डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नानासाहेब गोरे - एक समर्पित जीवन

नानासाहेब गोरे यांचे जीवन म्हणजे संघर्षांची एक मालिकाच होती. त्यांच्या आयुष्यभरच्या खडतर वाटचालीचा. अनेक वादळांचा आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या परिश्रमांचा हा आलेख.
 

सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबात संघर्ष नसतात असे नाही, परंतु त्या संघर्षाचे स्वरूप तीव्र नसते. नानासाहेब गोऱ्यांच्या घरात मात्र वैचारिक पातळीवर मतभेदांना सुरुवात झाली आणि संघर्ष वाढतच गेला. नानू आणि त्याची मोठी बहीण अशी दोन भावंडे. बहिणीचे लवकर लग्न झाले आणि ती तरुणपणीच वारली. स्वाभाविकपणेच आईवडिलांचा माझ्यावर फार जीव होता, आपल्या मनासारखा तो वाढावा असे त्यांना वाटत होते. नानूचेही आईवडिलांवर फार प्रेम होते.

कुटुंबाशी संघर्ष 

घरातील वातावरण सनातनी वळणाचे. नानूचे वडील कर्मठ, जुन्या विचारांचे आणि आचारांचे असे असूनही नानूच्या वाचनावर त्यांनी निर्बंध घातले नाहीत, आणि येथेच पितापुत्रांच्या वाटा भिन्न होऊ लागल्या. हायस्कूलमध्ये आणि कॉलेजात आगरकरांच्या लेखनाचा नानूच्या मनावर प्रभाव पडला. तो बुद्धिनिष्ठ वृत्तीने सर्व गोष्टींकडे पाहू लागला आणि त्याला घरातील नेमधर्म, सोवळेओवळे पटेनासे झाले. परक्याशी मतभेद झाले तर विरोध करणे कठीण नसते. परंतु घरातच, प्रिय असलेल्या आईवडिलांना विरोध करणे, त्यांना दुखविणे सोपे नसते. नानूने बराच विचार करून हे करण्याचे ठरविले आणि श्रावणीच्या दिवशी, श्रावणी करण्याचे नाकारून जानवे गळ्यातून काढले व ते वडिलांसमोर ठेवले. वडील रागावले परंतु त्यांनी आक्रस्ताळेपणा केला नाही. 'तुझा आणि माझा मार्ग भिन्न होणार,' असे मात्र ते स्पष्टपणे म्हणाले. कॉलेजमध्ये असताना आगरकरांप्रमाणेच लो. टिळकांच्या विचारांचाही प्रभाव नानूच्या मनावर पडत होता. हायस्कूलमध्ये असताना त्याने मंडालेहून परत आलेले निर्भय वृत्तीचे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले लो. टिळक पाहिले होते. स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे हे त्याने ऐकले होते, कॉलेजमध्ये गेल्यावर स्वराज्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे असे नानूला तीव्रतेने वाटू लागले. एस.एम.जोशी, र के. खाडिलकर, शिरूभाऊ लिमये हे सहाध्यायीही स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले होते. या मार्गाने जाणे म्हणजे सरकारी नोकरी न करणे, खडतर हालअपेष्टांचा मार्ग स्वीकारणे हे नानूला माहीत होते. घरात हा दुसरा संघर्ष करावा लागणार होता. कॉलेज विद्यार्थी असतानाच एसेम, गोरे आणि खाडिलकर ही त्रयी यूथ लीगमध्ये धडाडीने काम करू लागली. सरकारी नोकरीत असलेल्या अण्णांना- नानूच्या वडिलांना-हा मार्ग कष्टाचा आहे हे दिसत होते. त्याच वेळी स्वराज्यासाठी हालअपेष्टा सोसाव्या लागणारच हेही त्यांना कळत होते. ते इतकेच म्हणाले, 'तुला जे करावयाचे ते पूर्ण विचार करून कर.' या मार्गाने आपण गेल्यावर आई फार दुःखी होणार याची जाणीव नानूला होती. तरीही त्याने मन कठोर केले आणि बी.ए.झाल्यावर निर्धाराने स्वातंत्र्य चळवळीत तो काम करू लागला. 1930 आणि 1932 च्या चळवळीत त्याने आघाडीवर राशी काम केले आणि दीर्घ मुदतीचा कारावास सोसला. तुरुंगात चक्की पिसली आणि मारही सोसला.

कॉलेजमध्ये असतांनाच नानासाहेबांची फर्ग्युसन कॉलेजमध्ये बरोबर शिकणाऱ्या सुमतीबाईशी ओळख झाली. देसाई हे त्यांचे माहेरचे नाव. त्या बालविधवा होत्या. नानासाहेब व सुमतीबाई यांचा स्नेह वाढला. नानासाहेबांच्या ध्येयवादी जीवनात सहभागी होण्याऱ्या सुमतीबाईंनी निर्णय घेतला आणि दोघांनी विवाहबद्ध होण्याचे ठरविले, आता मोठाच संघर्ष घरात उभा राहिला. नानासाहेबांचे आई-वडील लग्नाला मान्यता देणे शक्यच नव्हते. आई तर फारच कष्टी झाली. परंतु नानासाहेबांनी ठरविल्याप्रमाणे सुमतीबाईशी पुनर्विवाह केला. आईवडिलांपासून होणारी ताटातूट मनाला क्लेशदायी होती, परंतु ती सहन करण्याशिवाय मार्ग नव्हता. सामाजिक सुधारणा घरापासून करणे ही कठीण कृती नानासाहेबांनी कठोरपणे केली. सुमतीबाईंचे प्रेम हा आता यापुढे त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता. नानासाहेबांना राजकीय काम करता यावे म्हणून सुमतीबाईंनी शिक्षिकेची नोकरी करून प्रपंचाचा आर्थिक भार उचलला.

स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार कृती 

1932 व्या चळवळीत नाशिक तुरुंगात असतानाच नानासाहेबांनी मार्क्स आणि समाजवादावरील अन्य ग्रंथ वाचले आणि ते समाजवादी विचारांकडे ओढले गेले. जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया, एस. एम. जोशी आदींच्या समवेत त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. नानासाहेबांच्या राजकीय जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा होता.

पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले व युद्धविरोधी भूमिका घेतानाच काँग्रेसने जनआंदोलन सुरू करावे अशी भूमिका काँग्रेस समाजवादी पक्षाने घेतली. गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहात न जाण्याचे ठरविल्याबद्दल नानासाहेब गोरे यांच्यावर काही जणांनी टीका केली. त्यावेळी ते म्हणाले, 'मी तुरुंगात जायला भीत नाही, परंतु आता देशव्यापी चळवळ करण्याची वेळ असताना प्रतीकात्मक सत्याग्रहात भाग घेणे माझ्या मनाला पटत नाही.'

याच वेळी महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक व अन्य हिंदुत्ववादी मंडळींनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. हे आव्हान स्वीकारण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना करून तरुणांना राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यासाठी शिक्षण द्यावे असा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. नानासाहेब गोरे आणि शिरूभाऊ लिमये यांनी या बाबतीत पुढाकार घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत नानासाहेब म्हणाले, 'जातीयवादी शक्तींना तोंड देताना केवळ त्यांच्यावर टीका करून चालणार नाही. तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात येण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. देशहित स्वातंत्र्यासाठी लढण्यात आहे, आपसात मारामाऱ्या करण्यात नाही हे नव्या पिढीला खासच पटेल. आपण युवक संघटनेकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. राष्ट्र सेवा दल या युवक संघटनेत पुरोगामी विचारांचा संस्कार तरुणांवर करून त्यांना आपण राष्ट्रीय चळवळीत आणू शकू असा मला विश्वास वाटतो.' या निर्णयाच्या वेळी एस.एम. जोशी हे तुरुंगात होते. ते काही दिवसांनी सुटून आल्यावर त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे दलप्रमुख व्हावे असे ठरले.

याच वेळी नानासाहेब गोरे यांना गुलबर्ग्यात केलेल्या एका भाषणाबद्दल अटक झाली आणि निजाम सरकारच्या कोर्टाने त्यांना दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली. ते तुरुंगात असतानाच 9 ऑगस्ट 1942 ला 'चले जाव'चे देशव्यापी आंदोलन सुरू झाले. काही महिन्यांनी गुलबर्गा तुरुंगातून सुटताच नानासाहेब भूमिगत चळवळीतील आपल्या सहकाऱ्यांना येऊन मिळाले. पुढे साने गुरुजी अन्य आणि सहकाऱ्यांबरोबर ते पकडले गेले. महाराष्ट्र कटाच्या खटल्यात ते एक प्रमुख आरोपी होते. 1945 अखेरीस त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

1947 साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीच आपल्या देशाची फाळणी झाली. त्यावेळी समाजवादी पक्षाने फाळणीस विरोध केला. या संदर्भात काही दिवसांनंतर केलेल्या एका भाषणात नानासाहेब म्हणाले "जयप्रकाश नारायण आणि डॉ. लोहिया यांनी आमच्या पक्षाची भूमिका मांडली. परंतु राजकारणात केवळ भूमिका मांडणे हे पुरेसे नसते. ती भूमिका देशात मान्य होण्यासाठी झगडावे लागते. या बाबतीत आम्ही अपुरे पडलो." परंतु केवळ आम्हीच नव्हे, फाळणीस कडवा विरोध करणारे हिंदुमहासभावादीही फाळणीविरोधी चळवळ करू शकले नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जुन्या ज्येष्ठ क्रांतिकारकांनी पुण्यात सांगता समारंभ केला, त्यावेळी भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे भाषण केले त्यामध्ये त्यांनी क्रांतिकारकांच्या आजवरच्या प्रयत्नांची आज सांगता झाली, असे म्हणून अनिच्छेने का होईना परंतु फाळणी स्वीकारली. त्यावेळी म. गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते तसेच फाळणीचे विरोधक या सर्वांच्यावर परिस्थितीने मात केली. साम्राज्याचे जोखड पूर्णपणे फेकून देण्यात आपण सर्वजण अपुरे पडलो आणि ब्रिटिशांची भेदनीती यशस्वी झाली.1947 साली ज्या ध्येयासाठी माझे सहकारी व मी चळवळीत पडलो, ते ध्येय पूर्णपणे साकार झाले नाही, हे आमच्या सर्वांच्या अपूर्णतेमुळे, हे मान्य केले पाहिजे."

समाजवादी पक्ष 

स्वातंत्र्य पूर्व काळात कॉंग्रेस हे राष्ट्रव्यापी व्यासपीठ होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये राहून विविध मतांच्या लोकांना आपल्या गटाचे अस्तित्व उघडपणे ठेवता येत होते. काँग्रेस समाजवादी पक्ष हा काँग्रेस-अंतर्गत उपपक्ष होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला. पक्षांतर्गत गटांना आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवता येणार नाही असा नवा नियम करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडावयाचे की नाही हा समाजवाद्यांसमोर प्रश्न होता. यासंबंधी बोलतांना नानासाहेब गोरे म्हणाले होते, "काँग्रेस ही आमची मातृसंस्था होती. साने गुरुजी तर 'काँग्रेस माऊली, सुखाची साऊली' म्हणत. काँग्रेसमध्ये राहून, काँग्रेसच्या झेंड्याखाली उभे राहून आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. आपले जुने घर सोडताना आपल्याला त्रास होतो, मग काँग्रेस सोडताना मनाला त्रास झाल्याशिवाय कसा राहील? परंतु राजकीय काम नेटाने करावयाचे असले तर त्या कामाला वैचारिक अधिष्ठान असावे लागते. 'समाजवाद' या विचारामुळे एकत्र आलेल्या आम्हां कार्यकर्त्यांना या विचारावर अधिष्ठित असलेला पक्ष असणे आवश्यक वाटते. काँग्रेस हा अशी निष्ठा असलेला पक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडणे अपरिहार्य आहे." या उद्गारावरुन दिसून येईल की सुस्पष्ट विचारांचा पाया असलेल्या पक्षाची बांधणी करावयाची अशा निर्णयाप्रत आल्यावर अन्य समाजवादी मित्रांसमवेत नानासाहेब काँग्रेसच्या बाहेर पडले. हा निर्णय घेण्यापूर्वी समाजवादी पक्षामध्ये बरेच दिवस चर्चा चालू होती. इतका महत्त्वाचा निर्णय घेताना कोणाच्याही मनात संघर्ष होणारच. अशा वेळी पूर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा व त्याची कार्यवाही करण्यासाठी विचाराशी बांधिलकी स्वीकारावी अशी नानासाहेबांची भूमिका होती. काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्षाची स्थापना करावी असे मत त्यांनी चर्चेत मांडले. बहुसंख्य समाजवादी कार्यकत्यांनी हीच भूमिका मांडली, आणि मे 1948 मध्ये नाशिक येथील अधिवेशनात समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पक्षांतर्गत मतभेद 

1953 साली जयप्रकाश नारायण यांनी ज्या वेळी राजकारण सोडून भूदान आंदोलनास जीवनदान केले त्यावेळी नानासाहेब गोरे फार अस्वस्थ झाले. ते म्हणाले, 'भूदान हा एक अभिनय विचार आहे, हे मी मान्य करतो, भूदान ही देशव्यापी चळवळही होऊ शकेल, या चळवळीत समाजवादी पक्षाने कसा भाग घ्यावयाचा हे पक्षात चर्चा करून ठरविले पाहिजे. ते न करता जयप्रकाशजींनी पक्ष सोडून भूदान आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला हे योग्य नाही.' नानासाहेब या संदर्भात बोलताना पुढे काही वर्षांनी म्हणाले 'काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे ज्यावेळी आम्ही ठरविले त्यावेळी, पुढील अनेक वर्षे या पक्षात एकत्र राहून तो संघटित करण्याची, भारतीय राजकारणात त्या पक्षाला महत्वपूर्ण स्थान मिळेल असे काम करण्याची अलिखित प्रतिज्ञा आम्ही सर्वांनी केली होती. आमच्यावर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्ते समाजवादी पक्षात सामील झाले. या सर्व गोष्टींचे भान ठेवून निदान पंचवीस वर्षे आम्ही सर्वांनी एकजुटीने काम करावयास हवे होते. तसे न पडल्यामुळे आम्ही स्वतःशी, आमच्या कार्यकर्त्यांशी आणि आमच्या ध्येयाशीच प्रतारणा केली. अच्युतराव पटवर्धनांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि जयप्रकाशजींनी भूदान आंदोलनास स्वतःला वाहून घेतले हे पक्षावर मोठे आघात होते. विरोधकांनी जेव्हा आमच्यावर आघात केले तेव्हा आम्ही त्यांना तोंड दिले. परंतु आमचेच ज्येष्ठ नेते जेव्हा आम्हांला सोडून गेले त्यावेळी आम्ही कोणाला बोल लावणार? संघर्ष प्रतिपक्षाशी करता येतो. आपल्या सहकाऱ्यांबरोबर वाद घालता येतो. परंतु आमच्या या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आम्हाला तीही संधी दिली नाही. व्यक्तिगत निर्णय घेऊन ते पक्षापासून बाजूला झाले. जयप्रकाशजी आणि अच्युतराव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात संदेह नाही. परंतु राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेणे असमर्थनीय आहे.'

1952 व्या निवडणुकीत कृषक मजदूर प्रजा पक्षाशी एकत्रीकरण करून समाजवादी पक्षाने प्रजासमाजवादी पक्ष असे नाव धारण केले. यामुळे पक्षात पुढे आणखी एक वादळ झाले, ते मुख्यतः अशोक मेहता आणि डॉ. लोहिया यांच्यातील वैचारिक मतभेदांमुळे. अशोक मेहता यांनी 'ज्या देशातील अर्थव्यवस्था अविकसित आणि मागासलेली आहे, त्या देशात सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकमताची क्षेत्रे (एरियाज ऑफ ॲग्रीमेंट) शोधून त्या क्षेत्रांमध्ये एकत्रित काम केले पाहिजे,' असा सिद्धांत मांडला. डॉ. लोहिया यांनी या सिद्धांतास कडाडून विरोध केला. ते म्हणाले, 'अशोक मेहतांचा सिद्धांत स्वीकारल्यास समाजवादी पक्ष हा काँग्रेसला दुरुस्त करू पाहणारा पक्ष होईल, समाजवादी पक्ष हा काँग्रेसला पर्याय म्हणून देशापुढे यावयाचा असेल तर आपण विरोधाची धार तीव्र केली पाहिजे. एकमताची क्षेत्रे शोधण्याने ही धार बोथट होईल. किंबहुना पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल.'

नानासाहेब गोरे व एस.एम.जोशी या दोघांनी या संदर्भात त्यांची भूमिका पुढील शब्दांत मांडली: 'अशोक मेहतांचा सिद्धांत आम्हांला मान्य नाही. परंतु याबाबत पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय घ्यावयास हवा होता. असे न करताना स्वतंत्र समाजवादी पक्ष काढण्याचा निर्णय डॉ. लोहिया व त्यांच्या सहकार्यांनी घेतला हे बरोबर नाही.' नानासाहेब गोरे काही वर्षांनी यासंबंधी बोलताना म्हणाले, 'आमच्या पक्षात वैचारिक मतभेदांप्रमाणेच नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्येही संघर्ष (क्लॅश ऑफ पर्सनलिटीज) झाला आणि त्यामुळे आमच्यात फाटाफूट झाली.

गोवा मुक्तिसंग्राम 

भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी राज्यांची पुनर्रचना भाषेच्या तत्त्वावर व्हावी,अशी नानासाहेब गोरे यांची भूमिका होती आणि म्हणूनच ते संयुक्त महाराष्ट्र परिषदेत सुरुवातीपासून हिरीरीने भाग घेत. परंतु याच सुमारास दुसऱ्या एका लढ्याकडे ते ओढले गेले, तो म्हणजे गोव्याचा मुक्तिसंग्राम. 1954 मध्ये गोव्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. त्या वेळी भारताने या मुक्तिसंग्रामास साह्य करून गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडापासून सोडविले पाहिजे, असे नानासाहेबांना तीव्रतेने वाटू लागले. परंतु केंद्र सरकार या बाबतीत हालचाल करण्यास तयार नाही हे लक्षात आल्यावर आपणच सत्याग्रह करून गोव्याच्या मुक्तिसंग्रामास साहाय्य करावे, असे नानासाहेबांना मनोमन वाटू लागले. कारवार येथे भरलेल्या गोमंतक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी ही घोषणा केली आणि महाराष्ट्रात 'गोवा विमोचन साहायक समिती'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन ते या समितीचे सरचिटणीस झाले. पुढे 1955 मध्ये नानासाहेबांनी सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जीवनातील हा फार मोठा समरप्रसंग होता. नानासाहेबांच्या नेतृत्वाखालील तुकडीने गोव्यात सत्याग्रह केल्यावर पोर्तुगीज पोलिसांनी नानासाहेबांना रक्त ओकेपर्यंत जबर मारहाण केली. परंतु नानासाहेबांनी ते धैर्याने सोसले.

पुढे लष्करी कोर्टापुढे खटला घालून नानासाहेबांना 12 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. गोवा विमोचन समितीने सत्याग्रहीच्या अनेक तुकडे पाठविल्यानंतर पंधरा ऑगस्ट 1955 ला एक प्रचंड मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. या वेळी नानासाहेब गोरे, शिरूभाऊ, मधु लिमये आणि सत्याग्रहाचे प्रमुख नेते आग्वाद किल्ल्यात कारावास भोगत होते. या सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात अनेकजण मृत्यू पावल्याचे वृत्त नानासाहेबांना समजले. त्या वेळी हा सत्याग्रह पुढे चालवू नये असे त्यांना वाटले. सत्याग्रह योग्य असला तरी यापुढे सत्याग्रहीचे बलिदान होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी आपले हे मनोगत स्पष्टपणे गोवा-विमोचन-सहायक समितीच्या नेत्यांना कळविले, या संबंधीचा सर्व अधिकृत पत्रव्यवहार गोवा सरकारच्या दप्तरात आहे आणि तो गोमंतक स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख स्वातंत्र्य सैनिक श्री. माधव पंडित यांनी प्रसिद्ध केला आहे. यासंबंधी पुढे काही दिवसांनी माझ्याशी बोलताना नानासाहेब म्हणाले, "गांधीजींनी सत्याग्रहाचा वापर ब्रिटिश सत्तेविरुद्ध केला यात त्यांचे मोठेपण होतेच. त्याचबरोबर ब्रिटिश सरकार न्यायबुद्धी आणि माणुसकी दाखवीत होते हेही लक्षात ठेवले पाहिजे. सालाझारविरुद्ध सत्याग्रह केल्यावर त्याने तो दंडुका व बंदुका वापरून चिरडून टाकण्याचे ठरविले. 15 ऑगस्टच्या सत्याग्रहातील बलिदानांनतर यापुढे अधिक बलिदान करणे योग्य ठरणार नाही असे मला वाटले आणि म्हणून सत्याग्रह आंदोलन मागे घ्यावे असे माझे मत मी गोवा विमोचन सहायक समितीच्या नेत्यांना कळविले. असे मत तुरुंगातून व्यक्त करणे सत्याग्रही वृत्तीशी विसंगत आहे असे शिरूभाऊंचे आणि अन्य काही मित्रांचे मत होते. परंतु सत्याग्रह सुरू करण्यात मी पुढाकार घेतला असल्यामुळे माझे मत विमोचन समितीला, एस.एम. सारख्या सहकाऱ्याला कळविणे ही माझी जबाबदारीआहे, असे मला वाटले." ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मध्यस्थीमुळे अन्य नेत्यांबरोबर नानासाहेबांची काही महिन्यांनी तुरुंगातून सुटका झाली. नानासाहेब गोरे आग्वादच्या तुरुंगात असतानाच संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना पुण्यातून लोकसभेसाठी उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. गोरे सुटून आले त्यावेळी निवडणुकीची प्रचार मोहीम चालू होती. या चुरशीच्या निवडणुकीत ते विजयी झाले.

संयुक्त महाराष्ट्र व सीमा प्रश्न 

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्राने जो लढा दिला त्याबद्दल, आणि विशेषतः एसेम जोशींनी या लढ्याचे ज्या रीतीने नेतृत्व केले त्याबद्दल, नानासाहेबांना फार अभिमान वाटत असे. 1957 च्या निवडणुकीत समितीच्या अंतर्गत जे मतभेद झाले त्यासंबंधीची माहिती नानासाहेबांना सुटून आल्यावर समजली. संयुक्त आघाडीत काम करणे नानासाहेबांना जमत नसे आणि ते आपली मते स्पष्टपणे मांडीत. मात्र संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट सफल होईपर्यंत सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे अशीच त्यांची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झाली. त्यानंतर समितीतील मतभेद वाढू लागले आणि अखेर प्रजासमाजवादी पक्षाने समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या बाबतीत नानासाहेबांवर खूप टीका झाली, परंतु त्यांनी ती शांतपणे सोसली. 'आचार्य अत्रे काँग्रेसवाल्यांच्या विरुद्ध लिहीत असताना आपण टाळ्या वाजविल्या. आता ते आपल्याविरुद्ध लिहितांना लोकांनी टाळ्या वाजविल्या तर ते आपण सोसले पाहिजे. मात्र आपण आपली वैचारिक भूमिका सोडून चालणार नाही. राजकारणात मानसन्मानाप्रमाणेच अपमानही वाटपाला येणार. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना आपली पातळी कटाक्षाने सांभाळली पाहिजे' असे ते म्हणत.

'संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळीच सीमा प्रश्न सोडविण्याचा आग्रह धरावा,' ही एसेमची भूमिका महाराष्ट्रात प्रभावी ठरली नाही. याबद्दल नानासाहेबांना खंत वाटत असे. ते म्हणाले 'मुंबईसह संयुक्त, महाराष्ट्र झाल्यावर आम्ही सीमा भागातील मराठी बांधवांचा प्रश्न डावलला हे नाकबूल करण्यात अर्थ नाही.' या प्रश्नाबाबत नानासाहेबांनी अखेरपर्यंत किती प्रयत्न केले हे सर्वांना ठाऊक आहे. लोकशाहीच्या मार्गाने सीमा भागातील मराठी जनतेने आपले मत पंचवीस वर्षे निःसंदिग्धपणे व्यक्त केले असताही त्यांना न्याय मिळाला नाही, आपण तो त्यांना मिळवून देऊ शकले नाही याबद्दल नानासाहेब अनेकदा व्यथित होत.

समाजवादी चळवळीतील वादळ 

1962 च्या निवडणुकीत नानासाहेब गोरे समाजवादी चळवळीतील वादळ आणि एसेम हे दोघेही पराभूत झाले. त्यावेळी नानासाहेब कार्यकत्यांसमोरील भाषणात म्हणाले, '1957 साली संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर जनतेने आम्हाला निवडून दिले. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आमच्या पक्षाची भूमिका व कार्यक्रम यांचे मूल्यमापन करून लोकांनी आपल्याला बाजूस सारले. यामुळे खचून चालणार नाही. आपली भूमिका समाजात रुजेल यासाठी अधिक नेटाने प्रयत्न केले पाहिजेत.' परंतु घडले ते त्याच्या उलटच. 1965 साली बनारस येथे समाजवादी पक्षात पुन्हा फाटाफूट झाली आणि प्रजासमाजवादी पक्ष व संयुक्त समाजवादी पक्ष एकमेकांपासून अलग झाले. हे ज्या रीतीने घडले त्यामुळे फार मोठी कटुता निर्माण झाली. समाजवादी चळवळीतील हा अत्यंत दुर्दैवी क्षण होता. या फाटाफुटीमुळे अनेक कार्यकर्ते राजकारणापासून बाजूला झाले. बनारसहून नानासाहेब परत आल्यावर मी त्यांना भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले, "या वेळेच्या फाटाफुटीमुळे मी फार दुःखी आहे. विशेषतः एसेम आणि मी दोन वेगळ्या पक्षांत गेलो यांचे मला वाईट वाटते. माझी भूमिका तू नीट समजून घे. मी वैचारिक मतभेदांना कधी भीत नाही. पक्षामध्ये प्रामाणिक मतभेदांना स्थान असले पाहिजे आणि विचार मंथनातून पक्षाचे निर्णय झाले पाहिजेत असे माझे मत आहे. मात्र पक्षात परस्परांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. माझ्या हेतूंबद्दलच कोणी संशय घेऊ लागला तर मी त्याच्याबरोबर काम करू शकणार नाही. डॉ. लोहिया किंवा मधू लिमये यांच्यापेक्षा माझी काम करण्याची पद्धत वेगळी असेल, परंतु समाजवादावरील माझी निष्ठा कोणापेक्षाही कमी नाही. मला जर कोणी अमेरिकेचा दलाल म्हणत असेल तर मी त्यांच्याबरोबर काम करू शकणार नाही. दुसरेही एक स्पष्टीकरण करणे मला आवश्यक वाटते.

"मी प्रतिपक्षाशी उघडपणे लढेन. पक्षातही मी वादविवाद करीन. परंतु पक्षांतर्गत दोन गटांनी एकमेकांवर मात करण्यासाठी डावपेच करणे हे माझ्या स्वभावाला मानवत नाही. समाजवादी पक्षाच्या सुरुवातीच्या काळात काही कम्युनिस्ट आमच्या पक्षात काम करताना पक्ष फोडण्याचा उपद्व्याप करीत होते. मसानी यांनी ते उघडकीस आणले. तेव्हापासून कम्यूनिस्टांच्या बरोबर युनायटेड फ्रंट करण्यास मी विरोध केला. डॉ. लोहिया यांना अशी आघाडी करावी असे वाटते. मला ते मानवणारे नाही. याबाबतीत मला ना.गोखल्यांची नेमस्त कार्यपद्धतीच मान्य आहे. पक्ष लहान राहिला तरी चालेल पण तेथे भ्रातृभाव, परस्परविश्वास असला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. एसेम आता जरी डॉ. लोहियांच्या बरोबर गेले असले तरी त्यांना तेथील वातावरण मानवणार नाही असे मला वाटते." पुढे 1976 च्या निवडणुकीत डॉ. लोहिया यांनी विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणली. त्यावेळी प्रजासमाजवादी पक्ष या आघाडीत सामील झाला नाही. डॉ. लोहियांच्या नेतृत्वाखालील आघाडीस (संयुक्त विधायक दल, संविद) उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश यामध्ये बहुमत मिळाले. इतरत्रही आघाडीस चांगल्या जागा मिळाल्या, प्रजासमाजवादी पक्षास त्यामानाने अगदी कमी जागा मिळाल्या. त्यानंतर नानासाहेब गोरे बैठकीत म्हणाले, 'काँग्रेसची मगरमिठी सुटण्यासाठी लोहियांनी जो पवित्रा घेतला तो व्यावहारिक राजकारणाच्या दृष्टीने यशस्वी ठरला हे मी मान्य करतो.' आपण अलग राहिल्यामुळे लोकांमध्ये अप्रिय झालो ही वस्तुस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा एक वैचारिकदृष्ट्या भोंगळ असणारा शंभूमेळा आहे असे म्हणताना दुसऱ्या शंभूमेळ्यामध्ये सामील व्हावयाचे हे प्रजासमाजवादी पक्षास मान्य नाही. आम्ही विरोधी पक्षाच्या आघाडीपासून अलग राहिल्यामुळे विरोधी मतात विभागणी होते हा आक्षेप यावयास नको असेल तर आपली जेथे ताकद असेल तेथेच फक्त निवडणूक लढवावयाची हे पथ्य पक्षाने पाळावयास हवे होते. दुर्दैवाने मनोहर कोतवालसारख्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी माझे ऐकले नाही. त्यामुळे आपले मुंबईत फार नुकसान झाले, डॉ. मंडलिक, दंडवते, वर्दे हे आपले मोहरे अकारण पराभूत झाले, आणि त्यापेक्षाही आपली तात्विक भूमिका मलीन झाली. शिवाय लोक आपल्यावर नाराज झाले.

दक्षिण रत्नागिरीत आपण असेंब्लीच्या चार जागा लढवून तीन जागा जिंकल्या आणि नाथ पै यांनी लोकसभेची जागा जिंकली; अशी स्ट्रॅटेजीच सर्व ठिकाणी करावयास हवी होती. आपण आपल्या मर्यादा ओळखून विरोधी पक्षाच्या आघाडीस अपाय होऊ नये असे वागावे, हे माझे म्हणणे पक्षाच्या कार्यकारिणीत मान्य झाले, परंतु अनेक ठिकाणी त्याची कार्यवाही झाली नाही हे मला माझे राजकीय अपयश वाटते. 1970 साली प्रजासमाजवादी पक्षात काँग्रेसबरोबर आपण काही प्रश्नांबाबत संवाद करावा असा प्रवाह निर्माण झाला. नानासाहेब या भूमिकेस काही काळ अनुकूल होते, परंतु त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला. दोनही समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र यावेसे वाटू लागले, आणि 1972 मध्ये पुन्हा समाजवादी पक्ष निर्माण झाला. एस.एम. व नानासाहेब पुन्हापुन्हा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना समाधान वाटले. या वेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना नानासाहेब म्हणाले, 'आपल्यातील फाटाफुटीमुळे समाजवादी चळवळीचे फार नुकसान झाले. यानंतर एकजुटीने काम करून आपण हे अपयश धुवून काढले पाहिजे.' 

आणीबाणीस विरोध आणि जनता पक्ष 

1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली त्यावेळी नानासाहेब राज्यसभेचे सभासद होते. राज्यसभेत त्यांनी इंदिरा गांधींच्या लोकशाहीविरोधी धोरणावर सडेतोड टीका केली. त्यावेळी एस.एम. आणि नानासाहेब या दोघांनी निर्भयपणाने आणीबाणीविरुद्धची भूमिका जनतेत मांडली आणि लोकांचे मनोधैर्य टिकविले. पुढे आणीबाणी उठल्यानंतर 'जनता पक्ष' म्हणून समाजवादी पक्ष, लोकदल व जनसंघ यांनी एकत्रित निवडणुका लढविल्या आणि प्रचंड यश संपादन केले. या नंतर दिल्लीमध्ये या तीन पक्षांनी जनता पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या विलीनीकरणाच्या वेळी समाजवादी पक्षातील अनेक कार्यकर्ते साशंक होते. परंतु एसेम व नानासाहेब यांनी जयप्रकाशजींची भूमिका पूर्णपणे मान्य करून समाजवादी पक्ष बरखास्त करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. पुढे ज्या वेळी जनता पक्षांतर्गत मतभेद विकोपास गेले तेव्हा नानासाहेब इंग्लंडमधून हायकमिशनर पद सोडून परत आले. त्यांना जनता पक्षाचे सरकार पाच वर्षे टिकावे असे वाटत होते. 'आपण मतदारांना अभिवचन दिले आहे. पुढील निवडणुकीच्या वेळी आपण फेरविचार करावा. तोपर्यंत आपले सरकार चालवावे,' असे मत ते मांडीत होते. जनता पक्षाचे सरकार पडल्यावर नानासाहेब गोरे बैठकीत म्हणाले, 'डॉ. लोहियांनी 1967 साली जे केले त्याच्या पुढचे पाऊल जयप्रकाशजींनी 1976 मध्ये आम्हाला टाकायला सांगितल्यावर, त्यांच्या आदेशानुसार आम्ही समाजवादी पक्ष बरखास्त केला, त्याचप्रमाणे स्वतःचे अस्तित्व विसरून जनता पक्षात काम करण्याच्या निर्णयानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; परंतु मूलभूत मतभेद असलेल्या पक्षांमध्ये ऐक्य निर्माण होऊ शकत नाही हे पुन्हा आमच्या प्रत्ययास आले.' जनता पक्षाच्या सरकारच्या विघटनानंतर पुन्हा समाजवादी पक्ष स्थापन करावा अशी सूचना काही कार्यकर्त्यांनी केली त्यावेळी नानासाहेबांचे चित्त काहीसे द्विधा होते. एसेम यांची भूमिका मात्र स्पष्ट होती. ते म्हणाले, 'समाजवादी पक्षाचे पुनरुज्जीवन न करता जनता पक्षाच्या द्वारेच आपण लोकशाही समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी काम करावे असे मला वाटते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संघर्ष वाहिनी निर्माण झाली. अनेक नवीन तरुण कार्यकर्ते आर्थिक व सामाजिक समतेसाठी होणाऱ्या लढ्यात आघाडीवर राहतील, त्यांना समाजवादी पक्षात आणण्याचा अट्टाहास करू नये. जयप्रकाशजींचा वारसा जनता पक्षाने पुढे चालविला पाहिजे.' नानासाहेब गोरे यांनी एसेमनी मांडलेली ही भूमिका मान्य केली, मात्र दुहेरी निष्ठा असणाऱ्या व्यक्तींना या गटांना जनता पक्षात स्थान देऊ नये, असे आग्रहाने मांडले.

जनता पक्षाचे रूपांतर पुढे जनता दलात झाले आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले त्यावेळी नानासाहेबांना फार समाधान वाटले. अखेरपर्यंत त्यांनी जनता दलाला साथ दिली. विश्वनाथप्रताप सिंग यांचे मंत्रिमंडळ पडल्यानंतर नानासाहेब गोरे क्रियाशील राजकारणापासून बरेचसे दूर झाले. मात्र ते विविध प्रश्नांवर आपली मते जाहीरपणे मांडीत असत. त्यांची मते अनेकदा विवाद ठरली. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनीही काही वेळा नाराजी व्यक्त केली, परंतु नानासाहेबांनी आपल्या मतांना कधी मुरड घातली नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिनिष्ठ तर्कसंगत विचारपद्धती ही त्यांची वैशिष्ट्ये प्रकर्षाने प्रगट होत. नानासाहेबांना म. गांधीच्याबद्दल मोठा आदर असला तरी गांधीजींना अपेक्षित असलेले विकेंद्रीकरण हे व्यवहार्य नाही असे त्यांचे मत होते. जवाहरलाल नेहरूंच्या अपूर्णतेवर त्यांनी टीका केली असली तरी, भारताच्या जीवनाला आधुनिक वळण देण्याचे फार मोठे कार्य पं. नेहरूनी केले असे मत ते स्पष्टपणे मांडीत.पं. नेहमीच्या नेतृत्वाखाली जे पायाभूत उद्योगधंदे उभारले गेले, त्यांच्यामुळेच भारताच्या औद्योगिक प्रगतीचा पाया घातला गेला आणि या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीमुळेच संरक्षण क्षेत्रात आपण सामर्थ्यवान झालो, असे नानासाहेबांचे मत होते. पाकिस्तान व चीन या दोन शेजाऱ्यांच्या आक्रमक पवित्रे लक्षात घेऊन आपण आपली संरक्षण सिद्धता केली पाहिजे ही भूमिका ते मांडीत. विज्ञाननिष्ठेचा आणि आधुनिकतेचा पाठपुरावा करतानाच, आपण पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरूक असले पाहिजे असे प्रतिपादन ते सतत करीत. मेधा पाटकर यांनी ज्या झुंजारपणे आणि नेटाने चळवळ चालविली त्याबद्दल नानासाहेबांना फार कौतुक होते. त्यांनी ही भावना एका लेखातून व्यक्त केली. त्याचबरोबर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनास पाठिंबा देताना, 'मोठी धरणेच नकोत अशी भूमिका घेऊन चालणार नाही. आदिवासींना न्याय देताना त्यांना आधुनिक जीवनाच्या प्रवाहात आणले पाहिजे,' असेही त्यांनी स्पष्टपणे लिहिले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्यात त्यांनी नरेंद्र दाभोलकरांना सतत पाठिंबा दिला. तसेच बाबा आढावांशी काही बाबतीत मतभेद व्यक्त केले तरी बाबांच्या प्रबोधन कार्याचे आणि समतेच्या स्थापनेसाठी चाललेल्या चळवळींचे त्यांनी आग्रहपूर्वक समर्थन केले.

नानासाहेबांनी जेव्हा 'साधने'चे संपादकत्व सोडले त्यावेळी त्यांनी 'साधने' साठी नियमाने लिहिले पाहिजे असा आग्रह आम्ही धरला, आणि वसंतरावांनी त्यांना 'आपुलाचि वाद आपणासी' हे सदर सुचविले. नानासाहेबांना ते एकदम पसंत पडले. ते म्हणाले, 'आपण इतरांना काय करावे ते सांगतो. परंतु आपणही सतत अंतर्मुख राहिले पाहिजे. स्वतःशी वाद घालण्याचा प्रामाणिकपणा आपल्यात असला पाहिजे.' या सदरात आणि नंतरही नानासाहेबांनी जे लिहिले त्यावरून त्यांच्या मनात काय होते याची स्पष्ट कल्पना येते. ट्रेड युनियन चळवळ चालविताना आपण कामगारांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत केले परंतु उत्पादन वाढविणे ही कामगारांची जबाबदारी आहे हे त्यांना आपण सांगितले नाही, याची नानासाहेबांना खंत वाटे. तसेच आपल्याकडील सार्वजनिक उद्योगधंदे तोट्यात चालत असताना त्याबद्दल पुरेशी जागरूकता समाजवादी चळवळीने दाखवली नाही, हे ते मान्य करीत. ते एका भाषणात म्हणाले, 'पब्लिक सेक्टर हा जर समाजवादी समाजरचनेचा आधार असेल तर तो वर्षानुवर्षे तोट्यात चालण्याने आपण आपल्याला हव्या असलेल्या रचनेच्या मुळावरच आघात करतो. खासगी क्षेत्राशी स्पर्धा करण्याचे सामर्थ्य पब्लिक सेक्टरमध्ये असले पाहिजे.'

राममंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी कोर्टाने तातडीने निकाल द्यावा असे नानासाहेबांना वाटत होते. ते ज्या वेळी शक्य दिसेना त्या वेळी या प्रकरणी बाबरी मशीद कमिटीने माघार घेतल्यास अयोध्येचा वाद संपेल आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे नवे पर्व निर्माण होऊ शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

शिक्षण क्षेत्रासंबंधी नानासाहेबांनी जे लिहिले आहे त्यामध्ये प्राध्यापकांना सुरक्षितता व चांगले पगार मिळाल्यावर शिक्षणाचा दर्जा उच्च होण्याऐवजी खालावला आहे यासंबंधी टीका केली होती. भारतात लोकसंख्येवर नियंत्रण घालण्याच्या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र काम करावयास हवे होते असे मत नानासाहेब मांडीत, जनता पक्षाच्या राजवटीत कुटुंब नियोजनाची पीछेहाट झाली याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. नानासाहेबांच्या या आत्मटीकेमुळे काही समाजवादी मित्र रागावले तेव्हा ते म्हणाले, 'समाजाला जे पथ्यकर आहे असे मला वाटते ते काही जणांना अप्रिय वाटले तरी मी ते बोलणारच.' 

नानासाहेबांचा हा 'आपुलाची वाद आपणांशी' अखेरपर्यंत चालू होता.

सामाजिक समतेसाठी निकराचा संघर्ष 

नानासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या दहा वर्षात प्रत्यक्ष राजकीय कार्यातील सहभाग कमी केला. त्याचवेळी सामाजिक समतेच्या लढ्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची मशाल पुन्हा पेटवली. त्यांच्या लेखणीचे प्रखर रूप यावेळी प्रकट झाले आणि चातुर्वर्ण्यं, जातिव्यवस्थेतील अन्याय, हिंदुत्ववादी राजकारण यांवर त्यांनी आसूडाचे फटके मारले. या काळात स्पष्ट आणि सडेतोड मतप्रदर्शन करताना नानासाहेबांनी सर्व तऱ्हेची अप्रियता निर्भयतेने सोसली आणि समाजासमोर कणखर पुरोगामी भूमिका मांडली. सामाजिक समतेसाठी आपल्या सर्व शक्ती नानासाहेबांनी या काळात पणास लावल्या. एका चर्चेत ते म्हणाले, मी ज्यावेळी 1942 पासून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व प्रश्नांची सोडवणूक करता येईल असे मला वाटत होते. पुढे मार्क्सचे साहित्य वाचल्यानंतर स्वातंत्र्यामध्ये आर्थिक समतेचा आशय हवा ही जाणीव माझ्यामध्ये तीव्रतेने निर्माण झाली आणि काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेत मी पुढाकार घेतला. मला आज असे वाटते की डॉ. आंबेडकर जर स्वातंत्र्यलढ्यात असते तर सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही या त्यांच्या मतास माझ्यासारख्या अनेकांचा जोराचा पाठिंबा मिळाला असता. मला जातीयता मान्य नव्हती. सामाजिक समता असावी असे वाटत असले तरी स्वातंत्र्य लढ्यासच अग्रक्रम असला पाहिजे असे वाटत होते. भारतातील समतेच्या लढ्यामध्ये आर्थिक विषमतेविरुद्ध करावयाच्या संघर्षाप्रमाणेच सामाजिक विषमतेच्या निर्मूलनासाठीही संघर्ष केला पाहिजे हे मला 1952 नंतर तीव्रतेने वाटू लागले. डॉ. बाबासाहेबांच्या 'अनायहिलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथाच्या अभ्यासानंतर भारताच्या संदर्भात मार्क्सवादी विचार अपुरा आहे आणि जातिव्यवस्था राहिली तर समता येऊच शकणार नाही हे मला मनोमन पटले. 1972 नंतर हे मत मी अधिक आग्रहाने मांडू लागलो. दलितांना व अन्य मागास जमातीना शतकानुशतके ज्ञानापासून आपण वंचित ठेवले आणि त्यांना माणूस म्हणूनही वागविले नाही, हा फार मोठा अन्याय होता. त्यामुळे आपण स्वतःचे आणि देशाचेही नुकसान करून घेतले. जातिव्यवस्थेमुळे हिंदू समाज कधी एकात्म होऊ शकला नाही आणि त्यामुळेच आपल्यावरील परकीय आक्रमणांना आपण एकजुटीने प्रतिकार करू शकलो नाही. आपल्याकडील तथाकथित उच्चवर्णीयांनी परकीयांच्या पुढे हार खाल्ली आणि त्यांच्या सार्वभौमत्वाला मान्यता देतांना आपले सामाजिक वर्चस्व टिकावे अशी मात्र खबरदारी घेतली. स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतर सामाजिक विषमतेची जाणीव काही प्रमाणात वाढली. परंतु राजकीय चळवळीसच अग्रस्थान दिले गेले. कम्यूनिस्टांनी व समाजवाद्यांनी सामाजिक समतेच्या प्रश्नास अधिक महत्त्व द्यावयास हवे होते. 'ज्यांना आम्ही सर्व क्षेत्रांत मागे ठेवले त्यांना आपल्याबरोबर आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात, नोकऱ्यांमध्ये खास सवलती आणि जादा जागा दिल्या पाहिजेत असे माझे स्पष्ट मत आहे आणि अनेकांना ते अप्रिय वाटले तरी मी ते मांडीत राहणार आहे.' या भूमिकेवरूनच मंडल आयोगाचे नानासाहेबांनी सतत आग्रहाने समर्थन केले.

हिंदुत्ववादी प्रवृत्तींशी आणि तथाकथित उच्चवर्णीयांशी केलेला संघर्ष हा नानासाहेबांच्या आयुष्यातील अखेरचा संघर्ष होता. ते एका भाषणात म्हणाले, 'हिंदुत्ववादी आज हिंदू समाजातील उच्चनीच भाव गेला पाहिजे असे वरवर म्हणत असले तरी मी जे जवळून पाहतो आणि अनुभवतो त्याप्रमाणे त्यांना तथाकथित उच्चवर्णीयांचेच वर्चस्व राहावे असे वाटते. त्यांच्या मनातील चातुर्वर्ण्य गेलेले नाही. भारतात हिंदू व मुस्लिम समाजांत भांडणे होत राहिली तर आपली प्रगती होऊ शकणार नाही, असे माझे मत आहे आणि म्हणून जुने वाद उकरून काढू नका असे मी सांगतो.' नानासाहेबांना हमीद दलवाईच्या भूमिकेचे फार महत्व वाटत असे. ते म्हणत, 'हिंदु समाजात ज्याप्रमाणे फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकर असे समाजसुधारक झाले त्याप्रमाणे मुस्लीम समाजालाही समाजसुधारक निर्माण झाले पाहिजेत. हमीद दलवाई यांनी निर्भयपणे या सुधारणांचा पुरस्कार केला म्हणूनच त्यांच्याबद्दल मला फार प्रेम व आदर वाटत असे. नानासाहेबांनी मुस्लिम सत्यशोधक समाजास या भूमिकेवरूनच सतत पाठिंबा दिला.

नानासाहेबांनी जातीयवादी भूमिकेला कडाडून विरोध केला त्यावेळी पांढरपेशा वर्गात त्यांच्याविरुद्ध क्षोभ निर्माण झाला. नानासाहेबांना गलिच्छ पत्रे येत, फोनवरुन घाणेरड्या शिव्या व धमक्या दिल्या जात, परंतु नानासाहेब यत्किंचित् डगमगले नाहीत. 'तुम्हांला जोड्याने मारावयाचे आहे,' असा फोन आला तेव्हा नानासाहेब शांतपणे म्हणाले, 'मी घरातून रस्त्यावर येऊन थांबतो. तुम्ही जाहीरपणे चौकातच मला जोडे मारा.' एका भाषणात ते म्हणाले, 'आगरकरांना जे सोसायला लागले त्या मानाने ही शिवीगाळ काहीच नाही. मी तर आगरकरांच्या मानाने अगदी लहान माणूस आहे.'

नानासाहेबांनी कॉलेजमध्ये असताना आगरकरांचे विचार वाचले. ते त्यांना पटले. त्यानुसार त्यांनी घरात प्रथम वडिलांच्या जुन्या आचारांना विरोध केला, पुढे अनेक चळवळींमध्ये आघाडीवर राहून लढताना त्यांना आपल्या समाजाची अधिकाधिक ओळख पटत गेली. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करीत असताना आर्थिक समतेइतकेच सामाजिक समतेस महत्त्व आहे. भारतीय समाज प्रगतीशील होण्यासाठी जातीजातींतील उच्चनीच भाव नष्ट केला पाहिजे, हे त्यांना मनोमन पटले. त्यांच्या भूमिकेच्या या विकासामागे आगरकरांप्रमाणेच म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचारही होते. 'इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार,' या बाण्यानेच नानासाहेब गोरे हे अखेरपर्यंत जगले. थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, राजकारणाच्या धकाधकीतही श्रेष्ठ ललित लेखन करणारे साहित्यिक आणि कडवे समाजसुधारक म्हणून नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजमानसावर स्पष्टपणे उमटला.

नानासाहेबांच्या संघर्षमय जीवनापुढे मी विनम्र आहे.

Tags: इंदिरा गांधी. गोवा मुक्तीसंग्राम समाजवादी पक्ष डॉ.लोहिया लो.टिळक नानासाहेब गोरे Indira Gandhi Goa Liberation Struggle Samajwadi Party Dr. Lohia Lo. Tilak #Nanasaheb Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके