Diwali_4 ‘संशोधक’ राजा भेटतो तेव्हा...
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

संस्थानिक असतानासुद्धा राष्ट्र पुनर्निर्माणाचा विचार आणि कृती करणारा हा राजा खऱ्या अर्थाने भारताचा सार्वकालीन ‘राष्ट्रीय नायक’ ठरतो. लोकांचे विचार, धोरण आणि कृती संतुलित ठेवण्यासाठी त्यांना धर्माचे तुलनात्मक शिक्षण देण्याचा आग्रह धरणारा हा भारतातील एकमेव विद्वान. पुरोहितांसाठी ‘दुष्ट देवदूत’ हे रूपक वापरणारा हा राजा निर्भीड होता. पुरोहितांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊनच त्यांना धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्याचा कायदा करणारा हा जगातील बहुधा पहिला शासक असावा. भारतात जेव्हा राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता, तेव्हा राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ‘अस्पृश्यतानिवारण’ हा विषय राष्ट्रीय प्रश्न म्हणून हाताळणारा हा पहिला राजा. आधुनिक भारतात एक राजकीय व्यवस्था म्हणून राज्याच्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेवरील ‘मुलभूत कार्यक्रम’ हा दर्जा ‘अस्पृश्यतानिर्मूलन’ या प्रश्नाला देणारा पहिला राजा म्हणून सयाजीरावांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल.

बाबा भांड यांनी- २०१३ मध्ये लिहिलेले ‘लोकपाल राजा सयाजीराव’ हे चरित्र वाचले. एवढा अफाट राजा महाराष्ट्रात जन्मला, तरी बसता-उठता पुरोगामित्वाचे ढोल वाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या बौद्धिक वर्तुळात हा राजा ‘अस्पृश्य’ ठेवला गेला. ही बाब महाराष्ट्रातील सामाजिक संशोधकांवर येथून पुढे विेशास ठेवायचा नाही, असा संकल्प सोडण्यास भाग पाडणारी ठरली. मग सुरू झाला एका नव्या शोधाचा प्रवास. पुणे, शिवाजी विद्यापीठ, इंटरनेट अशा विविध मार्गांनी सयाजीरावांसंदर्भात मिळेल ते लागेल ते मोल देऊन मिळवण्याचा धडाका लावला. गेल्या सहा वर्षांत या शोधयात्रेने समृद्ध केले, आनंद दिला.

यामध्ये तीन वर्षांपूर्वी महाराणी चिमणाबाई यांनी लिहिलेला ’The Position of Women in Indian Life’ हा १९१२ मध्ये लंडनमधून प्रकाशित झालेला ग्रंथ Forgotten Books या संकेतस्थळावरून सापडला. तो लंडनहून मागवून घेतला. ज्या दिवशी तो हातात आला, त्या दिवशी झालेला आनंद शब्दातीत होता. आजवर कोणत्याही स्त्रीवादी लेखिकेने याचा संदर्भ घेतला नव्हता. कोण प्रकाशित करेल याचा विचार न करता बी.ए.ला शिकणाऱ्या सुरक्षा घोंगडे या विद्यार्थिनीला याचा अनुवाद करायला सांगितला. पुढे भांडसरांना हे सांगितल्यानंतर त्यांनी हा अनुवाद प्रकाशित करण्याची हमी दिली. त्यानंतर या निबंधाबाबत असेच झाले. हिंदी निबंध भांडसरांनी अनुवादासाठी पाठवून दिला आणि ‘मूळ इंग्रजी निबंध तुमचेच विद्यार्थी शोधून काढतील’ असा विेशासही व्यक्त केला. त्यांचा हा विेशास माझ्या जनता दरबारच्या ‘ब्लॅक पँथर्स’नी काही दिवसांतच खरा केला, त्या वेळी साक्षात सयाजीराव महाराज भेटल्याचा आनंद झाला. मला एक ‘संशोधक’ राजा भेटला. त्याचीच ही गोष्ट.

महाराजा सयाजीराव गायकवाड या आधुनिक भारतातील महान आणि विद्वान राजाने ११० वर्षांपूर्वी भारतातील सर्वांत मोठ्या प्रश्नावर  The Indian Review  मध्ये  'Depressed Classes' हा ऐतिहासिक दुर्मिळ निबंध लिहिला. एक भारतीय राजा विसाव्या शतकाच्या आरंभी अस्पृश्यतेसारख्या भारतातील अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर इंग्रजीत गंभीर लेखन करतो, ही बाब एकविसाव्या शतकात चमत्कार वाटावा अशीच आहे. भारतातील राजांची स्थिर झालेली प्रतिमा विचारात घेता, हा निबंध सयाजीरावांच्या दरबारातील एखाद्या विद्वानाने लिहिला असावा, असेच वाटेल. कोणत्याही रूढ चौकटीत न बसणाऱ्या सयाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाची वैचारिक बैठक भक्कम होती. या व्यासंगाला जगण्यातील वास्तवाचा आधार होता, डोळसपणे जगभ्रमंतीतून आलेली सृजनशील दृष्टी होती; आपली प्रजा ज्ञानी, सृजनशील आणि जागतिक दर्जाची व्हावी, ही तळमळसुद्धा होती. समाजशास्त्र ही ज्ञानशाखा भारतातील पदवी अभ्यासक्रमात प्रविष्ट होण्याअगोदर दहा वर्षे एक ‘देशी’ राजा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असा निबंध लिहितो, हेच मुळात अलौकिक.

या निबंधाचा शोध पंडित श्रीराम शर्मा या सयाजीरावांच्या पहिल्या हिंदी चरित्रकारामुळे लागला. बडोद्यातून १९१५ मध्ये प्रकाशित झालेले ‘सयाजी चरितामृत’ या पंडित श्रीराम शर्मालिखित ग्रंथात या भाषणाचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. सयाजीरावांच्या उपलब्ध मराठी १७, इंग्रजी ३ अशा एकूण २० चरित्रांपैकी कोणत्याही चरित्रामध्ये या निबंधाचा संदर्भ आलेला नाही. मात्र, १७९ पानांच्या संक्षिप्त परंतु अतिशय परिणामकारक एकमेव हिंदी चरित्रात हा ऐतिहासिक निबंध उपलब्ध आहे. १९०९ मध्ये प्रकाशित झालेला हा मूळ इंग्रजी निबंध शोधण्याची प्रेरणा या हिंदी चरित्रातील संदर्भामुळे मिळाली.

 हा हिंदी चरित्रग्रंथ महाराजा सयाजीराव गायकवाड साधने प्रकाशन समितीचे संशोधन सहायक डॉ.राजेंद्र मगर यांना सापडला. ‘सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकल्पाचे’ प्रवर्तक मा.बाबा भांड यांनी अनुवादकास हा ग्रंथ उपलब्ध करून दिला. इतकेच नाही, तर हिंदी निबंधाचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणा आणि संधी दिली. मूळ इंग्रजी निबंध शोधण्यास प्रोत्साहन दिले. इंटरनेटमुळे ही शोधयात्रा सुलभ झाली. हिंदी अनुवादावरून मराठी अनुवाद केल्यानंतर मूळ इंग्रजी निबंध नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या संकेतस्थळावर सापडला. हिंदी अनुवादात न आलेल्या मजकुराची भर घालून मूळ इंग्रजी निबंधाबरहुकूम सदरचा मराठी अनुवाद नव्याने केला. मूळ इंग्रजी निबंध जुन्या अक्षरजुळणीप्रमाणे असल्याने तसेच जुन्या इंग्रजीतील शब्दांचे अर्थ शोधून मूळ इंग्रजी निबंध नव्याने जुळवण्याच्या खडतर प्रक्रियेतून जाण्याचा नवा सृजनशील अनुभव ऊर्जादायी ठरला.

सयाजीराव गायकवाडांचा ‘अस्पृश्य जाती’ हा निबंध १९०९ मध्ये प्रकाशित झाला. या निबंधाची शब्दसंख्या ३९२६ इतकी होती. भारतात समाजशास्त्र, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, तुलनात्मक अभ्यासपद्धती, जागतिक घडामोडींच्या संदर्भात चर्चा या बाबी विद्वानांच्या मुख्य प्रवाही चर्चेत अपवादात्मक असताना या सर्व शिस्तबद्ध आणि शास्त्रीय चौकटीत या प्रश्नांची चर्चा त्यांनी केली आहे. अतिशय संतुलित तरीही परखड, त्याचप्रमाणे एक राष्ट्र म्हणून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची चर्चा ही या निबंधाची वैशिष्ट्ये आहेत. अगदी संस्कृत संदर्भांचा आधार, धर्माची परिवर्तनशीलता, धर्मधारणांतील वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोहितशाहीचे अर्थकारण या बाबी निबंधात केंद्रस्थानी आहेत. अतिशय संवेदनशील बाबी हाताळत असतानासुद्धा चर्चा नकारात्मक न होता सकारात्मक झाली आहे. अगदी वर्णव्यवस्थेचा अंत करणारे गौतम बुद्धसुद्धा अस्पृश्यता नष्ट करण्याच्या प्रयत्नात कसे अपुरे ठरतात, याची चर्चा पुरातत्त्वशास्त्र आणि प्राच्यविद्या बाल्यावस्थेत असतानाच्या पार्श्वभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

हा निबंध तीन भागांत विभागलेला आहे. पहिला भाग अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीची चर्चा करतो. दुसरा भाग अस्पृश्यतेची व्याप्ती व स्वरूप यावर प्रकाश टाकतो, तर तिसरा भाग या प्रश्नाच्या सोडवणुकीचे उपाय व गरज अधोरेखित करतो. या निबंधाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक विषमतेचे वैश्विक संदर्भ यामध्ये आढळतात. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या विदेशी संदर्भांची रेलचेल यामध्ये आढळते. जगभरातील वंशवाद आणि भारतातील अस्पृश्यता यांची स्थलकालसापेक्ष चर्चा स्वतंत्रपणे आणि देशीसंदर्भात कशी घडावी याचा हा निबंध म्हणजे वस्तुपाठ आहे. नव्या पिढीतील संशोधकांना संतुलित आणि सकारात्मक चर्चेचा उत्तम नमुना हा निबंध पुरवतो, ही या निबंधाची समकालीन प्रस्तुतता आहे. भारतीय धर्मशास्त्राची चर्चा संस्कृत ग्रंथापासून ते मध्ययुगीन संत तसेच आधुनिक काळातील अस्पृशोद्धाराचे कार्य करणाऱ्या विविध सुधारणा चळवळी यांचा नेमकेपणाने आढावा घेतला आहे. अगदी लोकसंख्येची आकडेवारीसुद्धा आधार म्हणून वापरली आहे सदर निबंधातील आशय आणि विश्लेषण विचारात घेता, हा समतावादी जातीय ऐक्याचा जाहीरनामा आहे.

संस्थानिक असतानासुद्धा राष्ट्र पुनर्निर्माणाचा विचार आणि कृती करणारा हा राजा खऱ्या अर्थाने भारताचा सार्वकालीन ‘राष्ट्रीय नायक’ ठरतो. लोकांचे विचार, धोरण आणि कृती संतुलित ठेवण्यासाठी त्यांना धर्माचे तुलनात्मक शिक्षण देण्याचा आग्रह धरणारा हा भारतातील एकमेव विद्वान. पुरोहितांसाठी ‘दुष्ट देवदूत’ हे रूपक वापरणारा हा राजा निर्भीड होता. पुरोहितांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊनच त्यांना धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्याचा कायदा करणारा हा जगातील बहुधा पहिला शासक असावा. भारतात जेव्हा राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता, तेव्हा राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ‘अस्पृश्यतानिवारण’ हा विषय राष्ट्रीय प्रश्न म्हणून हाताळणारा हा पहिला राजा.

आधुनिक भारतात एक राजकीय व्यवस्था म्हणून राज्याच्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेवरील ‘मुलभूत कार्यक्रम’ हा दर्जा ‘अस्पृश्यतानिर्मूलन’ या प्रश्नाला देणारा पहिला राजा म्हणून सयाजीरावांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल. वयाच्या १४व्या वर्षापासून मृत्यूपर्यंत अखंड ६२ वर्षे हा राजा या प्रश्नाला भिडत राहिला. राज्यकारभाराचा हीरकमहोत्सव १९३६मध्ये साजरा करताना खासगी फंडातून अस्पृश्यता उद्धारासाठी एक कोटीचा निधी राखून ठेवण्याचे दातृत्व हा त्यांच्या बांधिलकीचा पुरावा आहे. सयाजीरावांच्या या अद्वितीय कामाची दखल जगाला आता घ्यावी लागेल आणि भारताचा इतिहास नव्याने रचावा लागेल, ही जाणीव हा शोधनिबंध निर्माण करतो.

‘अस्पृश्यतायुक्त भारत’ हा राष्ट्रीय आत्महत्येकडे जाण्याचा मार्ग आहे, हा सिद्धांत हे या अद्वितीय शोधनिबंधाचे क्रांतिकारक योगदान आहे. या निबंधाच्या आधारे अधिक संशोधन झाले, तर भारतातील जातीय विषमतानिर्मूलनाचा नवा कृती कार्यक्रम तयार होईल. म्हणूनच हा निबंध जातिप्रश्नाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवणे, ही नव्या पिढीची जबाबदारी राहील. तसेच आजही सयाजीरावांच्या या निबंधातील चिंतन सहिष्णू भारताचे अपूर्ण चित्र पूर्ण करण्यासाठी उपकारक ठरेल.   

Tags: अस्पृश्यतानिवारण सामाजिक विषमता डॉ.राजेंद्र मगर पंडित श्रीराम शर्मा सयाजी चरितामृत समाजशास्त्र राष्ट्रीय नायक निबंध महाराजा सयाजीराव गायकवाड अस्पृश्यता सुरक्षा घोंगडे लोकपाल राजा सयाजीराव बाबा भांड दिनेश पाटील संशोधक राजा भेटतो तेव्हा नवे पुस्तक Dr. Rajendra Magar Forgotten Books The Position of Women in Indian Life Nibandh Badoda Maharaja Sayajirao Gaikwad Asprushyta Suraksha Ghongade Lokpal Raja Sayajirao Baba Bhand Dinesh Patil Sanshodhak raja bhetato teva weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिनेश पाटील
dineshpatil1942@gmail.com

समाजशास्त्र विभाग प्रमुख- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात