डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परीक्षेच्या निकालांमध्ये टक्केवारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परीक्षक आणि विद्यार्थी दोघेही उच्च टक्केवारीला आता सरावले आहेत. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण पडले किंवा शंभरपैकी शून्य गुण पडले तर त्याचा अर्थ एकच होतो;  म्हणजे त्यांची परीक्षा झाली नाही. आज 10 गुणांच्या सलग लेखनप्रकारात 8 पर्यंत सर्रास गुण दिले जातात.

गेली काही वर्षे आपल्याकडे वस्तुनिष्ठ परीक्षा प्रक्रिया अंमलात आहे. त्यापूर्वीच्या परीक्षापद्धतीत परीक्षकाच्या व्यक्तिनिष्ठेला महत्त्व होते. त्याने एखाद्या प्रश्नाला कमी किंवा जास्त गुण दिले तर त्याचा निर्णम अंतिम असे. ‘मॉडरेटर’ नेमला जात असे. तो परीक्षकाला सूचना देऊ शकत असे. काही थोड्या उत्तरपत्रिका तपासण्याचा त्याला अधिकारही असे. परीक्षकाने दिलेल्या गुणांत तो असा किंवा तसा बदल करू शकत असे. मात्र कमीत कमी 10 टक्के उत्तरपत्रिका या मॉडरेटरने तपासाव्या अशी अपेक्षा होती. उरलेल्या 90 टक्के उत्तरपत्रिकांना परीक्षकांचेच गुणदान असे.

परीक्षक झाला तरी तो माणूसच असल्यामुळे माणसाचे गुणदोष त्याच्या अंगी असायचेच. काहीजण उदार तर काही जण कंजूष असत. यावर काही उपायही नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त गुण मिळू शकत;  म्हणजे तपासणीची प्रक्रिया विश्वासार्ह वाटत नसे.

पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी मागील परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीचा निकष लावला जाणे क्रमप्राप्त ठरले. जागा कमी आणि प्रवेशेच्छू अधिक या परिस्थितीत अन्य पर्यायही उपलब्ध नव्हता. प्रवेश मिळणे किंवा न मिळणे हे एका किंवा अर्ध्या गुणावर ठरविणे ओघानेच आले. अशा तणातणीच्या स्पर्धेच्या वातावरणात परीक्षकाच्या व्यक्तिनिष्ठेला पूर्वीप्रमाणे महत्त्व देणे कालविसंगत ठरले.

अशा परिस्थितीत वस्तुनिष्ठ परीक्षेची संकल्पना पुढे आली. ही पद्धत गेली पंचवीस-तीस वर्षे तरी अस्तित्वात आहे. एवढ्या अवधीत ती रूजली आणि पचनी पडली.

कोणतीही परीक्षापद्धती वापरली तरी तिचे काही अंगभूत गुणदोष असतात. ते जसे व्यक्तिनिष्ठ परीक्षेचे होते तसे वस्तुनिष्ठ परीक्षेचेही आहेत. त्यांची जरा चर्चा करणे आवश्यक आहे.

वस्तुनिष्ठ परीक्षेत सलग लेखन कमी असून बहुपर्यायी प्रश्न अधिक असतात. त्यात जोड्या जुळवा, रिकाम्या जागा भरा, विधाने सत्य का असत्य ते निर्दिष्ट करा, वगैरे... प्रकार असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी बहुधा चार पर्याय दिले जातात. त्यातील एकावर विद्यार्थ्याने खूण करायची. अशा तऱ्हेच्या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण पडू शकतात. शिवाय, विद्यार्थ्याने चारऐवजी सहा पर्याय सोडविले तरी जे बरोबर असतील तेच विचारात घ्यावयाचे असल्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळविणे सोपे जाते.

परिणामी, टक्केवारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परीक्षक आणि विद्यार्थी दोघेही उच्च टक्केवारीला आता सरावले आहेत. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण पडले किंवा शंभरपैकी शून्य गुण पडले तर त्याचा अर्थ एकच होतो;  म्हणजे त्यांची परीक्षा झाली नाही. आज 10 गुणांच्या सलग लेखनप्रकारात 8 पर्यंत सर्रास गुण दिले जातात.

प्रत्येक घरातील पाल्याला आपल्या पालकांपेक्षा दहावी-बारावीला किती तरी अधिक गुण पडलेले दिसतात. यामुळे पालक जरा गंभीर होतात.

1950 च्या आसपास इंटर सायन्सला पहिला वर्ग मिळाला की मेडिकलचा प्रवेश निश्चित असे. आज बारावीला 80 टक्के गुण पडले तरी प्रवेश मिळणे दुरापास्त असते.

वस्तुनिष्ठ परीक्षेतील गुणांचा पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याकरिता उपयोग होऊ लागल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असे सगळे या स्पर्धेत उतरले. यामुळे परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आली. त्यामुळे संयुक्त पात्रता परीक्षा (सीईटी) घेतली जात आहे. तिची विश्वासार्हता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. असो.

वस्तुनिष्ठ परीक्षेतही काही अंगभूत उणिवा आहेत.

1. या परीक्षेत गुणसंख्या कमालीची वाढलेली आहे. ही प्रगती आहे की सूज आहे हे कळत नाही. हल्ली मंडईत कॉलिफ्लॉवरचे गड्डे मिळतात. एकेक गड्डा दीड-दोन किलो वजनाचा असतो. चव मात्र पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. तो हवा भरून मोठा केल्यासारखा वाटतो. कस मात्र कमी असतो. रासायनिक पृथक्करण केले तर ही गोष्ट सिद्ध होण्याजोगी आहे. परीक्षेतील टक्केवारीचेही असेच काही झाले आहे की काय, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

2. या परीक्षेतील फुगीर गुणसंख्येचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. दहावीला 80 टक्के गुण मिळूनही 11 वी विज्ञान शाखेला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्याला नैराश्य येऊ शकते. नैराश्य हा मानसिक रोग आहे.

3. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्याला नावारूपाला आणण्यासाठी वर्षानुवर्षे खस्ता खाणाऱ्या पालकांचाही केवळ परीक्षापद्धतीवरचाच विश्वास उडतो.

4. यश मिळविण्यासाठी काही खेळाडू उत्तेजके घेतात. दमलेल्या घोड्याला चाबूक मारण्यासारखेच ते असते. परीक्षेतील गुणसंख्या वाढविण्यासाठी परीक्षेतील गैरप्रकार चालतात. त्यांना उत्तेजकेच मानता येईल.

5. सलग लेखनाचे महत्त्व कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण वाक्याची रचना करणे अवघड जाते. बोलतानाही तुटकतुटक शब्द वापरले जातात. बोलणे, ऐकणे, लिहिणे व वाचणे ही चार कौशल्ये म्हणजेच सध्या मागणी असलेली कम्युनिकेशन स्किल्स, यातील बोलणे आणि लिहिणे ही दोन कौशल्ये वस्तुनिष्ठ परीक्षेमुळे अविकसित राहतात. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज लिहिणे, मुलाखत देणे, गटचर्चेत भाग घेणे, वगैरे क्षेत्रांत तो कमकुवत ठरतो. पत्रे वगैरे लिहिता येत नाहीत. द्राक्षाच्या भावाने करवंदे खपवायची असतील किंवा करवंदांच्या भावाने करवंदे विकायची असतील तरी चांगले बोलता येणे गरजेचे असते. ‘मार्केटिंग’ शिकायचे असेल तर ‘सेल्फ मार्केटिंग’ पहिल्यांदा शिकावे लागते. बोलल्याशिवाय ते करता येत नाही.

6. आपल्याकडे ज्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात त्याला हुशार समजण्याची प्रथा आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ परीक्षेतील चढत्या भाजणीचे गुण पाहता सर्वच विद्यार्थी हुषार झालेले आहेत असे वाटण्याचा संभव असतो. तसे प्रत्यक्षात आढळत नाही. वस्तुत: संशोधक आणि कलावंत यांनाच बुद्धिमत्तेची गरज असते. इतर क्षेत्रांत वेगवेगळ्या कौशल्यांचीच गरज असते. कोणतेही कौशल्य सरावाने वाढत असते. तेव्हा लिहिणे, वाचणे, बोलणे आणि ऐकणे ही मूलभूत कौशल्ये अंगी बाणविण्यासाठी त्यांचा सराव ठेवणे आवश्यक आहे.

वस्तुनिष्ठ परीक्षेतील जाणवणाऱ्या उणिवांमुळे हे सगळे लिहिणे आले.

खरे पाहता वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीतही गुणांचा फुगोटा कमी करून तो ‘वस्तुनिष्ठ’ पातळीवर आणायची सोय आहे. ती म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल गुण कापणे. याला ‘नकारात्मक गुणदान’ म्हणतात. सर्व प्रश्न सक्तीचे आणि विनापर्याय ठेवून बहुपर्यायी प्रश्न विचारले आणि चुकीच्या उत्तराबद्दल गुण कापले तर वस्तुनिष्ठ परीक्षा खऱ्या अर्थाने ‘वस्तुनिष्ठ’ होऊ शकेल. मात्र हा बदल आपल्याकडे सहजासहजी स्वीकारला जाणे सध्या तरी शक्य दिसत नाही.

Tags: व्यावसायिक अभ्यासक्रम वस्तुनिष्ठ परीक्षा शिक्षण प्रा. कमलाकर दीक्षित objective exam education Pr. Kamlakar Dixit weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके