मागे-पुढे पाहिले नसते.
‘शोधन' नावाचे एक मराठी साप्ताहिक गेली चार वर्षे मुंबईहून प्रकाशित होत असते. डॉ. एम. ओ. शेख हे सदर साप्ताहिकाचे संपादक असून ‘सद्भाव' प्रकाशनातर्फे ते प्रसिद्ध होते. अंकाची वार्षिक वर्गणी केवळ दहा रुपये आहे. मुस्लिम समाजात सुधारणांचा जो प्रवाह निर्माण होत आहे तो ‘शोधन’च्या कागदी बांधांनी रोखता येईल, अशा कल्पनेने सनातनी मुसलमान हा मराठी उद्योग करीत असतात! अशा कागदी बांधांनी कालप्रवाह रोखता येत नाही, हे या मंडळींना जरी कळले नाही तरी मराठीतून अशी वृत्तपत्रे चालवल्यावाचून मुसलमानांपर्यंत यापुढे पोहोचता येणे शक्य नाही, हे समजण्याइतपत व्यावहारिक शहाणपणा त्यांच्यांत आता आला आहे. उर्दू हीच मुसलमानांची भाषा आणि तिला सर्व राज्यांत दुसऱ्या भाषेचे स्थान मिळाले पाहिजे, असा आग्रह ही मंडळी आपले जातीय राजकारण चालवण्यासाठी धरत असतात, पण आपले साप्ताहिक मात्र मराठी भाषेत काढतात. मराठीचा आश्रय केल्यावाचून पुरेसा वाचकवर्ग यापुढे आपल्याला मिळू शकणार नाही, ही गोष्ट आडवळणाने त्यांनी यात मान्य केली आहे. ही माणसे अशा द्वयर्थी मन:स्थितीत नेहमीच वावरत असतात. पण धर्म आणि भाषा यांचा अविच्छेद्य असा काही संबंध नसतो असे मात्र ही मंडळी कधीही सांगणार नाहीत. हिंदूंना किंवा बिगरमुस्लिमांना इस्लाम समजावून सांगण्याच्या उदात्त हेतूने ते हा सारा खटाटोप करतात, असे कोणाला म्हणायचे असेल तर त्याने खुशाल म्हणावे. ख्रिस्ती मंडळींइतपत जरी त्यांच्यात समजूतदारपणा असता तरी त्यांनी विनोदांनी 'कुराणसार’ मराठीत आणण्यापूर्वीच ते कार्य करून टाकले असते. आता अटळ झाल्याने मराठी कुराण खंडश: उपलब्ध करण्याचा वेडाबागडा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.
'शोधन' कारांचे अश्रुविमोचन
तर अशा या ‘शोधन’ साप्ताहिकाला कसा कोणाला ठाऊक पण एकाएकी साने गुरुजींचा उमाळा आला. साने गुरुजींनी इस्लामी ‘संस्कृती' नावाचा एक ग्रंथ लिहिला असून त्याच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. झाकीर हुसेन आणि विनोबांनी त्या पुस्तकाला पुरस्कार लिहिले आहेत. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत झाला आणि अन्य काही ठिकाणी तदनुषंगिक चर्चासत्रेही झाली, पण ‘शोधन’कारांना या ग्रंथाचा नव्याने शोध लागला असून साधनेचे सध्याचे संपादक त्या साने गुरुजींच्या कार्याला बट्टा छावीत आहेत, म्हणून त्यांनी ‘शोधन'मध्ये अश्रुविमोचन केले आहे! पण हे करताना साने गुरुजींनी लिहिलेले ते पुस्तक प्रत्येक मराठी मुसलमानाने वाचावे, अशी शिफारस मात्र त्यांनी केली नाही! साधनेच्या सध्याच्या संपादकांना शिव्याशाप वाहण्यासाठी ज्या पुस्तकाचा आधार त्यांनी घेतला ते पुस्तक वाचण्याचा आग्रह त्यांनी धरला असता तर त्यांनी घेतलेला आधार इमानदारीचा आहे असे तरी म्हणता आले असते.
मानवता हाच धर्म, हीच संस्कृती
‘शोधन'कारांना बहुधा हे माहीत नसावे की, 'इस्लामी संस्कृती' व 'चिनी संस्कृती' हे ग्रंथ लिहिण्याआधी साने गुरुजींनी 'भारतीय संस्कृती' नावाचाही एक ग्रंथ लिहिला असून त्याच्या अनेक आवृत्त्या आजवर निघाल्या आहेत. परंपरागत भारतीय संस्कृतीचा आधुनिक काळाच्या नव्या संदर्भात नवा अर्थ काय, ते त्यांनी त्या ग्रंथात विवरले आहे. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद देणाऱ्या देशात आता कुटुंब नियोजनामुळेच गृहस्थाश्रमाची प्रतिष्ठा टिकून राहील, असे त्यांनी निर्भयपणे सांगितले आहे. साने गुरुजीची धर्म व संस्कृतिविषयक मते समजून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. सर्व धर्म कालान्तराने दूषित होतात आणि त्यांचा मूळचा समाजकल्याणकारी हेतूच लोपून जातो. म्हणून धर्मातील सूत्रांचा स्थल-काल-परिस्थितीच्या संदर्भात नवा अर्थ लावणे व कालबाह्य धर्ममतांचा त्याग करणे अपरिहार्य आहे, असे त्यांचे मत होते. पंढरपूरच्या मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांनाही इतरांप्रमाणेच खुले असले पाहिजेत अशी भूमिका साने गुरुजींनी घेतली व त्यासाठी आपले प्राण पणाला लावण्याचे ठरवले तेव्हा बडव्यांनी त्यांना शास्त्रार्थ करून वादात जिंकण्याचे आव्हान दिले. वादात साने गुरुजींना जिंकण्यासाठी पोथ्यांची पोती घेऊन बडवे आले होते. साने गुरुजींनी पूर्वपक्ष करावा असे त्यांनी सुचवले तेव्हा साने गुरुजींनी एका वाक्यात पूर्वपक्ष केला. "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, यासाठी कोणत्याही धर्मग्रंथांच्यादेखील आधाराची गरज नाही" असे त्यांनी स्वच्छ सांगितले आणि वादाचा उत्तर पक्षही तिथेच झाला! ‘मानवता हाच धर्म आणि मानवता हीच खरी संस्कृती’ असे त्यांचे मत होते.
साने गुरुजींचे सूचन
'इस्लामी संस्कृती' या पुस्तकात स्थल- काल-परिस्थितीच्या संदर्भात जास्तीतजास्त जो उदार अर्थ निघू शकतो त्याचे विवेचन साने गुरुजींनी केले आहे. हा पहिला खंड मुख्यतः महंमद पैगंबर आणि त्यांचा काळ याविषयीचा आहे. त्या काळात स्त्रियांची अरब देशात जी दयनीय स्थिती होती तिच्यात महंमद पैगंबरांनी बदल घडवून आणला ही महती साने गुरुजींनी त्या ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे युद्धात मारले गेलेल्यांच्या बायकामुलांना वाऱ्यावर सोडणे व त्यांच्यावर अत्याचार करणे वैध मानणाऱ्यांना त्यांनी त्या स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार करा व त्यांना समतेने वागवा, असे सांगितले. ही गोष्ट या स्थल-काल-परिस्थितीच्या संदर्भात मोठीच होती. पण तोच अखेरचा टप्पा. त्या शब्दांच्या लक्ष्मणरेषेपुढे कोणी जाताच कामा नये, असे साने गुरुजींनी कुठेच म्हटले नाही. उलट पैगंबरांनी जी दिशा सूचित केली आहे त्या दिशेने पुढे पावले टाका, असे साने गुरुजींनी सुचवले आहे.
तर मग धर्माची डबकी होतात!
धर्म व संस्कृती यांच्यातील गतिशीलता संपते तेव्हा त्यांची डबकी होतात. धर्म हा चैतन्यदायी ठरण्याऐवजी जड कर्मकांडाच्या बेड्यांनी आपल्या अनुयायांना जखडून ठेवतो, अशी साने गुरुजींची भूमिका आहे. सध्याच्या संपादकांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याचा पाठपुरावा केला म्हणून साने गुरुजींचे नाव घेऊन त्यांना ठोकून काढण्याचा प्रकार किती हास्यास्पद आहे, हे यावरून ध्यानी येईल. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन या स्थल-काल-परिस्थितीच्या संदर्भातच केले पाहिजे. ज्या काळात मुलगी जन्माला येताच तिला मारून टाकणेदेखील पाप समजले जात नव्हते त्या काळात तिला जगण्याचा अधिकार आहे, हे सांगणेदेखील क्रांतिकारी होते. राजा राममोहन राय यांनी सतीची प्रथा बंद व्हावी आणि विधवेचा जगण्याचा हक्क मान्य व्हावा म्हणून जिवाच्या आकांताने खटपट केली. पण म्हणून त्यापुढची पावले टाकणे हे गैर म्हणता येईल काय? महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी आपल्या हयातीतच विधवांवरील अन्याय दूर झाल्याचे पाहिले आणि आयुष्याच्या अखेरच्या चरणात मानवधर्माचा प्रचार आरंभला. स्त्रियांचा जगण्याचा हक्क समाजाने मान्य केल्यानंतर पैगंबर तिथेच थांबून राहिले असते असे मानणे स्वतः पैगंबरांवरही अन्याय करण्यासारखे आहे. पैगंबरांचा विनय फार प्रख्यात आहे. ‘चमत्कार करून दाखवा म्हणजे झटपट सारे जग आपल्या मताकडे वळेल,' असा सल्ला त्यांना देणाऱ्या सज्जनांना पैगंबर म्हणाले होते, 'अरे! माझ्यासारखा अनपढ ही धर्मतत्त्वे सांगतो, हाच केवढा विलक्षण चमत्कार आहे!’ इस्लाम हा गतिशील धर्म आहे असे एका बाजूला म्हणायचे व दुसऱ्या बाजूला स्थल-काल-परिस्थितीच्या संदर्भात सुधारणा करू पाहणारांना विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. इस्लाममध्ये 'आखिरत'चा सिद्धान्त ज्या नास्तिकांनी घुसडून दिला त्यांनी इस्लामचेच सत्वहरण केले आहे.
मतलबी धर्मनिष्ठा
‘शोधन’कारांनी साधनेच्या संपादकांवर साने गुरुजींना हाताशी धरून टीकेची जी निरर्थक झोड उठवली त्याला कारण नगर व इतरत्र वकिलांच्या संघटनांनी, स्त्रियांवर अन्याय करणारा मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा भाग बदलावा अशी मागणी करणारे ठराव केले हे झाले. तलाक आणि सवत यांचा धाक घालून मुस्लिम स्त्रीला गुलामीत ठेवू पाहणाऱ्या कायद्यात बदल केला पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या वकिलांच्या जात-धर्माचा शोध 'शोधन'कारांनी घ्यावा व खऱ्या-खोट्याची फारशी तमा न करता मुस्लिम वकिलांनी शरीयतमधील मुस्लिम स्त्रीवरील अन्याय कायम ठेवण्यासाठी जिहाद पुकारावे अशी हाकाटी करावी, हा त्यांचा मतलबीपणा आहे. नगरच्या वकील संघटनेने केलेला ठराव कोणाही सहृदय माणसाला आणि भारतीय संविधानाशी इमान राखण्याची घोषणा करणाऱ्याला निश्चितच स्वागतार्ह वाटेल. 'शोधन'कारांची खरी डोकेदुखी आहे ती ही! आणि वड्याचे तेल वांग्यावर एखाद्या माथेफिरूने काढावे त्याप्रमाणे साने गुरुजींशी साधनेचे संपादक गद्दारी करत आहेत, असा ते प्रचार करीत सुटले आहेत.
हास्यांपद युक्तिवाद
'शोधन’कारांसारख्यांचा तोल सुटून ते कशा प्रकारचे हास्यास्पद युक्तिवाद करतात ते पाहण्यासारखे आहे. "हजारो अनिर्णित कज्जे उच्च व सर्वोच्च न्यायालयांत रेंगाळत पडले असताना मुस्लिम स्त्रियांच्या कज्जांची त्यात भर चालणे मूर्खपणाचे ठरेल." असे ते म्हणतात. कज्जे कमी करण्याची ही युक्ती इतर कोणा बुद्धिवंताला आजवर सुचली नाही, हे केवढे दुर्दैव! 'अन्यायाबद्दल दाद मागण्याची सवलत काढून घ्या, म्हणजे कज्ज्यांची संख्या कमी होईल' असेच ‘शोधन’कार सुचवत आहेत. सगळेच कायदेकानू, शरीयतचेदेखील रद्द केले तर कज्जांची संख्या शून्यावरदेखील आणता येईल. ‘शोधन'कारांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली असती तर काय बहार झाली असती!
मतलबी मौन
पाकिस्तानमध्ये शरीयत किंवा मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात ज्या सुधारणा झाल्या त्याबद्दल 'शोधन'कार आपल्या वाचकांना अर्थातच काही सांगणार नाहीत. अय्यूबखानने त्याच्या राजवटीत न्यायालयातूनच तलाक मिळवणे सक्तीचे केले. इथल्या सुधारणावाद्यांची मागणी त्याहून फारशी वेगळी नाही. एकाच दमात तीनदा 'तलाक' शब्द उच्चारून मुलाबाळांसह बायकोला घराबाहेर काढणाऱ्यांबद्दल 'शोधन'कार अवाक्षर बोलत नाहीत! अरब मंडळी भारतीय मुस्लिम स्त्रियांची जी विटंबना या तलाकच्या सवलतीचा फायदा घेऊन राजरोसपणे करत आहेत त्याबद्दल 'शोधन'कार मतलबी मौन पाळतात. अशा मंडळींचे पारिपत्य करण्याची एकादी प्रभावी पद्धत ते सुचवत नाहीत. लग्नप्रसंगी ठरलेला मेहेर व इद्दतची धर्माने सांगितलेली रक्कम निर्वेधपणे तलाकपीडित स्त्रीला किमान ताबडतोब मिळावी यासाठी भविष्य निर्वाह निधीसारखी काही शासकीय व्यवस्था असावी असेदेखील म्हणायला ‘शोधन'कार तयार नाहीत! नवऱ्याच्या मर्जीवर हे तरी अवलंबून राहाता कामा नये; एवढे म्हणायला त्यांना काय हरकत आहे? धर्माची ठेकेदार मंडळी जेव्हा धडधडीत अन्यायाविरुद्ध अगतिक ठरतात तेव्हा कायद्याचा आधार शोधण्यावाचून पीडितांना गत्यंतर राहत नाही. कायद्याइतकेही संरक्षण द्यायला जो धर्म असमर्थ ठरतो तो आपली उपयुक्तताच गमावून बसतो. धर्म जोवर दुर्व्यवहार थांबवण्याऐवजी नुसतीच उच्च तत्त्वे घोषवीत राहतो तोवर त्याची सांभाळणूक करणे अशक्य आहे. अस्पृश्यता निवारण धमनि होत नाही हे पाहिल्यावर साने गुरुजींनी प्राण पणाला लावले. मुस्लिम स्त्रियांचा मूक आक्रोश त्यांच्या कानी पडला असता तर त्यांच्यासाठीदेखील प्राण पणाला लावायला साने गुरुजींनी मागे-पुढे पाहिले नसते.
Tags: मतलबी धर्मनिष्ठा शोधन साप्ताहिक त्यांची इस्लामविषयक दृष्टी साने गुरुजी वैचारिक meaning religeous allegiance Shodhan Weekly His Islam Boundary Vision Sane Guruji Ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या