डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांची दुसरी मुलाखत

प्रश्न - बरे, ते सोडा. आगरकरांनी ‘सुधारक’मधून निबंध लिहिला होता, ‘तरुण सुशिक्षितांस विज्ञापना’. 1895 च्या थोडा आधी. म्हणजे तुम्ही तरुण लोकच त्यांच्या नजरेसमोर असणार त्या वेळी. जुन्या पिढीकडून फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही, असे स्पष्टच बजावले होते त्यांनी. तुम्ही लोकांनी कितपत गांभीर्याने घेतले होते ते?

- आजची तरुण पिढी फार हुशार असेल, पण शहाणीही आहे, असे म्हणायचेय का तुम्हाला? तसे असेल तर मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये या नवतरुणाईने कोणत्या राजकीय पक्षाला एकगठ्ठा म्हणावी अशी मते दिली? तो पक्ष, त्यांचा वारसा, त्यांचा अजेंडा कितपत पुरोगामी आहे?

प्रिय वाचकहो,

कालच्या 6 ऑक्टोबरला पुण्यातील डेक्कन कॉलेजने द्विशताब्दी वर्षात पदार्पण केले, त्या निमित्ताने आम्ही त्या दिवशी तिथे गेलो होतो. त्या वेळी कॉलेज परिसरात शुकशुकाट होता, मात्र तिथे भेटलेल्या केशवरावांची मुलाखत घेतली होती आणि गेल्या महिन्यात याच स्तंभात प्रकाशित केली होती. शिवरामपंत परांजपे यांचे वर्गमित्र असलेल्या केशवरावांची ती मुलाखत अगदीच अनपेक्षित होती, झालेला संवाद त्याहून अधिक अनपेक्षित होता, आणि सर्वाधिक अनपेक्षित हे होते की, साधनाचे वाचक केशवरावांनी दिलेल्या मर्मभेदी उत्तरांवर फिदा झाले. शिवाय, केशवरावांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना प्रतिप्रश्न विचारून आम्हालाच कैचीत पकडले, हा प्रकारही बहुतांश वाचकांना भलताच आवडल्याचे आढळले. अर्थात, काही वाचकांनी अशी शंका व्यक्त केली की, केशवराव नावाची कोणी व्यक्ती आम्हाला भेटलेलीच नसून ती मुलाखत काल्पनिक असावी. तर काही वाचकांनी अशी शंका व्यक्त केली की, तिथे गेल्यावर मुलाखतकर्त्याला झालेला भास म्हणजे ही मुलाखत असणार. या दोन शंका उपस्थित होण्याचे कारण एकच, ते म्हणजे केशवराव यांचे वय दीडशे वर्षांपेक्षा अधिक आहे, आणि रेकॉर्ड असे सांगते की- आजच्या जगात एकशेदहा पेक्षा अधिक वर्षांची व्यक्ती अस्तिवात नाही, म्हणजे शंका साहजिक आहेत. मात्र वाचकांच्या या दोन्ही शंकांचे निरसन करता यावे  म्हणून आम्ही ठरवले की, पुन्हा एकदा भल्या पहाटे डेक्कन कॉलेज परिसरात जावे आणि केशवराव फिरायला येतात का ते पाहावे. वाचकांची खात्री पटवता येईल आणि कदाचित आणखी एखादी मुलाखत घेता येईल.

त्याप्रमाणे, आम्ही गेल्या आठवड्यात पहाटे डेक्कन कॉलेज परिसरात प्रवेश केला. योगायोगाने तो 6 नोव्हेंबरचा दिवस होता, म्हणजे बरोबर महिनाभरापूर्वी केशवराव भेटले होते. या दिवशीही संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता, नीरव शांतता नांदत होती. पावसाळा संपून, हिवाळ्याची चाहूल लागली होती. वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रसन्नता होती. झाडांच्या पानांची सळसळ आणि पक्षांची किलबील तेवढी ऐकू येत होती... आणि सुखद आश्चर्य म्हणजे, गेल्या महिन्यात भेटलो त्याच बाकड्यावर बसलेले केशवराव दिसले. लांबून पाहिल्यावर दुसरी कुणी व्यक्ती आहे की काय असे वाटले, पण निरखून पाहिले तर केशवरावच. तसेच क्षितिजाकडे नजर लावून बसलेले. आवाज न करता त्यांच्या जवळ गेलो. ‘नमस्कार केशवराव आजोबा’ असे म्हणून त्यांच्या शेजारी बसलो. ते थोडेसे दचकले, मग त्यांनी थोड्याशा ओळखीचे स्मित दिले. त्यानंतर झालेला प्रश्नोत्तर रूपातील आमचा संवाद असा होता.

प्रश्न - केशवराव, आपल्या पहिल्या भेटीत, शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता तुम्ही निघून गेलात. शिवाय प्रतिप्रश्न विचारत राहण्याच्या तुमच्या पवित्र्यामुळे माझे काही प्रश्न मनातल्या मनात विरघळून गेले. तरीही तुमची ती मुलाखत छापली. त्यावर काही वाचकांनी शंका उपस्थित केल्या हे खरे, पण तुमची मुलाखत आमच्या बहुतांश वाचकांना आवडली हेही खरे. त्यामुळे तुमची हरकत नसेल तर आज उर्वरित मुलाखत पूर्ण करू या का? 

- हरकत नाही, पण तुमच्या प्रत्येकच प्रश्नाला उत्तर मिळेल अशी खात्री बाळगू नका.

प्रश्न - ते आले लक्षात तेव्हाच... आणि तसेही एकोणिसाव्या शतकात वाढलेली आणि आजपर्यंत टिकून असलेली पुणेकर मंडळी अशीच असणार. ते असो. पण मला सांगा, सव्वाशे वर्षांपूर्वी या कॉलेजात तुम्ही शिकत होता तेव्हाची विद्यार्थ्यांची स्थिती आणि आताची स्थिती यात प्रमुख बदल काय दिसतात?

- तेव्हा वयाच्या दहा-पंधराव्या वर्षात विद्यार्थ्यांची लग्न व्हायची आणि वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत सर्व कार्यभाग आटोपून अनेकजण हे जग सोडून गेलेले असायचे. आता काय, तिशी-पस्तिशीपर्यंत अनेकांची विद्यार्थीदशाच संपत नाही...

प्रश्न - हो, बाळशास्त्री चौतीसाव्या वर्षी गेले, विष्णुशास्त्री बत्तीसाव्या, आगरकर एकोणचाळीसाव्या, तेलंग बेचाळीसाव्या, आणि अशी बरीच यादी देता येईल. त्यामुळेच तर why graduates die young असा प्रश्न उपस्थित होऊन मोठा वाद चर्चिला गेला होता तेव्हा. रानडे-भांडारकर ते टिळक-गोखले अशा अनेकांनी त्या वादात भाग घेतला होता. काय झाले त्याचे पुढे?

- आपल्याकडे कधी कोणते सामाजिक वाद निकालात निघतात का? वादपटूमधले कोणी म्हणाले इंग्रजी विद्येचा ताण असह्य होतो म्हणून, कोणी म्हणाले कमी वयात विवाह व कौटुंबिक जबाबदाऱ्या पडतात म्हणून, कोणी म्हणाले आहार व पोषणमूल्ये कमी पडतात म्हणून, तर कोणी म्हणाले आपले वैद्यकशास्त्र विकसित झालेले नाही म्हणून...

प्रश्न - हो, पण तुमचे मत काय होते त्या वेळी?

- सर्वच कारणे खरी होती, एकमेकांशी निगडित होती. तरीही काथ्याकुट करीत बसले होते सगळे...

प्रश्न - अरे वा, समाजजीवनातला सापेक्षतावाद तुम्हाला आधीच कळला होता तर... आइन्स्टाईनला तो जरा उशीरा म्हणजे 1905 ला सापडला.

- पुढे चला... सुतावरून स्वर्ग गाठण्याची भाषा बरी नव्हे.

प्रश्न - बरं, मला एक सांगा- विद्यार्थ्यांचे वाचन किती व कसे असायचे त्या वेळी? कारण पूर्वीचे काही संदर्भ वाचले तर गोंधळून जायला होते. उदाहरणार्थ, तुमचे समकालीन कदाचित वर्गमित्र शंकर वावीकर यांनी 1895 मध्ये लिहिलेले छोटे पुस्तक आले आमच्या वाचण्यात, ‘वाचन’ याच नावाचे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘हल्लीचे बहुतांश विद्यार्थी व प्राध्यापक पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत.’ कितपत खरे आहे हे?

- पूर्णतः खरे आहे. पण आजचे चित्र काही वेगळे आहे असे म्हणायचेय का तुम्हाला?

प्रश्न - तसे नाही. पण आज वाचनाची गरज भागवणारी किती तरी साधने उपलब्ध आहेत, वापरात आहेत. त्या काळात मात्र माहिती, मनोरंजन, ज्ञानसंवर्धन, प्रबोधन यासाठी वाचन हेच मुख्य साधन होते, विद्यार्थी व शिक्षक प्राध्यापक यांच्यासाठी. तरीही तशी अवस्था का होती?

- तुम्हीच सांगितलेत ना साक्षरतेचे आकडे. त्या वेळी वाचता येणाऱ्यांची टक्केवारी होती पाच, म्हणजे जेमतेम दोन कोट लोक वाचू शकत होते. आज ती टक्केवारी आहे पाऊणशे, म्हणजे शंभर कोटी लोकांना वाचता येतेय असे सांगतात तुमचे आकडे. आणि तरीही वाचनसंस्कृती रुजलेली नाही, अशी सर्वमान्य ओरड आज आहेच ना? शाळा, कॉलेज ते सरकारी धोरणे आणि साहित्यिक ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या अपयशाचा पुरावाच सादर करताय ना तुम्ही?

प्रश्न - पण आजची परिस्थिती इतकी काही निराशाजनक नाही वाटत आम्हाला. मोठ्या वृत्तपत्रांच्या खपाचे आकडे प्रचंड आहेत. शंभराहून अधिक दूरचित्रवाहिन्या अहोरात्र धगधगत असतात. समाजमाध्यमेसुद्धा किती तरी मजकूर पोहोचवतात सर्वदूर. यांच्या दर्जाबद्दल प्रश्न जरूर होऊ शकतो, पण वाचन कमी झालेय आज असे कसे म्हणता येईल?

- मग या राज्यातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये ललित साहित्य पुस्तक विक्रीचे एकही दुकान का नाही? महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक वाचनालय अहमदनगर येथे 1848 मध्ये सुरू केले आमच्या लोकहितवादींनी, वयाच्या 25 व्या वर्षी. पावणेदोनशे वर्षे होत आली त्या घटनेला. आजच्या महाराष्ट्रात किती शहरांमध्ये सार्वजनिक वाचनालये आहेत? आणि त्यातील किती वाचनालये मरणासन्न अवस्थेत नाहीत?

प्रश्न - बरे, ते सोडा. आगरकरांनी ‘सुधारक’मधून निबंध लिहिला होता, ‘तरुण सुशिक्षितांस विज्ञापना’. 1895 च्या थोडा आधी. म्हणजे तुम्ही तरुण लोकच त्यांच्या नजरेसमोर असणार त्या वेळी. जुन्या पिढीकडून फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही, असे स्पष्टच बजावले होते त्यांनी. तुम्ही लोकांनी कितपत गांभीर्याने घेतले होते ते?

- आजची तरुण पिढी फार हुशार असेल, पण शहाणीही आहे, असे म्हणायचेय का तुम्हाला? तसे असेल तर मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये या नवतरुणाईने कोणत्या राजकीय पक्षाला एकगठ्ठा म्हणावी अशी मते दिली? तो पक्ष, त्यांचा वारसा, त्यांचा अजेंडा कितपत पुरोगामी आहे?

प्रश्न - केशवराव, तीन तरुण पिढ्या आम्हालाही जवळून पाहता आल्या. म्हणजे पुढची, बरोबरीची आणि मागची. एक खंत मात्र जाणवते की, ही पोरे-पोरी हुशार व बुद्धिमान आहेत; पण यांच्यात संशोधनवृत्तीचा अभाव आणि सामाजिक जाणिवेची तीव्रता कमी आहे. तुमच्या तारुण्यातही तुम्हाला असेच वाटायचे, की वेगळे काही?

- हो वाटायचे ना, अन्यथा त्या पिढ्यांनी दीडशे वर्षे इंग्रजी राजवट चालवून घेतली असती का इथे?

प्रश्न - म्हणजे तुम्ही असे ध्वनित करीत आहात की, आजची देशाची परिस्थिती राहू दिली असती का या तरुणाईने अशी. बरोबर?

- चोरांच्या मनात चांदणे असे म्हणतात ते यालाच...

प्रश्न - घटकाभर मान्य... पण मग सांगा, याची कारणमीमांसा कशी करणार? ही परिस्थिती सुधारायची असेल तर काय करायला हवे?

- शिक्षणव्यवस्था...

प्रश्न - पण तिथे तर काही जादूची कांडी उपलब्ध नाही. मग काय हे बदल कासवगतीनेच होत राहणार? एकेका बारक्या सुधारणेसाठी हजारोंची आयुष्ये खर्ची पडत राहणार?

- डेक्कन कॉलेजकडे पाहून तुमच्याही मनात आमच्यासारखेच विचार यायला लागलेत तर?

प्रश्न - तसे नाही. आम्ही कमालीचे आशावादी आहोत. भले आजचा वर्तमान अस्वस्थ असेल, पण एकूणात विचार केला तर, परवापेक्षा काल आणि कालपेक्षा आज चांगला आहे, असेच आम्हाला वाटते. परिणाम, आजच्यापेक्षा उद्या चांगला असेल, असेही आम्हाला वाटते.

- थोडे थांबा, आणखी काही काळ जाऊ द्या. तुम्हाला या केशवरावांचे म्हणणे नीट कळू लागेल...

प्रश्न - केशवराव, आमच्या साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक येतोय. मागील सहा वर्षे उत्तम प्रतिसाद आहे त्याला. क्लासचा मजकूर मासपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तर त्या अंकासाठी काही संदेश द्याल का?

- पण तुमच्या युवा अंकात युवा लेखक तर नसतात, कधी काळी युवा होते त्यांचेच लेख असतात. युवकांनी लिहिलेले लेखन वाचायला युवकांना आवडत नाही, असे विधान तुम्ही एखाद्या सिद्धांताच्या आविर्भावात मांडता...

प्रश्न - हो, खरे आहे. आक्षेप खरा आहे आणि आमचा अनुभवही खरा आहे.

- तुम्ही दुटप्पी माणसांसारखे बोलत आहात असे नाही वाटत तुम्हाला?

प्रश्न - केशवराव, तुम्ही ज्याला दुटप्पी म्हणता त्याला आम्ही दुहेरी म्हणतो. या दोन्हीतला सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक कळत नाही भल्याभल्यांना. तुमचेच समकालीन कदाचित वर्गमित्र श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिली होती की कादंबरी... ‘दुटप्पी की दुहेरी?’

- वाचलीय आम्ही ती, न्यायमूर्ती रानड्यांना समोर ठेवून लिहिली होती ती...

प्रश्न - असो. तर युवा अंकासाठी काही संदेश देता का? आणि हो, या वर्षीच्या अंकात पाच कर्तबगार युवांच्या मुलाखती आहेत. आणि त्या मुलाखती पाच युवकांनीच घेतल्या आहेत...

- म्हणजे तुम्ही स्वतःचाच सिद्धांत चुकीचा ठरवणार आहात तर...!

प्रश्न - नाही! हे पाचही युवा अकाली प्रौढ आहेत...

- मग आमच्या संदेशाची काही गरज नाही या अंकात, पण हवेच असेल तर हा संवादच त्यांच्यासमोर ठेवा...

प्रश्न - कल्पना टाकाऊ नाही, पण कितपत रुचेल याची खात्री नाही...

- चला, उशीर झाला. निघतो मी...

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात