साने गुरुजींचे जीवन आणि त्यांनी लिहिलेले साहित्य एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. पूर्वी साने गुरुजींच्या सहवासात राहिलेल्या, त्यांचे साहित्य वाचलेल्या ग. प्र. प्रधान यांनी अलीकडेच एक पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने साने गुरुजींचे साहित्य पुन्हा वाचले. या वेळी त्यांच्या मनात उमटलेले हे विचार तरंग आणि भाव तरंग.
काही लेखक आपल्याला लहानपणी आपल्या बाल-कुमार वयात आवडतात. काही लेखकांच्या साहित्याची मोहिनी तरुण वयात पडते. काही लेखक प्रौढ वयात आपल्याला आकृष्ट करतात. काही थोडेच लेखक किंवा ग्रंथ असे असतात की आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या अवस्थांमध्येही आपण ते पुनःपुन्हा वाचतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्या ग्रंथांमध्ये काही तरी नवे गवसते. महाभारत हे असे महाकाव्य आहे. शेक्सपिअर हा असा महान लेखक आहे. अशा ग्रंथांची आणि लेखकांची सोबत आपल्या मनाला आयुष्यभर होते. अन्य अनेक लेखक आपण पुनःपुन्हा वाचत नाही. काहींची एका वेळी आवडलेली पुस्तके पुन्हा वाचल्यावर सामान्य वाटतात. काहींचे आपण पुनर्मूल्यांकन करतो. साने गुरुजींचे पहिले पुस्तक मी वाचले ते म्हणजे 'श्यामची आई'. त्या वेळी मी मॅट्रिकच्या वर्गात होतो. 'श्यामची आई,' वाचायला सुरुवात केली आणि पहिल्या 'तीन रात्री' वाचल्यावर मी इतका प्रभावित झालो की ते पुस्तक हातातून खाली ठेववेना. एका पवित्र, सुंदर जगात साने गुरुजी मला घेऊन गेले. 'श्यामची आई' वाचताना अनेकदा डोळे पाणावले आणि त्यातील निसर्गाचे सुंदर वर्णन वाचताना मन उल्हसित झाले. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र मी साने गुरुजी फारसे वाचले नाहीत. त्या वेळी वि. स. खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्यांमुळे मी फार प्रभावित झालो होतो. पुढे 1940 साली साने गुरुजी एकदा पुण्याला आले. त्या वेळी खानदेशातील काही मित्रांसमवेत मी त्यांच्याबरोबर रात्री फिरायला गेलो. फर्ग्यूसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर आम्ही चालत असताना, आधी अबोल असलेले गुरुजी, गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या स्मारकापाशी येताच आम्हांला म्हणाले, "आपण इथं जरा बसूया. मी कॉलेजमध्ये शिकत असताना येथे येत असे. माझी ही फार आवडती जागा. इथं आलं की गोखल्यांनी घेतलेली देशभक्तीची शपथ मला आठवते आणि माझ्याही मनात देशभक्ती उचंबळून येते." आम्ही बसलो आणि साने गुरुजी गोखल्यांच्या जीवनावर बोलू लागले. त्यांचे ते भाषण मी कधीच विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यलढ्याबद्दल मला ओढ वाटत होतीच. गुरुजींचे ते भाषण ऐकल्यावर स्वातंत्र्यचळवळीत पडण्याची माझ्या मनात एक प्रचंड ऊर्मी उसळली.
पुढे साने गुरुजींची भाषणे ऐकली. परंतु त्यांचे साहित्य फारसे वाचले नव्हते. 1942 साली येरवडा तुरुंगात असताना 'पत्री' आणि 'भारतीय संस्कृती' ही गुरुजींची पुस्तके वाचली. 1943 ते 1950 या कालखंडात साने गुरुजींचा सहवास लाभला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारून गेलो होतो, त्यामुळे त्यांचे साहित्य चिकित्सकपणे वाचण्याच्या मनःस्थितीतच मी नव्हतो. राष्ट्र सेवा दलातील मुलामुलींना साने गुरुजी जेव्हा गोष्टी सांगत त्या वेळी मीही त्या गोष्टींमध्ये रंगून जात असे. साने गुरुजींच्या 'गोड गोष्टी' वाचल्या आणि त्या खूप आवडल्या. मात्र गुरुजींच्या साहित्यापेक्षा त्यांच्या जीवनाचाच माझ्या मनावर अधिक प्रभाव पडला. मी साहित्याचा विद्यार्थी होती. कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य शिकवीत होतो. अभिजात साहित्याचे वाचन करीत होतो. त्या वेळी साने गुरुजींच्या साहित्याच्या काही मर्यादा माझ्या लक्षात आल्या. मात्र त्यांची भाषाशैली किती सुंदर आहे आणि कुमार वयातील मुलामुलींच्यावर त्यांच्या साहित्याने सुसंस्कार कसा होतो याचीही मला जाणीव झाली.
एक वर्षापूर्वी 'साहित्य अकादमी' ने 'मेकर्स ऑफ इंडियन लिट्रचर' या मालेत साने गुरुजींच्यावर मी एक पुस्तक लिहावे असे सुचविले. भारतातील विविध भाषांतील थोर लेखकांच्या साहित्याचा आणि जीवनाचा परिचय करून देणारी छोटी, 60 ते 75 पानांची, अनेक पुस्तके या मालेत प्रसिद्ध झालेली आहेत. या पुस्तकांत फार विद्वत्ताप्रचुर अगर स्वतंत्र रीतीने विश्लेषण करावे अशी अपेक्षा नसते. भारतातील प्रतिभावान लेखकांच्या साहित्याची ठळक वैशिष्टये सर्व भाषांतील वाचकांना समजावीत अशा रीतीने लिहिलेली पुस्तके या मालेत आजवर प्रसिद्ध झाली आहेत.
दोन वर्षापूर्वी मराठीतील प्रतिभाशाली नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांच्यावर या मालेसाठी मी एक पुस्तक लिहिले आणि ते साहित्य अकादमीने प्रसिद्ध केले. साने गुरुजींच्या जीवनाचा परिचय करून देणे मला अवघड वाटत नव्हते, परंतु त्यांच्या साहित्याचे नव्याने मूल्यमापन करणे मात्र मला काहीसे कठीण वाटत होते. अन्य कामांच्या व्यापात सहा सात महिने तसेच निघून गेले. साहित्य अकादमीचे 'पुस्तक लवकर हवे आहे' असे तगाद्याचे पत्र येताच, मी साने गुरुजींचे साहित्य पुन्हा वाचण्यास सुरुवात केली. माझ्याकडे गुरुजींची बहुतेक पुस्तके होतीच. जी तीन-चार पुस्तके नव्हती ती 'साधना प्रकाशना' कडून मिळाली.
राजाभाऊ मंगळवेढेकरांनी लिहिलेली 'साने गुरुजींची जीवनगाथा' पुन्हा वाचताना अनेक आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली. नानासाहेब गोरे यांनी साने गुरुजींच्या पहिल्या स्मृतिदिनाला केलेले भाषण आठवले. साने गुरुजींच्या त्यागमय समर्पित जीवनाच्या, त्यांच्या मुलांवरील अपार प्रेमाच्या, त्यांच्या मला न कळलेल्या मनाच्या स्मृती जाग्या झाल्या. माझे मन पुन्हा भूतकाळात गेले. गुरुजींच्या समवेत वावरले आणि गुरुजींच्या असामान्य जीवनाचा परिचय करून देणारे प्रकरण मी लिहिले.
साने गुरुजींचा ‘पत्री' हा कवितासंग्रह मी पुन्हा वाचला. साने गुरुजी विद्यार्थी दशेपासून कविता लिहीत. आपल्या मनातील भावना, विशेषतः वेदना व्यक्त करण्यासाठी गुरुजींनी अनेक कविता लिहिल्या. साने गुरुजी स्वतःबद्दल, स्वतःच्या भावभावनांबद्दल कोणाहीजवळ कधी बोलत नसत. परंतु अनेकदा त्यांच्या मनात वादळे उठत. अशा वेळी परमेश्वराचा त्यांच्या मनाला आधार वाटे. आपल्याकडे अनेक ठिकाणी साधीसुधी माणसे देवळात जाऊन, देवाजवळ आपले मन मोकळे करतात. गाभाऱ्याजवळ बसून देवाशी बोलणाऱ्या आमच्या शेजारच्या एक बाई मी लहानपणी सातारला विश्वेश्वराच्या देवळात पाहिल्या. मला काही समजेना. मी घरी येऊन आईला हे सांगितले तेव्हा ती म्हणाली, 'तुला इतक्यात नाही समजायचं ते. तू माझ्याशी बोलतोस तशा रमाकाकू विश्वेश्वराशी बोलतात.' तेही मला फारसे समजले नाही. पुढे ज्या वेळी मी जनाबाई, नामदेव यांचे अभंग वाचले, त्यांचे विठ्ठलाशी लडिवाळ बोलणे आणि काही वेळा त्यांच्याशी कडाडून भांडणे हे जेव्हा त्यांच्या अभंगात वाचले तेव्हा मला सातारच्या रमाकाकू आठवल्या आणि त्यांच्या त्या वेळच्या बोलण्याचा अर्थ समजला. साने गुरुजींच्या 'पत्री' या कवितासंग्रहातील अनेक कविता हे असेच देवाशी केलेले हितगुज आहे. एका ठिकाणी साने गुरुजी लिहितात:
'तुजवीण आधार मज कोणि नाही
बघतो तुझी वाट नयनातुनी पाट
गळा दाटतो सांग तुजलागी काही'
दुसऱ्या एका कवितेत साने गुरुजी परमेश्वराला म्हणतात:
“प्रभु माझी जीवन बाग फुलव."
धुळे तुरुंगात असताना गुरुजींनी एका कवितेत देवाला आई म्हटले आहे. ते लिहितात :
"येई ग आई मज माहेराला नेई
तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव सुकुनी जाई
मज माहेराला नेई'
साने गुरुजींनी या कविता स्वतःच्या मनाला शांती मिळावी म्हणून लिहिल्या. वाचकांना सौंदर्याचे दर्शन घडविणे हा या कवितांचा उद्देशच नाही. गुरुजींना त्यांच्या चा कविता प्रसिद्ध करायच्याच नव्हत्या. परंतु अमळनेरला त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या नकळत या कवितांच्या वह्या वाचल्या आणि त्या प्रसिद्ध करण्याचा आग्रह धरला. गुरुजी तयार नव्हते पण अखेर भिडस्तपणे म्हणाले, "माझ्या कवितात सौंदर्य नाही. त्या मी स्वतःसाठी लिहिल्या. त्या कुणाला कशा आवडतील? पण करा तुम्हाला काय करायचे ते." साने गुरुजी हे मार्मिक वाचक होते. साहित्यातील सौंदर्याची त्यांना जाण होती. स्वतःच्या कवितांची मर्यादा ते ओळखत होते. परंतु साने गुरुजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे भारून गेलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शब्द स्फूर्तिदायी वाटत होते. गुरुजींच्या मनाचा हा आविष्कार लोकांना कळावा असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी आग्रहाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला.
साने गुरुजींची देवाप्रमाणेच देशावरही भक्ती होती आणि म्हणून या कवितासंग्रहात देशभक्तीपरही कविता आहेत. आपला देश स्वतंत्र नाही याची साने गुरुजींच्या मनाला फार खंत वाटे. ही मनाची वेदना व्यक्त करताना त्यांनी एका कवितेत लिहिले आहे, 'हे जीवन केविलवाणे, गाऊ मी कसले गाणे ?' परंतु त्याच बरोबर साने गुरुजी हे झुंजार स्वातंत्र्यसेनानी होते. अनेकांच्या अंतःकरणात त्यांनी देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. जेव्हा स्वातंत्र्यलढ्याला धार येत होती तेव्हा साने गुरुजींनी लिहिले, "उठू दे देश पेटू दे देश, येथून तेथून सारा पेटू दे देश.”
गुरुजींनी मुलांसाठी लिहिलेले एक गीत आहे ?
भारतमाता माझी लावण्याची खाण
गाईन तिचे गान मी
गाईन तिचे गान
करीन तिचे ध्यान मी
करीन तिचे ध्यान
भारत माता माझी लावण्याची खाण
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आम्हा तरुणांच्या ओठावर साने गुरुजींची एक कविता खेळत असे ती म्हणजे : "स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारतमाई", या कवितेतील,
"जाच काच गरिबांना नुरवू
झोपड्यांतुनि मोदा फुलवू
स्थापन करणार लोकशाही
सुखयू प्रियतम भारतमाई"
या ओळी त्या वेळी मला आवडल्या आणि आजही ती कविता पुन्हा वाचताना त्या पूर्वीइतक्याच आवडल्या. साने गुरुजींनी आपल्या मनातील भारताच्या भविष्याचे चित्र 'बलसागर भारत होवो' या कवितेत रेखाटले आहे.
साने गुरुजींचे मुलांवर नितांत प्रेम होते आणि मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता आजही सुंदर वाटतात. एका कवितेत ते लिहितात:
वारा वदे, कानामधे, गीत गाइन तुला
ताप हरिन, शांति देइन, हस रे माझ्या मुला
सुमन वदे, मोठ्या मोदे, प्रेम देइन तुला
गंध देईन, रंग दाविन, हस रे माझ्या मुला
एका चिंतनपर कवितेत साने गुरुजी लिहितात : "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे"
साने गुरुजींना आपल्या कवितेचे स्वरूप काय आहे हे बरोबर माहीत होते. साने गुरुजींच्या कवितांना जाई-जुई-मोगऱ्याचा सुगंध नाही, गुलाबाचा रंग नाही. परंतु लहान मुली मंगळागौरीच्या पूजेसाठी वेगवेगळ्या झाडांची सोळा तऱ्हेची पाने आणतात, त्यांना पत्री म्हणतात, या लहान मुलींच्या मनाचे आणि त्यांनी गोळा केलेल्या पत्रीचे पावित्र्य या कवितांमध्ये खास आहे. श्रेष्ठ काव्याचे निकष लावले तर 'पत्री' हा कवितासंग्रह सामान्य वाटेल. परंतु साने गुरुजींनी स्वतःच्या मनाचे उन्नयन व्हावे यासाठी लिहिलेल्या या कवितांतील पवित्र भावना मला आजही ह्रद्य वाटते.
साने गुरुजींनी लिहिलेल्या कादंबऱ्या मी पूर्वी वाचल्या होत्या आणि त्या वेळीही मला त्या आवडल्या नव्हत्या. काही महिन्यांपूर्वी मी त्या पुहा वाचल्या, त्यांचे उणेपण मला तीव्रतेने जाणवले. कथानक हे नेहमी उत्कंठा वाढवणारे हवे. तशी कथानके या कादंबऱ्यांना नाहीत. कादंबरीकाराने मानवी मनाची गुंतागुंत उकलून दाखवावी ही अपेक्षाही येथे पूर्ण होत नाही. साने गुरुजींनी आपल्या मनातील स्वप्ने काही कादंबऱ्यांत रेखाटली आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतील अनेक स्त्री-पुरुष साने गुरुजींचेच विचार व्यक्त करतात. त्यांच्या सारखेच बोलतात. वागतात. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 15-16 वर्षाच्या मुलामुलींना ध्येयाचे आकर्षण वाटावे यासाठी साने गुरुजींनी 'क्रांति' व अन्य काही कादंबऱ्या लिहिल्या. त्या परिस्थितीच्या संदर्भात लिहिलेल्या या कादंबऱ्या आज कालबाहा झाल्या आहेत. साने गुरुजींची 'आस्तिक' ही कादंबरी मला पूर्वी आवडली होती. ही कादंबरी अलीकडे वाचतानाही मला गुरुजींच्या कादंबऱ्यांमध्ये ती सर्वात अधिक सरस वाटली, आर्यांनी नागांवर केलेले आक्रमण, अस्तित्वासाठी शौर्याने लढणारे नाग-तरुण, हा भीषण संघर्ष चालू असतानाच शांततेचा संदेश देणारे आस्तिक ऋषी आणि मानवी जीवनातील प्रेमभावनेने सारे भेद ओलांडल्यामुळे पराक्रमी नाग-तरुण नागानंद आणि आर्य तरुणी वत्सला तसेच सौम्य प्रकृतीचा आर्य-तरुण कार्तिक आणि आनंदी नाग कन्या कृष्णी यांची प्रेमकहाणी, असे या कादंबरीचे नाट्यपूर्ण कथानक आहे. वि. स. खांडेकरांना हे कथानक फार आवडले आणि शांतीचा संदेश देणाऱ्या या कादंबरीवर आधारलेला चित्रपट काढावा असे त्यांनी मास्टर विनायक यांना सुचविले होते. वि. स. खांडेकर यांनी या कादंबरीला सुंदर आणि विवेचक प्रस्तावना लिहिली. 'आस्तिक' या वर्षात मला वाचताना काय वाटले हे सांगण्यापेक्षा खांडेकरांचे शब्द उद्धृत करणेच मला उचित वाटते. खांडेकर लिहितात. "साने गुरुजींच्या प्रेमशक्तीतूनच 'आस्तिक' ची सर्व आकर्षकता आणि हृदर्यगमता निर्माण झाली आहे. ती स्वभावप्रधान अथवा कथानकप्रधान कादंबरी नाही. ती तत्त्वप्रधान कथा आहे. मानवाच्या आत्म्याचा विकास हा तिचा विषय आहे. सान्यांच्या लेखनात लौकिक कलेच्या दृष्टीने अनेक वैगुण्ये आहेत हे कळत असूनही मला नेहमी वाटते, की साने थोर कलाकार आहेत. ते जीवनातले अंतिम सौंदर्य शोधायला निघाले आहेत. ते मानवतेचे शिल्पकार आहेत. जग अधिक सुंदर व्हावे, मनुष्य अधिक चांगला व्हावा म्हणून त्यांची लेखणी अविश्रांत कष्ट करीत आहे."
भाऊसाहेब खांडेकरांनी मांडलेले हे विचार अत्यंत योग्य आहेत. माझा त्यांच्याशी इतकाच मतभेद आहे की साने गुरुजींच्या लेखणीला कधी कष्ट पडत नसत. त्यांचे सारे साहित्य सहजसुंदर आहे. गुरुजींच्या मनातील सुंदर विचार आणि उत्कट भावना त्यांच्या लेखणीतून निसर्गाच्या सहजतेने प्रगट होत.
साने गुरुजींच्या लेखनातील ही सहजसुंदरता त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींतून आणि सुधा या आपल्या पुतणीला लिहिलेल्या पत्रांतून उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे. बाल-कुमारांसाठी त्यांनी लिहिलेल्या साहित्याच्या सौंदर्याने मी आजही मुग्ध होतो. किंबहुना पंचवीस-तीस वर्षांचा असताना मी गुरुजींनी लिहिलेल्या गोष्टी आणि त्यांची 'सुंदर पत्रे' वाचली होती, त्यापेक्षाही गेल्या काही महिन्यांत, हे साहित्य पुन्हा वाचताना माझ्या मनाला अनिर्वचनीय आनंद वाटला. साने गुरुजी हे एक छांदिष्ट वाचक होते. विद्यार्थिदशेत आणि पुढे की शिक्षक झाल्यावरही त्यांनी अफाट वाचन केले. साने गुरुजींची स्मरणशक्ती असामान्य होती. जी पुस्तके त्यांना आवडत ती त्यांच्या मनात जणू रेंगाळत आणि मुलांना गोष्टी सांगताना त्या पुस्तकांच्या आधारे आपल्या समाजात जणू ती घडली आहे असे रूप साने गुरुजी मूळ कथेला देत. टॉलस्टॉयची 'रिसरेक्शन' ही कादंबरी, व्हिक्टर ह्युगोची 'ला मिझराब्ल, हार्डीची 'मेयर ऑफ कॅस्टरब्रीज'- या कादंबऱ्यांच्या कथानकांना गुरुजींनी असे खास मराठी रूप दिले आहे. मात्र या गोष्टी मुलामुलींना सांगताना मूळ कादंबरीतील स्वभावलेखन अथवा चिंतन यापेक्षा कथानकातील मुख्य घटनांचा आधार घेऊनच साने गुरुजी आपली गोष्ट रंगवतात, ही गोष्ट या वेळी माझ्या लक्षात आली. साने गुरुजी त्रिचनापल्ली तुरुंगात असताना, एका तमिळ सह-राजवंद्याने जी कथा त्यांना सांगितली तिचे सुंदर सूपांतर 'चित्रा आणि चारू' या मध्ये आहे. चिनी भाषेतील एका नाटकाच्या कथानकाचा सारांश साने गुरुजींनी वाचला होता. त्याच्या आधारे त्यांनी 'करुणादेवी' ही गोष्ट लिहिली आहे. बंगालीतल्या सहा लोककथाही साने गुरुजींनी मराठीत आणल्या आहेत. 'आपण सारे भाऊ' आणि 'नवा प्रयोग' या दीर्घ कथांमध्ये साने गुरुजींनी मुलांसमोर भविष्याबद्दलचे चित्र ठेवले आहे. साने गुरुजींचे साहित्यातील स्थान मुलांसाठी कथा लिहिणारे लेखक म्हणूनच अढळ राहील असे मला वाटते. गुरुजी जशी गोष्ट सांगत तशीच ती लिहीत. त्यामुळे त्यांचे 'गोड गोष्टी', 'अमोल गोष्टी' आणि 'विश्राम' हे गोष्टींवे संग्रह मुलांना आजही फार आवडतात. या गोष्टी सांगताना साने गुरुजी कधी उपदेश करीत नाहीत. मुलांचे मनोरंजन करणाऱ्या या गोष्टी आहेत आणि हे मनोरंजन होत असतानाच मुलांच्या मनावर सुसंस्कार सहजपणे होतो तो साने गुरुजींच्या साधूतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे. साने गुरुजींनी आपली पुतणी सुधा हिला लिहिलेली पत्रे 'सुंदर पत्रे' म्हणून प्रसिद्ध झाली. ही पत्रे आजही मुलामुलींना खासच आवडतील. या पत्रांमध्ये साने गुरुजी रानफुलांचे, कोकणातल्या धुवांधार पावसाचे, नद्यांचे, ओढ्यांचे वर्णन करतात. सुधाला खेड्यापाड्यांतील साध्यासुध्या माणसांची ओळख करून देताना बैलपोळ्याला बैलाची पूजा करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातील श्रद्धेचे दर्शन घडवतात. साने गुरुजींना आवडलेल्या पुस्तकांतील विचार ते सांगतात. संतवाङ्मयातील तसेच इंग्रजी काव्यातील अनेक सुंदर ओळी या पुस्तकात विखुरल्या आहेत. संत तुकारामांप्रमाणेच वर्डस्वर्थ हाही साने गुरुजींना सहज आठवतो. या पत्रांतून साने गुरुजींचे नितळ पारदर्शी मन दिसते. त्यांच्या स्मृतिमंजूषेतील अनेक रत्ने ते मुलांना देतात. साने गुरुजींची ही 'सुंदर पत्रे' अविनाशी आहेत. साने गुरुजींनी मुलांसाठी विपुल साहित्य लिहिले. त्या पैकी 'माझी दैवते' हे पुस्तक मी पूर्वी वाचले नव्हते, या वेळी मी ते वाचले. साने गुरुजी मुलांच्या अंतरंगात कसा सहज प्रवेश करीत, त्यांना भव्यतेये, सौंदर्याचे दर्शन कसे घडवीत ते मला 'माझी दैवते' मध्ये दिसले. 'आकाश', 'प्रकाश' आणि 'पाणी' हे तीन निबंध म्हणजे सोप्या गद्यात लिहिलेल्या सुंदर कविता आहेत. साने गुरुजींना झाडे, पशुपक्षी, समुद्र यांबद्दल जे प्रेम होते ते त्यांनी लिहिलेल्या गोष्टीतून सहजपणे व्यक्त होते आणि बाल-कुमार वाचकांच्या मनालाही या निसर्गप्रेमाचा हळुवार स्पर्श होतो. 'कावळे' हे एक असेच सुंदर पुस्तक आहे. साने गुरुजींनी कावळ्याच्या मनाची अनोखी ओळख करून देताना माणसाच्या क्षुद्रपणावर कोरडे ओढले आहेत.
साने गुरुजींचे 'भारतीय संस्कृती' हे पुस्तक पन्नास वर्षांनी मी पुन्हा वाचले. हे तत्त्वज्ञानावरचे पुस्तक नाही. साने गुरुजींनी जे वाचले, त्यांनी जीवनात जे पाहिले आणि अनुभवले, त्या सर्व गोष्टींबद्दल त्यांनी दीर्घकाल चिंतन केले. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना साने गुरुजींना आपल्या समाजातील गुणदोषांची कल्पना आली आणि आपल्या देशातील तरुणांसमोर भारतीय संस्कृतीचे वास्तव चित्र रेखाटावे असे त्यांना वाटले. आपल्या समाजातील जातिव्यवस्थेमुळे जो उच्च नीच भाव निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेकांचे जीवन करपून गेले आहे, उद्ध्वस्त झाले आहे. ते भारतीय संस्कृतीचे विकृत स्वरूप आहे, असे साने गुरुजींनी 'भारतीय संस्कृती' या पुस्तकात हिरीरीने साधार सांगितले आहे. भारतीय संस्कृती ज्ञाननिष्ठ आहे. कर्म आणि ज्ञान यांचा मेळ घालणारी आहे, ती सर्वसंग्राहक आहे हे साने गुरुजींनी आपल्या निवेदनात रसाळपणे सांगितले आहे. 'भारतीय संस्कृती' वाचताना साने गुरुजींच्या शैलीतील प्रसाद आणि ओज या गुणांमुळे मी मंत्रमुग्ध झालो. साने गुरुजी लिहितात: "भारतीय संस्कृती हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदार भावना व निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. ... भारतीय संस्कृती म्हणजे सान्तातून अनंताकडे जाणे, अंधारातून प्रकाशाकडे जाणे, भेदातून अभेदाकडे जाणे, विरोधातून विकासाकडे जाणे, विकारातून विवेकाकडे जाणे. भारतीय संस्कृती म्हणजे मेळ, सर्व धर्मांचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञान-विज्ञानांचा मेळ, अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी, सर्व मानवजातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाणारी अशी जी थोर संस्कृती, तिचाच लहानसा-निदान मानसिक तरी- उपासक मला जन्मोजन्मी होऊ दे."
साने गुरुजींचे साहित्य मी तरुणपणी वाचले होते. इंग्रजीत त्यांच्यावर छोटेसे पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने हे साहित्य आयुष्याच्या संध्याकाळी मी पुन्हा वाचले. त्या साहित्यातील काही मर्यादा, उणीवा लक्षात आल्या. त्याचबरोबर मुलांचे रंजन करण्यासाठी त्यांना साने गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी अमोल आहेत, त्या मुलांना अक्षय आवडतील हेही जाणवले. साने गुरुजींनी बाल कुमारांसाठी लिहिलेल्या या गोष्टी आणि 'सुंदर पत्रे' ही मराठी साहित्याची भूषणे आहेत.
साने गुरुजींच्या साहित्यात सुंदर विचार आणि प्रासादिक शैली यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. साने गुरुजींचे साहित्य आणि त्यांचे जीवन एकात्म होते. गुरुजींच्या जीवनापासून त्यांचे साहित्य वेगळे करता येणार नाही. त्यांचे साहित्य वाचल्याशिवाय त्यांचे जीवन समजू शकणार नाही.
साने गुरुजींचे साहित्य पुन्हा वाचताना त्यांच्या सहवासातील दिवस मला आठवले. त्यांचे उदात्त विचार आणि साहित्यातील माणुसकीचा गहिवर यांमुळे त्यांचा सहवास जणू पुन्हा अनुभवला आणि एक आगळी शांतता माझ्या मनाला लाभली.
Tags: टॉलस्टॉय स्वातंत्र्यलढा भारतीय संस्कृती साहित्य साने गुरुजी Tolstoy Freedom struggle Indian Culture Literature Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या