डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विकासाचा असमतोल अधोरेखित करण्यासाठी

सर्वसमावेशक विकास किंवा विकासाचा असमतोल हे दोन शब्दप्रयोग आता उदारीकरण पर्वातील दोन दशकांनंतर सर्वाधिक परवलीचे झालेले आहेत. त्यामुळे विकासाचा असमतोल व सर्वसमावेशक विकास यांना केंद्रस्थानी ठेऊन होत असलेल्या चर्चेला वाट मोकळी करून देण्याचे काम या अंकातून अपेक्षित आहे. अर्थातच, अशा अंकातून कोणत्याही विषयाची वा घटकाची सर्वांगीण मांडणी करणे शक्य नाही आणि नियतकालिकांकडून तशी अपेक्षा करणेही योग्य नव्हे. पण काही विषय प्राधान्याने चर्चेत आणणे, त्यावर जनमानस तयार करण्यासाठीच्या वातावरण निर्मितीला हातभार लावणे एवढेच आम्हाला अपेक्षित आहे.

साधनाच्या नियमित वाचकांना हे माहीत आहे की, हा विशेषांक एका दीर्घकालीन नियोजनप्रक्रियेचा भाग आहे. हीरकमहोत्सवानंतर अमृतमहोत्सवाच्या दिशेने सुरू केलेल्या वाटचालीत साधनाने जे काही उपक्रम महत्त्वाचे मानले त्यातला एक म्हणजे साधनाचे विशेषांक.

दरवर्षी साने गुरुजींचा स्मृतिदिन (11 जून) आणि साधनाचा वर्धापनदिन (15 ऑगस्ट) ही त्यासाठींची निमित्त आहेत.

या दोन दिवसांचे औचित्य साधून, गेल्या चार वर्षांत आठ विशेषांक वाचकांच्या कक्षा रुंदावण्यासाठी एक-एक युनिट घेऊन काढले आहेत. त्यातूनच भारताचे शेजारी, भारतातील प्रादेशिक पक्ष, ईशान्य भारताची शोधयात्रा आणि विदर्भाला सुखी करा या चार विशेषांकांपासून एक साखळी तयार होऊ लागली आहे, तिच्यात आणखी एका कडीची भर टाकणारा ‘मराठवाडा शब्द निरर्थक व्हावा’ हा विशेषांक आहे. त्यातही या अंकाचे थेट नाते आहे ‘विदर्भाला सुखी करा’ या अंकाशी.

1 मे 2010 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हाच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई या चार प्रादेशिक विभागांवर विशेषांक करण्याच्या कल्पनेचे बीज पडले.  त्यानुसार 2010 मध्ये विदर्भाला समोर ठेवून विशेषांक तयार केला. त्या अंकाला मध्यवर्ती सूत्र होते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या एका विधानाचे. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची 30 एप्रिल 1960 रोजी घोषणा करताना नेहरूंनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर केलेल्या भाषणात ‘मुंबईचे वैभव कायम ठेवा, विदर्भाला सुखी करा!’ असा इशारेवजा सल्ला दिला होता. तो सल्ला किती यथार्थ व दूरदृष्टीचा होता हे गेल्या 50 वर्षांत पुरेसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच विदर्भाचा विकास आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवून 15 ऑगस्ट 2010 चा साधना विशेषांक काढला तेव्हा त्यात कैफियत, कैवार, कोंडी असे तीन विभाग तयार झाले.

त्याचवेळी मराठवाड्याचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून विशेषांक काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार या विशेषांकांची तयारी करीत असताना नरहर कुरुंदकर यांचा ‘माझा मराठवाडा’ हा लेख वाचनात आला आणि लक्षात आले, हा तर आपल्या नियोजित विशेषांकाचा ‘बीजलेख’ होऊ शकतो, त्यामुळे तो लेख या अंकात घेतला आहे.

मराठवाड्याचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवताना आम्ही विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा केली, त्यातून (विकासाबाबत भूतकाळात फारसे रममाण न होता) मराठवाड्याची सद्यस्थिती काय आहे, कोणते बदल वा ट्रेंड दिसत आहेत आणि कोणते बदल वा निर्णय नजिकच्या काळात संस्थात्मक व सरकारी पातळीवर होणे आवश्यक आहे यावर सखोल चर्चा घडवून आणावी असे ठरवले.

त्यानुसार या अंकात विविध क्षेत्रांतील 12 मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. या मान्यवरांना लेख लिहिण्याची विनंती करण्याची कारणे उघड होती. जनार्दन वाघमारे यांनी प्राचार्य, कुलगुरु, नगराध्यक्ष व राज्यसभेचे खासदार या चार भूमिका पार पाडल्याने आजच्या मराठवाड्यात त्यांचे स्थान ‘विशेष आदरणीय’ आहे. शिवाय, त्यांच्याकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाबाबत कोणता दृष्टिकोन आहे हे जाणून घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे मागील पाच वर्षे नागनाथ कोत्तापल्ले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु तर होतेच, पण त्यांची सुरुवातीची जडणघडण व प्राध्यापकीचा महत्त्वाचा कार्यकाळ मराठवाड्यातच गेला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सद्यस्थितीविषयी त्यांना काय वाटते हे जाणून घेणे आवश्यक होते.

यमाजी मालकर, निशिकांत भालेराव व सुभाषचंद्र वाघोलीकर या तीनही पत्रकार-संपादकांची 25 ते 30 वर्षांतील महत्त्वाची कारकीर्द मराठवाड्यातच झाली आहे आणि तेथील समाजजीवनाशी ते अधिक एकरूप झाले आहेत, म्हणून त्यांना कोणते प्रश्न विशेष महत्त्वाचे वाटतात आणि मराठवाड्याच्या विकासाकडे ते कसे पाहतात याला महत्त्व आहे.

निळू दामले यांनीही ‘मराठवाडा’ दैनिकातून पत्रकारितेला प्रारंभ केला, ‘टेलिवर्तन’ आणि ‘उस्मानाबादची साखर’ ही त्यांची पुस्तके पाहता त्यांचे मराठवाड्याशी असलेले पूर्वीचे संबंध लक्षात घेता मराठवाड्याच्या विकासाबाबतची त्यांची दृष्टी समजून घेणे आवश्यक वाटले.

अतुल देऊळगावकर गेल्या दशकभरात ‘विकास’ आणि ‘पर्यावरण’ या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास व लेखन करत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतून उपस्थिती लावल्याने शाश्वत विकासाबाबत त्यांची स्वत:ची अशी भूमिका तयार झाली आहे, म्हणून त्यांना लिहिण्याबाबत विनंती केली.

अभय टिळक आणि सुलक्षणा महाजन हे दोघेही नागरीकरणाचे अभ्यासक आहेत आणि मराठवाड्यात नागरीकरणाची स्थिती पाहता त्यांचा अभ्यास काय सांगतो याला विशेष महत्त्व आहे.

विवेक घोटाळे आणि दासू वैद्य या दोनही तरुण लेखक-कवींना अनुक्रमे शिक्षण व पाणी हेच दोन प्रश्न मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न आहेत असे वाटते, म्हणून त्या दोघांनीही अतिशय पोटतिडकीने त्या विषयांवर लिहिले आहे.

विश्वास पाटील कोरडवाहू शेतीवर साधना ट्रस्टने दिलेल्या अभ्यासवृत्तीतून काम करीत आहेत, तो अभ्यास करताना वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या बीड जिल्ह्यातील गटशेतीच्या एका प्रयोगाविषयी त्यांनी लिहिले आहे. हे सर्व 12 लेख हाती आल्यानंतर त्यातील आशय लक्षात घेऊन ढोबळमानाने विभाजन करायचे ठरवले तेव्हा तीन विभाग तयार झाले.

पहिला विभाग : व्यथा-वेदना, यात मराठवाड्याचे मानस स्पष्टपणे पुढे आले आहे. तक्रारी काय आहेत, अपेक्षा काय आहेत, त्या कोणाकडून आहेत हे त्यात नेमकेपणाने व ठोसपणे मांडले गेले आहे.

दुसरा विभाग : वाटावळणे, यात वस्तुस्थितीचे रेखाटन करून ती बदलण्यासाठीच्या वाटा व त्यातील वळणे यांच्याकडे लक्ष वेधले आहे.

तिसरा विभाग व्यामिश्रता : यात मात्र एकूणच विकासप्रक्रिया आता किती व्यामिश्र झाली आहे आणि त्यामुळे एकूण सर्वच मागास भागांचा विकास हा प्रश्न पुढे आणला पाहिजे, त्यात मराठवाडा येऊन जाईल असा सूर आहे.

हे सर्व लेख काळजीपूर्वक वाचले तर लक्षात येईल, की या लेखांतून त्या त्या विषयांची सूत्रबद्ध मांडणी केलेली नसून वेगळे ट्रेंड दाखवले आहेत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत, विकासासाठी काही तातडीने करावयाचे बदल सुचवले आहेत. त्यातूनच विकासाची सर्वसाधारण दिशा स्पष्ट झाली आहे. अर्थातच- शिक्षण, शेती, उद्योग या तीन क्षेत्रांतील मोठ्या सुधारणांतूनच मराठवाड्याचे सर्वांगीण मागासलेपण हटवता येणार आहे हेच त्यातून पुढे आले आहे.

डॉ.वाघमारे यांच्या लेखाच्या शीर्षकातून तर ते अधिकच तीव्रतेने अधोरेखित झाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मराठवाड्याच्या मागासलेपणाला ऐतिहासिक व भौगोलिक परिस्थिती जास्त कारणीभूत आहे, याकडे बहुतांश लेखांतून निर्देश केला गेला आहे. ही पार्श्वभूमी मराठवाड्यातील लोकांना माहीत असली तरी मराठवाड्याबाहेरील लोकांना फारशी परिचित नाही, ती पार्श्वभूमी हा अंक वाचणाऱ्यांच्या मनात अधिक नेमकेपणाने ठसेल आणि पर्यायाने मराठवाड्याकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होईल असा विश्वास वाटतो.

काही वाचकांना असा प्रश्न पडेल की, असा एक एक प्रादेशिक भाग घेऊन त्यावर अंक काढण्याचे प्रयोजन काय? या अंकातील तिसऱ्या विभागातूनही असा अर्थ काढता येणे शक्य आहे. 

पण सर्वसमावेशक विकास किंवा विकासाचा असमतोल हे दोन शब्दप्रयोग आता उदारीकरण पर्वातील दोन दशकांनंतर सर्वाधिक परवलीचे झालेले आहेत. त्यामुळे विकासाचा असमतोल व सर्वसमावेशक विकास यांना केंद्रस्थानी ठेऊन होत असलेल्या चर्चेला वाट मोकळी करून देण्याचे काम या अंकातून अपेक्षित आहे. अर्थातच, अशा अंकातून कोणत्याही विषयाची वा घटकाची सर्वांगीण मांडणी करणे शक्य नाही आणि नियतकालिकांकडून तशी अपेक्षा करणेही योग्य नव्हे. पण काही विषय प्राधान्याने चर्चेत आणणे, त्यावर जनमानस तयार करण्यासाठीच्या वातावरण निर्मितीला हातभार लावणे एवढेच आम्हाला अपेक्षित आहे. यापुढील काम विद्यापीठीय स्तरावर, संघटनांच्या पातळीवर, संशोधन करणाऱ्या संस्था आणि सरकार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षित आहे.

एका प्रादेशिक भाषेतील वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिकाने प्रचारकाची भूमिका न घेता विचारविमर्शाला निमित्त ठरणे हे आजच्या काळात जास्त आवश्यक आहे, तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शिवाय, वृत्तपत्र माध्यमांतून अनेक विषयांवर बातम्या व लेख येऊन जातात, मात्र त्यावर अधिक सखोल व व्यापक चर्चा करणे त्यांना वेळ व जागा या दोन्हींच्या मर्यादामुळे शक्य नसते. त्यामुळे नियतकालिकांनी वृत्तपत्रांच्या मर्यादा ही आपली सामर्थ्यस्थळे बनवून त्याप्रमाणे काम केले तर ते काम वृत्तपत्रांना पूरकच ठरेल, साधना तेच करीत आहे.

Tags: संपादकीय विकास उद्योग शेती शिक्षण मराठवाडा editorial improvement backwardness industry agriculture education Marathwada weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात