डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आजच्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेताना अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ज्या तडजोडी केल्या, त्यामुळे ते उच्चारित असलेल्या डॉ. आंबेडकऱ्यांच्या शब्दांचे मूळ सामर्थ्य कमी झाले आहे. या परिस्थितीची जाणीव झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तवावर आधारलेल्या परंतु प्रत्यक्षात न घेतलेल्या मुलाखतींमधून त्यांच्या तोंडूनच त्यांची जीवनकथा सांगावी असे मला वाटले. यामुळे एका वेळी गगनाला गवसणी घालणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पैलूंवर आणि त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवर थोडा तरी प्रकाश पडेल असे वाटते.

भंडारा जिल्ह्यात खैरलांजी येथे झालेले हत्याकांड ही माणुसकीला काळिमा फासणारी आणि दलितेतर समाजास शरमेने मान खाली घालावयास लावणारी घटना होती. त्याचप्रमाणे कानपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने केलेली विटंबना हीदेखील अत्यंत निषेधार्ह आणि घृणास्पद घटना होती. या दोन घटनांनंतर दलित समाज संतप्त होणे स्वाभाविक होते. बहुसंख्य दलितेतर लोकांनाही खैरलांजी आणि कानपूर येथील घटना घडावयास नको होत्या असेच वाटत होते. परंतु दलित समाजाच्या संतापाचा उद्रेक ज्या हिंसक रीतीने झाला, ते मात्र बहुसंख्य लोकांना आवडले नाही. मी त्या वेळी बऱ्याच जणांशी बोललो, तेव्हा मला आपल्या समाजाचे मन दुभंगले आहे असे दिसले आणि माझे मन चिंतातुर झाले. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आणि कार्याची ओळख थोडक्यात आणि सुलभपणे राष्ट्र सेवा दलातील आणि अन्य पुरोगामी संघटनांतील संस्कारक्षम वयाच्या कार्यकर्त्यांना करून द्यावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे अधिष्ठान 'ज्ञान’ होते हे त्यांना समजून सांगावे असे मला वाटले. मात्र हे सांकेतिक पद्धतीने केले तर ते परिणामकारक होणार नाही, याचीही मला जाणीव झाली. म्हणून तरुण कार्यकर्त्यांना उपदेश न करता, त्यांचे मन अधिक संवेदनशील व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे मी ठरविले आणि या लेखनातून मी तसा प्रयत्न केला आहे.

शब्दांचे सामर्थ्य जी व्यक्ती ते शब्द उच्चारते तिच्या आचरणावर आणि चारित्र्यावर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण काय होती हे आज त्यांचे अनुयायी असलेले अनेक राजकीय पुढारी सांगतात, परंतु एका वेळी सर्व दलितांना चैतन्य देणारे ते शब्द आज प्रभावी होत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द - त्यांची ज्ञानसाधना आणि त्यांचे त्यागमय जीवन यातून स्फुरलेले होते. माझ्यासारख्याने तरुण कार्यकर्त्यांना त्यांचे उतारे वाचून दाखवले तर आशय श्रोत्यांना समजेल, परंतु त्यांचा प्रभाव मात्र पूर्वीसारखा पडू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाऊराव गायकवाड आणि अन्य काही निवडक निष्ठावान अनुयायांनी बाबासाहेबांची शिकवण समाजात रुजावी यासाठी दीर्घकाल कार्य केले आणि त्याग केला. त्यामुळेच ते बाबासाहेबांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकले. परंतु गेल्या पंचवीस वर्षांमध्ये राजकारणाचे ते स्वरूप पालटले. आजच्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेताना अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ज्या तडजोडी केल्या, त्यामुळे ते उच्चारित असलेल्या डॉ. आंबेडकऱ्यांच्या शब्दांचे मूळ सामर्थ्य कमी झाले आहे. या परिस्थितीची जाणीव झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तवावर आधारलेल्या परंतु प्रत्यक्षात न घेतलेल्या मुलाखतींमधून त्यांच्या तोंडूनच त्यांची जीवनकथा सांगावी असे मला वाटले. यामुळे एका वेळी गगनाला गवसणी घालणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पैलूंवर आणि त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवर थोडा तरी प्रकाश पडेल असे वाटते.

युवा पत्रकार : बाबासाहेब, आपल्या मुलाखती घेण्याची परवानगी आपले निष्ठावान अनुयायी आणि थोर कार्यकर्ते व लेखक अॅड. शंकरराव खरात यांच्यामुळे आपण मला दिली याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि आपणास वंदन करतो. 

डॉ. आंबेडकर : नमनाला घडाभर तेल नको, कामाला सुरुवात कर. 

युवा पत्रकार : आपल्या लहानपणी आपल्या मनावर जे संस्कार झाले त्याच्या स्वरूपाबद्दल आपण मला सांगाल का?

डॉ. आंबेडकर : दलित समाजातील ग्रामीण भागात राहाणाऱ्या, येसकर म्हणून कसेबसे जगणाऱ्या गरीब दलित कुटुंबीयांच्यापेक्षा आमच्या कुटुंबाचे जीवन वेगळे होते. माझे वडील रामजी हे सैन्यात सुभेदार होते. त्यामुळे खरात किंवा दया पवार यांना ज्या हालअपेष्टा, जी उपासमार सोसावी लागली ती माझ्या वाट्याला आली नाही. आमचे कुटुंब गरीब असले तरी आमच्या घरातील वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते. आमच्यामध्ये विदेशी अभिरुची उत्पन्न व्हावी, आमचे चारित्र्य सोज्ज्वळ बनावे यासाठी आमचे वडील फार दक्ष असत. जेवायला बसायच्या आधी ते आम्हांला भजने, अभंग, दोहे म्हणायला लावीत. माझ्या वडिलांनी कबीरपंथाची दीक्षा घेतली होती. ते पहाटे भूपाळ्या व स्तोत्रे म्हणत. वडिलांच्या पाठांतरामुळे मुक्तेश्वर, तुकाराम वगैरे संतकवींची वचने माझी पाठ झाली.

आमचे मूळचे नाव आंबवडेकर होते. परंतु मला शिकवणाऱ्या आंबेडकर या ब्राह्मण शिक्षकांचे माझ्यावर फार प्रेम होते. ते म्हणाले, ‘‘तुझ्या आडनीड नावापेक्षा आंबेडकर हे माझे नाव तू लाव’’ आणि कॅटलॉगमध्ये त्यांनी तशी नोंदही करून टाकली. 

युवा पत्रकार : आपल्याला लहानपणी परिस्थितीचे चटके बसले नाहीत, असे म्हणता येईल का?

डॉ. आंबेडकर : गरिबीचे चटके मला बसले नाहीत. परंतु आम्ही सातारला राहायला आल्यावर शाळेत असताना, मला अस्पृश्यतेचे चटके मात्र बसू लागले. माझे केस न्हावी कापत नसे. मला संस्कृत शिकायचं होतं, परंतु आमच्या संस्कृतच्या मास्तरांनी, ‘‘मी अस्पृश्यांच्या पोरांना संस्कृत शिकवणार नाही’’, असं सांगितल्यामुळे मला पर्शियन घ्यावे लागले.

त्यापेक्षाही एका अनुभवाने माझ्या मनावर कायमचा ओरखडा ओढला गेला. आमच्या भूमितीच्या मास्तरांनी मला फळ्यावर आकृती काढायला सांगितली; आणि मला फळ्याकडे जायला सांगितले. त्या वेळी वर्गातल्या सर्व मुलांनी गिल्ला केला, ‘‘मास्तर, थांबवा त्याला. तो आमच्या फराळाचे जिन्नस बाटवील.’’ मुलांच्या फराळाचे डबे फळ्याच्या मागे होते. माझ्याच वर्गातल्या मुलांच्या या वागण्यामुळे मला फार वाईट वाटले; माझे मन दुखावले. पुढे मोठा अधिकारी असताना बडोद्यालाही मला असाच अपमान सोसावा लागला.

बाबासाहेब थोडे थांबून म्हणाले,

‘‘आपल्या समाजात अस्पृश्य तरुण खूप शिकला, अधिकारी झाला तरी स्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील चपराशीही त्याचा अपमान करतो, हे अनुभवल्यामुळेच माझे मन बंड करून उठले. पण या अपमानांबद्दल मी अधिक बोलणार नाही. हिंदू धर्मातील जातिव्यवस्येमुळे अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना कुत्र्यापेक्षाही वाईट वागवले जाई. हे गाऱ्हाणे मी जगाच्या वेशीवर टांगले. या अन्यायाच्या विरुद्ध मी अनेक वर्षे लढलो. पण त्या संबंधी आता जास्त बोलण्यात मला रस वाटत नाही.’’ 

युवा पत्रकार : आपण आपल्या शिक्षणाबद्दल काही सांगाल का? 

डॉ. आंबेडकर : शिक्षणामुळे माणूस घडतो, हे अर्धसत्य आहे. शिकत असताना तो स्वतः जे कष्ट, जी तपश्चर्या करतो त्यातून त्याच्या जीवनाची घडण होते. 

मी लहानपणापासून शाळेच्या अभ्यासाबरोबर अवांतर वाचनही करीत असे. माझ्या वडिलांनी तर्खडकरांच्या भाषांतर पाठमालेची पुस्तके माझ्याकडून पाठ करून घेतली. इंग्रजी वाक्प्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी हेपण त्यांनीच शिकवले. पुढे साताऱ्याहून आम्ही मुंबईला आलो. हायस्कूल सुटल्यानंतर मी चर्नीरोड गार्डनमध्ये बसून वाचत असे. तिथे विल्सन हायस्कूलचे हेडमास्तर व एक व्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर हेही वाचत बसत. एक दिवस केळुसकरांनी माझी चौकशी केली. ते फार संतुष्ट झाले. त्यानंतर त्यांनी मला चांगल्या ग्रंथकारांची पुस्तके वाचायला दिली. केळुसकरांमुळे माझ्या वाचनात शिस्त आली. त्यांनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र मला वाचायला दिले. त्याचा माझ्या मनावर खोलवर संस्कार झाला. मी मॅट्रिक झाल्यानंतर मला कॉलेजमध्ये पाठविणे माझ्या वडिलांना शक्य नव्हते. परंतु केळुसकर मला सयाजीराव महाराजांकडे घेऊन गेले आणि महाराजांनी कॉलेज शिक्षण घेण्यासाठी मला दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्यामुळेच मी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये जाऊ शकलो.

एलफिन्स्टन कॉलेजमध्ये चांगले प्रोफेसर होते, पण काय असेल ते असो, त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती निर्माण केली नाही. मी अवांतर वाचन पुष्कळ करीत असे; परंतु परीक्षेत पहिला वर्ग मिळवावा असे मला कधी वाटले नाही. मी दर वर्षी पास होत गेलो आणि 1913 साली बी.ए. झालो. त्यानंतर मी बडोदा येथे नोकरी करण्यास गेलो. मात्र तिथल्या नोकरीत माझे मन रमेना. मला राहायला चांगली जागा मिळाली नाही. याच वेळी माझे वडील फार आजारी असल्याची तार मला मिळाली. मी रजा घेऊन मुंबईला आलो. वडिलांची प्रकृती अत्यवस्थ होती. वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि प्राण सोडला. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी ज्या खस्ता खाल्ल्या ते मी कधी विसरू शकणार नाही.

युवा पत्रकार : आपण अमेरिकेस कसे गेलात? 

डॉ. आंबेडकर : तेही सयाजीराव महाराज यांनी केलेल्या मदतीमुळे. मी त्यांना मुंबईत भेटलो. त्यांनी मला विचारले, ‘‘तुला कोणत्या विषयांचा अभ्यास करावासा वाटतो?’’ तेव्हा मी सांगितले की, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि पब्लिक फायनान्स. महाराजांनी मला विचारले की, तू हा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला जाशील का? मी 'हो' म्हणाल्यावर त्यांनी मला अर्ज करण्यास सांगितले. नंतर त्यांनी मला स्कॉलरशिप मंजूर केली. ते 1913 साल होते आणि स्कॉलरशिप तीन वर्षांसाठी होती. मी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेऊन अर्थशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. सुरुवातीस मी फारसा अभ्यास करीत नसे. परंतु चार महिन्यांनी मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली; नंतर मी रोज 16-18 तास अभ्यास करू लागलो. 1915 साली मी एम.ए.च्या परीक्षेत उच्च श्रेणीने उत्तीर्ण झालो आणि नंतर पीएच.डी. मिळवावी असा निर्णय घेतला. 

युवा पत्रकार : आपल्या विद्यार्थिदशेबद्दल थोडे सांगाल का?

डॉ. आंबेडकर : प्रथम 'अभ्यास' याचा अर्थ त्या विषयाची माहिती, असे मी समजत होतो. परंतु कोलंबिया विद्यापीठातील डॉ. सेलिग्मन या प्रोफेसरांमुळे मला ‘माहिती आणि ज्ञान' यांतला फरक समजला. विषयाच्या मूलतत्त्वांचे आकलन झाल्याशिवाय त्या विषयाचे ज्ञान होऊ शकणार नाही, हे मला कळले. डॉ. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनामुळेच मी ज्ञानाचा खरा उपासक झालो. माझ्या प्रबंधासाठी मी कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीत असलेले सर्व साहित्य वाचले आणि 'इव्होल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्स' या विषयावर प्रबंध लिहून 1917 साली पीएच.डी. मिळवली.

त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात अ‍ॅन्ड्रॉपॉलॉजी (मानववंश शास्त्राच्या) सेमिनारमध्ये 'हिंदुस्थानातील जाती, त्यांची घटना, उत्पत्ती आणि वाढ' हा निबंध मी वाचला. प्रो. गोल्डन वायजर आणि विद्यार्थिवर्ग यांना तो निबंध फार आवडला. पुढे 1917च्या मे महिन्यात 'इंडियन अँटिक्वेरी’च्या अंकात तो प्रसिद्ध झाला आणि नंतर तो मी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला. हे माझे पहिले पुस्तक. 

युवा पत्रकार : नंतर आपण लंडनला कसे आणि कशासाठी गेलात?

डॉ. आंबेडकर : कोलंबिया विद्यापीठातून दोन पदव्या मिळवल्यावर माझ्या मनात लंडन युनिव्हर्सिटीच्या पदव्या मिळवण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्यासाठी, जी दोन वर्षे लागतील, त्या काळात बॅरिस्टर व्हायचे, असेही मी ठरवले. माझे प्रोफेसर सेलिग्मन यांनी सयाजीराव महाराजांना पत्र लिहून माझी स्कॉलरशिप आणखी दोन वर्षे वाढवावी अशी शिफारस केली. मी मात्र बडोद्याच्या निर्णयाची वाट न पहाता न्यू यॉर्क सोडले आणि बोटीने इंग्लंडला गेलो. प्रो. सेलिग्मन यांनी केलेल्या शिफारशीमुळे सिडने वेब या ग्रंथकाराने मला इंडिया ऑफिसच्या ग्रंथालयात संशोधनासाठी अभ्यास करण्याची परवानगी मिळवून दिली. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पोलिटिकल सायन्स'मध्ये मला प्रवेश मिळाला आणि मी एम.एस्सी.च्या पदवीसाठी ‘प्रॉव्हिन्शिअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इंडियन फायनान्स' या विषयावर प्रबंध लिहायचे ठरवले.

त्याच वेळी बॅरिस्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी ‘ग्रेज इन्’मध्येही नाव घातले. परंतु माझी स्कॉलरशिप अधिक मुदतीसाठी वाढवण्यास नकार मिळाल्यामुळे, मला भारतात परतणे आवश्यक होते. माझ्या अभ्यासात खंड पडला तरी काही काळाने तो पूर्ण करण्याची परवानगी मला 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'ने आणि 'ग्रेज इन्'नेही दिली.

भारतात आल्यावर कराराप्रमाणे मला बडोदे संस्थानने सांगितलेली नोकरी स्वीकारावी लागली. परंतु मी अस्पृश्य मानला गेलो असल्यामुळे मला अनेक अपमान सहन करावे लागले. अखेर ती नोकरी सोडून मी मुंबईला परत आलो. नंतरची दीड वर्षे माझी फार हालअपेष्टेत गेली. अखेरीस 1918 मध्ये मला सिडनहेम कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली. इंग्लंडला परत जाण्यासाठी मला पैसे साठवणे जरूर होते, म्हणून मी फार काटकसरीने राहत असे.

युवा पत्रकार : मग आपण परत लंडनला केव्हा गेलात? 

डॉ. आंबेडकर : मी बरेचसे पैसे साठवले होते आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मला भरघोस अर्थसाहाय्य केले. शाहू छत्रपतींचे माझ्यावर निरतिशय प्रेम होते आणि ते स्वतः खरेखुरे समतावादी सुधारक होते. त्यांना दलितांबद्दल आणि धनगरांसारख्या उपेक्षित समाजाबद्दल मनापासून आत्मीयता वाटे. शाहू महाराजांचे मोठेपण हे की माणगाव येथे 1919 साली भरलेल्या परिषदेत ते दलितांना उद्देशून म्हणाले, ‘‘मी तुमचा राजा आहे हे खरे, पण आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. आंबेडकरच तुम्हांला न्याय मिळवून देतील.’’ छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक साहाय्य केले, म्हणूनच मी पुन्हा इंग्लंडला जाऊन माझे शिक्षण पूर्ण करू शकलो. साडेआठ हजार रुपये मी लंडनच्या खर्चासाठी बरोबर घेतले. दीड हजार रुपये कुटुंबाजवळ खर्चासाठी दिले आणि 5 जुलै 1920ला मी बोटीने लंडनला निघालो. लंडनला पोहोचल्यावर नियमाप्रमाणे मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि ग्रेज इनमध्ये पुन्हा विद्यार्थी म्हणून दाखल झालो. जून 1921 मध्ये मी लिहिलेला 'प्रॉव्हिन्शिअल डीसेंट्रलायझेशन ऑफ इंपीरिअल फायनान्स' हा प्रबंध स्वीकारला गेला आणि मला एम.एस्सी. ही पदवी मिळाली. विद्यापीठात प्रबंध सादर केल्यावर मी माझे लक्ष कायद्याच्या अभ्यासाकडे वळवले आणि नीट अभ्यास करून 'बार अॅट लॉ’ ही पदवी मिळवून बॅरिस्टर झालो. या काळात पुस्तके विकत घेण्याच्या माझ्या आवडीमुळे अनेकदा मला उपाशीपोटी रहावे लागे.

डॉक्टरेटसाठी मी लिहिलेल्या 'हिंदी चलनाचा प्रश्न’ ( प्रॉब्लेम ऑफ द रुपी) या प्रबंधातील ब्रिटिशांवर टीका करण्याच्या माझ्या निष्कर्षांबद्दल काही परीक्षकांनी आक्षेप घेतला. खूप वादावादी झाल्यावर मला माझ्या मांडणीत थोडा बदल करावयास प्रो. कॅनन यांनी सांगितले आणि मी ते मान्य केले.

14 एप्रिल 1923 रोजी मी मायदेशी परतलो आणि ऑगस्टमध्ये माझा प्रबंध लंडन युनिव्हर्सिटीत पाठवला. 1923च्या नोव्हेंबर महिन्यात मला 'डॉक्टर ऑफ सायन्स' - डी.एस्सी. ही पदवी मिळाल्याची तार मिळाली तेव्हा अत्यानंद होऊन मी ओक्साबोक्शी रडलो. 1923च्या डिसेंबरमध्ये माझा हा प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. प्रो. कॅनन यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि प्रस्तावनेच्या शेवटी माझे निष्कर्ष त्यांनी मान्य केले. त्यांनी लिहिले होते की, आंबेडकर यांचे सर्व निष्कर्ष मान्य नसले तरी त्यांनी प्रबंधात मांडलेले विचार बरोबर आहेत असे मला वाटते.

Tags: प्रॉब्लेम ऑफ रुपी परदेशात शिक्षण अस्पृश्यतेची जाणीव जीवनप्रवास डॉ. आंबेडकर प्रेरणादायी Problem of Rupee Education Abroad Awareness of Untouchability Life Journey Dr. Ambedkar Inspirational weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके