"मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात." 10 जूनच्या शेवटच्या पत्रावरून साने गुरुजींनी त्यांची जीवितयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला होता हे स्पष्ट होते. आपले जीवितकार्य संपले आहे असे साने गुरुजींना मनोमन वाटू लागले होते. हरिभाऊ लिमये यांनी साने गुरुजींनी झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी काय केले, ते कसे वागले हे सविस्तर सांगितले आहे. अंगावरच्या कपड्यांतच नेण्याची विनंती करून मृताची इच्छा पाळा असे साने गुरुजींनी लिहिले होते. अंत्यविधीचा बोजा कुणावर पडू नये म्हणून 30 रुपये एका पुडीत घालून त्यावर 'अखेरच्या विधीसाठी' असे लिहून ठेवले होते. पुस्तकाच्या शेवटी हरिभाऊ लिमयेंनी साने गुरुजींच्या मृत्यूबद्दल, सेनापती बापट, आचार्य जावडेकर, आचार्य अत्रे आणि आचार्य भिसे नी जे लिहिले ते उद्धृत केले आहे.
महाराष्ट्रातील संस्कारक्षम वयातील मुलामुलींच्यासाठी साने गुरुजींनी 'श्यामची आई', 'श्री शिवराय', 'लोकमान्य टिळक', 'महात्मा गांधी' आदी नेत्यांची चरित्रे; 'सुंदर पत्रे' आणि जगातील उत्तम पुस्तकांच्या आधारे अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या. साने गुरुजींच्या त्यागी, समर्पित जीवनामुळे असंख्य मराठी माणसांच्या मनावर सुसंस्कार झाले. साने गुरुजींच्या जीवनाची व्यापक ओळख करून देणारी 'साने गुरुजींची जीवनगाथा' राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी लिहिली. साने गुरुजींच्या जीवनावर अनेक छोटी-मोठी 'पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत.
हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेले 'आम्ही जातो आमुच्या गावा' हे साने गुरुजींचे चरित्र नाही; मात्र साने गुरुजींच्या मृत्यूवर या पुस्तकात आगळा प्रकाश टाकलेला आहे. 11 जून 1950 ला साने गुरुजींनी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने अनेकांना धक्का बसला. गेल्या अर्धशतकात साने गुरुजींनी त्यांच्या जीवनाचा शेवट का केला, या विषयावर अनेकांनी लिहिले आहे. हरिभाऊ लिमये यांना साने गुरुजींचा सहवास लाभला; आणि साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांनी गेली पन्नास वर्षे चिंतन आणि लेखनही केले आहे. या पुस्तकात हरिभाऊ लिमये यांनी साने गुरुजींची मृत्यूविषयक भूमिका सप्रमाण आणि विस्ताराने मांडली आहे. प्रथम त्यांनी साने गुरुजीची जीवनविषयक भूमिका गुरुजींच्या शब्दांतच सांगितली आहे. साने गुरुजींनी लिहिले आहे.
"मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. समोरचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञानमय नि कलामय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात." साने गुरुजींनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात समर्पण भावनेने काम केले. दहा वर्षांहून अधिक काळ कारावास सोसला. कारण स्वातंत्र्याशिवाय भारतीयांचे मन बहरणार नाही; जीवन समृद्ध होणार नाही असे साने गुरुजींना मनोमन वाटत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे ही जीवनाची उपासना आहे अशीच साने गुरुजींची भूमिका होती. साने गुरुजींचे मित्र सर्व राजकीय पक्षांमध्ये होते. परंतु त्यांचे मन राजकीय पक्षांच्या चौकटीत बसणारे नव्हते. सत्तासंपादन ही त्यांना जीवनाची उपासना वाटत नव्हती.
1950 च्या मे महिन्यात राष्ट्र सेवादलाच्या सांगली येथे भरलेल्या शिबिरात साने गुरुजींनी तरुण कार्यकत्यांसमोर जी भाषणे केली त्यांमधून त्यांनी नवभारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी काय करावे, ते स्पष्टपणे सांगितले. साने गुरुजींचा अपार विश्वास जनशक्तीवर आणि विशेषतः युवाशक्तीवर होता. युवकांनी आपले श्रम आणि आपले ज्ञान यांच्या साहाय्याने भारतीय समाजाचे आमूलाग्र परिवर्तन घडवून आणावे, हे सांगताना साने गुरुजींनी राजकीय स्वातंत्र्य हे अपूर्ण आहे, ही भूमिका स्पष्टपणे मांडली. भारतीय समाजात सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण झाली पाहिजे; सर्व मुलामुलींना शिक्षणाची उत्तम संधी मिळाली पाहिजे आणि भारताचे जीवन सर्व बाजूंनी समृद्ध झाले पाहिजे, हे साने गुरुजींचे स्वप्न त्यांनी राष्ट्र सेवादलाच्या तरुण कार्यकर्त्यांसमोर प्रभावीपणे मांडले. साने गुरुजींना असा विश्वास होता की नवजीवनाचा हा संदेश तरुणांना प्रेरणा देईल.
साने गुरुजींनी या भाषणात, बुद्धिवादी समाजावर श्रमाचा संस्कार झाला पाहिजे, हा विचार उत्कटतेने सांगितला. युवक-युवतींच्या समोर नवभारताबद्दलचे सुंदर स्वप्न साने गुरुजींनी ठेवले आणि त्यानंतर काही दिवसांनीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हरिभाऊ लिमये यांनी या पुस्तकात साने गुरुजींची मृत्यूविषयक भूमिका त्यांच्या लेखनाच्या आधारे विस्तृतपणे मांडली आहे. 'भारतीय संस्कृती' या पुस्तकात 'मृत्यूचे काव्य' या शेवटच्या प्रकरणात मृत्यूविषयीची त्यांची दृष्टी व विचार सुस्पष्टपणे मांडले आहेत. साने गुरुजींचा विचार असा आहे की, 'मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप आहे. जीवन व मरण या दोन्हीमध्ये परम मंगलभाव आहे. जीवन व मरण ही वस्तुतः एकरूपच आहेत. निशेतूनच शेवटी उषा प्रकट होते व उयेतूनच पुन्हा निशा निर्माण होते जीवनाच्या वृक्षाला मरणाचे फळ येते व मरणाला जीवनाचे फळ येते.' साने गुरुजींनी लिहिले आहे : "मृत्यू म्हणजे महायात्रा, मृत्यू म्हणजे महाप्रस्थान. मृत्यू म्हणजे महानिद्रा. मरण म्हणजे अंधार नव्हे. मरण म्हणजे अनंत प्रकाश. भारतीय संस्कृतीने मरणाला जीवनाहून सुंदर व मधुर बनविले आहे.
भारतातील सर्व प्रकारचे दैन्य, दास्य, सर्व प्रकारचे विषमय वैषम्य, सर्व प्रकारचा अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील त्यावेळेस भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंत होईल व भारत नवतेजाने फुलेल. हरिभाऊ लिमये यांनी या पुस्तकात साने गुरुजींच्या शब्दांतूनच त्यांच्या मृत्यूविषयक भूमिकेवर लख्ख प्रकाश टाकला आहे. साने गुरुजींनी चिरनिद्रा घेण्यापूर्वी त्यांचे मनोगत व्यक्त करणारी जी पत्रे मधू लिमये व अन्य मित्रांना लिहिली ती हरिभाऊ लिमये यांनी या पुस्तकात दिली आहेत. 3 जूनच्या पत्रात साने गुरुजी म्हणतात, "जगाचा खरा इतिहास मानवाला 'भिऊ नको, भिऊ नको' असे सांगत आहे. जगातील यज्ञ व बलिदाने यांमधून तोच ध्वनी येत आहे. सॉक्रेटिसाने घेतलेला विषाचा प्याला, ख्रिस्ताचा क्रॉस, ब्रूनोला जाळणे या सर्वांतून 'भिऊ नका, भिऊ नका' असा घोष येत आहे."
साने गुरुजींनी 3 जूनच्याच पत्रात लिहिले आहे.-
"मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात." 10 जूनच्या शेवटच्या पत्रावरून साने गुरुजींनी त्यांची जीवितयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला होता हे स्पष्ट होते. आपले जीवितकार्य संपले आहे असे साने गुरुजींना मनोमन वाटू लागले होते. हरिभाऊ लिमये यांनी साने गुरुजींनी झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी काय केले, ते कसे वागले हे सविस्तर सांगितले आहे. अंगावरच्या कपड्यांतच नेण्याची विनंती करून मृताची इच्छा पाळा असे साने गुरुजींनी लिहिले होते. अंत्यविधीचा बोजा कुणावर पडू नये म्हणून 30 रुपये एका पुडीत घालून त्यावर 'अखेरच्या विधीसाठी' असे लिहून ठेवले होते. पुस्तकाच्या शेवटी हरिभाऊ लिमयेंनी साने गुरुजींच्या मृत्यूबद्दल, सेनापती बापट, आचार्य जावडेकर, आचार्य अत्रे आणि आचार्य भिसे नी जे लिहिले ते उद्धृत केले आहे. हे पुस्तक केवळ 64 पृष्ठांचे आहे. परंतु त्या पुस्तकामुळे साने गुरुजींचा मृत्यू ही त्यांच्या जीवनातील मंगल घटना होती, साने गुरुजींच्या जीवनाची ती उदात्त अखेर होती हे समजून येते.
Tags: ग. प्र. प्रधान मृत्यू साने गुरुजीं G.P.Pradhan death Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या