कैसे उदारांचे | उतराई व्हावे
ऋणात रहावे । हेची बरे ।।
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनाचा सर्वांगीण परिचय करून देण्यासाठी पूर्वी आम्ही नेहरू विशेषांक प्रसिद्ध केला. त्याचे वडीलधाऱ्या मंडळींनी स्वागत केलेच पण आमच्या तरुण वाचकांनाही पंडितजींच्या थोरवीचा फार उत्तम प्रत्यय या अंकाने दिला. त्याचवेळी असा विशेषांक सरदार पटेलांच्याही जीवनकार्यावर प्रकाशित केला पाहिजे असे आमच्या मनाने घेतले होते. ती मनीषा यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पटेल विशेषांक सिद्ध करून आम्ही पुरी करीत आहोत.
आधुनिक भारताच्या थोर शिल्पकारांची महनीय कामगिरी आजच्या पिढीसमोर यावी तशी येत नाही, अशी आमची भावना आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल या नेत्यांची जीवने पक्षीय चौकटीत बंदिस्त झालेली नव्हती. एकतर राष्ट्रीय काँग्रेस ही स्वातंत्र्य आंदोलनाची व्यापक आघाडी होती, आणि म्हणून 1947 पर्यंतचा स्वातंत्र्येतिहास हा मुख्यतः काँग्रेसचा इतिहास आहे. परंतु आजच्या पक्षीय राजकारणाच्या गलबल्यात आणि तात्कालिक अभिनिवेशाने मने भारून जाण्याच्या काळात आपण इतके व्यस्त होत असतो की राष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महापुरुषांच्या चरित्रांचा आणि कार्याचा आपल्याला - विशेषतः तरुण पिढीला काही विचारच करायला सवड होत नाही. परंतु आपल्या निकटच्या भूतकाळातील इतिहासाचे सगळे ताणे-बाणे आपल्या नजरेसमोर असणे नितांत आवश्यक आहे याची जाणीव 'साधना'ने नेहमीच बाळगलेली आहे. पटेल विशेषांक याच जाणिवेतून आम्ही प्रकाशित करीत आहोत.
सरदार वल्लभभाई पटेल. महात्मा गांधींचे निकटचे सहकारी- बारडोलीच्या किसानांचा लढा फत्ते करणारे धुरंधर सरदार. पुढे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक बिनीचे सरदार, स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे कर्तबगार आणि निःस्पृह असे गृहमंत्री. 563 संस्थानांचे भारताच्या मुख्य संघराज्यात विलीनीकरण घडवून आणणारे सवाई बिस्मार्क. खरोखर सरदार पटेलांनी ही कामगिरी तडफेने बजावली नसती तर भारतीय संघराज्याची काय दशा झाली असती याची कल्पनाच करवत नाही. अशा महान नेत्याच्या कर्तृत्वसंपन्न जीवनावर प्रकाश टाकणारा अंक काढण्यात एक विशेष औचित्य आहे हे निःसंशय.
महात्मा गांधी जसे केवळ गुजरातचे नेते नव्हते तसेच सरदार पटेलही केवळ एका प्रांतापुरत्या मर्यादित कर्तृत्वाचे नव्हते. परंतु तरीही त्यांच्या जीवनाचे प्रथमाध्याय गुजरातमध्ये घडले हे लक्षात घेता त्यांचे अनेक सहकारी आणि चाहते गुजरातमध्येच असावेत हे स्वाभाविक आहे. या अंकाच्या परिपूर्णतेसाठी गुजराथी मित्रांची मोलाची मदत होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगली आणि समाधानाची गोष्ट म्हणजे ती पुरी झाली. अहमदाबादचे सुप्रसिद्ध विचारवंत निःपक्ष संसदपटू आणि लास्की इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. पुरुषोत्तम मावळंकर यांना या अंकाचे अतिथिसंपादक होण्याची आम्ही गळ घातली आणि त्यांनी मित्रभावाने ही जबाबदारी पत्करली. श्री. केशव मावळंकर यांनी आमच्यासाठी अपार मेहनत घेतली. या मंडळींच्या साधनेवरील लोभामुळे गुजरातमधील नामवंत, विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार यांचे लेखन त्यांनी आम्हास मिळवून दिले. सारांशाने सांगावयाचे तर सरदारांच्या विविध पैलूंचे दर्शन या अंकात घडणार आहे ते गुजरातमधील आमच्या मित्रांच्या हार्दिक सहकार्यामुळेच! त्यांचे औपचारिक आभार मानणे आमच्या शक्तीबाहेरचे आहे. ते आम्हांला जमणार नाही आणि त्यांना रुचणार नाही. या अंकासाठी अनुवादकांचीही अतिशय आवश्यकता होती. पण या बाबतीत श्री. गोपाळ शहा, प्रा. जयंत जोशी, श्री. बळवंत दीक्षित, श्रीमती वासंती तोडकर, श्रीमती पूर्णिमा मावळंकर, श्री. केशव मावळंकर प्रभृतींनी आम्हाला बहुमोल साहाय्य केलेले आहे. या सर्वांच्या कायम ऋणात राहणे आम्ही पसंत करतो.
खुद्द पुणे शहरातही पटेल विशेषांकासाठी खूप मेहनत घेणारे मित्र आम्हांला मिळाले. आमचे मित्र डॉ. रमेशचंद्र शहा यांच्यामुळेच आम्हांला असे सहकार्य लाभू शकले. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांचे सहकारी श्री. कनुभाई त्रिवेदी, श्री. चंदुलाल शहा यांचेही आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. विशेषांकाला शोभा छायाचित्रांची. अहमदाबादच्या सरदार पटेल स्मारक समितीचे प्रमुख तसेच मुंबईच्या भारतीय विद्या भवनाचे निदेशक श्री. रामकृष्ण यांनी सरदारांची दुर्मिळ छायाचित्रे आम्हांला दिली. त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद.
खरोखर सर्व साहित्य प्राप्त झाले तरी ते वाचकांहाती देण्याआधी किती सोपस्कार असतात! अशा वेळी श्री. नवलभाऊ फिरोदिया आणि सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांच्यासारखे आमचे पाठिराखे मदतीचा हात न देते तर आम्ही काय करू शकलो असतो? आमचे इतरही हितचिंतक आणि या विशेषांकाचे सर्व जाहिरातदार यांचेही ऋण मोठे आहे. अंक संग्राह्य ठरावा यासाठी त्याचे बहिरंगही सुंदर असावे लागते. आमचे तरुण मित्र शेखर गोडबोले यांनी आपल्या परिपाठानुसार सुंदर मुखपृष्ठ करून दिले. चित्रकार ओके यांनी काढलेल्या सरदारांच्या सुंदर रेखाचित्राला गोडबोले यांनी रंगसाज चढविला. 'मुद्रा'चे सुजित पटवर्धन आणि त्यांचे सहकारी यांनी अल्पावधीत उत्तम छपाई करून दिली.
कैसे उदारांचे | उतराई व्हावे
ऋणात रहावे । हेची बरे ।।
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या