डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींचे मन - एक समरभूमी

अत्युच आदर्शाची ओढ आणि स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव यांच्यामधील रस्सीखेच गुरुजींच्या मनाला सतत विकल करीत राही. सार्वजनिक जीवनातील धडपड आणि तरुणांचे सान्निध्य यांनी त्यांच्या जीवनाला जणू संजीवनी मिळाली होती.

साने गुरुजींचे जीवन ही एक समरप्रसंगांची मालिकाच होती. या समरप्रसंगांतील हाल-अपेष्टांतूनच त्यांच्या मनाला सामर्थ्य लाभते. त्यांच्या मनात निराशेचे मळभ आले. परंतु ते कधी वाकले नाहीत. समरप्रसंगांना ते निर्भयतेने सामोरे गेले. साने गुरुजींच्या या तेजस्वी जीवनाचे अनेकांनी वर्णन केले आहे. ते जवळून पाहण्याचे भाग्य अनेकांप्रमाणेच मलाही लाभले. या तेजस्वी जीवनापुढे नतमस्तक होताना माझ्या हे लक्षात आले की साने गुरुजींचे मन ही एक समरभूमी होती. या समरभूमीवरील द्वंदाचे स्वरूप काय होते हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. मला जे थोडे फार उमजले ते मांडण्याचा या लेखात मी प्रयत्न करीत आहे.

लहानपणी जे संस्कार पांडुरंगाच्या मनावर झाले, त्यामुळे त्याला जीवनातील पावित्र्याबद्दल ओढ वाटू लागली. त्याचवेळी त्याला, आपले मन पुरेसे शुद्ध नाही. राग, लोभ, मत्सर आदी दुर्गुणांनी ते डागळलेले आहे, ही जाणीवही तीव्रतेने झाली. 'देवा, माझ्यातील हे दोष, दुर्गुण नाहीसे कर, अशी तो परमेश्वराची प्रार्थना करी. त्याचवेळी त्याला असेही वाटे की आपल्याळा जे दुःख सोसावे लागेल त्यातूनच आपल्या मनातील हे किल्मिष कमी होत जाईल. मनातील अपराधित्वाची भावना आत्मक्लेशामुळे कमी होई हे त्याने अनुभवले. विद्यार्थिदशेत पांडुरंग सदाशिव सानेच्या मनाची अशी आगळीच घडण झाली. पुढे पुण्याला स.प.कॉलेजमध्ये शिकताना, चौफेर वाचन करताना, त्याच्या मनाला जीवनातील उदात्तेच्या शिखरांचे दर्शन घडले. त्याचवेळी मी या शिखरापर्यंत पोहोचू शकेन की नाही? असे काहूर त्याच्या मनात उठत असे. स्वतःच्या अपूर्णतेची त्याची जाणीव काही वेळा इतकी तीव्र होत जाई की निराशेने त्याचे मन काळवंडून जात असे. त्याच वेळी या अपूर्णतेवर मात करावयाची असेल तर अग्निदिव्य केले पाहिजे, असेही त्याला वाटे. अशा मानसिक अग्निदिव्यातून होरपळून निघत असतानाच उदात्ततेच्या शिखराकडे झेप घेण्याची एक ऊर्मी त्याच्या मनात उसळून येई. तो कठोर तपश्चर्येच्या मार्गाकडे वळत असे आणि या मार्गातील काट्यांनी रक्तबंबाळ होताना त्याचे मन समाधानाने भरून जात असे.

बौद्धिक जीवनाचा विस्तार 

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यावर साने एम.ए.च्या अभ्यासासाठी अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात दाखल झाले. तेथील ग्रंथभांडार पाहून बौद्धिक जीवनाच्या भव्यतेचे दर्शन त्यांना झाले, ते झपाटयाने एकामागून एक ग्रंथ वाचू लागले. पाश्चात्य तत्वज्ञांचे विचार, वेद आणि उपनिषदांतील अद्वैताच्या संकल्पना यांचा अभ्यास करताना या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या ज्ञानोपासकाला अपार बौद्धिक आनंद मिळाला. पुढे एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात राहून तत्वज्ञानाचा गाढा व्यासंग करून ग्रंथलेखन करणे साने यांना सहजशक्य होते. परंतु एक तर तत्वज्ञानातील अमूर्त संकल्पनांच्या अभ्यासात त्यांचे मन वा बुद्धी रमत नव्हती. त्याचबरोबर तत्त्वज्ञान हा केवळ बौद्धिक विकास होऊन चालणार नाही, त्याचे जीवनात आचरण केले पाहिजे आणि ते करताना अनेक कसोटयांना उतरले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात प्रबल होत होता.

साने यांनी लहानपणापासून दारिद्र्याचे चटके सोसले होते आणि आता भोवतालच्या जीवनातील दारिद्र्य आणि विपत्ती पाहून त्यांचे मन अस्वस्थ होत होते. या जीवनापासून दूर, स्फटिक मिनारात राहून केवळ ज्ञानोपासना करणे त्यांच्या स्वभावाला मानवणारे नव्हते. अमळनेरमधील ज्या मित्रांबरोबर ते बोलत, चर्चा करीत त्यांच्यापैकी प्रताप हायस्कूलचे मुख्याध्यापक गोखले यांनी साने गुरुजींच्या मनाची अस्वस्थता बरोबर ओळखली. प्रताप हायस्कूलमध्ये गोखल्यांच्या समवेत, वाड, बेडेकर आदी राष्ट्रीय वृत्तीचे ध्येयवादी शिक्षक होते. गोखले सान्यांना म्हणाले, "तुम्ही आमच्या हायस्कूलमध्ये शिकवायला या. शिकवण्यात तुम्हांला आनंद वाटेल. मुलांच्या सहवासात तुमच्या मनाला शांतता लाभेल," 

मुक्त आत्माविष्काराचा काळ 

सान्यांच्या मनावर लहानपणी त्यांच्या आईच्या जीवनाचा जो संस्कार झाला होता त्यामुळे ते मातृह्रदयी झाले होते; आणि कोणावर तरी मायेची पाखर घातली पाहिजे, ही भावना त्यांच्या मनात सतत उसळून येत होती. त्यामुळे गोखल्यांच्या म्हणण्याला होकार देऊन साने हे प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक झाले आणि विद्यार्थ्यांना व वसतिगृहातील मुलांना आईच्या मायेने वाढवू लागले. प्रताप हायस्कूलमधील सहा वर्षांचा कालखंड हा साने सरांना विलक्षण साफल्याचा वाटला. ते विद्यार्थ्यांच्या मनोभूमीत सुविचार पेरीत होते आणि जे पेरले होते त्याला येणारे अंकुर पाहून त्यांना अपार समाधान लाभत होते. हा कालखंड साने गुरुजींच्या जीवनातील मुक्त आत्माविष्काराचा आणि मनमोकळ्या संवादाचा होता. खानदेशातील शेतकरी कुटुंबांतून आलेल्या अनघड मुलांच्यामध्ये साने-सर रमून गेले. मुलांसाठी चालविलेल्या हस्तलिखितांतून जगदवंद्य विभूतींची ओळख करून देण्यासाठी, नवे विचार सांगण्यासाठी साने सर रात्री जागून हाताने सगळा मजकूर लिहीत. आजारी विद्यार्थ्यांची, आजारी पडलेल्या शाळेतील शिपायाची सर्व तन्हेची शुश्रूषा करण्यात त्यांना फार समाधान वाटे.

मात्र अध्यापनक्षेत्रात उत्कटतेने काम करताना सानेसरांना बदलत्या राजकीय परिस्थितीचे भान होते. 1930 च्या स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग महात्मा गांधीनी फुंकले आणि साने सरांनी समर्पण भावनेने त्यात उडी घेतली. 1930 ते 1947 या कालखंडात साने गुरुजींच्या राजकीय कर्तृत्वाला बहर आला. ते प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहिले आणि अनेक व्याख्यानातून त्यांनी असंख्य तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. सत्याग्रहींचे ते गुरुजी झाले. हे काम करताना अंतर्बाह्य पेटलेल्या साने गुरुजींच्या हृदयाचा आविष्कार 'येथून तेथून सारा पेटू दे देश' या काव्यपंक्तीत झाला. या कालखंडात गुरुजींच्या जीवनात एक वादळही झाले. स्वातंत्र्य हे श्रमिकांसाठी असावे या विचाराने भारलेल्या साने गुरुजींनी अंमळनेरच्या कामगारांना न्याय मिळावा म्हणून प्राण पणाला लावले. त्यावेळी कम्युनिस्ट कार्यकर्ते त्यांचे सहकारी होते. परंतु स्वातंत्र्य चळवळीसच अग्रक्रम देणाऱ्या साने गुरुजींना कम्युनिस्ट पक्षाची राजकीय भूमिका मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे सोशलिस्ट पार्टीच्या मधु लिमयांच्या समवेत ते स्वातंत्र्याची मशाल घेऊन खानदेशात सर्वत्र भ्रमण करू लागले. सतत कारावास त्यांच्या वाट्याला आला आणि त्यांनी तो आनंदाने भोगला.

1945 साली तुरुंगातून सुटल्यावर साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे यासाठी एक वर्ष लोकजागर मोहीम केली. 1946 साली पंढरपूरला उपोषण केले. उपोषण काळातील साने गुरुजींच्या भाषणांतून विषमतेबद्दलचा त्यांच्या मनातील तीव्र संताप, श्रोत्यांच्या मनात समतेचा अग्नी पेटविणाऱ्या शब्दांतून प्रगट झाला.

स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत समर्पणासाठी एक उदात्त ध्येय होते आणि या मार्गावर वाटचाल करताना साने गुरुजींना महात्मा गांधींचा मोठा आधार वाटत होता. 1948 साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर साने गुरुजींच्या मनातील प्रकाशच जणू कोपला. त्यांनी आत्मशुद्धीसाठी उपोषण केले. पण त्यांच्या मनाला शांतता लाभली नाही. मनातील अस्वस्थतेवर मात करण्यासाठी साने गुरुजी नवनवीन कामात स्वतःला झोकून देत होते. 15 ऑगस्ट 1948 ला त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केले. 'साधनात स्फूर्तिदायी अनेक अग्रलेख लिहिले. याच दीड वर्षांच्या काळात साने गुरुजींनी आंतरभारतीचे त्यांचे स्वप्न साहित्यिकांसमोर मांडले. याच काळात राष्ट्र सेवादलातील तरुण सैनिकांना ज्ञान आणि श्रम यांच्या संगमाकडे जाण्याचा संदेश साने गुरुजींनी दिला. परंतु हे सारे करीत असतानाच गुरुजींच्या तीव्र संवेदनशील मनाला झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीची चाहूल लागत होती. अशा वेळी जर आचार्य विनोबा भावे यांचे भूदान आंदोलन सुरू झाले असते तर साने गुरुजींना समर्पणासाठी नवे ध्येय गवसले असते. स्वातंत्र्य चळवळीत विनोबाजींच्या समवेत धुळे तुरुंगात असताना गीता प्रवचनांतून साने गुरुजींना प्रकाशकिरण लाभला होता. त्यामुळे भूदान आंदोलनात विनोबाजींच्या मागून वाटचाल करताना साने गुरुजींच्या मनातील वादळ शमले असते. परंतु 1950 साली साने गुरुजींच्या मनाला असा आधार सापडत नव्हता. आशा- निराशेचा पाठशिवणीचा खेळ साने गुरुजींच्या जीवनात सतत चालू असे.

स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर राष्ट्राच्या उभारणीची प्रक्रिया सुरू असतानाच, अनेकांच्या मनातील स्वार्थही जागा होत होता. हे पाहून साने गुरुजी फार व्यथित होत होते. हा सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा कोलाहल त्यांच्या भावविवश स्वभावाला मानवण्यासारखा नव्हता. त्यांच्या मनाची घुसमट होत होती. व्यवहारी जगातील विसंवादामुळे ते व्याकुळ होत होते. परंतु ते निराश झाले नव्हते. कारण लोकशाही समाजवादाचा विचार रुजविण्यासाठी धडपडणारी मुले त्यांच्याभोवती होती. परंतु स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तरुणांना जशी प्रेरणा दिली, तशी प्रेरणा समतेसाठी यापुढे आपल्याला किती काळ देता येईल, याबद्दल साने गुरुजी साशंक होऊ लागले. होते. 'आपली खेळी आता संपत आली आहे. ही भावना त्यांच्या मनात बळावू लागली होती. जगण्यासारखे जोपर्यंत आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे, असे साने गुरुजींना तीव्रतेने वाटले.

मृत्यूबद्दल त्यांच्या मनाला सतत आकर्षण वाटत असे. मृत्यू म्हणजे जगाच्या बंधनातून मुक्ती हा विचार साने गुरुजींनी त्यांच्या लेखनातून पूर्वी मांडला होता. साने गुरुजींनी एका कवितेत देवाला विनविले होते, 'आई आई मज माहेराला नेई' या माहेराची ओढ त्यांच्या मनाला आता तीव्रतेने वाटू लागली. मृत्यू म्हणजे साऱ्या बंधनातून मुक्तता या विचाराने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला. देहाचे पाश सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सहजतेने आपली जीवनज्योत मालवून टाकली.

Tags: साने गुरुजींचे मन - एक समरभूमी ग. प्र. प्रधान g.p.pradhan #sane gurujinche man : ek samrbhumi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान ( 383 लेख )

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके