मी अलीकडे तुकाराम, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर आदी संतांचे भक्तिपर अभंग आणि भजने वाचली आणि 'पत्री'मधील कविताही पुन्हा वाचल्या. तेव्हा मला वाटले एकनाथांची सामाजिक जाणीव, नामदेवांच्या अभंगातील व भजनांतील भावनेचा ओलावा आणि तुकाराम महाराजांच्या 'जे का रंजले गांजले' या अभंगातील विचार यांचा त्रिवेणी संगम सानेगुरुजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झाला होता.
24 डिसेंबर 1900 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. परंतु हे केवळ त्यांच्यावरील त्यांच्या शिष्यांच्या प्रेमामुळे घडले नाही. साने गुरुजींनी लेखनातून आणि भाषणांतून जे सांगितले आणि जे आचरिले, ते आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहे. मृत्यूच्या अगोदर काही महिने साने गुरुजी राष्ट्र सेवादलाच्या सांगली येथील शिबिरात आले होते. तेथे त्यांनी आम्हा सैनिकांच्या समोर जी दोन भाषणे दिली, त्यांतील शब्द उद्धृत करणे मला शक्य नसले तरी त्या भाषणांचा आशय मला आजही आठवतो. तो पुढीलप्रमाणे...
साने गुरुजी म्हणाले, “आपल्याला स्वराज्य मिळाले. आता स्वराज्याचे सुराज्य केले पाहिजे. स्वातंत्र्याला समतेची- सामाजिक आणि आर्थिक समतेची जोड दिली पाहिजे: हे करण्यासाठी तरुण पिढीने आपली बुद्धी आणि शक्ती वापरली पाहिजे. आधुनिक कालानुरुप आपल्याला वैज्ञानिक प्रगती केली पाहिजे. तरुणांची तल्लख बुद्धी आधुनिक विज्ञान आत्मसात करील; नवनवीन प्रयोग करील आणि विज्ञानाच्या साहाय्याने अनेक क्षेत्रामध्ये भारताची प्रगती करून दाखवील. हे तर झालेच पाहिजे; परंतु माझे प्रेम शहरांपेक्षा खेडयांवर, ग्रामीण भागावर आहे. भारतातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी, संपन्न व्हावे; ग्रामीण भागातील मुला-मुलींना उत्तम शिक्षण मिळावे; त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे; त्यांच्या आरोग्यासाठी सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात, असे मला वाटते. यांतील काही गोष्टी सरकार करील. परंतु आपल्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणे ही मुख्यतः आपलीच जबाबदारी आहे. देशभर गावांना जोडणारे रस्ते झाले पाहिजेत. प्रत्येक गावातील तळ्यांमधील गाळ उपसला गेला पाहिजे. यासाठी शारीरिक श्रम करणे हे तरुणांचे कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्र सेवादलाच्या शाखा आहेत, कलापथक आहे, त्याप्रमाणे श्रम करणाऱ्या तरुणांची पथके आपण तयार केली पाहिजेत. हे तरुण रस्ते बांधतील, तळी साफ करतील, प्रत्येक गावाभोवती अशी झाडे लावतील की त्यांच्या सावलीत सर्वांना विसावा मिळेल. आपल्या देशावर निसर्गाची कृपा आहे. भरपूर सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो; देशात पाऊसही चांगला पडतो. या निसर्गाच्या कृपेला आपण आपल्या श्रमांची जोड दिली पाहिजे. या मार्गानेच आपण आपली मातृभूमी सुजला आणि सुफला करू.'
गुरुजींनी त्या भाषणात आम्हा तरुणांच्या समोर भारताच्या नवनिर्मितीचे एक स्वप्न ठेवले. हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर तरुणांनी आपले श्रम आणि बुद्धी देशासाठी दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर दीड महिन्यांनीच गुरुजींची जीवनज्योत निमाली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे जिवंत स्मारक म्हणून 'साने गुरुजी सेवा पथक’ सुरू करण्याची कल्पना राष्ट्र सेवादलाचे प्रमुख एस. एम. जोशी यांनी मांडली आणि सेवापथकासाठी एक वर्ष द्यावयास तयार असलेले 50 सैनिक पुढे आले. नाना डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली सेवापथक काम करू लागले. महाराष्ट्रात पहिले सेवापथक केंद्र देहू रोडजवळ तळवडे येथे झाले. वर्षभर या सेवापथकाने अनेक केंद्रांवर काम केले. यांपासून प्रेरणा घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत साने गुरुजी सेवापथके निघाली. आम्ही पुण्यातील सैनिकांनी वडगाव (मावळ) येथील तळयातील गाळ काढून ते साफ केले. पुढे पुरंदर तालुक्यात धोंडज या गावात लालजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील सेवापथकाने तीन महिने काम करून पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले आणि गावाला पाणी मिळू लागले. या केंद्रावर मोहन धारिया, हरिभाऊ लिमये हे अनेक दिवस काम करीत होते. ठाणे जिल्ह्यात वाघबीळ, धुळे जिल्ह्यात वडजई, रायगड जिल्ह्यातील नेरळ, कोल्हापूरजवळचे उदगाव येथे काही प्रमुख सेवापथक शिबिरे झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात 'मूर' या खिंडीतील कठीण रस्ता तयार करून 'पाचल' या गावाला तीन गावे जोडण्यात आली. 'कोकणचे गांधी' अप्पासाहेब पटवर्धन आणि नानासाहेब गोरे हे काही दिवस या श्रमशिबिरात सहभागी झाले होते. त्या वेळी आप्पासाहेब पटवर्धन 'म. गांधी आणि साने गुरुजी' या विषयावर बोलताना म्हणाले, “गांधीजींनी आणि साने गुरुजींनीही शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा दिली. हा श्रम यज्ञ अखंड चालला पाहिजे."
साने गुरुजींनी मांडलेला सेवापथकाचा विचार आचरणात आणल्यामुळे राष्ट्र सेवादलात एक नवे चैतन्य आले. ते कविवर्य वसंत बापट यांनी पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त केले..
"तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून
उद्या पिकंल सोन्याचं रान
चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण."
कालानुरूप सेवापथकाच्या स्वरूपात बदल करून साने गुरुजींच्या विचाराला नवी गती देण्यात मात्र राष्ट्र सेवादल अपुरे पडले. राष्ट्र सेवादलाच्या एका बैठकीत एका कार्यकर्त्याने विचार मांडला, “विलासराव साळुंखे यांची पाणी पंचायत पुरंदर तालुक्यात व अन्यत्रही जे काम करीत आहे ते आपल्याला साने गुरुजींनी सांगितलेल्या सेवापथकाच्या भव्य कल्पने पुढचे पाऊल आहे.” राष्ट्र सेवादलाने ते काम हाती घ्यावयास हवे होते. दुर्दैवाने ते घडले नाही. आज पाणलोट क्षेत्राची जी कामे ठिकठिकाणी होत आहेत. त्यामध्ये राष्ट्र सेवादलाने, ठिकठिकाणच्या तरुण कार्यकर्त्यांनी सामील व्हावयास हवे. वनराईमार्फत आज जी विविध कामे होत आहेत, ते साने गुरुजी सेवा पथकाचेच पुढील पाऊल आहे. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी आज अनेक गावांमध्ये ध्येयवादी कार्यकर्ते तयार होत आहेत, कार्यही करीत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 'एन. एस. एस.’ च्या शिबिरातून श्रमदानाची कामे होत आहेत. या सर्व कामांची गंगोत्री साने गुरुजींनी 1950 च्या मे महिन्यात सेवादल शिबिरात मांडलेला विचार आहे, असे मला वाटते. साने गुरुजींनी दूरदृष्टीने त्यावेळी मांडलेला विचार यत्किंचितही कालबाह्य झालेला नाही, आज तो विचार अनेकांना पटला आहे. अनेक ध्येयवादी तरुण तो आचरणात आणीत आहेत, याचे मला समाधान वाटते.
साने गुरुजींचे निसर्गावर नितांत प्रेम होते. गुरुजींनी त्यांची पुतणी सुधा हिला जी पत्रे लिहिली, त्यांचे तीन खंड 'सुंदर पत्रे' म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. या पत्रांमधून निसर्गाची सुंदर वर्णने करताना साने गुरुजींनी माणसाच्या जीवनाची लय आणि निसर्गाची लय यात संवाद (हार्मनी) असला पाहिजे, हा विचार त्यांच्या खास शैलीत मांडला आहे. आज ‘पर्यावरणाचे रक्षण करा', हा जो विचार अनेकजण मांडतात तोच त्या पत्रांमधून 1948-49 साली साने गुरुजींनी मांडला होता.
साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून केलेले 'उपोषण' हा त्यांच्या जीवनातील एक उदात्त प्रसंग होता. विठोबाच्या मंदिराची दारे उघडली परंतु आपल्या मनाची दारे खरोखरच उघडली आहेत का, याचा आपण विचार करणे आवश्यक आहे. आजही दुर्दैवाने दलितांना जी वागणूक अनेक ठिकाणी दिली जाते; त्यांच्यावर जे अत्याचार काही ठिकाणी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये झाले, त्यांचा विचार केला तर साने गुरुजींचे सामाजिक समतेचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. हे मान्य करावे लागेल. बाबा आढाव यांनी जी 'एक गाव, एक पाणवठा' मोहीम केली; तो साने गुरुजींच्या उपोषणाचा पुढचा अध्याय होता. काही ठिकाणी डॉ. बाबा आढाव यशस्वी झाले, तरी आपल्यापैकी अनेकांच्या मनातील दलितांबद्दलची तुच्छता अद्याप कायम आहे हे कटुसत्य आहे. म्हणजे साने गुरुजींचा 'घ्यारे हरिजन घरात घ्यारे, घरात घ्या रे, घरात घ्या' हा विचार आजही महत्त्वाचा आहे. त्यांनी कवितेतून केलेल्या या आवाहनाला आपण मनापासून प्रतिसाद दिलेला नाही, हे लक्षात घ्यावयास हवे.
साने गुरुजींनी महाराष्ट्रातील संतांचे साहित्य आत्मसात केले होते आणि भक्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता. साने गुरुजींच्या 'पत्री' या कवितासंग्रहामध्ये त्यांच्या मनातील परमेश्वरावरील भक्तीचा आविष्कार करणाऱ्या अनेक कविता आहेत. मी अलीकडे तुकाराम, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर आदी संतांचे भक्तिपर अभंग आणि भजने वाचली आणि 'पत्री’ मधील कविताही पुन्हा वाचल्या. तेव्हा मला वाटले एकनाथांची सामाजिक जाणीव, नामदेवांच्या अभंगातील व भजनांतील भावनेचा ओलावा आणि तुकाराम महाराजांच्या 'जे का रंजले गांजले' या अभंगातील विचार- यांचा त्रिवेणी संगम साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झाला होता. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हा 'मानवतावादी मंत्र’ साने गुरुजींच्या मनाचा हुंकार होता. आचार्य भागवत यांनी ‘पत्री’ च्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, 'साने गुरुजींची कविता संतकाव्याच्या परंपरेतील कविता आहे.' आधुनिक महाराष्ट्रात गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या थोर संतांप्रमाणेच आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी हेही दोन संत होते. साने गुरुजींचे जीवन म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांची उपासना होती. त्यामुळेच त्यांचे विचार हे तत्कालीन जनतेला प्रेरक वाटत असले तरी ते केवळ तात्कालिक नव्हते. ते विचार मांडताना गुरुजींनी सत्य, शिव आणि सुंदर या चिरंतन मूल्यांवर आणि भारतीय संस्कृतीतील शाश्वत मांगल्यावर प्रकाश टाकला. आजच्या जीवनातील अनेक उग्र भीषण समस्यांमुळे भांबावलेल्या माणसाला साने गुरुजींच्या विचारांमध्ये प्रकाशाचा किरण गवसेल असा मला विश्वास वाटतो.
Tags: नामदेव एकनाथ तुकाराम तुकडोजी महाराज गाडगे महाराज डॉ. बाबा आढाव विठोबाचे मंदिर पंढरपूर 'सुंदर पत्रे' वनराई नानासाहेब गोरे अप्पासाहेब पटवर्धन राजापूर रत्नागिरी हरिभाऊ लिमये मोहन धारिया एस. एम. जोशी 'साने गुरुजी सेवा पथक’ साने गुरुजी Namdev Aenath Tukaram Tukdoji Maharaj Gadge Maharaj Dr. Baba Aadhav Vithoba Mandir Pandharpur Sundar Patre Vanrai Nanasaheb Gore Appasaheb Patwardhan Rajapur Ratnagiri Haribhau Limaye Mohan Dhariya S.M. Joshi Sane Guruji Seva Pathak Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या