डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

बंद दरवाजाआड मनाची कवाडे उघडा...

आताची परिस्थिती, लॉकडाऊनचा कालखंड असामान्य आहे. आज हयात असलेल्या जगभरातील सर्व माणसांच्या आयुष्यात आलेला असा हा काळ पहिलाच आहे. त्यामुळे या काळात प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात तोल साधण्याचा प्रयत्न केला तर, रोजचे जगणे व आताचे दिवस अधिक सुसह्य होऊ शकतील. म्हणजे वैचारिक क्षेत्रात अधिक कार्यरत असणाऱ्यांनी कलेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न नेहमीपेक्षा अधिक करावा. कलेच्या प्रांतात सतत मुशाफिरी करणाऱ्यांनी, आपल्या बुद्धीला अधिक ताण देऊन वैचारिक घटकांशी झगडावे. सतत मी, माझे, मला असा व्यक्तींनिष्ठ विचार करणाऱ्यांनी आपला सभोवताल व समाज यांच्या स्थितीगतीकडे लक्ष वळवावे. समाजहिताचाच विचार सतत करणाऱ्यांनी व्यक्तिनिष्ठ असण्याचेही फायदे समजून घेण्याचे प्रयत्न करावेत. राजकीय बाजूंनी सतत विचार करणाऱ्यांनी सामाजिक बाजूने पाहून तिथले दुःख दैन्य अधिक समजावून घ्यावे, सामाजिक कार्याच्या आघाडीवर लढणाऱ्यानी राजकीय क्षेत्रातील अपरिहार्यता व मर्यादा समजून घ्याव्यात. एका टोकाच्या विचारप्रवाहाने, दुसऱ्या टोकाचे व अन्य विचारप्रवाह तसा विचार का करतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. 

संपूर्ण भारत देश सलग 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा, 24 मार्चच्या रात्री पंतप्रधानांनी केली. त्या घटनेला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. दरम्यान लॉकडाऊनचा कालावधी आणखी 20 दिवस वाढवण्यात आला असून, त्यात आणखी वाढ होणार हे स्पष्ट आहे. एक महिन्यापूर्वी भारतभरात कोरोनाची लागण व त्यामुळे झालेले मृत्यू, हे आकडे अनुक्रमे 900 व 20 असे होते. आज हेच आकडे 25000 व 800 असे आहेत. भूमितीच्या वेगाने ही वाढ झालेली आहे. मात्र जगाच्या तुलनेत हे आकडे हायसे वाटावे असे आहेत. कारण एक महिन्यापूर्वी जगभरातील कोराना बाधित रुग्ण व त्यामुळे झालेले मृत्यू यांचे आकडे अनुक्रमे 6 लाख व 28 हजार असे होते, आज तेच आकडे 30 लाख व 2 लाख यांच्या जवळ गेले आहेत. आणि कोरोनाने ओढवलेल्या मृत्यूंमध्ये एकट्या अमेरिकेचे 50 हजार, तर स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या चार देशांचे मिळून एक लाख आहेत. सर्व अर्थाने प्रगत मानले जाणारे हे पाच देश आहेत. शिवाय, कोरोना संकट नेमके कोणत्या टप्प्यावर आहे, हे खात्रीलायकरित्या कोणीही सांगायला तयार नाही. म्हणजे हे संकट शिखरावर पोहचणे बाकी आहे, पठाराला लागले आहे, की उतार सुरू होणार आहे हे कळावयास मार्ग नाही. 

परिणामी भारतीय जनतेला राज्य व केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागत आहे, त्यातून येणाऱ्या विविध प्रकारच्या गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत, भविष्याचे काय याची चिंता कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. आणि कदाचित त्याहून अधिक त्रासदायक म्हणजे, या लॉकडाऊन काळात चित्त आणि  मन स्थिर ठेवून, आला दिवस मार्गी लावणे कठीण जात आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची कारणे व त्यांची तीव्रता कमी-जास्त आहे. मात्र ही समस्या सार्वत्रिक आहे. शिवाय, हीच स्थिती आणखी किती काळ राहणार याबाबतची अनिश्चितता अधिक त्रासदायक आहे. त्यावर उपाय काय? हा काळ सुसह्य व्हावा यासाठी काय केले जाऊ शकते? अर्थातच, त्याची येणारी उत्तरे- कामात मन गुंतवावे, मनोरंजन करण्यात वेळ घालवावा, आशावादी राहावे, इत्यादी सर्व परिचित वाक्यांमध्ये दिली घेतली जातात. सामान्यतः ती बरोबरच असतात, पण ते घडवावे कसे? त्याला काही सैद्धांतिक आधार असू शकतो? होय, असू शकतो. 

अगदीच रामबाण उपाय नाही सांगता येणार, पण त्यातल्या त्यात गुणकारी म्हणता येईल असा एक सिद्धांत सांगता येईल. त्याचा शक्य तितका विस्तार करून, अवलंबिता येईल. त्याला ठोस म्हणावा असा शास्त्रीय आधार किती आहे याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र त्या सिद्धांताचा अवलंब करण्यासाठी कोणाची ‘ना’ नाही. त्याला Equilibrium किंवा तोल सिद्धांत म्हणता येईल.  

मानवी मेंदूचे दोन भाग मानले जातात. मेंदूचा डावा भाग शरीराची  उजवी बाजू सावरून धरण्याचे काम करतो आणि मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू सावरून धरतो, त्यामुळे शरीराचा तोल सांभाळला जातो. हे गृहितक वैद्यकशास्त्रात मान्यता पावलेले दिसते. मात्र डावा व उजवा मेंदू असे स्वतंत्र अस्तित्व ते शास्त्र मानत नाही. आणि त्याच्या पुढचे एक गृहितक असे आहे की, तर्कसंगत विचार, विश्लेषण, शब्द व संख्या यांच्या मार्फत आकार घेणाऱ्या संकल्पना हे काम डाव्या मेंदू मार्फत केले जाते; तर अंतप्रेरणेतून येणाऱ्या भावना, सर्जनशीलता आणि चित्रे व रेषा यातून आकार घेणाऱ्या कल्पना हे काम उजव्या मेंदूमार्फत केले जाते.  या गृहितकाला विज्ञानाची अधिमन्यता नाही, पण लोकमान्यता मात्र मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना त्याचा डावा मेंदू अधिक सक्षम आहे की उजवा, असा एक निकष लावला जातो. साहजिकच, बुद्धीच्या क्षेत्रात कार्य करणारी माणसे समोर येतात तेव्हा त्यांचा डावा मेंदू अधिक तल्लख आहे असे मानले जाते आणि कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचा उजवा मेंदू अधिक तल्लख आहे असे मानले जाते. सिद्धांत म्हणून नसले तरी मिथक म्हणून हे गृहितक लोकप्रिय आहे. त्यामुळे तो वाद बाजूला ठेवला, तरी त्यातून निघणारा एक बोध तरी निश्चित स्वीकारण्यालायक आहे. तो म्हणजे डाव्या व उजव्या मेंदूची म्हणून जी कार्ये सांगितली जातात त्यांचा तोल साधला जात असेल, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समतोल असते असे मानायला वाव आहे. ते प्रमाण अगदी समसमान असणार नाही, पण अगदीच विषम नसेल हे तर उघड आहे. याच गृहितकाचा वा मिथकाचा उभा व आडवा विस्तार करून आपल्या व्यक्तिगत व सामूहिक जीवनाला लावता आला, तर त्यातून अनुकरणीय असे काही हाती लागतेच. उदाहरणार्थ, बुद्धी व कला, विचारप्रधान व भावनाप्रधान, अंतर्मुख व बहिर्मुख, व्यक्तिनिष्ठ व समाजनिष्ठ असे ढोबळ मानाने कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग करता येतात. आणि यातील जी बाजू कमजोर आहे, ती प्रबळ होईल यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न करायला हवेत असा निष्कर्ष काढता येतो.

त्यातून पुढे असाही निष्कर्ष काढता येईल की, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात असा तोल साधला गेला आहे अशी माणसे अधिक प्रमाणात निर्माण व्हायला हवीत, त्यांना पुढे आणायला हवे. तसे झाले तर आपले समाजजीवन अधिक शांत व सुखी होण्याची शक्यता वाढू शकते. पण प्रत्यक्ष समाजजीवन असे एकरेषिय नसते,  ते अनेक गुंतागुंतीच्या घटकांचे संयुग असते. शिवाय, एखाद्या समूहात किंवा समाजात असा तोल साधलेली माणसेच मोठ्या प्रमाणात निर्माण झाली किंवा त्यासाठीच मोठी शक्ती पणाला लावायचे त्या समूहाने वा समाजाने ठरवले, तर बुद्धी व कला या दोन्ही क्षेत्रांत अत्युच्च कर्तबगारी गाजवणारी माणसे निर्माण तरी कशी होणार? आणि मानवी संस्कृतीचा विकास तरी अधिक वेगाने कसा होणार?  

त्यामुळे तसा तोल साधण्याचा आग्रह एका मर्यादेपर्यंतच धरता येतो आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी खूप मर्यादित प्रमाणातच शक्य असते. मात्र हे झाले सर्वसामान्य परिस्थितीत. असामान्य परिस्थिती असते तेव्हा मात्र असा तोल साधणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज जास्त असते. सर्वसामान्य परिस्थितीत एका बाजूला अधिक झुकलेले किंवा एकरलेले व्यक्तिमत्त्व असेल तरी, समाजजीवनातील अन्य घटक त्या व्यक्तीला तोल सांभाळण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करतात, किमान सुसह्य तरी करतात. असामान्य परिस्थितीत मात्र तशा व्यक्तींची कुचंबणा होऊ शकते, अडचण जास्त होऊ शकते, सैरभरपणा येऊ शकतो, निराशा घेरून टाकू शकते, जीवनात निरर्थकता वाटायला लागू शकते, परिस्थितीचे सुलभीकरण केले जाऊ शकते.  

तर आताची परिस्थिती, लॉकडाऊनचा कालखंड असामान्य आहे. आज हयात असलेल्या जगभरातील सर्व माणसांच्या आयुष्यात आलेला असा हा काळ पहिलाच आहे. त्यामुळे या काळात प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात तोल साधण्याचा प्रयत्न केला तर, रोजचे जगणे व आताचे दिवस अधिक सुसह्य होऊ शकतील. म्हणजे वैचारिक क्षेत्रात अधिक कार्यरत असणाऱ्यांनी कलेचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न नेहमीपेक्षा अधिक करावा. कलेच्या प्रांतात सतत मुशाफिरी करणाऱ्यांनी, आपल्या बुद्धीला अधिक ताण देऊन वैचारिक घटकांशी झगडावे. सतत मी, माझे, मला असा व्यक्तींनिष्ठ विचार करणाऱ्यांनी आपला सभोवताल व समाज यांच्या स्थितीगतीकडे लक्ष वळवावे. समाजहिताचाच विचार सतत करणाऱ्यांनी व्यक्तिनिष्ठ असण्याचेही फायदे समजून घेण्याचे प्रयत्न करावेत. राजकीय बाजूंनी सतत विचार करणाऱ्यांनी सामाजिक बाजूने पाहून तिथले दुःख दैन्य अधिक समजावून घ्यावे, सामाजिक कार्याच्या आघाडीवर लढणाऱ्यानी राजकीय क्षेत्रातील अपरिहार्यता व मर्यादा समजून घ्याव्यात. एका टोकाच्या विचारप्रवाहाने, दुसऱ्या टोकाचे व अन्य विचारप्रवाह तसा विचार का करतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. 

हे असे कितीही लांबवता येईल. उदाहरणार्थ- बैठे काम करण्याची सवय असणाऱ्यांनी शारीरिक श्रमाचे काम करण्याचा प्रयत्न करावा, आणि2 उलटही घडावे. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या आठवणी काढाव्यात, पण आपणाकडून कळत-नकळत झालेल्या अन्यायाच्या नोंदीही मनातल्या मनात कराव्यात. आपल्याला लायकी असूनही काय मिळाले नाही हे जरूर आठवावे, पण लायकी नसताना काय काय मिळाले याचीही गोळाबेरीज करावी.  

सारांश- आताच्या बंद दरवाजाआड दिवस-दिवस व्यतीत करावे लागण्याच्या या काळात, मनाची कवाडे उघडावित! आताचा काळ तर सुसह्य होईलच, पण  लॉकडाऊन संपल्यानंतरच्या काळातही आपल्या व्यक्तिमत्वाचा कललेला अक्ष दोन पाच अंशाने तरी दुसऱ्या बाजूला झुकेल व उर्वरित आयुष्यात तोल साधण्यास किंचितसा का होईना उपयुक्त ठरेल...

Tags: ऑनलाईन आवृत्ती लॉकडाऊन विनोद शिरसाठ संपादकीय कोविड 19 कोरोना corona virus online edition weekly sadhana covid 19 open doors of mind vinod shirsath editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात