डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नानासाहेबांच्या 114 व्या जयंतीनिमित्त

‘नारायणीय’मध्ये 27 लेख आहेत. त्यात ललित लेख, कथा, वैचारिक लेख, तत्त्वचिंतन मांडणारे लेख आहेत. शिवाय ‘तिमिरातून तेजाकडे’ हा स्वत:च्या वैचारिक जडणघडणीचे विहंगमावलोकन करणारा लेखही आहे. राजकीय नेते अशी प्रमुख ओळख असणारे नानासाहेब किती शैलीदार व विचारप्रवण करणारे लेखन करीत होते, याचा प्रत्यय हे लेख वाचताना येतो. त्यांची आजही वाचलीच पाहिजेत अशी आणखी काही पुस्तके आगामी दोन वर्षांत साधना प्रकाशनाकडून क्रमाक्रमाने आणणार आहोत.

15 जून 1907 ते 1 मे 1993 असे 85 वर्षांचे आयुष्य ना. ग. ऊर्फ नानासाहेब गोरे यांना लाभले. थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पक्षाचे नेते, पुणे शहराचे महापौर, लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य, ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. 1982 ते 84 या काळात ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. या सर्व धकाधकीच्या काळातही त्यांनी उत्तम दर्जाचे ललित व वैचारिक लेखन केले, त्यातून दोन डझन पुस्तके आकाराला आली. त्यात ललित लेखांचे संग्रह, कथासंग्रह, वैचारिक निबंध, बालसाहित्य, तुरुंगातील रोजनिशी, पत्रसंग्रह, भाषणसंग्रह, तत्त्वचिंतनात्मक लेखन अशी विविधता आहे.  शिवाय, राष्ट्रीय स्तरावरील सहा दिग्गज नेत्यांच्या सहा पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले, ती नावे पाहिली तर कोणीही स्तिमित होईल. आत्मकथा : जवाहरलाल नेहरू, द्विखंड हिंदुस्थान : राजेंद्र प्रसाद, आपला हिंदुस्थान : मिनू मसानी, गांधीजींचे विविध दर्शन : सर्वपल्ली राधाकृष्णन, समाजवादच का? : जयप्रकाश नारायण, मेघदूत : कालिदास.

अशा या नानासाहेबांचे भावविश्व व विचारविश्व यांची ओळख होईल असा, त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘नारायणीय’ या नावाने 15 जून 1987 रोजी साधना प्रकाशनाकडून आला. त्याला निमित्त होते त्यांच्या 80 व्या वाढदिवसाचे आणि त्याचे संपादन केले होते साधनाचे तत्कालीन संपादक वसंत बापट व ग.प्र.प्रधान यांनी. त्या आवृत्तीचे प्रकाशन हिंदीतील नामवंत साहित्यिक उमाशंकर जोशी यांच्या हस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झाले. एस.एम.जोशी अध्यक्षस्थानी असलेल्या त्या समारंभात मधु दंडवते, बापूसाहेब काळदाते हे अन्य वक्ते होते. प्रधानसरांनी प्रास्ताविक तर बापटसरांनी सूत्रसंचालन केले होते. त्यावेळी नानासाहेबांच्या कन्या शुभा जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले होते.

त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे 2001 मध्ये ‘नारायणीय’ची दुसरी आवृत्ती आली. त्या आवृत्तीचे प्रकाशन पुणे येथील पत्रकार भवनच्या सभागृहात झाले, लोकसत्ताचे तत्कालीन संपादक अरुण टिकेकर यांच्या हस्ते व भारताचे माजी अर्थमंत्री मधु दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली तो समारंभ झाला. वसंत बापट व ग.प्र. प्रधान आणि साधनाचे तत्कालीन संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर त्या वेळी उपस्थित होते. पहिल्या आवृत्तीमधील एक लेख वगळून नानासाहेबांचे दोन लेख व प्रधानसरांचा नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा लेख नव्याने समाविष्ट करून दुसरी आवृत्ती काढली होती.

त्यानंतर वीस वर्षांनी ‘नारायणीय’ची तिसरी आवृत्ती आली आहे. दुसऱ्या आवृत्तीमधील सर्व लेख तसेच ठेवून, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या एका लेखाची भर टाकून ही आवृत्ती आणली आहे. पूर्वीचे कोणीही दिग्गज आज हयात नाहीत, नानासाहेब जाऊन पावशतक उलटले आहे आणि बापटसर व प्रधानसर यांचे जन्मशताब्दी वर्ष आले असताना ही आवृत्ती येत आहे. साधना दिवाळी 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला न्या.चपळगावकर यांचा लेख या आवृत्तीच्या प्रारंभी घेण्याचे कारण, बराच काळ उलटल्यानंतर नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा दृष्टिक्षेप ‘नारायणीय’ वाचताना उपयुक्त ठरेल.

‘नारायणीय’मध्ये 27 लेख आहेत. त्यात ललित लेख, कथा, वैचारिक लेख, तत्त्वचिंतन मांडणारे लेख आहेत. शिवाय ‘तिमिरातून तेजाकडे’ हा स्वत:च्या वैचारिक जडणघडणीचे विहंगमावलोकन करणारा लेखही आहे. राजकीय नेते अशी प्रमुख ओळख असणारे नानासाहेब किती शैलीदार व विचारप्रवण करणारे लेखन करीत होते, याचा प्रत्यय हे लेख वाचताना येतो. त्यांची आजही वाचलीच पाहिजेत अशी आणखी काही पुस्तके आगामी दोन वर्षांत साधना प्रकाशनाकडून क्रमाक्रमाने आणणार आहोत. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

Tags: विनोद शिरसाठ संपादकीय साधना प्रकाशन नारायणीय ग. प्र. प्रधान न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर नानासाहेब गोरे ना. ग. गोरे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके