डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरे तर गेल्या वर्षी 8 जानेवारीला ‘सत्यशोधक’चा पहिला प्रयोग झाला तेव्हापासून या नाटकावर एखादा अंक किंवा विशेष विभाग करावा असा विचार चालू होता, पण या ना त्या कारणामुळे राहून गेले होते. अखेर दिवाळी अंकात अतुल पेठे यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करायचे ठरवले, तसे जाहीरही केले आणि त्याप्रमाणे ती मुलाखतही घेतली, पण तिचे शब्दांकन वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने दिवाळीनंतरच्या पहिल्या अंकात ती प्रसिद्ध करावी असे ठरवले होते. पण तोपर्यंत एक चित्र स्पष्ट झाले, ते म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्या दिवशी पुणे येथील म.फुले वाड्यावर या नाटकाचा 100 वा प्रयोग होणार आहे आणि 101 प्रयोगानंतर हे नाटक थांबणार आहे. त्यामुळे असा विचार पुढे आला की, 3 जानेवारीच्या जवळचा संपूर्ण अंक या नाटकावर काढावा, त्याप्रमाणे घडवून आणले आहे. 

या अंकातील प्रत्येक लेखात अतुल पेठे यांच्याविषयी काही ना काही आले आहे, त्यामुळे त्यांना आणखी एखादे विशेषण लावून त्यांची ओळख सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अतुल पेठे यांच्या कामाची ‘साधना’ने गांभीर्याने दखल घेण्याची गेल्या पाच-सहा वर्षांतील ही चौथी  वेळ आहे. 

‘कचराकोंडी’ या माहितीपटाच्या निमित्ताने अवधूत परळकर यांनी अतुल पेठे यांची घेतलेली दीर्घ मुलाखत साधनाच्या 2007 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. ‘नाटक करताना होणारी घुसमट’ हा विशेष विभाग 2008 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता, त्या विभागाचे संपादन अतुल पेठे यांनी केले होते. त्यात त्यांनी मोहित टाकळकर, राजकुमार तांगडे, धर्मकीर्ती सुंत, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र आणि हिमांशु स्मार्त या सहा तरुण रंगकर्मींना लिहिते केले होते. 

माहितीच्या अधिकारासाठी अरुणा रॉय यांनी दिलेल्या लढ्याच्या संदर्भात मकरंद साठे यांनी लिहिलेल्या ‘दलपतसिंग येती गावा...’ या नाटकाचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले होते. त्या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेवरील 72 पानी अंक 1 मे 2010 चा महाराष्ट्र दिन विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला होता. ‘ती’ मुलाखत आणि ‘तो’ विशेष विभाग यांचे जोरदार स्वागत वाचकांकडून झाले होते आणि ‘दलपतसिंग...’ या विशेषांकाचा उल्लेख तर आम्ही गेल्या सहा वर्षांतील साधनाचा सर्वोत्तम अंक म्हणून करीत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर ‘सत्यशोधक’वरील या अंकाकडे पाहिले जावे अशी आमची अपेक्षा आहे. 

खरे तर गेल्या वर्षी 8 जानेवारीला ‘सत्यशोधक’चा पहिला प्रयोग झाला तेव्हापासून या नाटकावर एखादा अंक किंवा विशेष विभाग करावा असा विचार चालू होता, पण या ना त्या कारणामुळे राहून गेले होते. अखेर दिवाळी अंकात अतुल पेठे यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करायचे ठरवले, तसे जाहीरही केले आणि त्याप्रमाणे ती मुलाखतही घेतली, पण तिचे शब्दांकन वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने दिवाळीनंतरच्या पहिल्या अंकात ती प्रसिद्ध करावी असे ठरवले होते. पण तोपर्यंत एक चित्र स्पष्ट झाले, ते म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्या दिवशी पुणे येथील म.फुले वाड्यावर या नाटकाचा 100 वा प्रयोग होणार आहे आणि 101 प्रयोगानंतर हे नाटक थांबणार आहे. त्यामुळे असा विचार पुढे आला की, 3 जानेवारीच्या जवळचा संपूर्ण अंक या नाटकावर काढावा, त्याप्रमाणे घडवून आणले आहे. 

हा अंक ‘सत्यशोधक’ नाटकाच्या संहितेवर भाष्य करणारा किंवा तिची चिकित्सा करणारा नसून, 20 वर्षांपूर्वीच्या या नाटकाच्या पुनरुज्जीवनामागची प्रेरणा काय, हे नाटक बसविण्याची प्रक्रिया काय होती आणि या नाटकाचे 100 प्रयोग होत आल्यानंतर त्यांचे अनुभव काय आहेत, या तीन प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. या अंकात समाजवास्तवाला भिडणारे जे मुद्दे आले आहेत, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. 

1827 ते 1890 हा जीवनकाळ असलेल्या म.फुले यांच्याविषयी वाचकांना बरेच काही ऐकून-वाचून माहीत असते आणि 19 व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या विचारांचा व कार्याचा विचार करताना आज म.फुले यांचे स्थान अग्रभागी मानले जाते. मात्र वि.का.राजवाडे यांनी ‘19 व्या शतकातील महाराष्ट्रातील बुद्धिवान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद’ या निबंधात 150 लोकांची यादी प्रसिद्ध केली होती आणि सार्वकालीन श्रेष्ठ म्हणून त्यातील 43 लोकांची नावे सांगितली होती. त्या पहिल्याही यादीत म.फुले यांचे नाव नव्हते. याचा अर्थ इतिहासाचार्याचे पूर्वग्रह होते, असे सोपे उत्तर काढता येणे शक्य आहे. पण तत्कालीन समाजाला खरोखरच म.फुले यांचे विचार व कार्य यांचे महत्त्व पुरेसे कळलेले नव्हते, किंबहुना 1960 पर्यंत म.फुले यांचे कार्य मुख्य प्रवाहातील लोकांना फारसे परिचित नव्हते. मात्र गेल्या 50 वर्षांत अनेक अभ्यासकांनी व कार्यकर्त्यांनी म.फुले यांचे कार्य प्रकाशात आणल्याने, एकोणिसाव्या शतकातील अव्वल समाजसुधारकांत त्यांचे नाव घेतले जाते. या पार्श्वभूमीवर, ‘सत्यशोधक’ हे आजच्या काळाचे नाटक आहे असे अतुल पेठे म्हणत असतील तर त्या विधानाचा भावार्थ समजून घेतला पाहिजे.

Tags: त्या यादीत फुले नाहीत दिवाळी अंक मकरंद साठे अरुणा रॉय सत्यशोधक राजवाडे नाटक अतुल पेठे महात्मा फुले साधना साप्ताहिक संपादकीय Tya Yadit Phule Nahit Diwali Ank Makrand Sathe Aruna Roy Satyashodhak Rajwade Natak Atul Pethe Mahatma Phule Weekly Sadhana Editorial Samapdakiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके