Diwali_4 एलिझाबेथ एकादशी
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘एलिझाबेथ एकादशी’ हा दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा मराठी सिनेमा सध्या खूप गाजतो आहे. सिनेमाला लहान मुलांची तोबा गर्दी होतेय. यातल्या बालकलाकारांचं प्रचंड कौतुक होतंय. आणि ते येाग्यही आहे. पण म्हणून हा सिनेमा फक्त लहान मुलांसाठी आहे का? मोठ्यांनाही यातून शिकण्यासारखं काय आहे? त्याविषयी हा लेख 

थिएटरमध्ये चिल्ली-पिल्ली गजबजाट करत होती. शनिवारची संध्याकाळ होती आणि पालकांबरोबर सिनेमा बघायला आलेल्या त्या लहान-लहान मुलांमध्ये एक्साइटमेंट जाणवत होती. खूप-खूप पूर्वी बालनाट्य पाहायला येणाऱ्या मुलांमध्ये दिसायची, तशीच. कदाचित टीव्हीच्या पडद्यावरून सिनेमातले ज्ञाना, झेंडू आणि त्यांचे मित्र या मुलांच्या ओळखीचे झाले असावेत. त्यांचे कारनामे पाहायला ही बच्चेकंपनी सज्ज झालेली होती. सिनेमा पाहताना टाळ्या वाजवत होती. दाद देत होती. हसत होती. ज्ञाना आणि झेंडूच्या सुख-दु:खात पूर्णपणे रमून गेली होती. 

दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाने सध्या लहान मुलांच्या भावविश्वावर कब्जा केलेला असावा. एक सात वर्षांचा लहान मुलगा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्या आईला म्हणाला, ‘तुझ्यावर असा काही प्रसंग आला, तर मीसुद्धा ज्ञानासारखं काम करेन; तू काळजी नको करूस.’ हे उदाहरण सांगताना परेश म्हणतो, ‘त्या आईने मला हे सांगितलं आणि माझे डोळे पाणावले. मुलांच्या मनातली कुठची तार छेडली जाईल, काही सांगता येत नाही.’ 

सिनेमा हाऊसफुल्ल चालू आहे. मुलांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. पण म्हणून हा सिनेमा फक्त लहान मुलांचाच आहे का? ही गोष्ट लहान मुलांच्या भावविश्वापुरतीच मर्यादित आहे का; त्यातलं मोठ्यांचं जग आपल्याला काय सांगतं? ही फक्त स्वर्गवासी वडिलांनी आपल्या हाताने बनवलेली एलिझाबेथ ही सायकल वाचवण्यासाठी मुलांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केलेली धडपड आहे का; की त्याही पलीकडे जाऊन हा सिनेमा आपल्याला काही सांगू पाहतोय?  

सत्यजित रे म्हणाले होते, ‘सिनेमा इज ॲन आर्ट ऑफ सिंपल स्टोरी टेलिंग.’ इथेही एक साधी-सरळ गोष्ट सांगितली आहे. अत्यंत परिणामकारकतेने सांगितली आहे. पण केवळ तेवढी गोष्ट सांगून लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक परेश मोकाशी थांबलेले नाहीत. ‘एलिझाबेथ एकादशी’ला अनेक पदर आहेत. ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. वरवर पाहताना त्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी जाणवणार नाहीत कदाचित; पण बारकाईने विचार केला, तर त्या किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव झाल्यावाचून राहणार नाही. अगदी पहिल्याच दृश्यात विठोबाला दुधाने घातलेली जाणारी अंघोळ आणि एलिझाबेथची होणारी स्वच्छता आलटून-पालटून आपल्याला दिसते. एका प्रकारे एलिझाबेथ हीही विठोबाचंच प्रतीक बनून जाते आणि विठोबाची एकादशी एलिझाबेथ एकादशी होते. 

सिनेमा न पाहिलेल्यांसाठी थोडक्यात- सिनेमाच्या केंद्रस्थानी अर्थातच लहान मुलं आहेत. ज्ञानेश आणि मुक्ता म्हणजेच ज्ञाना आणि झेंडू यांचे वडील वारल्यामुळे घरात आर्थिक चणचण आहे. आजी वाती वळायचं काम करते. आई स्वेटर विणून पैसे कमावते. पण कर्ज काढून आणलेल्या मशिनचे हप्ते थकतात. ‘कार्तिकी एकादशीपर्यंत पाच हजार रुपये भरून मशीन घेऊन जा’ असं बँकेचा माणूस सांगतो आणि पैसे जमवायची आईची धडपड सुरू होते. नाहीच जमले पैसे, तर ज्ञानाच्या वडिलांनी   स्वत:च्या हाताने बनवलेली सायकल- एलिझाबेथ विकण्याची वेळ येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातली वर्दळ वाढतेय. बिडी-काडी, चहा, बांगड्या, वडा-पाव असे अनेक स्टॉल्स टाकले गेलेत. मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्यात. आपणही असा एखादा छोटा धंदा करावा, असा विचार ज्ञानाच्या मनात येतो. आईच्या नकळत तो बांगड्यांचा स्टॉल टाकतो. कोणत्याही परिस्थितीत एलिझाबेथ वाचवायची, हा मुलांचा निर्धार आहे. 

गोष्ट ही एवढीच. पण ज्ञानाला वडिलांकडून सायन्सचा मिळालेला वारसा, न्यूटन आणि आइन्स्टाईन यांचे येणारे उल्लेख आणि गाडगेबाबांचं कीर्तन यांचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. मुलं गाडगेबाबांची स्वच्छता शिकतात तेव्हा ती अमलातही आणतात. विज्ञानाचा संबंध केवळ पुस्तकात शिकण्यापुरताच नसतो. मोठी माणसं अगदी त्याच्या उलट. ज्ञाना कीर्तन छान करतो म्हणून त्याला गाडगेबाबांचं कीर्तन करायला एक काका सांगतात, ते झाल्यावर त्याच्या गळ्यात फुलांची माळ घालतात आणि ज्ञानाने दिलेल्या स्वेटरचे पाचशे रुपये न देताच निघून जातात. हिरमुसला ज्ञाना गळ्यातली फुलांची माळ काढतो, देवळात साफसफाई करणाऱ्या मावशींच्या ताब्यात देतो आणि निघून जातो. 

सुनेला मूल व्हावं म्हणून नवस बोललेल्या मावशी कोणता देव पावला हे कसं कळणार, यासाठी पंढरपुरातल्या सगळ्या देवांसमोर नवस फेडतात. ज्ञाना त्यांना इंग्लंडच्या संत न्यूटनची माहिती देतो तेव्हा तिथे जायला किती खर्च येईल असं त्या विचारतात.

पाच हजार रुपयांसाठी एका कुटुंबाची होणारी वणवण आपल्याला दिसते, तेव्हाच मंदिरात देवासमोर पडलेल्या नाण्यांचा आणि नोटांचा ढीगही दिसतो. हा सगळा विरोधाभास मोठ्यांसाठी; मुलांसाठी नाही. दिग्दर्शक परेश म्हणतो, ‘‘शाळेत असताना आपलं विश्व चित्रविचित्र गोष्टींनी वेढलेलं असतं. त्यातल्या विरोधाभासांसकट आपण ते स्वीकारलेलं असतं. कारण आपण पारदर्शी असतो. जसजसे मोठे होतो तसतसे आपण सिलेक्टिव्ह होतो. आपल्या सोईचं आणि हवं तेवढं घेतो, बाकी बाजूला टाकून देतो.’’

अशी मोठी माणसं आपल्याला या गोष्टीत भेटतात, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या परीक्षेची फी भरणारे कांबळे मास्तरही दिसतात. त्याच्या आईला स्वैपाकचं काम मिळवून देणाऱ्या  घराच्या मालकीणबाईही दिसतात आणि अख्खं पंढरपूरही आपल्याला भेटतं. एखादं शहर आणि त्या शहराची खासियत दाखवताना दिग्दर्शक जाणीवपूर्वक कशावरच फोकस ठेवत नाही. त्याचा फोकस केवळ आपल्या गोष्टीवर आहे. पण म्हणूनच गोष्टीच्या आजूबाजूला दिसणारी संस्कृती, माणसं आपल्याला सतत जाणवत राहतात. एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर धावणारे आणि वेगळ्याच घरांमधून खाली उतरणारे ज्ञाना व झेंडू पाहताना या शहरातल्या बिल्डिंग्जची रचना आपोआप आपल्या ध्यानात येते. सगळी घरं एकमेकांना जोडलेली. कदाचित माणसंही. 

खुद्द ज्ञानाच्या कुटुंबातल्या व्यक्तिरेखाही खास आहेत. ज्ञानाच्या आईला धीर देताना आजी म्हणते, ‘काळजी नको करूस, विठोबा सगळं नीट करेल.’ आईचं उत्तर, ‘दगड तो; तो काय नीट करतोय.’ मात्र, घराच्या मालकीणबाईही धीर देताना विठोबाचा दाखला देतात, तेव्हा आई शांतपणे ऐकून घेते. कठीण प्रसंगी कुणी तरी आपल्यासोबत आहे, हा विश्वास आवश्यक असतो का? 

ज्ञानाचे मित्र वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आलेले आहेत. एकाच्या वडिलांचं विडीकाडीचं दुकान आहे. स्वाभाविकच बापाप्रमाणे तोही लहान वयात शिव्या द्यायला लागलाय. दुसरा सधन, व्यापारी कुटुंबातला. एखाद्याच दृश्यात त्याच्या वडिलांचं दुकान दिसतं आणि या मुलाच्या आर्थिक स्थितीविषयी दिग्दर्शक आपल्याला सांगतो. एक तर थेट वेश्येचा मुलगा. (शाळेतल्या शिक्षिकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बरंच काही बोलून जातो). कान्होपात्रा ही गणिका होती. म्हणजे कोण, असं विचारल्यावर- कोण जाणे, पण ती गणितात हुशार असणार असं उत्तर ज्ञाना देतो. परीक्षेत पास व्हायचं तर कान्होपात्रेच्या झाडावरचं पान तोंडात ठेवतात म्हणजे असंच काही तरी असणार ना! मात्र या चर्चेत पान तोंडात ठेवून पास होता येत नाही, असेही संवाद येतातच.

मुख्य म्हणजे, ही वेश्या या सगळ्या गोष्टीत एक महत्त्वाची भूमिका बजावते. आणि तिच्या तोंडी आलेलं, ‘या वेळची वारी आमच्यासाठी चांगली गेली,’ हे वाक्यही वारीवर मोठं भाष्य करून जातं. 

सिनेमात आलेल्या अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींविषयी बोलताना परेश सांगतो, ‘‘त्यातल्या अनेक गोष्टी अर्थातच जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. काही आपोआप झाल्या आहेत. उदाहरणार्थ- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धाविरोधी विधेयकाची पार्श्वभूमी या वारीला आहे. हा उल्लेख विचारपूर्वक केलाय. पण काही गोष्टी पटकथा लिहिता-लिहिता सहजगत्या आलेल्या आहेत. मुळात ही गोष्ट मधुगंधाची आहे. लहान असताना तिने आणि तिच्या भावाने आईला आर्थिक मदत व्हावी म्हणून असे छोटे स्टॉल टाकले होते. तिने हे सांगितलं आणि त्यात सिनेमाच्या गोष्टीचे सर्व एलिमेंट्‌स आहेत, असं आम्हाला वाटलं. गेली दोन वर्षं आम्ही या गोष्टीवर काम केलं आणि त्यातून हा सिनेमा तयार झाला.’’ 

लहान मुलांचा लहानांना भावणारा सिनेमा, मोठ्यांसाठीही खूप काही सांगणारा सिनेमा. सामाजिक भाष्य करणारा सिनेमा. दिग्दर्शकाने आपलं म्हणणं ठामपणे मांडलंय, असा सिनेमा. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नंतर परेशचा हा दुसरा सिनेमा तब्बल चार वर्षांनंतर आलाय. मात्र ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहिल्यावर हे वाट पाहणं कारणी लागलं, असं वाटतं. किंबहुना, या सिनेमाद्वारे परेशने एक पाऊल पुढे टाकलंय, असं निश्चितच म्हणता येईल. 

Tags: नरेंद्र दाभोलकर डॉ वारी पंढरपूर सत्यजित रे परेश मोकाशी नवा सिनेमा एलिझाबेथ एकादशी मीना कर्णिक Dr. Narendr Dabholkar Pandhrpur Vari Satyjeet Re Paresh Mokashi Nava Cinema Elizabeth Ekadashi Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात