डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कोल्हापूरच्या काकी- उर्मिलाबाई सबनीस

उर्मिलाबाई या वृत्तीने शांत होत्या. आपल्या मते आग्रहाने मांडताना त्यांनी कधी कटू शब्द वापरले नाहीत. समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत आणि उपेक्षितांना, दलितांना व गरिबांना न्याय मिळावा ही त्यांच्या मनाची ओढ होती; आणि त्यासाठी अनेक वर्षे त्यांनी विविध चळवळीत काम करताना सर्व तऱ्हेची झीज सोसली. मृत्यूनंतर कोणताही धार्मिक विधी करू नये आणि नेत्रदान करावे असे त्यांनी आपल्या मुलाजवळ लिहून ठेवले होते.

श्रीमती उर्मिलाबाई सबनीस यांचे दिनांक 4 ऑक्टोबरला पुण्यामध्ये हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्य संग्राम आणि समाजवादी आंदोलन यात ध्येयवादी वृत्तीने निष्ठापूर्वक गेले अर्धशतक काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणून उर्मिलाबाईंच्याबद्दल सर्वांच्या मनात अतिशय आदर होता. कोल्हापूरमध्ये तर सर्व राजकीय पक्षांतील आणि सामाजिक संघटनांतील लहानमोठ्या कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार असे आणि म्हणून कोल्हापूरात सर्वजण त्यांना ‘काकी' या कौटुंबिक आपुलकीच्या नावानेच ओळखत असत.

उर्मिलाबाईंचा जन्म 1912 साली मध्यप्रदेशात धार येथे झाला. त्यांचे वडील धार संस्थानचे दिवाण होते. 1928 साली त्यांचा विवाह झाला आणि त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांची सून होऊन त्या कोल्हापूरला आल्या. 1940 साली करवीर भगिनी मंडळात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. 

प्रसिद्ध साहित्यिक प्रा. ना. सी. फडके यांनी प्रथम पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले, त्यावेळी उर्मिलाबाई सबनीस यांनी त्यांच्या निषेधाच्या सभेत द्विभार्या प्रतिबंधक कायदा व्हावा अशी मागणी प्रखरपणे केली होती. 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूरला प्रचंड उठाव झाला आणि कोल्हापूर हे भूमिगत चळवळीचे केंद्र बनले. त्यावेळी उर्मिलाबाईंनी त्यांचे पुतणे रवींद्र व त्यांचे भूमिगत सहकारी यांना सर्व प्रकारचे साहाय्य केले. 1942 च्या चळवळीत कोल्हापूर संस्थानात श्रीमती काशिबाई हणबर या महिलेवर पोलिसांनी अत्याचार केला तेव्हा उर्मिलाबाईंनी जाहीर सभेत या अत्याचाराचा तीव्र निषेध केला. त्या काळच्या संस्थानी वातावरणात त्यांनी हे धैर्य दाखविले. कोल्हापूर संस्थान विलीन झाल्यावर तेथे निवडणुका न घेता शासनाने विधानसभेवर काही व्यक्तींना नामनियुक्त केले, त्यामध्ये उर्मिलाबाई सबनीस होत्या. परंतु त्यांनी नामनियुक्ती ही लोकशाही विरोधी प्रथा आहे असे सांगून आमदारपद नाकारले.

उर्मिलाबाई सबनीस अन्यायाविरुद्ध चळवळीत भाग घेताना विधायक कार्य अत्यंत निष्ठापूर्वक करीत. हरिजन सेवक संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी हरिजन मुलींसाठी बोर्डिंग सुरू केले. तेच बोर्डिंग आज हिंद कन्या छात्रालय या विशाल स्वरूपात दिसत आहे. काकी हरिजनवाड्यांत जाऊन तेथील स्त्रियांना मुलांची स्वच्छता कशी राखावी, हे शिकवीत असत. करवीरभगिनी मंडळाच्या अध्यक्षा असताना शासनाकडून जागा मिळवून आणि समाजातून मदत गोळा करून त्यांनी कोल्हापुरात भगिनी मंडळाचा हॉल बांधला.

1950 मध्ये त्या कोल्हापूरच्या समाजवादी पक्षाच्या सेक्रेटरी झाल्या. त्यावेळी विडीकामगार संघटना, तसेच सफाई कामगार संघटनेत त्यांनी काम केले. कामगारांच्या मागण्या मांडत असताना काकी कामगारांच्या घरी जाऊन त्यांनी दारू पिऊ नये, कुटुंब नियोजन करावे, तसेच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे असे सतत सांगत असत.

1952 साली विधानसभेसाठी त्यानी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. कोल्हापूर जिल्हयातील त्या एकमेव स्त्री उमेदवार होत्या. 1952 साली महागाई विरोधी सत्याग्रहात त्यांनी स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व केले आणि त्या सत्याग्रहात त्यांना तीन महिने शिक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही उर्मिलाबाईंनी तडफदारपणे भाग घेऊन कारावास सोसला. 1967साली त्या कोल्हापूर नगरपालिकेत निवडून गेल्या. 1967 साली आणीबाणीविरोधी प्रचार मोहिमेत त्या सहभागी होत्या. यांनी कोल्हापूरमध्ये देवदासी परिषद संघटित करून देवदासीच्या मुलांसाठी बोर्डिंग काढण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर येथील झोपडपट्टीवासियांना रहाण्यासाठी राजेंद्रनगर येथे पर्यायी जागा मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना अखेर यशही आले. उर्मिलाबाई या वृत्तीने शांत होत्या. आपल्या मते आग्रहाने मांडताना त्यांनी कधी कटू शब्द वापरले नाहीत. समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत आणि उपेक्षितांना, दलितांना व गरिबांना न्याय मिळावा ही त्यांच्या मनाची ओढ होती; आणि त्यासाठी अनेक वर्षे त्यांनी विविध चळवळीत काम करताना सर्व तऱ्हेची झीज सोसली. मृत्यूनंतर कोणताही धार्मिक विधी करू नये आणि नेत्रदान करावे असे त्यांनी आपल्या मुलाजवळ लिहून ठेवले होते.

काकींच्या मृत्यूमुळे एक प्रगल्भ, पुरोगामी महिला कार्यकर्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. साधना परिवारातील वडिलधाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचा आम्हाला मोठा आधार होता.

उर्मिलाबाई सबनीस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
 

Tags: हिंद कन्या छात्रालय. देवदासी परिषद नेत्रदान द्विभार्या प्रतिबंधक कायदा प्रा. ना. सी. फडके कोल्हापूर मध्यप्रदेश समाजवादी आंदोलन स्वातंत्र्य संग्राम हृदयविकार उर्मिलाबाई सबनीस Hind Kanya Chhatralay Devdasi Parishad Eye Donation Dwibharya Pratibandhak Kayda Prof. Na. Si. Phadake Kolhapur Madhyapradesh Socialist Movement Swatantry Sangram Heart Diesease Urmilabai Sabnis weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके