डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

फिओडोर डोस्टोव्हस्की या जगविख्यात रशियन कादंबरीकाराचे जीवन अनेक तऱ्हेच्या दुःखांनी, आपत्तींनी भरलेले होते. त्यांच्या जीवनातील पहिले प्रेमही विफल झाले होते. असे असूनही त्यांच्या दुसऱ्या पत्नीमुळे त्यांच्या मनातील विषण्णतेच्या गडद काळ्या रंगाची जागा सुखाच्या सोनेरी किरणांनी घेतली. डोस्टोव्हस्कीपेक्षा वयाने लहान असलेल्या आणि अगदी वेगळ्या स्वभावाच्या अॅनानं, त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं सांगितलेली डोस्टोव्हस्कीच्या दुसऱ्या प्रेमाची ही अनोखी कहाणी.

अनेक वर्षे लोटली तरी 4 ऑक्टोबर 1866 या दिवसाची स्मृती अद्यापही माझ्या मनात ताजी, टवटवीत आहे. 3 ऑक्टोबरला मी नेहमीप्रमाणे लघुलेखनाच्या वर्गाला गेले आणि अॅना, लेक्चर सुरू होण्यापूर्वी माझी वही उघडणार, तोच माझे शिक्षक ओलखिन् माझ्याजवळ आले आणि म्हणाले, “स्टेनोग्राफर पाहा, असा मला एक निरोप आला आहे. मला वाटते तू हे काम घ्यावंस.” 

माझा अभ्यासक्रम पूर्ण होत आला होता आणि मी प्रत्यक्ष काम करायला उत्सुकच होते. मी जायला तयार आहे, हे सांगून मी विचारलं, “मला कोणासाठी काम करायचं आहे?” 
यावर ओलखिन् म्हणाले, “डोस्टोव्हस्की या लेखकांना स्टेनोग्राफर हवा आहे. ते एक कादंबरी लिहीत आहेत आणि स्टेनोग्राफरच्या मदतीनं त्यांना ती लवकर पूर्ण करायची आहे. सगळ्या कामाबद्दल तुला 50 रुबल्स मिळतील. साधारणतः दीडशे पानांची असेल ती कादंबरी.” 

हे ऐकून मी हरखूनच गेले. डोस्टोव्हस्की हे माझ्या वडिलांचे आवडते लेखक. त्यांचं ‘नोट्स फ्रॉम दि हाउस ऑफ दि डेड’ हे पुस्तक मी वाचलं होतं आणि ते वाचताना मला अश्रू आवरले नव्हते. अशा मोठ्या प्रतिभावान लेखकाचं काम करायचं याचा मला फार आनंद वाटला आणि माझ्या मनात वादळच उठलं. ओलखिन् यांनी एका कागदावर लिहिलेला पत्ता मला दिला. मलाया मेशकान्स्काया रस्त्यावर, स्टालिआर्नी लेनमध्ये 13 नं. फ्लॅट असा तो पत्ता होता. 
ओलखिन म्हणाले, “उद्या सकाळी बरोबर साडेअकराला तू तिथं जा. मात्र आधी जाऊ नकोस किंवा उशीरही करू नकोस, मला तसा त्यांनी निरोप दिलाय.”

आयुष्यात प्रथमच मला स्वकष्टाचे पैसे मिळणार होते. मला याचा अभिमान वाटला. पण त्यापेक्षाही, डोस्टोव्हस्कीसारख्या मोठ्या लेखकाची ओळख होणार या जाणिवेनं मी विशेष सुखावले. त्या दिवशी तासाकडे माझं लक्षच नव्हतं. घरी आल्यावर मी आईला हे सांगितलं तेव्हा तिलाही आनंद झाला. मला वाटलं की डोस्टोव्हस्की बहुधा माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. ते पोक्त, टक्कल पडलेले, स्थूल असतील, की उंच किरकोळ बांध्याचे असतील याची मी मनाशी कल्पना करीत होते. 

ओलखिननी मला सांगितलं होतं की डोस्टोव्हस्की हे रागीट आहेत आणि ते नेहमी उदास असतात. या त्यांच्या वर्णनानं माझं मन काहीसं दडपूनच गेलं होतं. अशा माणसाशी कसं बोलायचं, काय बोलायचं ते मला सुचेना. इतक्या विद्वान, हुषार माणसाचं डिक्टेशन घेताना आपल्या हातून चुका तर होणार नाहीत ना, असं काहूर माझ्या मनात उठलं. डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्यांतल्या पात्रांची नावं मला आठवत नव्हती आणि ते जर त्यासंबंधीच बोलू लागले तर काय करायचे, या शंकेनं मी हैराण झाले. मी वीस वर्षांची होते पण मला जगाचा काहीच अनुभव नव्हता.

दुसऱ्या दिवशी, 4 ऑक्टोबरला मी नेहमीपेक्षा लवकर उठले. आता आपण स्वतः कमावू लागणार, या कल्पनेनं माझं मन उल्हसित झालं होतं. मी घरातून लवकर निघाले. काही जादा पेन्सिली विकत घेतल्या आणि कागद ठेवण्यासाठी एक छोटी बॅगही घेतली. बरोबर साडेअकरा! आधी नको, नंतर नको. ओलखिन यांनी मला दिलेला डोस्टोव्हस्कीचा निरोप आठवत होता. अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी स्टालिआन लेनमध्ये शिरून मी 13 नंबरचा फ्लॅट कुठे आहे हे त्या आवाराच्या रखवालदाराला विचारलं. 

त्याने उजवीकडे बोट करून मला फ्लॅट दाखवला. घर चांगलं मोठं होतं. पुष्कळ बिऱ्हाडं होती. जिना चढून गेल्यावर 13 नंबरच्या फ्लॅटचं दार उघडं असलेलं मला दिसलं. ते घर पाहिल्यावर मला डोस्टोव्हस्कीच्या ‘क्राइम आणि पनिशमेंट’ या कादंबरीची आणि त्यातील नायक रॉसकोर्ल निकॉव्ह राहात असलेल्या घराची आठवण झाली. दार उघडणाऱ्या नोकराणीला ‘मला ओलखिन् यांनी कामासाठी पाठवलं आहे,' असं मी सांगितलं. इतक्यात हॉलचं दार उघडलं आणि मला काळ्याभोर केसांचा एक तरुण दिसला. परक्या व्यक्तीला पाहून तो तरुण चकित झाल्यासारखा दिसला आणि बाजूच्या दरवाजानं चटकन आत गेला. दोन मिनिटांनी स्वतः डोस्टोव्हस्कीच बाहेर आले आणि त्यांनी मला अभ्यासिकेत जायला सांगितलं. 

ही खोली चांगली प्रशस्त होती आणि तिथं भरपूर उजेडही होता. एका बाजूला एक लहानसा दिवाण होता आणि त्याच्या वरच्या बाजूला एका स्त्रीचा फोटो होता. ती फोटोत कमालीची हाडकुळी दिसत होती आणि तिनं काळा पोषाख करून काळी टोपी घातली होती. ‘ही डोस्टोव्हस्कीची बायको असणार’, मी मनाशी म्हणाले. दोन खिडक्यांच्या मध्ये एक मोठा आरसा होता. भिंतीला टेकून हिरव्या कातड्याचा अभ्रा घातलेला एक कोच होता आणि त्याच्यासमोर एक डेस्क ठेवलेलं होतं. दोन मिनिटांनी डोस्टोव्हस्की आत आले. ते मध्यमवयीन आहेत हे आता माझ्या लक्षात आलं. परंतु ते बोलायला लागले आणि एकदम मला ते काहीसे तरुण वाटले. असतील पस्तीस सदतीस वर्षांचे, माझ्या मनात आलं. 

इतक्यात नोकराणीनं काळा कडक चहा असलेले दोन ग्लास आणून टेबलावर ठेवले. मला चहा नको होता. पण उगाच वाईट दिसू नये म्हणून मी चहा पिऊ लागले. डोस्टोव्हस्की खुर्चीवर बसत आणि एकदम उठून येरझारा घालू लागत. ते सिगरेट ओढत होते. मध्येच ती विझवून दुसरी घेत होते, मला त्यांनी सिगरेट देऊ केली तेव्हा मी म्हणाले, “मी सिगरेट ओढत नाही आणि मुलींनी ओढलेली मला आवडत नाही.” डोस्टोव्हस्कींनी माझं उत्तर ऐकलं की नाही कोण जाणे! ते स्वतःच्याच नादात होते. येरझारा घालताना मध्येच बोलत आणि बोलताना एका विषयाकडून चटकन दुसऱ्या विषयाकडे वळत. वाक्यं तुटकच असायची. मध्येच ते मला म्हणाले, “मला एपिलेप्सीचा विकार आहे.” त्यांच्या या प्रांजळपणानं मी चकितच झाले. ते पुढे म्हणाले, “बघू या आपलं काम कसं काय होतं ते. आपण प्रयोग करू आणि पाहू.” 

त्यांच्या एकूण वागण्यावरून आणि बोलण्यावरून मला वाटू लागलं की आमच्या हातून एकत्र काम होण्याची फारशी काही शक्यता नाही. त्यांना माझ्या कार्यक्षमतेबद्दलही शंका आली असावी, असं मला वाटलं. म्हणून मी त्यांना म्हणाले, “आपण काम करू. पण तुम्हाला काही अडचण वाटली आणि मी येऊ नये असं वाटलं तर मला स्पष्टपणे नाही म्हणून सांगा. मला त्यात अपमान नाही वाटणार.” माझं काम कसे आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रातील एक उतारा मला सांगायला सुरुवात केली. ते फार घाईने सांगू लागले. तेव्हा मी त्यांना थांबवलं आणि सांगितलं, “आपण नेहमी बोलतो तसं तुम्ही बोला.” 

त्यांनी सांगितलेला मजकूर मी शक्य तितक्या लवकर लिहून दाखवला. एकदोन किरकोळ चुकांबद्दल, एका ठिकाणी पूर्णविराम नीट न लिहिल्याबद्दल ते चांगलेच रागावले. रागावल्यावर त्यांच्या कपाळाची शीर तटतटून उठली. मला वाटलं आता यांना फीट येणार. मध्येच ते खोलीत येरझारा घालीत. माझ्या अस्तित्वाचा त्यांना विसरच पडला होता. त्यानंतर ते म्हणाले, “माझी आता मजकूर सांगण्याची मनःस्थिती नाही. तुम्ही संध्याकाळी साधारण आठ वाजता येऊ शकाल का?” 

मला त्या दिवशी दुसऱ्यांदा येणं अडचणीचं होतं. परंतु काम पुढे ढकललं जाऊ नये म्हणून मी होकार दिला. संध्याकाळी पुन्हा मी आठ वाजता तेथे आले. नोकराणीने दार उघडले, त्या वेळी मी तिला डोस्टोव्हस्कींना हाक काय मारतात हे विचारलं. तिनं सांगितलं, “त्यांना फिओडोर मिखिलोविच म्हणतात.” 

मी अभ्यासिकेत गेले. त्यांना अभिवादन करून माझ्या जागेवर जाऊन बसले. फिओडोर मिखिलोविचनी मला दुसऱ्या टेबलासमोर लिहायला बसण्यास सांगितलं. ते म्हणाले, “याच टेबलावर मी माझी ‘क्राइम आणि पनिशमेन्ट’ लिहिली.” त्यांनी पुन्हा मला माझं नाव विचारलं. नातेवाईकांची चौकशी केली. इतक्यात नोकराणीने चहा आणि लिंबू आणलं. चहा पिता पिता आमच्या संभाषणात नकळत एक सहजता आली. माझ्या मनावरील दडपण दूर झालं आणि फिओडोर मिखिलोविच आपल्या आठवणी सांगू लागले. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा कशी देण्यात आली होती आणि ती अंमलात आणण्यासाठी बंदूकधारी शिपायांसमोर कसं उभ केलं होतं ते त्यांनी मला सांगितलं. ते म्हणाले, “मी मृत्यूच्या अगदी समीप होतो आणि जगावसं तर वाटत होतं. इतक्यात ज्या पहिल्या तिघांना गोळी घालून ठार मारण्यासाठी खांबाला बांधण्यात आलं होतं त्यांना मोकळं करण्यात आलं. नवा हुकूम आम्हाला वाचून दाखवण्यात आला. आमची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली होती. मला त्याऐवजी चार वर्षं सक्तमजुरी फर्मावण्यात आली होती.

डोस्टोव्हस्की एका विषयावरून दुसऱ्याकडे वळत होते. आमच्या कामाला सुरुवातच होईना. मला तसं त्यांना सांगण्याचा धीर मात्र झाला नाही. नंतर त्यांनीच मजकूर सांगायला सुरुवात केली. थोडं सांगून झाल्यावर त्यांनी मला तो वाचायला सांगितला. मी एका गावाचं नाव वाचल्यावर मी हे नाव सांगितलंच नव्हतं, असं ते म्हणाले. त्यांनी ते सांगितलं होतं, असं मी म्हटलं आणि त्यांनी आपली चूक चटकन कबूल केली. नंतर ते थांबले आणि म्हणाले, “आज जे मी सांगितलं, त्याची सुवाच्च्य टंकलिखित प्रत उद्या बारा वाजता तुम्ही आणाल का?" मी होकार दिला आणि 11 वाजता जायला निघाले. ते मला दारापर्यंत पोचवायला आले. 

घरी गेल्यावर काय घडलं ते सारं मी आईला सांगितलं. त्या दिवशी मला आलेला अनुभव पूर्वी कधीही आला नव्हता. एका बुद्धिमान आणि सरळ अंतकरणाच्या माणसाशी माझी ओळख झाली होती. एक मात्र वाटतं की डोस्टोव्हस्की कमालीचे दुःखी होते. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली. दुसऱ्या दिवशी मी उठले. त्यांनी सांगितलेला मजकूर टाईप केला. त्याला खूप वेळ लागला आणि मी तेथे तब्बल अर्धा तास उशीरा पोचले. फिओडोर मिखिलोविच कमालीचे अस्वस्थ झालेले दिसले. नंतर ते मला म्हणाले, “मी सांगितलेल्या मजकुराचे कागद मिळतात की नाही, याचीच मला काळजी वाटू लागली होती.” 

मी उत्तरले, “मला उशीर झाला याचं वाईट वाटतं, पण तुमचे कागद मी कधीच हरवले नसते.” यानंतर फिओडोरा मिखिलोविच यांनी कोणत्या परिस्थितीत हे काम त्यांना स्वीकारावं लागलं होतं ते सविस्तर सांगितलं. त्यांच्या थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याने काढलेलं सर्व कर्ज फेडण्याची जबाबदारी मिखिलोविचनी घेतली होती. कर्ज तब्बल तीन हजार रुबल्सचं होतं आणि इतके पैसे उभे करणं तर शक्यच नव्हतं. कर्ज फेडलं नसतं तर राहायची जागा गेली असती आणि तुरुंगातच जावं लागलं असतं. 
अशा भयंकर अडचणीत ते असताना स्टलव्हस्की नावाचा प्रकाशक भेटला आणि आजवरच्या त्यांच्या सर्व लेखनाचे हक्क 3000 रुबल्सना घेण्याची तयारी त्यानं दाखवली. तो प्रकाशक तीन संग्रहात डोस्टोव्हस्कीचं पूर्वीचं लेखन प्रकाशित करणार होता. याशिवाय या संग्रहासाठी डोस्टोव्हस्कींना आणखी एक नवी कादंबरी लिहून देण्याची अटही प्रकाशकानं घातली होती. कर्ज न फेडल्यास तुरुंगात जाण्याची भीती असल्याने डोस्टोव्हस्कींनी प्रकाशकाकडून होणाऱ्या त्या लुबाडणुकीस संमती दिली होती. 1 नोव्हेंबर 1866 ला ही कादंबरी पुरी करून द्यायची होती आणि ते न केल्यास डोस्टोव्हस्कींना तो भला प्रकाशक एक रुबलही मेहनताना देणार नव्हता. 1866 मध्येच डोस्टोव्हस्कींनी 'क्राइम ॲन्ड पनिशमेंट' या कादंबरीचा एक भाग लिहून पुरा केला होता. त्यामुळे मनानं ते थकले होते. शिवाय आता प्रकृतीही वाईट होती. परंतु त्यांनी नोव्हेंबरची 1 तारीख तर कबूल केली होती. म्हणून स्टेनोग्राफरला बोलावून ती पुरी करता येते का हे पाहण्याचा ते प्रयत्न करीत होते. मला जगाची फारशी माहिती नव्हती; परंतु डोस्टोव्हस्कीसारख्या लेखकाला लुबाडणाऱ्या प्रकाशकाचा मला फार राग आला. 

फिओडोर मिखिलोविच पुन्हा मजकूर सांगू लागले. पण सरळ सांगणे त्यांना फारसे जमेना. मधेच ते थांबत. अस्वस्थपणे येरझारा घालीत. सिगरेट पेटवीत आणि थोडीशी ओवून विझवूनही टाकीत. मध्येच मला झालेला मजकूर वाचायला सांगत. त्यांना थोडे शांत करावे म्हणून मीच बोलायला सुरवात केली आणि काही रशियन लेखकांविषयी त्यांना प्रश्न विचारले. फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “नेक्रोसॉव हा माझा विद्यार्थिदशेतला मित्र. तो मोठा प्रतिभावान कवी आहे. टुर्गेनेव्ह फार मोठे लेखक आहेत, परंतु रशियापासून अनेक वर्षे दूर राहिल्याने रशियन जीवनाशी त्यांचा संबंध काहीसा दुरावला आहे. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा मजकूर सांगायला सुरवात केली. पण तीही चाचपडत अडखळत. ते स्वतः लिहीत असावेत आणि मजकूर सांगण्याची त्यांना सवय नसावी, हे माझ्या लक्षात आलं. चार वाजता मी जायला निघाले तेव्हा त्यांना मी सांगितलं, “उद्या हा मजकूर टाईप करून आणीन!”

अशा रितीनं आमच्या कामाला सुरुवात झाली. मी रोज बाराला येत असे आणि चारपर्यंत थांबत असे. या वेळेत ते साधारणतः दीड तास मजकूर सांगत. एका वेळी अर्ध्या तासापेक्षा जास्त काम करणं त्यांना जमत नसे. हळूहळू त्यांना माझ्या कामाच्या पद्धतीची सवय व्हायला लागली आणि मलाही त्यांच्या कामाचा सराव होऊ लागला. जसजशी कादंबरीची जास्त जास्त पानं सांगून टाईप करून तयार होऊ लागली तसतसा त्यांचा आत्मविश्वास वाढत चालला. मजकूर सांगायचं थांबल्यावर ते माझ्याशी बोलत आणि आपल्या आयुष्यातील दुःखद अनुभवांबद्दल काहीतरी सांगत. त्यांना आजवर किती आणि काय काय सोसावं लागलं होतं, हे ऐकताना त्यांच्याबद्दल कणव वाटून माझं मन भरून येत असे.

फिओडोर मिखिलोविच यांच्या घरी कोणकोण नातेवाईक होते, याची मला काहीच कल्पना नव्हती. चौथ्या का पाचव्या दिवशी एक तरुण मुलगा मला पुन्हा दिसला. त्याला पहिल्या दिवशीच मी इथं पाहिलं होतं. त्यानं मला न विचारताच माझी वही उचलली आणि चाळून परत दिली. त्याच्या उद्धटपणाचा मला काहीसा राग आला, पण मी काही बोलले नाही.

आमच्या कामाची आता प्रगती होऊ लागली होती आणि मला डोस्टोव्हस्की या थोर लेखकाविषयी सुरुवातीला वाटणारी भीती नाहीशी झाली होती. आपल्या आयुष्याबद्दल त्यांनी मला बरंच काही सांगितलं. तुरुंगात इतर कैद्यांबरोबर कसं राहावं लागलं हे फिओडोर मिखिलोविच यांनी मला सांगितलं. आपल्या परदेशातील प्रवासाबद्दलही ते बोलले. एके दिवशी त्यांनी मला सांगितलं की ते विवाहित होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांची पत्नी मृत्यू पावली होती. जो तरुण मुलगा मला त्या घरात भेटला होता, तो त्यांच्या बायकोचा तिच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा होता. 

एक दिवस मी त्यांना म्हणाले, “फिओडोर मिखिलोविच, तुम्ही मला नेहमी तुमच्या दुःखाविषयी सांगता. तुमच्या आयुष्यातील सुखद क्षणांबद्दल काही सांगा की.” ते खिन्नपणे म्हणाले, “सुख? मला ते कधी मिळालंच नाही. आणि तरीही एका मित्राला मी म्हटलं की केव्हातरी सुखाचे दिवस दिसतील अशी मला आशा वाटते.” एक दिवस फिओडोर मिखिलोविच यांनी मला त्यांच्या जीवनातील प्रेमप्रकरणाची माहिती सांगितली. एका बुद्धिमान मुलीवर ते प्रेम करीत होते, आणि प्रेम करण्यात त्यांना मोठा आनंद वाटत होता. परंतु आयुष्यासंबंधी दोघांची मतं दोन टोकांची असल्यानं त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दिला होता. 

एक दिवस आम्ही बराच वेळ काम केल्यावर फिओडोर मिखिलोविच माझ्याशी बोलता-बोलता म्हणाले, “माझ्यासमोर तीन रस्ते आहेत. एक तर मी पूर्वेला कॉस्टंटिनोपल किंवा जेरुसलेमला जाईन किंवा मी यूरोपला जाऊन जुगारीत एकसारखा जुगार खेळत बसेन, किंवा दुसरे लग्न करून कौटुंबिक सुख मिळतं का हे पाहीन.” इतकं बोलून ते थांबले आणि त्यांनी मला एकदम विचारलं, “मी काय केलं तर ते योग्य होईल असं तुला वाटतं?” 
हा प्रश्न मला काहीसा अनपेक्षित होता. पण तरीही त्यांनी पुन्हा लग्न करावं असं मी त्यांना पटकन सांगितलं. ते म्हणाले, “कोणी माझ्याशी लग्न करेल असं वाटतं तुला?” आणि थोडं थांबून त्यांनी विचारलं, “मी हुषार बाईशी लग्न करावं की सुस्वभावी बाईशी?"

“अर्थात्! हुषार मुलीशीच तुम्ही लग्न करावं.” मी उत्तर दिलं. कारण मला त्यांच्या हुषारीची पुरी कल्पना आली होती. तेव्हा मध्येच येरझारा घालीत, टेबलावर बोटाने टकटक् करीत ते म्हणाले, “मला नाही असं वाटत. मला पटत नाही तुझं म्हणणं. जी मुलगी मला सुस्वभावी वाटेल, माझी काळजी घेईल, माझ्यावर प्रेम करील अशा मुलीशीच मी लग्न करीन.” 
अर्थात् ते माझ्याशी बोलत होते का स्वतःशीच बोलत होते हे सांगणं कठीणच होतं.
फिओडोर मिखिलोविच मला माझ्या आयुष्याबद्दलही कधी कधी विचारीत. एके दिवशी ते मला सहज म्हणाले, “तू नाही का कोणाशी लग्न ठरवलंस?” मी त्यांना सांगितलं की, दोन तरुण माणसांनी मला मागणी घातली होती. ते दोघेही फार चांगले होते. पण मला त्यांच्याबद्दल प्रेमच वाटत नसल्यानं मी नकार दिला. 
यावर फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “बरोबर आहे तुझं. प्रेम असल्याशिवाय लग्न कसं करता येईल?”
ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास मायकॉफ् नावाचे कवी अनपेक्षितपणे डोस्टोव्हस्कीना भेटावयास आले. मी त्यांचा फोटो पूर्वी पाहिला असल्यामुळे त्यांना लगेच ओळखलं. फिओडोर मिखिलोविच यांनी माझी मायकॉफशी ओळख करून दिली. ते म्हणाले, “ही मुलगी माझी उत्साही सहकारी आहे, म्हणूनच माझं काम होतंय.” 

त्यांच्या या स्तुतीमुळे मला आनंद झाला. मायकॉफ यांच्यादेखत डोस्टोव्हस्कींनी मला काही मजकूर सांगितला आणि त्यांनी सांगितल्यावर मी तो वाचूनही दाखवला. मायकॉफ् यांनी कुतूहलाने माझी वही पाहिली आणि शॉर्टहॅन्डमध्ये मी घेतलेला मजकूर पाहून ते म्हणाले, “यातलं तर मला एक अक्षर कळत नाही.” स्टेनोग्राफर हे लोकांना त्या वेळी एक कोडंच होतं आणि मायकॉफही त्याला अपवाद नव्हते. 

जसजशी कादंबरी लेखनाची प्रगती होऊ लागली, तसतशी फिओडोर मिखिलोविच यांची एकाग्रता वाढू लागली. ते आता सरळ मजकूर सांगत नसत. आदल्या रात्री मला सांगायच्या मजकुराची टाचणे ते करीत आणि त्यामुळे मला डिक्टेशन सांगताना ते आता अडखळेनासे झाले. सुरुवातीपेक्षा नंतरच्या एका पंधरवड्यात कितीतरी अधिक काम आम्ही केलं. घरी जाऊन त्यांनी सांगितलेला मजकूर टंकलिखित करण्यासाठी मला रोज जागरण करावं लागे. पण मी ते आनंदानं करी. कादंबरीचं कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखा यांच्यात आम्ही दोघेही जणू गुरफटून जाऊ लागलो होतो. ती कादंबरी जुगारी माणसांच्या जीवनावर होती. मला त्यातील म्हातारी आजी फार आवडे. नायकाबद्दल मात्र मला तिटकारा वाटे. कारण त्याला जुगाराचं जबरदस्त व्यसन होतं. 

याउलट फिओडोर मिखिलोविच यांना मात्र तो जुगारी नायकच मनापासून आवडत होता. डोस्टोव्हस्की हे फार मोठे लेखक होते. मला तर साहित्याची समज बेताचीच होती. माझी अनेक मतं त्यांना बालिश, पोरकट वाटलेली असणार. पण तरीही, मला जे वाटत असे ते मी त्यांना धीटपणे सांगत असे. इतक्या मोठ्या लेखकाची कादंबरी लिहून घेणं हा एक विलक्षण अनुभव होता. मला अगदी अपरिचित असलेल्या विचारांच्या जगात मी वावरत होते. डोस्टोव्हस्की माणसांच्या मनाचा जणू तळच गाठीत आणि त्यांच्या लेखनात उमटणारं हे चित्र पाहून मी काहीशी बावरून जात असे. आता मला माझे पूर्वीचे मित्र, माझ्या मैत्रिणी अगदी सामान्य वाटू लागल्या. कारण एका असामान्य लेखकाच्या सहवासात मी वावरत होते. मला आता दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागल्या होत्या. आपण टाइप केलेला मजकूर केव्हा एकदा त्यांना दाखवतो, असे मला होऊन जाई.

कादंबरी लेखन आता जवळजवळ संपत आलं होतं. फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “अॅना, तुझ्यामुळे माझं काम किती चांगलं झालं! आपण रोज भेटत होतो, बोलत होतो. काम तर आता संपेल. आपली भेट कशी का व्हायची? थिएटरमध्ये किंवा कुठं परक्या ठिकाणी भेटणं तर मला आवडत नाही. मी तुझ्या घरी आलो तर चालेल का?” 
त्यांच्या या प्रश्नानं मला खूपच आनंद झाला. मी चटकन् म्हणाले, “तुम्ही या की आमच्या घरी. पण कादंबरी पुरी झाल्याशिवाय मात्र नाही हं!” 
30 ऑक्टोबरला फिओडोर मिखिलोविच यांचा वाढदिवस होता. मी नेहमी साधे, काळ्या रंगाचे कपडे घाली. पण त्या दिवशी मी तांबूस जांभळ्या रंगाचा रेशमी पेहराव केला होता. फिओडोर मिखिलोविच यांचं लक्ष माझ्या पोशाखाकडे गेलं. ते म्हणाले, “तुला हा पोशाख किती सुंदर दिसतो!” त्यांनी केलेल्या स्तुतीमुळे मी हुरळून गेले. पण हा आनंद फारसा टिकला मात्र नाही. कारण अनेक लोक त्यांना वाढदिवसानिमित्त भेटायला येत होते आणि माझ्याकडे अगदी तुच्छतेनं पाहात होते. स्टेनोग्राफर महणजे एक नोकर मुलगी, इतकंच त्यांना वाटत होतं.

1 नोव्हेंबर जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी डोस्टोव्हस्कींना दुसरीच एक काळजी वाटू लागली. त्यांना असं वाटू लागलं की त्यांचा लबाड प्रकाशक गावाला निघून जाईल. दुसरं कोणी त्यांचं हस्तलिखित घेणार नाही आणि 1 नोव्हेंबरचा दिवस टळला तर त्यांचं पैशांचं खूपच नुकसान होईल. मी त्यांना खूप धीर दिला आणि आमच्या ओळखीच्या एका वकिलाचा सल्लाही घेऊन आले. वकिलांनी सांगितलं की तो प्रकाशक राहात असलेल्या भागातील पोलिस अधिकारी अगर नोटरी यांच्याकडून अधिकृत पावती मिळाली तर कोणतीच अडचण येणार नाही!

3 नोव्हेंबरला डोस्टोव्हस्की यांनी आमच्या घरी यावं, असं ठरलं. तो गुरुवार होता. सकाळपासून मी तयारी करीत होते. फिओडोर मिखिलोविच यांची आवडीची पेअर फळं मी आणली. वेगवेगळ्या तऱ्हेची चॉकलेट्स, मिठाई मी खरेदी केली. साडेसातला यायचं त्यांनी कबूल केलं होतं, पण आठ वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता. अखेर साडेआठ वाजता दारावरची घंटा वाजली. मी उत्सुकतेनं दार उघडलं. पाहते तर फिओडोर मिखिलोविच!

सात वाजल्यापासून ते माझं घर शोधीत होते. अखेर कोणीतरी त्यांना इथं आणून सोडलं. माझी आई तिथे आली. मी तिची त्यांच्याशी ओळख करून दिली. फिओडोर मिखिलोविच यांनी आम्हांला 1 तारखेला काय घडलं, ते सांगितलं. तो लबाड प्रकाशक गावाला निघून गेलाच होता त्याच्या ऑफिसमध्ये कादंबरीची टंकलिखित प्रत कोणी स्वीकारीना, नोटरीच्या ऑफिसात जायला फिओडोर मिखिलोविच यांना उशीर झाला; ते त्या ऑफिसात गेले तेव्हा नोटरी निघून गेलेला होता. पोलिस स्टेशनमध्ये गेले, तर तेथेही ऑफिसर बेपत्ता! रात्री दहापर्यंत फिओडोर मिखिलोविच यांची अशी ससेहोलपट चालली होती. अखेर रात्री दहा वाजता पोलिसस्टेशनवरच्या शिपायाने ती टंकलिखित प्रत ताब्यात घेऊन त्यांना पावती दिली. हे सगळं सांगून झाल्यावर फिओडोर मिखिलोविच यांच्या मनावरचं जणू ओझं उतरलं आणि ते चहा पिताना मजेत बोलायला लागले. नंतर गप्पा चांगल्याच रंगल्या. 

बोलण्याच्या ओघात फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “क्राइम ॲन्ड पनिशमेंट’ कादंबरीचा पुढचा भाग मला लिहायचा आहे. तू मला मदत करायला येशील का? तुझ्याबरोबर काम करायला मला आता चांगलंच जमतं”. 
मी त्यांना म्हणाले, “मला यायला नक्कीच आवडेल. पण माझ्या शिक्षकांनी मला तुमच्याकडे पाठवलं. त्यांची परवानगी प्रथम घ्यायला लागेल.” मी हे म्हटल्यावर फिओडोर मिखिलोविच निराश झाल्यासारखे मला दिसले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला भेटायला गेले. बऱ्याच दिवसांत तिच्याशी बोलायला वेळच झाला नव्हता. मी ज्या वेळी डोस्टोव्हस्की यांच्याबरोबर काम करताना मला आलेले अनुभव सांगितले, तेव्हा ती चटकन् म्हणाली, “त्यांच्यात तुझं मन इतकं गुंतणं बरं नाही.” मी तिला रागानं म्हणाले, “माझं मन मुळीच गुंतलेलं नाही.” पण घरी आल्यावर मात्र मला तिच्या शब्दांची पुन्हा पुन्हा आठवण होऊ लागली.

आठ दिवस गेले. रविवारी मी पियानो वाजवीत बसले असताना दारावरची घंटा वाजली. फिओडोर मिखिलोविच अनपेक्षितपणे मला भेटायला आले होते. ते काहीसे ओशाळल्यासारखे दिसत होते. हस्तांदोलन करून ते म्हणाले, “तुझी मला आठवण येत होती. पण या वेळी यावं का नाही ते मला ठरवता येत नव्हतं.” 

मला बाहेर जायचं होतं हे मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, “चल, मी तुला घेऊन जातो. आमची घोडागाडी रस्त्याने जाताना एका कठीण वळणापाशी माझा तोल जाऊ नये म्हणून फिओडोर मिखिलोविच यांनी माझ्या कमरेभोवती हात टाकून मला धरून ठेवलं. तेव्हा मी चटकन् म्हणाले, “मी काही पडणार नाही. मला धरायला नको.” माझे शब्द त्यांना चांगलेच झोंबले. हात बाजूला करून ते म्हणाले, “या क्षणी तू गाडीतून बाहेर पडशील तर किती बरं होईल.” यावर मी एकदम हसू लागले आणि आमच्यातलं भांडण मिटलं. आमचं संभाषण पुन्हा मजेत सुरू झालं आणि फिओडोर मिखिलोविच यांनी त्यांच्या कादंबरीचा पुढचा भाग लिहिण्यास येण्याचं वचन द्यायला मला भागच पाडलं.

8 नोव्हेंबर 1866 हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस. त्या दिवशी फिओडोर मिखिलोविच यांनी आपलं प्रेम माझ्याजवळ व्यक्त केलं. त्या दिवशी मी सकाळी पायीच त्यांच्या घरी गेले. मला अर्धा तास उशीर झाला. फिओडोर मिखिलोविच एकदम म्हणाले “तू आलीस! मला किती आनंद झाला. मग ते म्हणाले, “काल मला एक सुंदर स्वप्न पडलं.” 

“स्वप्न?” असं म्हणून मी हसले.
"कृपा करून हसू नकोस. मला माझी स्वप्नं फार महत्त्वाची वाटतात. मग सांगा की मला, काय स्वप्न पडलं ते?” ...आणि फिओडोर मिखिलोविच सांगू लागले, “ती समोरची लाकडी पेटी पाहिलीस? सैबेरियातल्या एका मित्रानं मला ती भेट दिली. त्या पेटीत मी माझी हस्तलिखितं आणि कधी कधी पत्रंही ठेवतो. स्वप्नात मी त्या पेटीसमोर बसून माझे काही कागद चाळीत होतो. कागदांमध्ये काहीतरी चमकताना मला दिसलं आणि मी काय ते पाहू लागलो तर एकदम एक तेजःपुंज हिरा मला दिसला. 
“मग तुम्ही नंतर काय केलंत?"

“ते मला आता आठवत नाही. पण ते एक सुंदर स्वप्न होतं, हे मात्र खरं.” यावर मी म्हणाले, “स्वप्न कितीही चांगलं वाटलं, तरी कित्येकदा त्याच्या उलटही घडतं.” माझ्या या शब्दांमुळे फिओडोर मिखिलोविच यांचा उत्साह एकदम मावळला. त्यांचा स्वभाव असाच चमत्कारिक होता. क्षणात खूप उत्साही आणि क्षणात एकदम उदास. आणि मग ते खूप वेळ उदासच असत. ते एकदम चिडत आणि चिडल्यावर रागाने ताडताड बोलत. अशा वेळी त्यांच्या कपाळाची शीर तटतटून उठे आणि यांना आता फीट येणार अशी मला भीती वाटू लागे. आताही मला तशीच भीती वाटली आणि विषय बदलावा म्हणून मी म्हणाले, “नवीन काय लिहायला घेणार आता?” 

माझ्या या प्रश्नानं त्यांची कळी एकदम खुलली. ते म्हणाले, “माझ्या मनात एक नवीन कादंबरी आहे. पण तिचा शेवट कसा करायचा हेच मला कळत नाही. मला तुझा सल्ला हवाय आणि मी खुळ्यासारखी स्वतःचं लहानपण विसरून डोस्टोव्हस्की या थोर कादंबरीकाराला सल्ला द्यायला तयार झाले. मी चटकन् त्यांना विचारलं, “कादंबरीचा नायक कोण आहे, कसा आहे?" फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “एका कलावंताच्या जीवनावर ही कादंबरी आहे. तो साधारण माझ्या वयाचा आहे.”
"हे असं अर्धवट सांगण्यापेक्षा मला कादंबरीचं सारं कथानक सांगा,” मी म्हणाले आणि फिओडोर मिखिलोविच एकदम उत्साहाने मला सांगू लागले. त्यांना जणू स्फूर्ती आली होती आणि स्फूर्तीच्या आवेगात ते मला त्यांच्या कादंबरीच्या नायकाची जीवनकथा सांगत होते. ती कथा ऐकताना माझ्या लक्षात आलं की फिओडोर मिखिलोविच आत्मकथनच करीत होते. तेच कष्टांत गेलेलं बालपण, प्रेमळ पित्याचा अकाली मृत्यू, आयुष्यातलं पहिलं प्रेम, त्यातील अपयश, पत्नीचा मृत्यू, दारिद्र्य, कर्जाचा डोंगर आणि तोच कमालीचा एकाकीपणा; चमत्कारिक आजार आणि इतरही खूप. त्यांनी पूर्वी मला सारं काही सांगितलेलं. 

फिओडोर मिखिलोविच पुढे बोलत होते, “माझ्या कादंबरीच्या नायकात खूप दोष आहेत. पण तो मनानं चांगला आहे. त्याच्या जीवनातल्या एका क्षणी एक तरुण मुलगी, तुझ्याएवढी किंवा थोडीशी मोठी, त्याला भेटते. आपण तिचं नाव अॅना ठेवू या..” हे ऐकताना मला माझंच नाव अॅना होतं, याचा जणू विसरच पडला होता. कारण कादंबरीच्या कथानकाशी माझा संबंध असेल, अशी मला कल्पनाच नव्हती. अॅनाची व्यक्तिरेखा फिओडोर मिखिलोविच यांनी माझ्या मनःचक्षूंसमोर दोनचार वाक्यांत उभी केली. ती हुषार, सहृदय आणि उत्साही होती. 

मी चटकन विचारलं, “तुमची ही नायिका सुंदर आहे का?” यावर फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “ती फारशी देखणी नाही, पण आकर्षक खास आहे. त्या कलावंताची या मुलीशी कलेच्या वर्गात भेट होते आणि प्रत्येक भेटीनंतर त्याला खात्री वाटू लागते की तिच्या सहवासात त्याचं जीवन सुखात जाईल. पण त्यांचं लग्न होणं कसं शक्य होतं? तो वयानं तिच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. शरीरानं दुबळा होता. एका तरुण, उत्साही मुलीने, त्याच्याबरोबर आयुष्य घालवणं म्हणजे नियतीनं केलेली क्रूर थट्टाच ठरायची. त्याच्याबरोबर आयुष्य काढण्यासाठी तिला केवढा त्याग करावा लागला असता! अॅना, तू मला सांग, एका साध्यासुध्या मुलीला अशा कलावंतावर प्रेम करता येईल का?”
या त्याच्या प्रश्नावर मी म्हणाले, “तुमची नायिका जर उथळ नसेल आणि तिला जर या काहीशा तऱ्हेवाईक कलावंताचं प्रेम भावत असेल तर का नाही ती प्रेम करणार? आणि तिचं जर त्याच्यावर प्रेम असेल, तर मग त्यागाचा आणि पश्चात्तापाचा प्रश्नच कुठे येतो?" मी हे शब्द काहीशा आवेगातच बोलले.

फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “तुला खरंच असं वाटतं का, की ती मुलगी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या, अगदी भिन्न स्वभावाच्या कलावंतावर आयुष्यभर प्रेम करू शकेल?” आणि क्षणभर थांबून फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “अॅना, तू कल्पना कर, की तो कलावंत म्हणजे मी आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का, असं विचारतो आहे आणि मला सांग, या प्रश्नाचं उत्तर तू काय दिलं असतंस?”

फिओडोर मिखिलोविच यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भाव दिसले. पूर्वी मी कधी न पाहिलेले. त्याच वेळी त्यांच्या तोंडावर नेहमी दिसणारी एक तीव्र वेदनाही उमटून गेली. माझ्या लक्षात आलं की आम्ही एका कादंबरीची चर्चा करीत नव्हतो. आमची जीवनं एकमेकांसमोर उभी होती. मी त्यांच्या चेहऱ्याकडे धिटाईनं पाहिलं आणि म्हणाले, “त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करीत राहीन.” 
माझ्या या उत्तरानंतर फिओडोर मिखिलोविच यांनी त्या अविस्मरणीय क्षणी जे तरल, प्रेममय शब्द उच्चारले, ते मी कोणाला सांगणार नाही. तो माझा पवित्र ठेवा आहे. माझं भान हरपलं होतं आणि सुखाच्या सागरात मी डुंबत होते. आम्ही काय बोललो ते

मला आता आठवत नाही. फिओडोर मिखिलोविच म्हणाले, “मला माझं सारं स्वप्न आठवत नाही. पण स्वप्नातला हिरा मला सापडला आहे आणि तो मी आयुष्यभर जपणार आहे.” 
मी म्हणाले, “तुम्ही चुकता आहात, फिओडोर मिखिलोविच. तो फक्त एक चकाकणारा दगड तर आहे." 

“छे! असं मुळीच नाही. या वेळी तरी मी खासच चुकलेलो नाही”, फिओडोर मिखिलोविच गंभीरपणे म्हणाले आणि आमच्या मनांच्या एकरूपतेच्या अननुभूत आनंदाने मी स्वतःला विसरूनच गेले!
 

Tags: ग प्र प्रधान दुसरं प्रेम दोस्तोव्हस्की g p pradhan अॅना दोस्तोएव्हस्काया dusra prem Taganna dostoevsky weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके