Diwali_4 वेडात मराठे वीर दौडले तीन
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

बावीस वर्षांच्या मुलाचे ते परिपक्व लेखन वाचून सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर त्याला, त्या सफरीची पार्श्वभूमी जरा विस्ताराने लिहायला सांगितली. त्याप्रमाणे त्याने लिहिली, ती वाचून उर्वरित दोघांना (विकास आणि श्रीकृष्ण) भेटीसाठी बोलावले. या तिघांशीही एकत्रितपणे संवाद झाल्यावर लक्षात आले, त्या तिघांच्यामध्ये असलेला संवाद आणि समन्वय दुर्मिळ प्रकारातला आहे आणि तरीही तिघांचाही आपापला असा वेगळा दृष्टिकोन आकाराला येण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणून विकास व श्रीकृष्ण यांनाही त्यांचे डायरीवजा लेख लिहायला सांगितले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी सुरू केलेले साधना साप्तााहिक गेली 68 वर्षे अखंड प्रकाशित होत आहे. प्रत्येक वर्षी, वर्धापनदिनाच्या निमित्ताने समाजमनाला भिडणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर साधनाचा विशेषांक काढण्याची परंपरा सुरुवातीपासून चालू आहे. वर्षानुवर्षे ती परंपरा अधिकाधिक सकस होत गेली आहे, वृद्धिंगत झाली आहे. साधनाच्या हीरकमहोत्सवानंतर भारताचे शेजारी, नक्षलवादाचे आव्हान, विदर्भाला सुखी करा, शेती आणि शेतकरी, मला प्रभावित करून गेलेला सिनेमा, पुनर्भेट : हमीद दलवार्इंची हे वर्धापनदिन विशेषांक विशेष महत्त्वपूर्ण ठरले आहेत. त्याच मालिकेतला हा विशेषांक आहे... तीन मुलांचे चार दिवस. 

हा अंक हळूहळू इव्हॉल्व होत गेला आहे, गंभीर विषयाकडून अतिगंभीर आशयाकडे सरकत गेला आहे. राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांतील संवेदनशील नेतृत्वाला (आळस व अनास्था झटकून) कार्यक्षम होण्याचे आवाहन करणारा झाला आहे. 2006 च्या डिसेंबरमध्ये, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला सर्वांत मोठा धोका नक्षलवादापासून आहे.’ असे विधान केले होते, तेव्हा सर्वांना माहीत असलेल्या त्या धोक्याचे गांभीर्य स्पष्ट झाले होते. मागील दहा वर्षांत अधूनमधून पण सातत्याने आदळणाऱ्या बातम्यांमुळे तो धोका पुन:पुन्हा अधोरेखित होत आला आहे. आणि 1967 मध्ये पश्चिम बंगालमध्ये उगम पावलेल्या नक्षलवादाला आता 50 वर्षे झाली आहेत. 

नक्षलवाद या समस्येची तीव्रता व दाहकता लक्षात घेऊन साधनाने 2009 चा वर्धापनदिन विशेषांक ‘नक्षलवादाचे आव्हान’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला होता. त्यातील तीन लेख विशेष महत्त्वपूर्ण होते. नक्षलवादी चळवळीची भूमिका मांडणारा त्यांच्या प्रवक्त्याचा चेराकुरी राजकुमार उर्फ आझाद यांचा लेख (ईपीडब्ल्यू मधून अनुवादित केलेला) प्रसिद्ध केला होता. नैतिक, तात्त्विक व व्यावहारिक या तीनही दृष्टिकोनातून पाहिले तरी ‘नक्षलवाद त्याज्य आहे’ अशी भूमिका मांडणारा लेख नक्षलवादाच्या अभ्यासक बेला भाटिया यांनी लिहिला होता. आणि तेलंगणातील आदिलाबाद या नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात 2001 ते 2004 या काळात पायलट प्रोजेक्ट राबवणारे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची दीर्घ मुलाखत ‘नक्षलवादाशी लढण्याचा फॉर्म्युला’ सांगणारी होती. 


त्याच विशेषांकात सुरेश द्वादशीवार यांनी नक्षलवादी चळवळ कशी विकृतीच्या दिशेने जात आहे, याचे सूचन केले होते. (महाराष्ट्रातील नक्षलवादग्रस्त प्रदेशात 2007 मध्ये निघालेल्या 25 दिवसांच्या, एक हजार किलोमीटर अंतराच्या शांतीयात्रेचे नेतृत्व द्वादशीवार यांनी केले होते.) त्या विशेषांकानंतर देवेंद्र गावंडे यांची लेखमाला दीड वर्षे (2010-11) साधनातून क्रमश: प्रसिद्ध झाली. एका बाजूला पोलिस-प्रशासन-राज्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला नक्षलवादी यांच्या तावडीत सापडलेल्या आदिवासींची कशी ‘ससेहोलपट’ होत आहे, याचे विदारक चित्रण त्या लेखमालेत पहायला मिळाले होते. देवेंद्र गावंडे यांची ती लेखमाला व त्या विशेषांकातील ते तीन लेख यांचे एकत्रित पुस्तक साधना प्रकाशनाकडून 2011 मध्ये आले, आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे मागून घेणारे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. 

बहादूरशहा आलाम या कार्यकर्त्याची हत्या नक्षलवाद्यांनी केली, त्यासंदर्भातला देवेंद्र गावंडे यांचा हृदयद्रावक लेख 2012 मध्ये साधनात प्रसिद्ध झाला, तेव्हा साधना वाचकांना आवाहन करून गोळा झालेला निधी बहादूरशहा आलाम यांच्या अपूर्ण राहिलेल्या घराच्या बांधकामासाठी पाठवला गेला होता. ती कृती छोटी होती, पण आदिवासींकडे लक्ष वेधणारी होती. या सर्व प्रक्रियेत साधनाचे संपादक म्हणून डॉ.नरेंद्र दाभोलकर अधिकाधिक सजग होत चालले होते, महाराष्ट्राच्या स्तरावर तरी नक्षलवादाच्या समस्येचे निवारण करण्यासाठी काय करता येईल, याबाबतचे विचारही त्यांच्या मनात घोळत होते. 

त्यानंतर छत्तीसगड राज्यात 2013च्या जूनमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात विद्याचरण शुक्ल व महेंद्र कर्मा यांच्यासह 72 लोक मारले गेले होते. तेव्हा प्रस्तुत संपादकाने ‘नक्षलवादाला सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल!’ या शीर्षकाचा संपादकीय लेख (साधना : 8 जून 2013) लिहिला होता. आणि त्यावर डॉ.दाभोलकरांची प्रतिक्रिया होती, ‘नक्षलवादाच्या संदर्भात यापेक्षा रॅशनल भूमिका असू शकत नाही.’ ती प्रतिक्रिया त्यांनी एवढी गांभीर्याने दिली होती की, त्यांचे त्यापुढचे विधान होते, ‘या पद्धतीने विचार करणारे तुझ्या वयाचे किती लोक महाराष्ट्रात असतील? जे कोणी असतील त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजे.’ आणि अर्थातच डॉक्टरांना तसे लोक जोडून घेणे आवश्यक वाटत होते, ते केवळ कृतिकार्यक्रमांसाठी! म्हणजे 2009 नंतरच्या पाच वर्षांत साधनाने नक्षलवाद हा विषय जेवढा व ज्या पद्धतीने हाताळला तेवढा व त्या पद्धतीने मराठीतील कोणत्याही नियतकालिकाने हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत विशेषांकाकडे वाचकांनी पाहावे, अशी आमची अपेक्षा आहे. 

गेल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नक्षलवादग्रस्त भागात पुणे शहरातील तीन मुले अडकून पडली होती आणि नंतर त्यांची सुटका झाली, या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण वृत्तपत्रांमधील त्रोटक माहितीवरून, त्या मुलांविषयी विशेष जाणून घ्यावे असे आम्हाला वाटले नाही. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रा.सुभाष वारे यांच्याकडून असा फोन आला की, ‘‘त्या तीन मुलांपैकी एकाने काही लेखन केले आहे. त्याला तुमच्याकडे पाठवतो, ‘त्या’ लेखनाचे साधनातून काही करता आले तर पहा.’’ त्यानंतर आदर्श पाटील साधना कार्यालयात जे लेखन घेऊन आला, ते होते ‘त्या’ चार दिवसांच्या डायरीचा विस्तार. 

बावीस वर्षांच्या मुलाचे ते परिपक्व लेखन वाचून सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर त्याला, त्या सफरीची पार्श्वभूमी जरा विस्ताराने लिहायला सांगितली. त्याप्रमाणे त्याने लिहिली, ती वाचून उर्वरित दोघांना (विकास आणि श्रीकृष्ण) भेटीसाठी बोलावले. या तिघांशीही एकत्रितपणे संवाद झाल्यावर लक्षात आले, त्या तिघांच्यामध्ये असलेला संवाद आणि समन्वय दुर्मिळ प्रकारातला आहे आणि तरीही तिघांचाही आपापला असा वेगळा दृष्टिकोन आकाराला येण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणून विकास व श्रीकृष्ण यांनाही त्यांचे डायरीवजा लेख लिहायला सांगितले. 

तिघांच्या अनुभवकथनामध्ये पुनरुक्ती होण्याची शक्यता त्यांना वाटत होती, परंतु त्याचे काय करायचे ते आपण सर्व लेखन हाताशी आल्यानंतर ठरवू असे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे पुढील दोन महिन्यांत तिघांचेही लेख हाताशी आले. आश्चर्य म्हणजे एकाच प्रवासातले ते अनुभव  असले, बहुतांश प्रसंगांचे साक्षीदार तिघेही असले आणि काही प्रसंगांचे वर्णन तिघांनीही तपशीलवार केले असले तरी तो सारा प्रकार वाचनीय आहे, कुतूहल वाढवणारा आहे. मग त्या तिन्ही लेखांचाच विशेषांक सादर करायचा असा निर्णय झाला. वाचकांची सोय, विषयाला न्याय व एकूण आर्थिक गणित पाहता साधनाचे विशेषांक 72 किंवा 80 पानांचे केले जातात. मात्र या तीन लेखांना 80 पानांची मर्यादा त्रासदायक ठरू लागली. 

बरीच काटेकोर छाननी करूनही 104 पानांपेक्षा कमी जागेत ते बसणार नव्हते. मग विचार केला तो एवढाच की, आर्थिक गणित पुढे जुळवून आणता येईल, पण हा अंक पुन्हा जुळवून आणता येणार नाही. कारण या तीन युवकांनी जे साहस व जी परिपक्वता तो प्रवास/सफर/अनुभव घेताना दाखवली तशी क्वचितच पाहायला मिळते. आणि त्याहून आश्चर्य हे आहे की, त्यांच्या प्रांजळ आत्मनिवेदनात ते सारे जिवंत पद्धतीने आले आहे. इतके जिवंत की, ‘तीन मुलांचे चार दिवस’ याच शीर्षकाचा एक अभिजात चित्रपट होऊ शकेल. 

मागील पाच-सहा वर्षांत राजा शिरगुप्पे यांनी साधनाच्या वतीने महाराष्ट्र, बिहार व ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रा केल्या आहेत. तळागाळातला माणूस जगतो कसा आणि विचार कसा करतो, यांचा शोध घेण्याचा तो अफलातून प्रयत्न होता. ‘भूक’ आणि ‘संस्कृती’ हे दोन विषय तळागाळातल्या माणसांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहेत, असा महत्त्वपूर्ण (कदाचित निर्विवाद!) निष्कर्ष त्यांनी त्या शोधयात्रांमधून काढला होता. त्याचप्रमाणे आदर्श, विकास व श्रीकृष्ण या तीन मुलांनी केलेल्या सफरीलाही शोधयात्रा म्हणता येईल. 

हे तिघेही वयाने पंचविशीच्या आतले आहेत आणि त्यांनी केलेली भ्रमंती सायकलवरून आहे, त्यामुळे त्यांच्या शोधयात्रेला आणखी वेगळे परिमाण लाभले आहे. ‘माणूस’ समजून घेण्यासाठी आणि ‘माणूस’ म्हणून जगायला शिकण्यासाठी, त्यांनी ही शोधयात्रा केलेली आहे. मित्रांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी आणि अपरिचित पांथस्थांनीही ‘तिकडे जाऊ नका, तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही या तिघांनी नक्षलवादग्रस्त आदिवासी प्रदेशात जाण्याचे साहस केले आहे. हे साहस ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गाण्याची आठवण करून देणारे आहे. (संदर्भ वेगळे असले तरी) या तीन मुलांनी ‘माणूस’ समजून घेण्यासाठी केलेली ही सफर आहे. यानंतरच्या टप्प्यावर त्यांना ‘व्यवस्था’ समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण व्यवस्था ही माणसांनीच बनवलेली असते. 

म्हणजे एका बाजूने माणूस बदलण्याची प्रक्रिया तर दुसऱ्या बाजूने व्यवस्था बदलण्याची प्रक्रिया एकाच वेळी चालू असते, त्या दोन्ही प्रक्रियांची गती वाढवण्यासाठी समाजसन्मुख असणाऱ्यांनी प्रबोधन-रचना-संघर्ष यापैकी पटेल त्या, वा झेपेल त्या मार्गाने प्रयत्न करायचे असतात. मात्र हे सारे प्रयत्न सनदशीर मार्गाने, अहिंसक लढ्याद्वारे वा साध्यसाधनविवेक बाळगून करायचे असतात. भारतीय संविधानाचाच तो सांगावा आहे. नक्षलवाद्यांना मात्र भारतीय संविधानच मान्य नाही, या देशात प्रचलित असलेली संसदीय लोकशाही मान्य नाही आणि भारतीय राज्यसंस्था त्यांना ‘शत्रू’ वाटते. शिवाय त्यांना त्यांच्या स्वप्नातील लोकशाही आणायची असते आणि त्यासाठी ‘हिंसा’ हाच एकमेव मार्ग योग्य वाटतो. त्यामुळे कोणत्याही विवेकी नागरिकाला नक्षलवादावर ‘त्याज्य’ असाच शिक्का मारावा लागणार आहे. 

भारतातील आदिवासींची लोकसंख्या दहा कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक जनता नक्षलवादग्रस्त प्रदेशांत आहे. ‘स्थानिक आदिवासींचा नक्षलवाद्यांना पाठिंबा असतो,’ असे सर्वसाधारण बोलले जाते. वस्तुत: त्यांच्या वर्तनाला पाठिंबा म्हणणे तितकेसे योग्य नाही. पोलीस, प्रशासन, राज्यकर्ते आणि स्थानिक व बाह्य प्रस्थापित शक्ती यांच्याकडून होत असलेल्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात लढणारे ‘मसिहा’ म्हणून नक्षलवाद्यांकडे आदिवासींकडून पाहिले जाते. दुसऱ्या बाजूला, नक्षलवाद्यांची भीती किंवा दहशत असते म्हणूनही आदिवासींकडून त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होत असते. मात्र नक्षलवाद्यांच्या स्वप्नातील व्यवस्था आणण्यासाठी आदिवासी त्यांच्या बाजूला असतात, असे समजणे आदिवासींच्यावर अन्याय करणारे आहे. 

रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्वांची आदिवासींना गरज आहे; त्या सुविधा पुरविणारे सरकार/प्रशासन कार्यरत असेल तर आदिवासींच्या मनात नक्षलवाद्यांबद्दल असलेली आपुलकीची वा भीतीची भावना संपुष्टात येईल. ते घडवून आणायचे असेल तर आदिवासींच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणात आदान-प्रदान व्हायला हवे, हाच संदेश या तीन मुलांच्या शोधयात्रेतून मिळतो आहे. हो की नाही? 

Tags: तीन मुलांचे चार दिवस नक्षलवाद श्रीकृष्ण शेवाळे विकास वाळके आदर्श पाटील आदिवासी गोंडी gadchiroli naxalism tin mulanche char diwas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात