डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अभियान राबवा : गणिताची आवड आणि गाईडची नावड

गाईड्‌स हे निखळ साहित्य म्हणून वाईट असतेच असे नाही, किंबहुना त्यांचा किंचितसा वापर सर्वसाधारण रुपरेषा समजण्यासाठी केला तर फार काही बिघडत नाही. पण सामान्यत: तसे घडत नाही. मूळ पाठ्यपुस्तके किंचित वापरायची आणि गाईडस्‌चा मुख्य आधार घ्यायचा हा प्रकार 1970 च्या दशकानंतर क्रमाक्रमाने वाढत गेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शाळांची संख्या, त्या तुलनेत चांगले शिक्षक व प्रशिक्षक खूप कमी आणि पूरक ठरतील अशा माध्यमांचा अभाव, या सर्वांचा परिणाम गाईडसंस्कृती फोफावण्यात झाला. नंतर ते विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनाच सोयीचे ठरू लागले, म्हणजे फार श्रम न करता पास होणे, अधिक गुण मिळवणे यासाठी गाईडस्‌ उपयुक्त ठरू लागली.आणि मग शाळा महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या अनेक मुला-मुलींनी मूल्यशिक्षण तर सोडाच किमान पातळीवरील कौशल्येसुद्धा आत्मसात केलेली नसतात. त्यामुळे बेरोजगारांचे तांडे निर्माण झालेले दिसतात. शिवाय अकार्यक्षम, अप्रामाणिक, भ्रष्ट वृत्तीचे नागरिक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. असामाजिक घटकांच्या जाळ्यात ते फसत जातात. 

‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक टी.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमाला लागले, त्या निमित्ताने मागील अंकात ‘या पुस्तकावर तरी गाईड काढू नका रे!’ या शीर्षकाचा लेख याच संपादकीय स्तंभात लिहिला होता. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली, त्या निमित्ताने ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेला लेख प्रस्तुत अंकात घेतला आहे. आणि मागील दीड वर्ष कोरोनाचे संकट असल्याने जवळपास ठप्प असलेली शाळा-महाविद्यालये हळूहळू सुरू करण्याची चर्चा व तयारी होत असल्याचे संकेत आता मिळत आहेत. वरील तिन्ही कारणांमुळे, बरीच वर्षे मनात घोळत असलेल्या विषयावर एकदा व्यक्त होऊन मोकळे व्हावे असे वाटते आहे. विषय हाच की, आपल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पद्धतीमधून ‘गणिताची आवड आणि गाईडची नावड’ या शीर्षकाखाली अभियान राबवण्याची गरज आहे!

आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल लहान-थोरांकडून सतत बोलले व लिहिले जाते, त्यात सामान्य माणसे असतात तशीच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळीही. सामान्यतः त्यांचा मध्यवर्ती सूर असा असतो की, आपली शिक्षणपद्धती बेरोजगारांचे तांडे निर्माण करीत आहे, जगण्यासाठी किमान कौशल्ये प्रदान करण्यात अपयशी ठरत आहे, चारित्र्याचे शिक्षण देण्यात कुचकामी ठरली आहे. आणि मग त्यातून येणारे निष्कर्ष असे असतात की, आपल्या शिक्षणव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे, परिणामी आमूलाग्र परिवर्तन करण्याची किंवा ही व्यवस्थाच उखडून टाकण्याची गरज आहे. वस्तुतः वरील निरीक्षणे व निष्कर्ष मांडणाऱ्या लोकांच्या भावना समजून घेतल्या तरी वास्तव इतके एकारलेले नाही आणि मुख्य म्हणजे मानवी बुद्धीचा व मनाचा विचार करता, या क्षेत्रात तरी आमूलाग्र असे काही घडवता येत नसते. कारण मानवी मेंदू काही लाख वर्षांच्या प्रक्रियेतून उत्क्रांत होत आला आहे. शिवाय, उपलब्ध मनुष्यबळ व उपलब्ध साधनसंपत्ती आणि प्रत्यक्षात शिक्षण द्यायचे आहे ती लोकसंख्या आणि त्यांची स्थिती-गती यांचा विचार करता, अनेकानेक मर्यादा पडतात. मग ते सरकारी क्षेत्र असो वा खासगी! परिणामी, गुणात्मक वाढ व संख्यात्मक वाढ या दोन बाजूंना लंबकासारखे हेलकावे खात-खात आपली शिक्षणव्यवस्था पुढे पुढे जात असते. दोन्हींपैकी कोणत्याही एका बाजूवर जास्त भर द्यायचा ठरवले जाते तेव्हा दुसरी बाजू लंगडी पडत जाते. त्यामुळे सरकार-दरबारी तरी संख्यात्मक वाढीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते आणि ते समर्थनीयच असते. निरक्षरांचे तांडे निर्माण करण्यापेक्षा अर्धे-कच्चे साक्षर केव्हाही सुसह्य अशी ती धारणा असते.

आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 10 टक्के साक्षरता होती आणि स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आले असताना 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 75 टक्केपर्यंत साक्षरता आली आहे. हेच आकडे दुसऱ्या पद्धतीने पाहिले तर साडेसात दशकांपूर्वी या देशात 3.5 कोटी साक्षर आणि 31.5 कोटी निरक्षर होते, आज तेच आकडे 102 कोटी साक्षर आणि 33 कोटी निरक्षर असे आहेत. संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने विचार केला तर, या देशाने किती मोठी मजल मारली आणि आणखी किती मजल मारणे बाकी आहे, अशी संमिश्र भावना मनात येते. (हे सरकारी आकडे आहेत, त्यामुळे त्यात काही कमी-जास्त असणार हे उघड आहे, पण तूर्त तो विषय बाजूला ठेवू.) साहजिकच गुणात्मक वाढीच्या दृष्टीने विचार केला तर भयावह चित्र समोर येते. आणि म्हणून संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने आणखी खूप प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करीत असतानाच, गुणात्मक वाढीसाठी काय केले पाहिजे, यावर बरेच चिंतन-मंथन होत असते. व्यक्तिगत, संस्थात्मक व सरकारी पातळीवर त्यासाठी कमी-अधिक प्रयत्नही चालू असतात. त्यात आणखी एका प्रयत्नाची भर टाकण्याची आता नितांत आवश्यकता आहे. ती म्हणजे ‘गणिताची आवड आणि गाईडची नावड’ हे अभियान राबवण्याची!

आपल्याकडे बोलण्याचा असा एक प्रघात आहे की, पूर्वीचे शिक्षक भारी होते आणि विद्यार्थी कष्टाळू होते. पण  वस्तुस्थिती अभ्यासली तर ते तितकेसे खरे नव्हते. तुकड्या-तुकड्यांनीच ते खरे होते. अर्थातच, त्यांना त्या काळाच्या व परिस्थितीच्या अनेक मर्यादा होत्या, मात्र ‘गणिताची नावड व गाईडची आवड’ हे दुष्टचक्र सुरू झाले, त्याला आता अर्धशतक उलटून गेले आहे. आणि त्या दुष्टचक्राने आपल्या शिक्षणव्यवस्थेचा बराच घात केला आहे. शाळा महाविद्यालयात असताना विद्यार्थ्यांच्या मनात सर्वाधिक भीती निर्माण करणारा विषय गणित हाच राहिला आहे. काही शाळा-महाविद्यालयांत  चांगले शिक्षक-प्राध्यापक असतात; तेव्हा तिथले आकडे समाधानकारक असतात, पण गणित आवडते असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूणात सरासरी काढली तर 10 टक्क्यांपेक्षा जास्त भरणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला, कोणत्याही विषयासाठी गाईडचा अजिबात वापर केला जात नाही किंवा माफक वापर केला जातो, असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 10 टक्क्यांपेक्षा अधिक भरणार नाही. परिणामी आजचे 90 टक्के शिक्षक-प्राध्यापक त्याच दुष्टचक्रातून पुढे आलेले आहेत आणि तेच चक्र अधिक गतीने पुढे चालविण्यास हातभार लावत आहेत. म्हणून ते दुष्टचक्र थांबवून चक्र उलटे फिरवण्यासाठी बरेच कठीण व कठोर काम करण्याची गरज आहे.

मुळाशी जाऊन थोडासा विचार केला म्हणजे गणित नेमके काय करते आणि गाईड नेमके काय पेरते, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या समस्येची तीव्रता आणि उपायाची दिशा स्पष्ट होईल. गणिताचा गाभा असतो तर्क (लॉजिक), त्यात सुरुवातीला एकरेषीय साखळी दिसते. मात्र पुढे जावे तसतसे असंख्य साखळ्या व त्यांच्यात प्रचंड गुंतागुंत निर्माण करता येणे आणि ती सुलभ पद्धतीने व जलद गतीने सोडवता येणे, याचे चमत्कार पाहायला मिळतात. त्यासाठी टप्प्याटप्प्याने (स्टेप बाय स्टेप) पुढे जात, सूत्र-तत्त्व-नियम वापरत उत्तराच्या दिशेने जायचे असते. ते उत्तर बरोबर की चूक हे ताळा करून पाहता येते. एवढेच नाही तर ते सूत्र, तत्त्व, नियम कसे आकाराला आले  हे शोधता येते, उलट-सुलट तपासता येते. महत्त्वाचे म्हणजे त्यात स्थल-काल-व्यक्ती सापेक्षता नसते. किंबहुना संपूर्ण सृष्टीला गणिताने जोडता येते आणि अर्थातच सृष्टीत सर्वत्र गणित असते. आपल्या दैनंदिन जगण्यातही गणित सर्वकाळ असतेच. जन्माला आल्यावर भाषा आपल्याला शिकवली जाते हे आपण मान्य करतो, पण गणितही शिकवले जात असते हे आपल्या लक्षात येत नाही. बोलणे, ऐकणे, चालणे, फिरणे, उठणे-बसणे, खाणे-पिणे या सर्व लहान-मोठ्या क्रियांमध्ये गणित असतेच असते. तिथे आकडे कमीत कमी असतात किंवा अजिबात नसतात, पण गणित असतेच. काळ, काम, वेग हे गणित फळ्यावर किंवा पाटीवर/कागदावर जरी शाळेत गेल्यानंतर शिकायला मिळत असले, तरी त्याचे प्रत्यक्षातील धडे शाळेत जाण्याआधीच आपण गिरवलेले असतात. शाळेत गेल्यावर गणिताचे औपचारिक शिक्षण सुरू होते, पण शाळेत जाण्याआधीच अनौपचारिक पद्धतीने गणिताचे शिक्षण मिळालेले असते. यासंदर्भात आई आणि कुटुंबातील व अन्य लोक हे आपले शिक्षक म्हणून काम करीत असतात, त्यातले काही शिक्षक तर निरक्षर असतात. बीजगणिताच्या बाबतीत हे तितकेसे लक्षात येत नाही, मात्र भूमितीच्या बाबतीत (रेषा, आकार) हे कसे घडते याचा अंदाज तुलनेने लवकर येतो.

अर्थात, घरातून मिळालेले गणिताचे अनौपचारिक शिक्षण हे प्राथमिक स्वरूपाचे व कमी गुंतागुंतीचे असते. हेच शिक्षण शाळा-महाविद्यालयात गेल्यावर अधिक दर्जेदार मिळाले तर प्रचंड मोठी गुंतागुंत कशी सोडवायची, याचे प्रशिक्षण होऊ शकते. कारण निरीक्षण-प्रयोग-अनुमान किंवा वर्गीकरण-विश्लेषण-निष्कर्ष या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी असते गणित. आणि म्हणूनच गणिताच्या शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम मंडळाच्या वतीने जे प्रास्ताविक किंवा निवेदन दिलेले असते; त्यात बजावून सांगितलेले असते की, ‘गणिताकडे स्वतंत्र विषय म्हणून पाहण्यापेक्षा पृथःकरण करण्यास शिकवणारा विषय म्हणून पाहावे.’ आणि मग प्रश्न येतो, पृथ्थकरण करावे लागत नाही असा विषय कोणता असतो? त्यामुळेच गणित विषय किचकट असतो असे संबोधून त्याच्याबद्दलची नावड निर्माण केले जाते किंवा जोपासली जाते, तेव्हा कळत-नकळत अन्य विषयांचे आकलन करून घेण्यास मर्यादा टाकल्या जातात.

गणिताच्या जवळपास उलट प्रकारचे म्हणता येईल असे काम गाईड करीत असते. इथे गाईड हा शब्द वापरताना कोणत्याही विषयाच्या पाठ्यपुस्तकावर काढलेले तयार प्रश्न व उत्तरे या स्वरुपातील नोट्‌स, अपेक्षित, नवनीत व तत्सम साहित्य अभिप्रेत आहे. या गाईड्‌समध्ये प्रश्न व उत्तरे रेडिमेड असतात. आणि शिक्षणप्रक्रियेत प्रामुख्याने काय अपेक्षित असते? प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधता येणे. कोणताही प्रश्न मनात यायचा असेल तर मूळ धडा/प्रकरण वाचणे, त्यातील आशय-विषय लक्षात घेणे, त्यासाठी अनेक बाजूंनी विचार करणे, त्यातून काही प्रमाणात कुतूहल शमणे. मग त्यातून काही प्रश्न व त्यांची उत्तरे मनात आकाराला येणे. त्यानंतर अधिक प्रमाणात कुतूहल निर्माण होणे. आणि मग त्या कुतूहलापोटी आणखी काही प्रश्न मनात येणे. त्यांची उत्तरे त्या धड्यात/प्रकरणात नाहीत म्हणून ती अन्यत्र शोधणे. त्यासाठी वर्गमित्र, शिक्षक, अन्य क्षेत्रांतील लोक यांच्याशी चर्चा-संवाद किंवा अन्य साधनांचा वापर करत राहणे. त्या प्रश्नांचा व उत्तरांचा आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनाशी कसा व किती संबंध येतो याचा अंदाज घेत राहणे. आणि अर्थातच त्यासाठी कृतीप्रवण होण्याची इच्छा-आकांक्षा जागृत होणे. ही प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण असते. आणि त्याआधारे अधिकाधिक गुंतागुंतीचे प्रसंग चांगले हाताळता येतात. व्यक्तीचे व घटनांचे मूल्यमापन अधिक वस्तुनिष्ठ करता येते. आणि गाईड नेमके काय करते, तर या प्रक्रियेला अटकाव निर्माण करते. उत्तरे देण्यातून माणसाची हुशारी समजते आणि प्रश्न विचारण्यातून माणसाचे शहाणपण कळते, असे म्हटले त्याचा भावार्थ इथे दडला आहे.

गाईड्‌स हे निखळ साहित्य म्हणून वाईट असतेच असे नाही, किंबहुना त्यांचा किंचितसा वापर सर्वसाधारण रुपरेषा समजण्यासाठी केला तर फार काही बिघडत नाही. पण सामान्यत: तसे घडत नाही. मूळ पाठ्यपुस्तके किंचित वापरायची आणि गाईडस्‌चा मुख्य आधार घ्यायचा हा प्रकार 1970 च्या दशकानंतर क्रमाक्रमाने वाढत गेला आहे. किंबहुना शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण/संख्यात्मक वाढ अधिक गतिमान व्हायला लागल्यावर गाईड्‌सचा वापर वाढत गेला. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शाळांची संख्या, त्या तुलनेत चांगले शिक्षक व प्रशिक्षक खूप कमी आणि पूरक ठरतील अशा माध्यमांचा अभाव, या सर्वांचा परिणाम गाईडसंस्कृती फोफावण्यात झाला. नंतर ते विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनाच सोयीचे ठरू लागले, म्हणजे फार श्रम न करता पास होणे, अधिक गुण मिळवणे यासाठी गाईडस्‌ उपयुक्त ठरू लागली. बहुतांश शिक्षक व परीक्षा यंत्रणेतील तज्ज्ञही त्या प्रक्रियेला गतिमान करीत राहिले. आणि मग शाळा महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या अनेक मुला-मुलींनी मूल्यशिक्षण तर सोडाच किमान पातळीवरील कौशल्येसुद्धा आत्मसात केलेली नसतात. त्यामुळे बेरोजगारांचे तांडे निर्माण झालेले दिसतात. शिवाय अकार्यक्षम, अप्रामाणिक, भ्रष्ट वृत्तीचे नागरिक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. असामाजिक घटकांच्या जाळ्यात ते फसत जातात. हे असे खूप सांगता येईल.

तर मूळ मुद्दा असा की, शाळा व महाविद्यालये या दोन्ही ठिकाणी ‘गणिताची आवड व गाईडची नावड’ हे अभियान राबवले तर सर्व आघाड्यांवर खूप फरक पडेल. हे अभियान कोणी राबवायचे? अर्थातच विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी, प्राचार्यांनी, शिक्षणक्षेत्रांतील कनिष्ठ-वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, संस्थाचालकांनी, कुलगुरूंनी, शिक्षणमंत्र्यांनी, साहित्यिकांनी, प्रसारमाध्यमांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, शिक्षण तज्ज्ञांनी, गावपंचायतीनी आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी! अर्थातच, यासाठी एक वा अनेक घटक आपापल्या परिप्रेक्ष्यात अशी सुरुवात करू शकतात. तसे करायला जाणाऱ्यांच्या वाट्याला उपहास, असहकार, विरोध, संघर्ष येणार हे तर उघड आहे. म्हणून बरीच तयारी ठेवावी लागेल. यातील गणिताची आवड हा कार्यक्रम उघड-उघड रचनात्मक आहे, गाईडची नावड हा कार्यक्रमही तसाच आहे, पण अनेकांना तो विध्वंसक वाटण्याची शक्यता आहे. म्हणून गणितासाठी त्या-त्या क्षेत्रांतील अभ्यासक, जाणकार, तज्ज्ञ, विज्ञान शाखेतून आलेले लहान-थोर यांचे सहकार्य घ्यावे लागेल. गणिताची भीती घालवणे एवढे पुरेसे ठरणार नाही, तो कसा ‘मोस्ट रोमँटिक’ विषय आहे हे समाजमनावर ठसवावे लागेल. त्याचबरोबर गाईडची नावड निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांकडून विविध प्रकारचा सहभाग घेत असतानाच, गाईडच्या वापराला अप्रतिष्ठा बहाल कशी करता या दिशेनेही जावे लागेल!

मात्र हे अभियान राबवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे शिक्षक प्राध्यापक. ते जसे उपयुक्त ठरू शकतात, तसेच ते मुख्य अडथळा बनू शकतात. याचे कारण बहुतांश शिक्षक-प्राध्यापक ‘गणिताची नावड व गाईडची आवड’ याच आधारावर पुढे आलेले आहेत. त्यामुळे या अभियानाच्या संदर्भात त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण हे मुख्य आव्हान असणार आहे. ते पेलवता आले तर आधी त्या शिक्षक प्राध्यापकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येईल आणि मग भावी पिढ्यांच्या...!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके