डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तीन डॉक्टरांची मुलाखत कार्यक्रमाची पार्श्वभूमी

महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांच्याबरोबरच अनिल अवचट, अभय बंग व आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांच्या तीन संस्थांचे (अनुक्रमे मुक्तांगण, निर्माण, वेध) आणि विवेक सावंत यांच्या एम.के.सी.एल. या संस्थेशी संबंधित लोक कार्यक्रमाला येणार असल्याने गर्दी जमणे यात विशेष काही नव्हते. पण या गर्दीत वरीलपैकी कोणत्याही संस्थेशी- संघटनेशी संबंधित नसलेल्या लोकांची विशेषत: तरुणाईची गर्दी लक्षणीय होती. त्याहून अधिक महत्त्वाचे हे होते की, तीनही डॉक्टर जे काही बोलत होते ते ‘स्व’च्या पलीकडे जाण्यासंदर्भातच होते, सामाजिकतेला भिडणारेच होते आणि तरीही ती संपूर्ण गर्दी कान गोळा करून ऐकत होती

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी १९७८मध्ये ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)’ या संस्थेची स्थापना केली. या फाउंडेशनच्या वतीने मागील ४०वर्षे अमेरिकेत, अन्य काही देशांत व महाराष्ट्रात सामाजिक कार्य चालू आहे. तळागाळातील समूहाला आधाराचा हात द्यावा, समाजबदलांच्या नव्या प्रवाहांना गती मिळावी आणि तरुण पिढीला समाजसन्मुख बनविण्यासाठी बळ पुरवावे असे तीन प्रधान हेतू समोर ठेवून फाउंडेशन काम करते. या फाउंडेशनचे बहुतांश सदस्य आपापली नोकरी वा व्यवसाय सांभाळून वेगवेगळ्या उपक्रमांत आपापल्या शक्तीनुसार वेळ, ऊर्जा व पैसा खर्च करतात. या सर्वांची भूमिका सर्वसाधारणपणे अशीच राहिली आहे की, आम्ही जे काही घडलो; त्याची काही अंशी तरी परतफेड करावी किंवा समाजाप्रती ऋण व्यक्त करावे. त्यामुळे विविध उपक्रम- कार्यक्रम विविध सदस्यांच्या पुढाकारातून सुरू होतात आणि फाउंडेशन त्यांच्यामागे उभे राहते. असा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा व मोठा उपक्रम म्हणजे साहित्य व समाजकार्य क्षेत्रांतील व्यक्तींना पुरस्कार. हा उपक्रम सुनील देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झाला आणि गेली २४ वर्षे अखंडपणे चालू आहे.

मागील आठ वर्षांपासून त्या उपक्रमाचे संयोजन साधना ट्रस्टच्या वतीने केले जात आहे. या पुरस्कार वितरणाचा समारंभ दरवर्षी जानेवारी महिन्यात पुणे येथे होत असतो. त्या कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद आणि त्याची परिणामकारकता लक्षात घेऊन, गेल्या वर्षी महाराष्ट्र फाउंडेशनचे एक ज्येष्ठ सदस्य डॉ.सुरेश तलाठी यांनी पुरस्कार वितरण समारंभाला जोडून आणखी एक कार्यक्रम घ्यावा असा प्रस्ताव ठेवला.

डॉ.तलाठी हे अमेरिकेत शिकागो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात, त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची सामाजिकता हा विषय त्यांच्या मनात प्राधान्याने घोळत होता. त्यानुसार अनिल अवचट, अभय बंग आणि आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांच्या एकत्रित दीर्घ मुलाखतीचा कार्यक्रम व्हावा अशी कल्पना त्यांनी मांडली. अर्थातच, मागील दोन तरुण पिढ्यांना आणि आज-उद्याच्याही तरुण पिढ्यांना हे तीन डॉक्टर्स आयकॉन्स किंवा आयडॉल वाटतात म्हणून ही तीन नावे त्यांनी पुढे केली. आणि कार्यक्रमाच्या संयोजनासाठी फाउंडेशनचे व अन्य काही लोकांचे आर्थिक सहाय्य मिळवले. आणि मग ‘मुक्तांगण मित्र’ या संस्थेच्या मदतीने साधना ट्रस्टने या कार्यक्रमाचे संयोजन करावे असा प्रस्ताव ठेवला.

या तीन डॉक्टरांची मुलाखत घेण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा चांगला परिचय असणारी व्यक्ती आम्ही शोधत होतो. परंतु डॉ.अनिल अवचट यांनीच जेव्हा विवेक सावंत यांचे नाव सुचवले आणि त्यांनी आनंदाने होकार दिला, तेव्हा तीन आयकॉन्स बरोबर संवाद साधणारा चौथा आयकॉन मिळाला अशीच सर्वांची भावना झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर तळागाळातल्या समूहाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे आणि कोणताही उद्योग-व्यवसाय अंतिमत:  सामाजिकतेच्या दिशेने गेला पाहिजे, अशी धारणा असलेल्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे विवेक सावंत. त्यांनी, ही मुलाखत युवा वर्गाच्या जाणीवांच्या कक्षा रूंदावतील अशा पद्धतीने व्हायला हवी असा विचार मांडला आणि अर्थातच तो सर्वांना मान्य होता.

राष्ट्रीय युवक दिन १२जानेवारीला असतो, म्हणून त्या दिवशी किंवा त्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण तीन डॉक्टरांच्या सोईच्या तारखा १५जानेवारीला जुळत होत्या, म्हणून तो दिवस निश्चित केला. डॉ.सुरेश तलाठी यांनी ‘मागे वळून पाहताना’ असे शीर्षक सुचवले होते आणि ते यथार्थ असल्याने तशी जाहिरात दोन महिने आधीच केली. परंतु पहिलीच जाहिरात पाहून सुनील देशमुख यांनी कळवले, ‘‘आजच्या तरुणाईला काल-परवामध्ये रस नाही, त्यांना ‘आज’मध्ये रस आहे आणि ‘उद्या’ची आस आहे.’’ त्यामुळे मुलाखतीचा फोकस निश्चित व बरोबर असला तरी, श्री.देशमुख यांचे मार्मिक निरीक्षणही महत्त्वाचे होते. म्हणून मग दुसऱ्या जाहिरातीपासून आम्ही ‘मागे वळून पाहताना’ हे उपशीर्षक केले आणि मुख्य शीर्षक केले ‘पुढे जाण्यासाठी’. अर्थातच, सर्वांनी या बदलाला पसंती दिली, दाद दिली.

त्यानंतर मुक्तांगण मित्र, महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट या तीनही संस्थांनी आपापल्या बाजूने कार्यक्रमाची निमंत्रणे धाडली. शेवटच्या आठवड्यात सोशल मीडियावरून थोडा पण डिसेंट पद्धतीने प्रचार केला गेला. त्यामुळे कार्यक्रमाला गर्दी होणार हे सर्वांनाच अपेक्षित होते. परंतु सायंकाळी साडेपाच ही वेळ दिली असताना, पाच वाचताच बालगंधर्व रंगमंदिर बाल्कनीसह गच्च भरले होते.

बरोबर साडेपाचला कार्यक्रम सुरू केला, तेव्हा सभागृहात चारही बाजूंनी उभे असलेल्या श्रोत्यांना विचारपीठावर येऊन बसण्यास सांगितले. आणि मग दोनतीन मिनिटांतच विचारपीठावर येऊन त्या चौघांच्या आजूबाजूला व विंगेत मांडी घालून बसणाऱ्या श्रोत्यांची संख्या अडीचशेपेक्षा जास्त झाली. त्यानंतर बाहेरची गर्दी सभागृहात घुसली. अनेक लोक कडेने उभे राहिले, काहीजण मधल्या पॅसेजमध्ये येऊन बसले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आनंद नाडकर्णी यांच्या ‘वेध’ या संस्थेच्या वतीने एक गीत सादर केले गेले. डॉ.नाडकर्णी यांनीच लिहिलेले व संगीत दिलेले ते गीत कार्यक्रमासाठी समयोचित म्हणावे असे होते. त्यानंतर ‘मुक्तांगण मित्र’च्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत, डॉ.सुरेश तलाठी यांचे  मनोगत, सुनील देशमुख यांनी अमेरिकेतून पाठवलेल्या संदेशाचे वाचन, या कार्यक्रमासाठी देणगी दिलेल्या तीनचार व्यक्तींचा सत्कार, साधनाच्या संपादकांनी केलेले प्रास्ताविक-निवेदन, आणि अनिल अवचट यांच्या ‘कुतूहलापोटी’ या समकालीन प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन इतके सर्व सोपस्कार अवघ्या २५ मिनिटांत संपले. त्यानंतर बरोबर ६ ते ८ अशी दोन तास ही मुलाखत झाली.

विवेक सावंत यांनी काही प्रश्न या तिघांसाठी समान आणि उर्वरित प्रश्न प्रत्येकासाठी वेगवेगळे अशी रचना मनाशी जुळवली होती. एवढेच नाही तर, त्या प्रत्येकाला स्वत:विषयी व अन्य दोघांविषयी बोलता येईल अशाही काही प्रश्नांची रचना केली होती. त्यासाठी त्यांनी २४प्रश्न तयार ठेवले होते, मात्र दोन तासांच्या मुलाखतीत केवळ १२प्रश्नच विचारता आले. त्या संपूर्ण दोन तासांत सभागृहातील दीड हजारापेक्षा अधिक लोक ‘पीनड्रॉप सायलेन्स’चा अनुभव घेत होते, आवश्यक तिथे हशा-टाळ्या तेवढ्या मिळत होत्या.

महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांच्याबरोबरच अनिल अवचट, अभय बंग व आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांच्या तीन संस्थांचे (अनुक्रमे मुक्तांगण, निर्माण, वेध) आणि विवेक सावंत यांच्या एम.के.सी.एल. या संस्थेशी संबंधित लोक कार्यक्रमाला येणार असल्याने गर्दी जमणे यात विशेष काही नव्हते. पण या गर्दीत वरीलपैकी कोणत्याही संस्थेशी- संघटनेशी संबंधित नसलेल्या लोकांची विशेषत: तरुणाईची गर्दी लक्षणीय होती. त्याहून अधिक महत्त्वाचे हे होते की, तीनही डॉक्टर जे काही बोलत होते ते ‘स्व’च्या पलीकडे जाण्यासंदर्भातच होते, सामाजिकतेला भिडणारेच होते आणि तरीही ती संपूर्ण गर्दी कान गोळा करून ऐकत होती. तिघेही डॉक्टर असले तरी प्रत्येकाचे कार्यक्षेत्र, कार्यशैली व दृष्टिकोन वेगवेगळे आहेत आणि तरीही त्यांचे कार्य व दृष्टिकोन परस्परांना पूरक आहेत, तिघांचेही अंतिम ध्येय एकच आहे अशी भावना श्रोत्यांची झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिघांचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकले असते तर त्यात परस्परविरोध आहे, असे जाणवले असते. मात्र तिघेही स्वत:विषयी व परस्परांविषयी जे बोलले ते लक्षात घेता त्यांचा प्रवास समांतर जाणारा असून, त्यात आंतरिक एकरूपता आहे, असे नव्यानेच उलगडले. त्यामुळे ‘हेतूविना प्रयास आणि दिशेविना प्रवास’ हे प्रारंभीचे गीत अगदीच समर्पक असल्याचा प्रत्यय मुलाखत संपत असताना सर्वांनाच आला असावा.

दुसऱ्या दिवशी सर्वच प्रमुख वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला विशेष स्थान देऊन गौरविले. त्यानंतरच्या आठवड्यात संपूर्ण अडीच तासाच्या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफित, यू- ट्यूबवर टाकण्यात आली आणि त्यानंतरच्या दोन आठवड्यांतच जवळपास पाच हजार लोक त्या मुलाखतीपर्यंत पोहोचले अशी नोंद झाली. आणि आता साधनाच्या या अंकात ती संपूर्ण मुलाखत शब्दांकन करून दिली आहे. आणखी दोन आठवड्यांनी ही संपूर्ण मुलाखत स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने साधना प्रकाशनाकडून येईल. त्या पुस्तिकेत, या तीन डॉक्टरांना मागील अडीच-तीन दशकांपासून ओळखत असलेले, त्यांचे काम प्रत्यक्षात पाहिलेले व काही वेळा सहभागी झालेले विवेक सावंत यांचा लेख किंवा मुलाखत असेल. त्यातून या तिघांच्या व्यक्तिमत्त्वावर व कार्यावर एक वेगळा दृष्टिक्षेप टाकलेला असेल.

बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित असलेले लोक, यु-ट्यूटबवरून ती मुलाखत पाहिलेले लोक, या अंकाच्या सात हजार प्रतींच्या माध्यमातून मुलाखत वाचणारे लोक आणि आगामी पुस्तिकेच्या काही हजार प्रतींचे वितरण हे सर्व पाहता आणि या निमित्ताने झालेली सामाजिक घुसळण लक्षात घेता, हा उपक्रम भारीच उपयुक्त ठरला आहे. म्हणूनच महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने डॉ.सुरेश तलाठी यांनी पुढच्या वर्षीच्या युवकदिनाच्या कार्यक्रमासाठी नवा प्रस्ताव आताच दिला आहे. प्रशासनात लक्षणीय काम करणाऱ्या आणि तरुणाईला आयकॉन्स वाटू शकणाऱ्या तीन व्यक्तींच्या एकत्रित मुलाखतीचा कार्यक्रम असा तो प्रस्ताव आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय विदेश सेवा (आयएफएस), अशा तीन क्षेत्रांतील प्रत्येकी एक कार्यक्षम व समाजसन्मुख अधिकारी आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी निखिल वागळे, असा तो कार्यक्रम विचाराधीन आहे. म्हणजे सारे काही व्यवस्थित जुळून आले, तर तीन प्रशासकीय अधिकारी हा जानेवारी २०१८ मध्ये होणारा कार्यक्रमही सामाजिक घुसळण करणारा ठरेल, तरुणाईला प्रेरणा व प्रोत्साहन देणारा ठरेल! 

Tags: विवेक सावंत आनंद नाडकर्णी अभय बंग अनिल अवचट डॉ.सुरेश तलाठी विनोद शिरसाठ vinod shirsath साधना ट्रस्ट संयोजन सुनील देशमुख पुरस्कार समाजकार्य साहित्य महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) १९७८ पार्श्वभूमी संपादकीय एम.के.सी.एल वेध निर्माण मुक्तांगण कुतूहलापोटी मुक्तांगण मित्र आयडॉल आयकॉन्स मुलाखत Organising Co-ordination Idols Icons Maharashtra Foundation America Reward Award Literature Field Social Field Social work Dr. Suresh Talathi Vivek Sawant M.K.C.L. Interview Sadhana Trust Sunil Deshmukh Parshvbhumi background Anil Awachat Aanad Nadkarni Abhay Bang 1978 Vedh editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके