डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांची तिसरी मुलाखत

आम्ही त्यांच्या जवळ हळुवार जाऊन शांतपणे बसलो, काही क्षण गेले. मग त्यांना विचारले, ‘तुम्ही रोज इथे येता तर मागच्या वेळी कसे दिसला नाहीत? आणि मघाशीही इथे नव्हता, मग आता अचानक कसे व कुठून आलात?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी केवळ स्मित दिले, त्याचा अर्थ ‘सोडून द्या, कशाला इतकी चौकशी करता?’ असा होता. त्यानंतर त्यांना असेही विचारले की, ‘तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा आमच्या काही वाचकांनी व्यक्त केली आहे, त्यांना काय सांगू?’ या प्रश्नावर त्यांनी एकदाच पण इतक्या ठामपणे नकारदर्शक मान हलवली की, त्याचा अर्थ ‘मी कोणालाही भेटू इच्छित नाही आणि तुम्हीही भेटीसाठी मला गृहीत धरू नका’ असाच होता. म्हणून शिळोप्याच्या वा हवापाण्याच्या गप्पा न मारता, आम्ही थोडासा धूर्तपणा दाखवला आणि ते बोलते होतील अशा विषयाकडे वळलो. तेव्हा आमचा संवाद बऱ्यापैकी पुढे सरकला.

कालच्या 6 ऑक्टोबरला पुणे येथील डेक्कन कॉलेजने दोनशेव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी पहाटे त्या परिसरात आम्ही फिरायला गेलो, तेव्हा अगदीच अनपेक्षितपणे दीडशे वर्षे वय असलेल्या केशवरावांची भेट झाली होती. शिवरामपंत परांजपे यांचे घनिष्ट मित्र अशी ओळख असलेल्या केशवरावांची त्यावेळी झालेली मुलाखत हे एक अफलातून प्रकरण होते. ती मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर साधना वाचकांचा आलेला प्रतिसाद पाहून नोव्हेंबर महिन्याच्या 6 तारखेलाही पहाटे आम्ही डेक्कन कॉलेज परिसरात गेलो होतो. आणि त्या वेळी झालेली मुलाखत त्यानंतरच्या आठवड्यात प्रसिद्ध केली होती. त्यालाही आता दोन महिने होत आलेत. पण केशवरावांचे व्यक्तिमत्त्व मनात घर करू लागले म्हणून, त्यांची तिसरी मुलाखत घेण्याचा विचार आमच्या मनात आला. मात्र गेल्या महिन्यात अशाच एका भल्या पहाटे तिकडे फेरी मारली तेव्हा केशवराव भेटले नव्हते.

त्यानंतर 31 डिसेंबरच्या पहाटे आम्ही तिथे गेलो तर नेहमीच्या जागेवर दिसले नाहीत. म्हणून आसपासच्या परिसरात (पहाटेच्या शांततेचा भंग होतोय हे कळत असूनही) केशवरावऽ केशवरावऽऽ  केशवरावऽऽऽ अशा हाका मारल्या. त्या हाकांना कुठूनही ‘ओऽ’ मिळाली नाही. त्यामुळे, निराश होऊन परत निघताना नेहमीच्या त्या बाकड्याकडे नजर टाकली तर केशवराव नेहमीप्रमाणेच क्षितिजाकडे नजर लावून बसलेले दिसले. आश्चर्य वाटले. कारण ते कोणत्या बाजूने व कसे तिथे आले हे कळले नाही. पण त्यांना ते खोदून विचारण्यात अर्थ नव्हता. कारण मुळातच ते खूप कमी बोलतात, त्या बोलण्यात प्रश्नच जास्त असतात आणि स्वत:विषयीचे तपशील सांगायला तर ते पूर्णत: नाखूष असतात.

तर आम्ही त्यांच्या जवळ हळुवार जाऊन शांतपणे बसलो, काही क्षण गेले. मग त्यांना विचारले, ‘तुम्ही रोज इथे येता तर मागच्या वेळी कसे दिसला नाहीत? आणि मघाशीही इथे नव्हता, मग आता अचानक कसे व कुठून आलात?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी केवळ स्मित दिले, त्याचा अर्थ ‘सोडून द्या, कशाला इतकी चौकशी करता?’ असा होता. त्यानंतर त्यांना असेही विचारले की, ‘तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा आमच्या काही वाचकांनी व्यक्त केली आहे, त्यांना काय सांगू?’ या प्रश्नावर त्यांनी एकदाच पण इतक्या ठामपणे नकारदर्शक मान हलवली की, त्याचा अर्थ ‘मी कोणालाही भेटू इच्छित नाही आणि तुम्हीही भेटीसाठी मला गृहीत धरू नका’ असाच होता. म्हणून शिळोप्याच्या वा हवापाण्याच्या गप्पा न मारता, आम्ही थोडासा धूर्तपणा दाखवला आणि ते बोलते होतील अशा विषयाकडे वळलो. तेव्हा आमचा संवाद बऱ्यापैकी पुढे सरकला.

मात्र एक ठळक गोष्ट यावेळी आमच्या लक्षात आली; ती अशी की- बहुश्रुत असलेले केशवराव साधना साप्ताहिकाचे अंक बऱ्यापैकी नियमितपणे नजरेखालून घालत असावेत. अर्थात, तसे थेटपणे त्यांना विचारण्याचे धाडस आम्ही केले नाही. कारण ‘तुमचे अंक आम्ही वाचत नाही, केवळ चाळतो’ असे उत्तर त्यांच्याकडून आले तर काय, अशी भीती आमच्या मनात गोळा झाली होती. असो. तर या तिसऱ्या भेटीतील संवाद पुढीलप्रमाणे...

प्रश्न - केशवराव, उद्याच्या 6 जानेवारीला पत्रकार दिन. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस. वयाच्या विशीत ‘दर्पण’ हे साप्ताहिक आणि त्यानंतर सात वर्षांनी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले बाळशास्त्रींनी. आणि वयाच्या केवळ चौतीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला त्यांनी. असे सांगतात की- मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, हिंदी, संस्कृत, ग्रीक, इंग्लिश, फ्रेंच, फारसी, अरबी या डझनभर भाषांचे जाणकार होते ते! काय अलौकिक प्रतिभेचा माणूस असेल ना?

- आम्ही तारुण्यात पदार्पण केले, त्याच्या अर्धशतकभर आधी पराक्रम गाजवला त्यांनी...

प्रश्न - हो, ना! 1812 मध्ये जन्म, म्हणजे आज हयात असते तर 209 वर्षांचे झाले असते. काय कमाल आहे नाही; पावणेदोनशे वर्षांनतरही ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ हेच दोन शब्द पुरतात... ‘माध्यमांचे कार्य काय वा कसे असले पाहिजे’ हे सांगायला.

- संपादक, तुम्हाला अप्रिय वाटणार नसेल तर एक सांगू का?

प्रश्न - केशवराव, असे काय विचारताय? अप्रिय सत्य सांगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे. नाही पटले आम्हाला तरी ऐकून घेऊ आणि मुख्य म्हणजे रागावणार नाही, तुमच्यावर तरी! कारण उत्तम श्रोते आहोत आम्ही आणि तसेही संपादकाला रोज अप्रिय सत्य व अप्रिय असत्यही ऐकण्याची सवय असतेच की!

- तर मग सांगतोच. तुम्ही भूतकाळातून जरा बाहेर पडा, वर्तमानात या, भविष्याचा वेध घ्या... म्हणजे व्यक्तिगत तुमच्याबाबत नाही म्हणत मी, तुमच्या साप्ताहिकाबाबत सांगतोय...

प्रश्न - केशवराव, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. भूतकाळात डोकावणारे, पुन:पुन्हा डोकावणारे आशय व विषय अलीकडच्या काळात जास्त आलेत खरे! पण त्यासाठी सभोवतालची परिस्थिती जास्त कारणीभूत आहे. वर्षानुवर्षांचे जुने विषय पुन्हा पुन्हा उकरून काढले जातात, चव्हाट्यावर आणले जातात, इतिहासाची मोडतोड केली जाते, तेव्हा त्याचा प्रतिवाद होईल असे लेखन जास्त येते आणि वाचकांनाही ते जास्त अपिल होते.

- असे म्हणून तुम्ही आपले अकर्तृत्व झाकत तर नाहीत ना? ‘लेखकानुनय आणि वाचकानुनय यांचा अतिरेक व्हायला लागला तर ते नियतकालिक ऱ्हासमार्गाने चालू लागते,’ असे तुम्हीच सांगत आलात ना सातत्याने?

प्रश्न - हो, पण आपले सार्वजनिक चर्चाविश्व गोल गोल फिरत राहणारे आहे. त्याच त्या विषयांभोवती, त्याच त्या घटनांभोवती, त्याच त्या व्यक्तींभोवती, त्यामुळे...

- बरोबर! पण तुम्हीच एकदा उद्‌धृत केलेले एक विधान आठवतेय? ‘‘महान व्यक्ती विचारांचा परामर्श घेत असतात, सामान्यजन घडून गेलेल्या घटनांवर भाष्य करीत राहतात आणि छोट्या मनाचे लोक व्यक्तींवर चर्चा करीत बसतात.’’

प्रश्न - हेही खरे आहे. पण आजचे वर्तमान इतके गुंतागुंतीचे, व्यामिश्र व संभ्रमित करणारे आहे की, ते उकलून दाखवणेच भल्याभल्यांना शक्य होत नाहीये. तर मग भविष्याचा वेध कोण घेणार आणि कसा?

- याला मराठीत ‘पलायनवाद’ असे म्हणतात! ‘आज’कडून ‘उद्या’कडे जाणाऱ्या समाजाला दिशादर्शन करण्याचे काम वैचारिक नियतकालिकांनी नाही करायचे तर मग कोणी?

प्रश्न - तत्त्वत: सहमत आहे तुमच्या या म्हणण्याशी! तशा सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही. पण परिस्थिती कठीण होत चालली आहे. त्यातच भर म्हणजे, 2020 या वर्षात कोविड-19 ने आख्ख्या जगाला वेठीस धरले. त्यात सर्वाधिक फटका बसला माध्यमांना आणि त्यातही प्रिंट मीडियाने तर हाय खाल्ली आहे.

- काहीच कारण नाही गर्भगळीत होण्याचे. आम्ही पाहिलाय मागील सव्वाशे वर्षांचा कालखंड. हे खरे की, आताचे संकट शतकातून एखादे म्हणावे असे, पण अशी परिस्थिती यापूर्वी अनेक वेळा आली आणि गेली. त्यातून जग सावरलेच ना!

प्रश्न - तुम्हाला काय वाटते, आताच्या या संकटातून प्रिंट मीडिया पुन्हा उभारी घेऊ शकेल? विशेषत: या डिजिटल युगात?

- का नाही घेणार? प्रिंट मीडियाची अशी काही बलस्थाने आहेत की नाहीत? पण आपोआप नाही उभारी घेता येणार! त्यासाठी मुळाशी जाऊन विचार करावा लागेल. आपापली बलस्थाने व मर्यादा यांची कठोर चिकित्सा करावी लागेल प्रत्येक नियतकालिकाला. आणि मग उत्तरांच्या दिशेने कठोर पावले टाकावी लागतील.

प्रश्न - आम्हाला हे माहीत आहे की, एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यावरच अवलंबून असतो, पण याबाबत मराठी नियतकालिकांची स्थिती फार सुधारत नाही आणि तशी ती सुधारण्यासाठी प्रयत्नही होत नाहीत, तशी गरज वाटणाऱ्यांची संख्याही अत्यल्प असते.

- हे बघा, तुमच्या या मुद्याशी वाचकांना, लेखकांना आणि टीकाकारांना काहीही देणे-घेणे नाही. तुम्ही स्वत:हून हा वसा घेताय ना, वारसा चालवण्याचे ठरवलेय ना? मग काय व कसे करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा. अपयशाची कारणमीमांसा ऐकण्यात कोणाला रस नसतो. आम्ही तुमच्यावर टीका करू वा तुमचे कौतुक करू, ते केवळ तुम्ही काय व कसे वाचायला देता यासाठीच!

प्रश्न - हरकत नाही. तुम्ही इतक्या ठामपणे सांगतच आहात तर हेही सांगून टाका की, आमच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांनी आशय विषयांच्या बाबतीत काय करायला हवे?

- संपादकांना सूचना व सल्ला देऊन उपयोग होतो असे वाटत नाही आम्हाला. पण तरीही एक पंचसूत्री घोळते आहे मनात तुमच्यासाठी....

प्रश्न - सांगा की... अर्थात तुमची पंचसूत्री पटली तरी कितपत राबवता येईल याची खात्री नाही देता येणार. कारण वाचक समजतात तितके संपादक सर्वाधिकारी नसतात, सर्वव्यापी नसतात आणि सर्वज्ञ तर नसतातच नसतात!

- ऐका तर मग... 
सूत्र क्रमांक- 
1. पुढील वर्ष-दोन वर्षे लेखमाला किंवा सदरे शक्यतो चालवू नका. 
2. दीर्घ लेख कमीत कमी असतील याची काळजी घ्या. 
3. भूतकाळ व इतिहास उगाळणाऱ्या लेखनाला जास्त जागा देऊ नका. 
4. अतिगंभीर व क्लिष्ट, ठोकळेबाज व पोथीनिष्ठ लेखनाला तडकाफडकी नकार द्या. 
5. जे आशय/विषय अलीकडच्या काळात तुम्ही किंवा अन्य माध्यमांनी हाताळले आहेत, त्यांना स्थान देण्याचे शक्य तितके टाळा.

प्रश्न - केशवराव, तुम्ही आमच्यावर पाळत ठेवून आहात, असे वाटायला लागलेय आता...

- छे! छे! आम्ही असे काही करण्यात वेळ दवडत नाही. आम्ही केवळ परिघावरून दिसते तेवढे सांगतो. फरक असेल तर एवढाच की, सतत केंद्रस्थानी वावरणाऱ्यांना परिघावरून दिसतात ती दृश्ये पाहायची सोय नसते.

प्रश्न - कळले आम्हाला, पण तुमच्या म्हणण्याचे सार एवढेच आहे की, वाचनीयता हाच मुख्य निकष बनवा आणि दर्जा व वेगळेपण काटेकोरपणे वाढवत चला... बरोबर?

- हो! आणि आणखी एक लक्षात असू द्या. संपादक जेव्हा संपादकासारखे वागत नाहीत तेव्हा अनेक घटक त्याचा गैरफायदा घेऊ लागतात.

प्रश्न - अरेच्चा! आम्ही तसे वागत नाही, असे म्हणायचेय का तुम्हाला?

- चला, उशीर झालाय निघतो मी...

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके