डॉ. ग. ना. जोशी एम.ए.चा अभ्यास करीत असताना त्यांनी हा लेख लिहिला होता. ते स्वतः गुरुजींच्या उपवास-कालात गुरुजींच्या जवळ पंढरपुरास राहत होते. गुरुजींच्या दररोजच्या कार्यक्रमाची व भेटीगाठींच्या तपशीलाची माहिती दैनंदिन डायरीच्या स्वरूपात लिहीत असत व ती माहिती मुंबईला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी पाठविली जात होती. 1947 साली लिहिलेला लेख पुनर्मुद्रित करीत आहोत.
महाराष्ट्रात अस्पृश्यतेच्या प्रथेचा निषेध महात्मा जोतिबा फुले व विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेला होता. त्यांनी बरेच कार्यही केले होते. पण हा प्रश्न महात्माजी व राष्ट्रसभा काँग्रेस यांनी हाती घेतल्यावर हे कार्य अधिक तीव्रतेने होऊ लागले. अस्पृश्यतेचा प्रश्न धार्मिक सामाजिक व राजकीय असा त्रिविध स्वरूपाचा आहे. प्रस्थापित धार्मिक विधींच्या व व्यवस्थेच्या प्रवर्तकां-विरुद्ध कोणी बंड करणारा महान धार्मिक मनुष्य भारतात उभा राहिलेला दिसत नाही. जुन्या रूढींना धक्के देऊन, त्या नाहीशा करून धर्माला त्याचे खरे मानवतेचे स्वरूप देण्यासाठी धार्मिक भूमिकेवरून या अन्यायी पद्धतीविरुद्ध बंड पुकारणारा 'धर्मवीर' निर्माण झालेला नाही, म्हणून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना हा प्रश्न हाती घ्यावा लागला.
काँग्रेसने सामाजिक व धार्मिक समतेचा पुरस्कार करून धर्म-जाति-निरपेक्ष अशी राष्ट्रीय एकी उभारण्याचा चंग बांधला. त्यामुळे या प्रश्नाला चालना मिळून अस्पृश्यांशी सहभोजने, सहशिक्षण. सामाजिक समता इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1934 साली तर अस्पृश्यांना दिलेले विभक्त मतदार संघ रद्द करून त्यांना हिंदू म्हणूनच समजण्यात येऊन संयुक्त मतदार संघातच त्यांना ठेवावे म्हणून महात्माजींनी येरवड्यास उपवासही केला होता. राजकीय स्वातंत्र्यात इंग्रजांनी निर्माण केलेली एक विरोधी फळी व हिंदू धर्माला कलंक लावणारी व मानवी समतेला घातक अशी अन्याय्यपद्धती म्हणून अस्पृश्यतेचे कायमचे निराकरण करणे सर्वांना आवश्यक वाटू लागले.
वीस वर्षे अखंड प्रयत्न करूनही, शांतपणे काम करूनही महाराष्ट्रात ह्या कार्यास यावे तितके यश येताना दिसेना. एक प्रकारची अन्यायाची चीड लोकांत उत्पन्न झालेली नव्हती. सर्वत्र शैथिल्य होते. लोकांना मनापासून हिरीरीने हे कार्य करावेसे वाटेना. सर्वत्र वरपांगी सहानुभूती दाखविण्यात येई. पण खऱ्या प्रामाणिक भावनेने लोक अस्पृश्यता घालविताना दिसेनात. स्वातंत्र्य उंबरठ्यात येऊन उभे होते. भारतीय स्वातंत्र्याची वेळ जाहीर करण्यात आली होती. पण काँग्रेसच्या राजकीय ठरावात जाहीर केल्याप्रमाणे धर्म- जातिनिरपेक्षपणे हे स्वातंत्र्य स्वीकारण्याची वृत्ती समाजात दिसेना. कागदी घोडे सर्वत्र नाचत होते. तोंडापुरते सारे बोलायचे. पण अस्पृश्य लोकांत विश्वास निर्माण करण्यासारखे काही कार्य स्पृश्यांकडून होत नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य येऊनही ते टिकविण्याची पात्रता व भावना लोकांत दिसेना.
भारत स्वतंत्र होऊ पाहत होता. सत्तासंक्रमण त्वरेने होत होते. पण ते टिकविण्यास लागणारे अभेय जुटीचे सामर्थ्य जनमनात निर्माण झाले नव्हते. आंतरराष्ट्रीय संघटनेत "दक्षिण आफ्रिकेतील हिंदी प्रश्न सोडविण्याआधी देशातील जातिभेद नाहीसे करा, अस्पृश्यता नाहीशी करा." अशा अर्थाची उत्तरे जनरल स्मटस् सारखे देऊ लागले होते. पाकिस्तान निर्माण करून त्यात अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळवून देऊ असे सांगून अस्पृश्यांना मुसलमान धर्मात आत्मसात करण्याचे कुप्रयत्न सुरू होते. हिंदू धर्म आचाराने कमकुवत होत चालला होता. नुसत्या अस्पृश्यता निवारणाच्या घोषणा सर्वत्र सुरू होत्या. अशा विचित्र परिस्थितीत समाजमनाला मोठा धक्का पूज्य साने गुरुजींनी दिला.
पूज्य साने गुरुजी हे स्वातंत्र्याचे पाईक आहेत. समानतेचे पुरस्कर्ते आहेत व मानवतेचे पुजारी आहेत. काँग्रेसमध्ये आज सतरा वर्षे अखंड कार्य त्यांनी केले आहे. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी काँग्रेसद्वारे प्रचंड कार्य केले आहे. अस्पृश्य मुलांना शिक्षणासाठी व गरीब अस्पृश्य कुटुंबाना त्यांनी आपला पैसा दिला आहे. त्यांना अस्पृश्यांबद्दल अपार सहानुभूती वाटते. अस्पृश्यतेने ते अस्वस्थ होतात. मानव्याचा हा कलंक नाहीसा कसा होईल याचा ते सदैव प्रयत्न व विचार करतात. आपला देह, आपले धन व आपले प्राण त्यांनी समाजसेवेस वाहिले आहेत. ते जात्याच उत्कट वृत्तीचे असल्याने अस्पृश्यता निवारणाकडे झालेले दुर्लक्ष त्यांना खपेना. हरिजनांची होणारी उपासमार, आबाळ, कुचंबणा पाहून ते बरेच दिवस व्यथित होते. या सर्वांचा- या परिस्थितीचा त्यांच्या भावनाप्रधान मनावर तीव्र परिणाम झाला, व त्यांच्या आंतरिक तळमळीतून त्यांनी पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हरिजनांना खुले करण्यासाठी केलेल्या उपवासाचा जन्म झाला. त्याच सुमारास पवनारचे जीवनयोगी पू. विनोबाजी भावे यांनी गुरुजींकडे अस्पृश्यांसाठी केलेल्या कामाचा हिशेब मागितला. पण प्रयत्न करूनही लक्षात भरण्यासाखे यश महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यास या कामात आले नव्हते. अशा वेळी जनमतास हादरा देण्याशिवाय दुसरा मार्गच शिल्लक नव्हता.
आपले प्राण पणास लावून महाराष्ट्रात हरिजनांविषयी आपुलकी व सहानुभूती, समता व प्रेम निर्माण करावे असे गुरुजींच्या मनाने घेतले त्यांना महर्षि सेनापती बापट, श्री. अच्युतराव पटवर्धन इत्यादी थोरांनी उपवास सहा महिने स्थगित करण्यास विनंती केली. नाइलाज म्हणून गुरुजींनी त्यांना मान दिला व आपला उपवास, दरम्यान मंदिर हरिजनांना खुले न केल्यास, वैशाख शु. 11 शके 1869 पर्यंत स्थगित केला. त्यानंतर या प्रश्नाला महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी चालना दिली. सर्व विविध पक्षाच्या पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला. शेवटी न्यायमूर्ती जयकर यांना मध्ये घालून पंढरपूरच्या बडव्यांनी निवेदन प्रकट केले. "महाराष्ट्रातील जनमत जर मंदिर प्रवेशास बहुतांशी अनुकूल असेल तर आम्ही पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हरिजनांस खुले करू." असे बडव्यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे योग्य मार्गाने जाण्यासाठी जनमताचा कौल घ्यावयाचा ठरला. मंदिर प्रवेश समिती महर्षी सेनापती बापट घ्यावयाचे याबद्दल वाद माजला.
पण मंदिर प्रवेश समितीने सभांतून आकडे घेऊन व प्रत्यक्ष अनुकूल सह्यांच्या संख्येवरून बहुमत अजमावावे असे ठरविले. त्याप्रमाणे हे बहुमत मिळविण्याचे काम गुरुजींसारख्या प्रभावी व्यक्तीवर सोपविण्यात आले. प्रचारासाठी गुरुजींबरोबर महर्षी सेनापतीही निघाले. त्यांच्याबरोबर महाराष्ट्र शाहीर पथकही निघाले. प्रचारासाठी लोकांनी आपण होऊन एक मोठी मोटार लॉरी घेऊन दिली. व खर्चासाठी लागणारी मदत प्रत्येक सभेत झोळ्या फिरवून जमा करण्यात येऊ लागली. प्रत्येक जिल्ह्यास 10 दिवस असे 11 जिल्ह्यांस 110 दिवस म्हणजे अदमासे चार महिन्यांचा दौरा आखण्यात आला. या दौ-याला सर्व मतांच्या लोकांचा, पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. या दौऱ्याचा आरंभ पुण्यात ता. 7 जानेवारीस काँग्रेस भुवनाच्या आवारात पहिली सभा घेऊन करण्यात आला. या सभेस पक्षातीत वृत्तीचे महाराष्ट्रातील थोर तपस्वी महर्षी कर्मवीर अण्णासाहेब कर्वे अध्यक्ष होते. सेनापती बापट व कै. तात्यासाहेब केळकरही या सभेत बोलले होते. अशा रीतीने प्रचंड उत्साहाने हा दौरा महाराष्ट्रभर चार महिने सुरू होता.
गुरुजी वाऱ्यासारखे हिंडत होते. हजारोंच्या सभा गावोगाव होत होत्या. अफाट जनसमाज गुरुजीच्या व्याख्यानास जमत होता. एखाद्या मध्यवर्ती सोयीच्या गावी सभा जाहीर करण्यात येई. आजूबाजूच्या खेड्यांतून लोक तेथे जमा होत. उत्कटतेने भरभरून गुरुजी लोकांपुढे आपले हृदय उघडे करीत. हरिजनांची करुण स्थिती सांगत, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांचा अपमान, त्यांची कुचंबणा व त्यामुळे भारताचा झालेला अधःपात लोकांना पटवून देत. धर्माच्या दृष्टीनेही हरिजनांना मंदिरात घेऊनच नव्हेतर घरी- दारी, बाजारात दुकानांत, शाळा, विद्यालयात सर्वत्र समतेने वागविणे कसे रास्त आहे, व आवश्यक आहे हे पटवून देत. अशा रीतीने सभेत अनुकूल असणान्यांचा हात उंच करून पाठिंबा घेण्यात येई व शक्य तितक्या जास्तीत जास्त सह्या छापील पत्रकांवर घेत घेण्यात येत.
अशा रीतीने ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, दक्षिणी संस्थाने, नाशिक, नगर, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश इत्यादी सर्व जिल्ह्यांतून ते हिंडत होते. रात्री दोन तीन वाजता सभा आटोपायची. दोन अडीच तास झोप मिळते न मिळते तोच पुनः लवकर उठून पुढचा मुक्काम गाठायचा. ठरलेल्या वेळी ठरल्याप्रमाणे सभेसाठी पोचावयाचे असे सारखे चार महिने सुरू होते. मधून मधून सेनापतीही बोलत. आधी महाराष्ट्र शाहीर पथकाचे थोडक्यात कार्यक्रम होत, व मग गुरुजींचे हृदयंगम व प्रभावी भाषण होई. अस्पृश्यांना जवळ घेणे हा स्वातंत्र्य देण्याचा प्रश्न आहे, आपल्या माणुसकीची ती कसोटी आहे, आपल्या प्रामाणिकतेची कसोटी आहे. अशा रीतीने गुरुजी धडाडीने समाजातील सर्व थरांच्या लोकांपुढे हा प्रश्न मांडीत असत. सभेस येणाऱ्या सर्व लहानथोरांनी, सुशिक्षित अशिक्षितांनी, जातपात सारे विसरून एकजात गुरुजींना लाखोंनी पाठिंबा दिला होता.
वारकरी, भजनी मंडळीही गुरुजींना मनापासून सहकार्य देत. अशा रीतीने अदमासे सहा लक्ष लोकांनी सभांतून या त्यांच्या मोहिमेस संपूर्ण हार्दिक पाठिंबा दिला व हजारो सह्यांचे अर्जही बडवे मंडळींकडे गेले. गुरुजींना केवळ पंढरपूरचे मंदिर उघडावयाचे नव्हते. पंढरपूरचे मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे भक्तिभावाचे तीर्थस्थान. पंढरपूरचे मंदिर म्हणजे महाराष्ट्रात सर्वात पवित्र म्हणून महत्त्वाचे स्थान. पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. ती महाराष्ट्राची कळ. पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले करणे याचा अर्थ महाराष्ट्रीय जनतेने आपल्या सर्वात पवित्र ठिकाणी हरिजनांना घेणे. पंढरपूरचे मंदिर उघडणे म्हणजे आपली हृदये प्रेमाने हरिजनांना उघडी करणे. पंढरपूरचे मंदिर खोलणे म्हणजे आपल्या घरीदारी सर्वत्र कोणताही निर्वध न ठेवता हरिजनांना येऊ देणे.
सर्वत्र मानवतेचा साक्षात्कार करून अव्हेरलेल्या कोट्यवधी हरिजनांना घरांतील आप्ताप्रमाणे वागवणे म्हणजे हा मंदिर प्रवेश. हजारो वर्षे जनावरांप्रमाणे वागविलेल्या, अपमानित केलेल्या, तेजोहीन केलेल्या, अशिक्षित, अज्ञानी, अर्धपोटी व रोगी झालेल्या हरिजनांना जवळ घेणे म्हणजे खरे प्रभुपूजन, परमेश्वराच्या मुलांना प्रेमाने व आपुलकीने कवटाळणे हाच खरा धर्म, कोट्यवधी दीन, दुःखी, जर्जर पीडित हरिजनांना जवळ घेण्यातच प्रभुप्रेमाची साक्ष पटवायची व हिंदू धर्मावर- नव्हे मानव धर्मावर पडलेला हा कलंक घालवायचा येणारे स्वातंत्र्य खऱ्या मानसिक व हार्दिक समतेतून स्थिर करावयाचे हा महान अर्थ या एका मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात होता. मंदिर प्रवेशाचा दौरा संपला तरी बडव्यांनी एवढया प्रचंड बहुमतास झुगारून दिले व मंदिर उघडलेच नाही.
त्यामुळे गुरुजींना उपवासावर उतरणे प्राप्त झाले. "मंदिर जर वैशाख शु॥11॥ पर्यंत उघडले गेले नाही तर पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी मी आमरण उपोषण करीन.' असे गुरुजींनी दौऱ्यात लाखो बंधुभगिनींना सांगितले. गुरुजींचे ओजस्वी भाषण ऐकून व त्यांची हरिजनांविषयी तळमळ पाहून त्यांच्या या गंभीर प्रतिहोने सर्वांचे डोळे अश्रुंनी भरून येत. लाखो मायब हिणींनी व हजारो बंधूंनी गुरुजींसाठी अश्रू ढाळले होते व त्याचे प्रात्यक्षिक पंढरपूरच्या मंदिर प्रवेशद्वारा व्हावयाचे होते. गुरुजींची प्रतिज्ञा बडव्यांना अनेकदा माहीत होती. पण त्यांनी शेवटपर्यंत दुर्लक्ष केले. एप्रिल 30 तारीख संपली तरी बडव्यांनी इच्छित निवेदन केलेच नाही. तेव्हा गुरुजींना आपला निश्चय कायम करावा लागला, व ता. 1 मे 1947 वैशाख शु॥11 ला गुरुजींनी आपल्या महान साधनेस सुरुवात केली.
हा उपवास सुरू करण्यापूर्वी अनेकांनी याला शेवटी विरोध केला. काँग्रेसश्रेष्ठींनी हा उपवास करू नये असे गुरुजींना विनंतीवजा कळविले. मुंबई विधिमंडळात हरिजनांना सर्वत्र प्रवेश देऊन व सर्व सार्वजनिक मंदिरे खुली करून सामाजिक समता प्राप्त करून देण्याचे बिल सिलेक्ट समितीकडे पाठविण्यात आले होते. "लवकरच कायदा होत आहे, त्याच्यामुळे सर्व अस्पृश्यस सार्वजनिक मंदिरात जाण्याचा अधिकार बिनर्तपणे मिळत आहे. म्हणून तुम्ही उपवास करण्याची आवश्यकता नाही." असे मंत्र्यांकडून गुरुजींना विनवण्यात आले होते. व याच प्रश्नावर जोर देऊन थेट कॉंग्रेसश्रेष्ठीपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनी गुरुजींना उपवासापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कोणाला वाटे या उपवासामागे वजन वाढविण्याचा डाव आहे, तर कोणाला वाटे कायदा होण्याआधी मंदिर खुले करण्यास लावून सर्व श्रेष उपटण्याचा व आपले वर्चस्व यावविण्याचा गुरुजींचा इरादा आहे.
कोणाला वाटे गुरुजी एका विशिष्ट पक्षाच्या हाताने खेळविले जाताहेत. तर कोणाला वाटे गुरुजींचा हा आततायीपणा आहे. अनेकांनी अनेक प्रयत्न केले. पण शेवटी गुरुजी स्थिर राहिले. गुरुजींचा उपवास स्वार्थाने बरबटलेला नव्हता. गुरुजींइतका सत्तांध राजकारणापासून अलिप्त राहणारा व निःस्वार्थतेने कार्य करणारा मनुष्य विरळ आहे. गुरुजींना मान, श्रेय काही नको होते. कायद्यासाठीही ते भुकेले नव्हते. त्यांना फक्त एकच तहान होती व ती ही की स्पृश्यांनी पश्चात्तपद होऊन उचंबळलेल्या हृदयाने हरिजनांना, पददलितांना कवटाळावे, त्यांना आपल्या पवित्र मंदिरात न्यावे, घरीदारी न्यावे एकत्र राहावे. जेवावे. सर्वत्र सामाजिक समता हरिजनांना मिळावी हीच एक त्यांची इच्छा होती. ह्याचाच एक त्यांना ध्यास लागला होता.
गुरुजींना आत्म-प्रतारपणा करावयाची नव्हती. राजकारण खेळाववावे नव्हते. सत्ता मिळविण्याचा डाव रचावयाचा नव्हता. लक्षावधी बंधुभगिनींना दिलेल्या आश्वासनाशी व त्यांनी काढलेल्या अश्रूंशी प्रतारणा करावयाची नव्हती. म्हणून “जग आडवे आले तरी तू स्वतःला फसवू नकोस- सत्याचा मार्ग सोडू नकोस." ही महात्माजींची शिकवण त्यांनी अंमलात आणली व मंदिर प्रवेश समितीच्या संमतीने 1 मे 1947 ला सकाळी चंद्रभागेत स्नान करून आपल्या साधनेस सुरुवात केली. 1 मे रोजी सकाळी चार तास चंद्रभागेच्या वाळवंटात प्रचंड सभा झाली. हजारोंचा विराट समुदाय हजर होता.
सनातनी विरोधकांशी खटकेही उडाले गुरुजी चंद्रभागेत स्नान करून माघारी आले व त्यांनी आपल्या अनशनास विठोबाची प्रार्थना करून सुरुवात केली. हा उपवास श्री. तनपुरे महाराजांच्या मठाच्या प्रशस्त सभामंडपात सुरू केला. सभामंडपात मंदिर प्रवेशाची सर्व धुरा अंगावर घेणारे महाराष्ट्र हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष श्री. काकासाहेब बरवे यांचे ऑफिस होते. अधिकृत रीतीने प्रसिद्ध होणारी सर्व पत्रके श्री. काकासाहेब जबाबदारीने स्वतः तयार करीत त्याचप्रमाणे येणारे प्रचंड टपाल, त्यातील योग्य व जरूर त्यांना उत्तरे देणे, वर्तमानपत्रांना आवश्यक माहिती पुरविणे ही सर्व कामे श्री. काकासाहेब बरवे स्वयंसेवकांच्या मदतीने स्वतः करीत काकासाहेबांवर कामाचा फारच ताण पडत असे. पण अत्यंत शांतपणाने व धीमेपणाने त्यांनी सर्व कामे केली. त्याशिवाय गावातील बडवे पंच समितीचे अध्यक्ष श्री. बबनराव बडवे व श्री. बाबूराव जोशी हे सारखे येऊन योग्य ती खटपट करीत.
श्री. बबनराव बडवे यांनी गुरुजींचे प्राण वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या उपवासकालात सेनापती, श्री. अच्युतराव, एस.एम.जोशी इत्यादी थोर सहायक येऊन जाऊन असत. पहिल्या चार दिवसांत पंढरपूरचे श्री. उत्पात दिल्लीस जाऊन महात्माजींना भेटले, त्यांनी महात्माजींची भेट घेऊन गुरुजींची बाजू विकृत करून मांडली. महात्माजींनी गुरुजीना उपवास स्थगित करण्यास कळविले, तेव्हा गुरुरजींना फार वाईट वाटले. त्यांच्या प्रामाणिक तपस्येची फजिती होऊ नये असे त्यांना वाटे.
लगेच ठकरबाप्पा व नामदार दादासाहेब मावळकर तेथे स्वतः आले. त्यांनी सर्व विचारपूस केली. जातीने सर्व गोष्टी जाणून घेतल्या; व इतर लोक प्रचार करतात तसा कोणताही अमंगल व अपवित्र हेतू उपवासाच्या मागे नसल्याची 185 शब्दांची तार त्यांनी पंढरपूरहून महात्माजींस केली. महात्माजी म्हणजे सत्याचे पुजारी. त्यांना त्यांनी अधिकृतरीत्या सर्व खरी माहिती मिळताच त्यांनी विश्वासाने सर्व काम नामदार मावळंकर यांच्यावर सोपविले व बडव्यांना मंदिर उघडण्यास विनंती केली. नंतर महात्माजींनी उपवासाला मुळीच विरोध केला नाही. अशा रीतीने उपवासाचे दिवस चालले होते. महात्माजींनी उपवास सोडावयास सांगितले तेव्हा गुरुजींनी त्यांना उत्कृष्ट पत्र लिहिले होते. "बापू तुमची शिकवण मी पाळत आहे, हृदयाचा कायदा प्रस्थापित करू पाहात आहे. जग विरुद्ध गेले तरी तू तुझे सत्य सोडू नकोस ही तुमची शिकवण मी पाळत आहे. आशीर्वाद द्या व क्षमा करा. "
अशा अर्थाचे करुण गंभीर व उत्कट पत्र ते होते. महात्माजींचे- ही लक्ष तेव्हा इकडे लागले होते. दिवसांमागून दिवस जात होते. गुरुजी क्षीण होत होते. शक्ती कमी होत होती. डोळे खोल जात होते, नाडी मंदावत होती. पण आत्मा तुष्ट-पुष्ट होत होता. गुरुजी उपवासकालात शांत, स्थिर व आनंदी होते, त्यांना विद्यास वाटत होता. श्रीविठोबाच्या [तसविरीपुढे चिंतन करीत ते पडून राहत. फार बोलणे नसे. रात्री झोप फारशी येत नसे. पण ते शांत वाटावे म्हणून उन्हाळ्याच्या कृष्णपक्षांतील तारकापूर्ण आकाशाखाली आपल्यावर झोपत.उपोषणकालांत महाराष्ट्रांतून सर्व भागांतून गावागावांतून व खेडपापाठ्यातून गुरुजींना उपोषण नीट जावे अशा प्रार्थना होत. बडव्यांकडे पत्रे व तारांचा वर्षाव होई.
वाचता वाचता थकवा यावा इतका पत्रांचा प्रचंड ढीग दररोज जमा व्हावयाचा. सगळीकडून गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस व्हावयाचा. तारा व पत्रे पाहण्यासाठी स्वतंत्र माणसांची व्यवस्था करावी लागे. या सर्व तारांचा व पत्रांचा परिणाम बडव्यांवर होत होता. महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज त्यांना स्वस्थ बसू देईना. महाराष्ट्राच्या जनतेने उद्घोषित केलेले सत्य त्यांना डोळ्यांआड करणे शक्य नव्हते. "गुरुजींना वाचवा. गुरुजी म्हणजे महाराष्ट्राचा प्राण. बडव्यांनो, गुरुजींचे प्राण तुमच्या हाती आहेत. जनतेसाठी गुरुजींना वाचवा." अशा सारख्या तारा येत. बडवे बावरले होते, गोंधळले होते. जुन्या रुढींचे पाश, जुन्या कल्पना व नवे विचार यांच्यात त्यांची ओढाताण होई.
पण शेवटी त्यांना महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाच्या मताला मान द्यावा लागला. दहाव्या दिवशी सकाळी 10 वाजता पुण्याहून खास मोटारीने पूज्य ठक्करबाप्पा व श्री. दादासाहेब मावळणकर येऊन पोचले. दोघे तडक गुरुजींजवळ आले. गुरुजींनी पडल्या पडल्या दोघांना प्रणाम केले. कुशल विचारून दोघेही बडव्यांच्या सभेला निघून गेले. दिवसभर विचारविनिमय झाला. श्री. दादासाहेबांनी सर्व खरी परिस्थिती बडव्यांना सांगितली. शेवटी बडव्यांनाही सुबुद्धी सुचली. बडवे पंच समितीने एकमताने मंदिर उघडे करण्याचा जाहीर निर्णय घेतला. सायंकाळी साडेसहाला निर्णय घेतल्याची बातमी आश्रमात येऊन पोचली. आश्रमातील सारे सेवक जरा चिंतातुर होते. एकदम सर्वांना हलके वाटू लागले. विजेसारखा सर्वत्र आनंद पसरला. लगेच बडवे व उत्पात यांचे पुढारी अधिकृत पूजा घेऊन आले त्यांनी श्री. दादासाहेब व पू. ठक्करबाप्पा यांच्यासमोर गुरुजींना हार घातले. गुरुजींच्या पायांवर डोकी ठेवली.
भक्ति- भावाने या संताला प्रमाण केले. हातांत नारळ दिले, समोर उघड्यावर प्रार्थना झाली. नंतर दादासाहेबांनी, बडव्यांनी मंदिर प्रवेशाला आपली हरकत नसल्याचे केलेले निवेदन वाचून दाखविले, व गुरुजींनी सर्वासमोर नम्रतापूर्वक साडेसात वाजता मोसंबीचा रस घेऊन उपोषण सोडले. गुरुजी म्हणजे महाराष्ट्राची चैतन्य शक्ती. महाराष्ट्रात प्रतीकात्मक का होईना पण अस्पृश्यता नाहीशी केल्याचे श्रेय इतिहासकार त्यांच्या पवित्र व निःस्वार्थ, निर्मळ व उदार मानवप्रेमी आत्म्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासात गुरुजींनी केलेले कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल व त्यांनी केलेल्या थोर क्रांतीबद्दल व वाचविलेल्या मानवी जीवन मूल्यांवद्दल महाराष्ट्र चिरतंन कालपर्यंत त्यांचा कृतज्ञ राहील.
Tags: एस.एम.जोशी सेनापती बापट बाबूराव जोशी बबनराव बडवे गांधी ठक्करबाप्पा व श्री. दादासाहेब मावळणकर साने गुरुजी ग. ना. जोशी S.M. Joshi Senapati Bapat baburao Joshi Babanrao Badawe Gandhi Dadasaheb Mawalkar Thakkrabappa G.N. Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या