डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करता आले...

त्याने मला विचारले की, ‘मॅडम, तुम्ही कुठून आलात?’ मी फार विचार न करता उर्दूत सांगितले, ‘मी पाकिस्तानी आहे.’ तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसून विचारले, ‘पाकिस्तान कसे आहे? मला वाटते दिल्लीसारखेच असावे, कारण आपली भाषा एकच आहे.’ या इंटरेस्टिंग संवादाने माझ्या दिल्लीतील आयुष्याची सुरुवात झाली. होस्टेलवर जाईपर्यंत मी भारताविषयी (प्रश्न/माहिती) विचारायला आणि पाकिस्तानविषयी शेअर करायला तयार झाले होते.

माझे नाव फातिमा परवीन. मी मूळची शिमशाल नावाच्या (अतिउत्तरेच्या) एका अतिशय दुर्गम भागातील पाकिस्तानी खेड्यातील. माझे हे गाव समुद्र सपाटीपासून ३००० मीटर उंचीवर, चिनी सीमेजवळ वसलेले आहे. माझे गाव नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी लाभलेले असून सुद्धा भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानच्या डोंगराळ भागात असल्याने, आधुनिक जीवनाच्या मूलभूत सोई-सुविधा (उदा. वीज, दळणवळणाची साधने) आमच्याकडे पोहोचलेल्या नव्हत्या. देशातील इतर भागांना जोडणाऱ्या काराकोरम महामार्गाला आमचे गाव २००३ पर्यंत जोडलेले नव्हते. तत्पूर्वी, माध्यमिक शिक्षणासाठी मी इस्लामाबादला राहिले होते, तेव्हा मला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी तीन दिवस पायी चालावे लागत असे. २००३ नंतर मात्र जीप जाऊ शकेल अशा रस्त्याने शिमशाल गाव देशाशी जोडले गेले.

माझे प्राथमिक शिक्षण आमच्या गावातीलच ‘आगा खान डायमंड ज्युबिली स्कूल’मध्ये झाले. आमचे कुटुंब मध्यमवर्गीय असून, माझ्या भावांचे विद्यापीठीय शिक्षण पूर्ण होऊन त्यांना शहरात नोकरी लागेपर्यंत आमची उपजीविका शेती आणि पशुपालनावर चालायची. माझे आई-वडील कधीही शाळेत गेलेले नसले, तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हा भावंडांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन दिले. प्रसंगी घरातले पशुधन विकून त्यांनी आमच्या शिक्षणाचा खर्च उचलला. गावातील सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मला तीन मोठे भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी आहेत. आमच्या घरात मी सर्वांत लहान आहे. मला सार्क युनिव्हर्सिटीविषयी माहिती एका स्थानिक

FM चॅनेलवर कळली.

मी प्रवेशपरीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले आणि निवड झाल्याचे कळल्यावर मला पुढे जाण्याचा धीर आला. माझ्या कुटुंबीयांनीसुद्धा मला सार्क युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. भारतात येणे आणि सार्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणे, ही माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. मी घेतलेला तो तसा कठीण निर्णय होता. पण कुटुंबाचा पाठिंबा असल्याने मला सार्कमध्ये येणे शक्य झाले. बॉलीवुडचे सिनेमे व सिरियल्समुळे मला भारताच्या संस्कृतीची चांगली ओळख दिल्लीत येण्यापूर्वीच झाली होती. तरीही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक होते. दुसरीकडे मनात एक भीतीही होती की, मी पाकिस्तानी असल्याने येथील लोक मला कसे वागवतील? पण दिल्लीत उतरल्यावर एका टॅक्सी ड्रायव्हरशी माझे जे बोलणे झाले, त्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी कोण आहे हे त्याला सांगण्यास कचरत होते. त्याने मला विचारले की, ‘मॅडम, तुम्ही कुठून आलात?’ मी फार विचार न करता उर्दूत सांगितले, ‘मी पाकिस्तानी आहे.’ तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसून विचारले, ‘पाकिस्तान कसे आहे? मला वाटते दिल्लीसारखेच असावे, कारण आपली भाषा एकच आहे.’ या इंटरेस्टिंग संवादाने माझ्या दिल्लीतील आयुष्याची सुरुवात झाली.

होस्टेलवर जाईपर्यंत मी भारताविषयी (प्रश्न/माहिती) विचारायला आणि पाकिस्तानविषयी शेअर करायला तयार झाले होते. काही दिवसांतच मी दक्षिण आशियाई मुलांमध्ये रमू लागले. पहिल्या महिन्यातच मित्र-मैत्रिणींसमवेत मला खूप मजा करायला मिळाली. त्याचा इथल्या वातावरणात रुळायला चांगलाच उपयोग झाला. दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, विविध चवींचे पदार्थ खाणे आणि शॉपिंग यासाठी आम्ही फिरत असू. तमिळनाडू भवनमधील इडली आणि डोशाची पहिल्यांदा घेतलेली चव, बिहार भवनमधील वेगळ्या चवीचे मासे, आसाम हाऊसचे जेवण हे अनुभव अविस्मरणीय असेच होते. दिल्लीतील मिठाई पदार्थांना मी कशी विसरू शकेन? पारंपरिक भारतीय जेवणाचे मला आकर्षण वाटते, तरीसुद्धा दिल्लीतील अनेक जागी मी अजून गेलेली नाहीये. काही ऐतिहासिक स्थळे मात्र मी पाहिली आहेत. आमच्याकडील पारंपरिक आर्किटेक्चरशी साधर्म्य असल्याने हुमायूनच्या कबरीने माझे लक्ष वेधून घेतले.

सार्क युनिव्हर्सिटीमुळे माझे आयुष्य अनेक प्रकारे बदलले. वेगळ्या संस्कृतींतील मुलांबरोबर कसे जगावे, कसे राहावे याचा वस्तुपाठच मला इथे मिळाला. त्यामुळे मला त्यांच्या संस्कृतीबद्दल काही गोष्टी शिकता आल्या आणि माझ्या संस्कृतीतले काही शेअर करता आले. मला तासन्‌तास अभ्यास करण्याची सवयही सार्क युनिव्हर्सिटीमुळे लागली. वेगवेगळी सेमिनार्स व कार्यशाळा अटेंड करणे, आमच्या विषयाशी संबंधित व्यावसायिकांशी बोलणे, सिनेमा आणि डॉक्युमेंटरी या अभ्यासाच्या नव्या साधनांद्वारे सामजिक प्रश्न समजून घेणे; यामुळे मला माझा विषय नीट समजून घेता आला. (आमच्या सोशिऑलोजी डिपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या ‘सिनेमा आणि सोसायटी’ या कोर्समुळे मला भारतीय भाषांतले आणि जगभरातले सिनेमे पाहता आले) या नव्या वातावरणात शिकण्याची संधी केवळ सार्क युनिव्हर्सिटीमुळेच मिळाली.

अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांत सहभागी होणे हा आमच्या अभ्यासक्रमाचाच भाग आहे. (उदा. एका कोर्समध्ये आम्हाला दिल्लीत किंवा इतरत्र फिरून कोणत्याही एका थीमवर फोटो काढून त्यांचे प्रेझेंटेशन करावे लागते. आमच्या डिपार्टमेंटकडून एक ब्लॉग चालवला जातो. तसेच या वर्षीपासून एक फेस्टिव्हल चालू झाला आहे.) या सर्व उपक्रमांमधून मला अप्रत्यक्षपणे खूप शिकता आले. मित्र- मैत्रिणींचे वाढदिवस, भारत-पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन एकत्र साजरा करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी इतर व्यवस्था करणे, यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. अशा कार्यक्रमांमुळे मला गाणी, खाद्यपदार्थ, कपडे यांच्या माध्यमातून पाकिस्तानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करता आले.

सध्या मी सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असणारी एकमेव पाकिस्तानी मुलगी आहे. माझी अशी इच्छा आहे की, सार्क युनिव्हर्सिटीने परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची, वैविध्यपूर्ण विषय शिकवण्याची आणि गरजू मुलांना पूर्ण स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था अशीच चालू ठेवावी. कारण दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये शांतता आणि सौहार्द जोपासणारी ही एकमेव संस्था आहे.

फातिमा सध्या सार्क युनिव्हर्सिटीत सोशियोलॉजीमधून एम.ए. (२०१३ पासून) करीत आहे.        

(सार्क युनिव्हर्सिटीमध्ये मुळातच पाकिस्तानी मुलांची संख्या कमी आहे. त्यांपैकी बरेचसे विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्ससाठी आहेत. सामाजिक शास्त्रांमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे कोणाला लिहायला सांगावे, हा तसा प्रश्नच होता. फातिमाला विचारण्याआधी एका पासआउट झालेल्या पाकिस्तानी मुलीचा लेख या अंकात घेणार होतो. तिने आधी होकार देऊन नंतर काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओमरच्या माध्यमातून फातिमाला लेख लिहायला सांगितले. फातिमाचा लेख १५ डिसेंबरपर्यंत येणार होता. पण सध्या ती सुट्टीवर तिच्या खेडेगावात आहे आणि तिला नेट ॲक्सेस नसल्याने तिच्याशी काहीच संपर्क होत नव्हता, लेखही आला नव्हता. त्यानंतर आठवडाभराने म्हणजे २१ डिसेंबरला तिचे ओमरशी बोलणे झाले आणि दुसऱ्या दिवशी लेख देते, असे तिने सांगितले. पण दि. २२ रोजी तिचा लेख पोहोचू शकला नाही... इकडे बाकी सर्व लेख अनुवादित करून तयार होते आणि तिचा लेख आला नाही म्हणून मी फार अस्वस्थ होतो. तेव्हा साधनाच्या संपादकांनी मला धीर धरण्याचा सल्ला दिला होता खरा, पण त्यामुळे माझी अस्वस्थता काही कमी झाली नव्हती. शेवटी २५ डिसेंबरला सकाळी तिचा लेख पोहोचला. हा लेख मिळवून देण्यात ओमरची फार मदत झाली. फातिमाच्या लेखाबरोबरच तिचा रेझ्युमेसुद्धा आम्ही तिला पाठवायला सांगितला होता. त्यामधील माहिती या लेखाच्या दृष्टीने उद्‌बोधक वाटली म्हणून देत आहोत. फातिमाने इथे येण्याच्या पूर्वी बी.एड. केलेले आहे. तिला शाळेत शिकवण्याचाही अनुभव आहे. इस्लामाबादमध्ये तिचे शिक्षण चालू असतानाच ती जमेल त्याप्रमाणे सुट्टीत येऊन तिच्या गावातील शाळेत शिकवत असे. तिने काही कॅनेडियन प्राध्यापकांबरोबर दुभाष्याचे आणि संशोधन सहायकाचेही काम केलेले आहे. - अतिथी संपादक)

Tags: saarc university shimshal pakistani sanskrutiche pratinitwa karta aale pakistan fatima parveen weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके