11 जून हा साने गुरुजींचा स्मृतिदिन. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उर्जा ही आजही ‘साधना’चे प्राणतत्त्व आहे. साने गुरुजींच्या भावविश्वाची उलघाल चित्रीत करणारे हे प्रधानगुरुजींचे मनोगत...
पूज्य साने गुरुजींनी ज्या रीतीने त्यांच्या जीवनाची ज्योत मालवून टाकली त्यासंबंधी नानासाहेब गोरे आणि अन्य अनेकांनी लिहिले आहे. 11 जून हा दिवस जवळ येऊ लागला की माझ्या मनाची अद्यापही कालवाकालव होते. 1950 साली मे महिन्यात राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरात, ‘श्रमातून आपण देश घडवला पाहिजे’ हा संदेश देताना अत्यंत ओजस्वी भाषण करणारे साने गुरुजी मला आठवतात. त्याचप्रमाणे पुणे येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात ‘आंतरभारती’ या उदात्त कल्पनेसंबंधी उत्कटतेने भाषण करणारे साने गुरुजी मला आठवतात आणि मी ज्यावेळी गुरुजींचे अंत्यदर्शन घेतले त्यावेळी शांतपणे पहुडलेले साने गुरुजीही डोळ्यांसमोर येतात.
साने गुरुजींच्या जीवनातील 1930 ते 1950 ही दोन दरशकेच मला फार महत्त्वाची वाटतात. अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये खानदेशातील साध्याभोळ्या मुलांना शिकविण्यात, त्यांना नवनवीन कल्पना सांगताना, रंगून गेलेले साने सर लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पं. नेहरूंनी दिलेला संपूर्ण स्वातंत्र्याचा संदेश ऐकून आमूलाग्र बदलून गेले आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी यापुढे जीवन समर्पण करावयाचे असा त्यांनी निर्णय घेतला.
शाळेतील अध्यापनाचे कार्य संपवून साने सरांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. 1930 आणि 1932 सालातील नाशिक आणि धुळे तुरुंगातील कारावासामुळे त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू व्यक्त झाले. एकीकडे नाशिक तुरुंगात बरोबरीच्या स्वातंत्र्यसैनिकांना श्यामच्या आईच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि महाराष्ट्रातील असंख्य वाचकांसाठी ‘श्यामची आई’ हे अविस्मरणीय पुस्तकही लिहिले. दुसरीकडे धुळ्याच्या तुरुंगात आचार्य विनोबा भावे यांनी गीतेवर दिलेली प्रवचने लिहून विनोबाजींना सादर केली. त्या लेखनाच्या आधारेच निर्माण झालेली ‘गीता प्रवचने’ देशभर लोकांपर्यंत गेली.
1934 साली तुरुंगातून सुटल्यावर साने गुरुजींनी खानदेश ही कर्मभूमी म्हणून स्वीकारली. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी गुरुजींनी आजच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला आणि हजारो लोकांपर्यंत ‘काँग्रेस माऊली, सुखाची सावली हाय हो’ हा संदेश पोचविला. त्यांच्या भाषणांमुळे खानदेशातील असंख्य तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित झाली.
स्वातंत्र्याचा संदेश देतानाच खेड्यापाड्यांतील आणि शहरांतीलही मुलामुलींना गोष्टी सांगितल्या आणि स्त्रियांकडून ओव्या गोळा करून त्या प्रसिद्ध केल्या. 1936 पासून गुरुजींना जहाल भाषणांबद्दल सतत तुरुंगवास घडला. त्या काळात ‘येथून तेथून सारा पेटू दे देश’ हे व्रत घेऊन स्वातंत्र्याच्या अंतीम लढ्यासाठी साने गुरुजींनी तरुणांना पेटवले आणि उठवले. 1942 साली त्यांनी भूमिगत कार्य केले आणि पकडले गेल्यानंतर प्रथम येरवडा आणि नंतर नाशिक येथील तुरुंगात 1945 अखेरीपर्यंत ते स्थानबद्ध होते. स्वातंत्र्यलढ्यात समर्पण भावनेने कार्य केल्याचे समाधान त्यांना लाभले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक समता आली पाहिजे, ही साने गुरुजींच्या मनाची आस होती. यामुळेच पंढरपूरचे विठोबाचे मंदीर दलितांना खुले व्हावे याकरिता साने गुरुजींनी प्रथम महाराष्ट्राचा दौरा केला आणि नंतर पंढरपूरला उपोषणही केले. अखेर मंदिराची दारे उघडली. या कामात प्राणपणाला लावतानाही साने गुरुजींना साफल्य लाभले.
साने गुरुजींची लढाऊ वृत्ती स्वातंत्र्यलढ्यात प्रगट झाली. हे समर्पण करताना त्यांच्या मनाला महात्माजींचा मोठा आधार वाटे. 1948 साली महात्माजींच्या हत्येनंतर साने गुरुजींनी 21 दिवस उपोषण केले. गांधीजींच्या निधनाने साने गुरुजी दुःखी झाले; पण खचले नाहीत. त्यांच्या मनाने पुन्हा उभारी घेतली आणि 15 ऑगस्ट 1948 रोजी त्यांनी ‘साधना साप्ताहिक’ सुरू केले. दीड वर्षांत त्यांनी जे लेखन केले त्यात उत्कटता आहे; परंतु त्यांच्या मनाला समर्पणाची जी ओढ होती त्यासाठी मोठ्या चळवळीची आवश्यकता होती, तशी चळवळ त्यावेळी निर्माण झाली नाही.
आचार्य विनोबा भावे यांचे भूदान आंदोलन 1950 मध्ये सुरू झाले असते, तर साने गुरुजींनी समर्पण भावनेने त्यात उडी घेतली असती. त्यांनी विनोबाजींच्या बरोबर देशभर पदयात्रा केली असती आणि भूमिहीनांना जमीन मिळावी म्हणून प्राणपणाला लावले असते. गुरुजींमुळे भूदान आंदोलनात संघर्ष निर्माण होऊ शकला असता आणि त्या संघर्षातून समाजपरिवर्तनाचे नवे आंदोलन सुरू झाले असते.
भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी लढण्यात त्यांना साफल्य लाभले असते. परंतु 1950 साली ते आंदोलन सुरूच झाले नव्हते. त्यामुळे समर्पणासाठी तडफडणाऱ्या गुरुजींच्या मनाला, जीवनात फार मोठी पोकळी जाणवू लागली. लेखणीत सामर्थ्य होते; परंतु कृतिशील जीवन जगतानाच ती लेखणी बहरत असे. नुसते लेखन करण्यात गुरुजींना समाधान लाभेना. राष्ट्रसेवादलाची शिबिरे होत तेव्हा त्यांच्या मनाला भविष्यकालाची प्रसादचिन्हे दिसत. त्याचबरोबर भोवतालच्या जीवनात विशेषतः राजकारणात काही अनिष्ट प्रवृत्तीही निर्माण होऊ लागल्या होत्या. साने गुरुजींच्या संवेदनशील मनाला या अनिष्ट प्रवृत्तींच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येयवादी प्रवृत्तीची पिछेहाट होईल, हे तीव्रतेने जाणवले आणि ते निराश होऊ लागले.
लहानपणापासून एम. ए. होईपर्यंत वैयक्तिक जीवनातील संघर्षात ज्ञानोपासनेमुळे साने गुरुजींना साफल्य मिळाले. 1930 ते 1947 स्वातंत्र्यासाठी समर्पण करण्यात त्यांना सफलता वाटली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंढरपूरच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. ‘साधना’ काढताना साधना हे समतेच्या चळवळीचे मुखपत्र करावे ही त्यांची आकांक्षा होती. परंतु अशा चळवळी त्यावेळी निर्माणच झाल्या नाहीत. उलट अनिष्ट प्रवृत्तीच समाजजीवनात वाढू लागल्या. त्या प्रवृत्तींकडून पराभूत होण्यापेक्षा मरण बरे, असे साने गुरुजींच्या ध्येयवादी मनाला तीव्रतेने वाटू लागले. विफलतेने त्यांच्या भावनाप्रधान मनाला ग्रासून टाकले. वरवर उत्साही वाटणारे गुरुजी त्यांच्या भोवतालच्या धडपडणार्या मुलांपासूनही मनाने दूर जाऊ लागले; आणि अखेर सर्वांचा निरोप घेण्याचा निर्णय घेऊन जीवनयात्रा संपवली.
Tags: साधना साप्ताहिक स्वातंत्र्यलढा दलित पंढरपूर नाशिक फैजपूर विनोबा भावे धुळे जळगाव महात्मा गांधी पं नेहरू काँग्रेस प्रताप हायस्कूल खानदेश अंमळनेर पुणे महाराष्ट्र नानासाहेब गोरे स्मृतिदिन साने गुरुजी Sadhana Weekly Freedom fight Dalit Pandharpur Nashik Faizpur Vinoba Bhave Dhule Jalgaon M. Gandhi P. Nehru Congress Pratap High School Amalaner Pune Maharashtra Nanasaheb Gore Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या