डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

पू. साने गुरुजींचे मन हे एक कोडेच होते! मानवी मनात गुंतागुंत असते, विसंगती असतात हे आपणा सर्वांना ठाऊक आहे, परंतु साने गुरुजींच्या मनातील कल्लोळांचे स्वरूपच वेगळे असे. 1942 साली त्यांच्या समवेत तुरुंगात एकाच बराकीत मी होतो. पण दिवसाचे कित्येक तास ते आम्हा सर्वांपासून अतिशय दूर असत, हे लक्षात येत असे.

पू. साने गुरुजींचे मन हे एक कोडेच होते! मानवी मनात गुंतागुंत असते, विसंगती असतात हे आपणा सर्वांना ठाऊक आहे, परंतु साने गुरुजींच्या मनातील कल्लोळांचे स्वरूपच वेगळे असे. 1942 साली त्यांच्या समवेत तुरुंगात एकाच बराकीत मी होतो. पण दिवसाचे कित्येक तास ते आम्हा सर्वांपासून अतिशय दूर असत, हे लक्षात येत असे. स्वतःच्या मनाच्या स्फोटक-मिनारात गुरुजी गुप्त झाले की ते या मानव समूहातील नाहीत असेही केव्हा वाटे. तेच साने गुरुजी गोष्ट सांगू लागले की वेगळे असत. प्रौढांना त्यांचे प्रौढपण विसरावयास लावण्याची किमया ते करीत. स्वतः लहान मुलासारखे निरागस, केव्हा केव्हा खोडकरपणेही हसत आणि इतरांना हसवीत. गुरुजींच्या मनावर अभ्र केव्हा येतील ते सांगता येत नसे. त्यांचे मन बराच वेळ असे झाकोळलेले असे आणि तरीही स्वातंत्र्यप्रेमाची वीज जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चमकून जात असे तेव्हा सर्वांचे डोळे दिपून जात पारतंत्र्यामुळे घुसमटून जाणाऱ्या साने गुरुजींना शिरीषकुमार, भाई कोतवाल किंवा गारगाटीचे करवीरच्या स्वामी यांच्या हौतात्म्याचे जेव्हा स्मरण होई, तेव्हा त्यांच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध आगडोंब उफाळून येत असे आणि त्या वेळचे साने गुरुजींचे शब्द प्रत्येकाच्या अंतःकरणात अंगार फुलवीत असत. ‘येथून तेथून सारा पेटू दे देश’ या गुरुजींच्या काव्यपंक्तीतील शब्द मशालीचे रूप धारण करून मुर्दाड मनांनाही पेटून उठायला कसे लावत हेही मी पाहिले होते.

आसू आणि हसू, तीव्र उद्वेग आणि ओसंडून जाणारा उत्साह, उत्फुल्ल अशा आणि दारुण निराशा यांच्यामध्ये साने गुरुजींच्या मनाची होणारी ही आंदोलने पाहिल्यावर या मनाचे आपल्याला नीटसे आकलन होऊ शकणार नाही, हे माझ्या लक्षात आले. पण गुरुजींच्या मनातील उदात्ततेचे इतके भव्य दर्शन मला अनेकदा झालेले आहे की त्यांच्या स्वभावातील न उमगलेल्या गोष्टींचा विचार करून सत्याचे काही कण सापडतात का, असा मी केव्हा केव्हा प्रयत्न करतो. साने गुरुजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्यामधील भावबंधांचे स्वरूपही अद्याप मला नीटसे समजलेले नाही. विनोबाजी हे गुरुजींचे जणू एक दैवतच होते आणि एकूण जगाकडे सतत चिकित्सक दृष्टीने पाहणारे आणि भावविवशतेला स्वतःच्या जीवनात थारा न देणारे विनोबाजीही साने गुरुजींच्यावर सतत थोरल्या भावाची माया करीत. या दोघांचे स्वभाव अगदी भिन्न होते आणि तरीही कमालीचे बुद्धिनिष्ठ विनोबाजी आणि भावाकुल साने गुरुजी यांच्या मनांचे तंबोरे जुळून गेले होते. मला या गोष्टीचे नेहमी आश्चर्य वाटे, पण स्वभावात फरक असला तरी या दोघांमध्य जो दृढ भावबंध निर्माण झाला होता त्याची दोन उगमस्थाने होती. एक भगवद्गीता आणि दुसरे महात्मा गांधी!

भगवद्गीता हे विनोबाजींच्या जीवनाचे अधिष्ठान होते. ही गीता सर्वांना समजावी म्हणून आईला ती सोप्या पद्धतीने सांगण्याच्या निमित्ताने विनोबाजींनी गीताई लिहिली. त्याचप्रमाणे धुळ्याच्या तुरुंगात असताना अन्य राजबंद्यांना गीतेचा संदेश समजून सांगण्यासाठी विनोबाजींनी अठरा प्रवचने दिली. साने गुरुजी ही प्रवचने ऐकणाऱ्यांपैकी एक होते. गुरुजींनी पूर्वी गीता अनेकदा वाचली होती. त्यांच्या मनाला गीतेचा अनेकदा आधार वाटला होता, परंतु विनोबाजींची प्रवचने ऐकताना साने गुरुजींना जणू दिव्य प्रकाशात गीतेचे नवे दर्शन घडले. विनोबाजींच्या तोंडून येणारा प्रत्येक शब्द साने गुरुजींनी हृदयसंपुटात साठवला आणि ही प्रवचने त्यांनी लिहून काढली. साने गुरुजींची स्मरणशक्ती कशी असामान्य होती, हे सांगण्याची आवश्यकता नाही. विनोबाजींनी केलेली ही प्रवचने साने गुरुजींनी शब्दांकित केली आणि विनोबाजींनी ती ज्यावेळी वाचली त्यावेळी तेही स्तिमित झाले, असे मी ऐकले आहे. विनोबाजी हे शब्दांच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. शब्दांची उधळमाधळ त्यांनी कधी केली नाही. त्यांच्या गणिती बुद्धीमुळे ते सूत्रबद्ध विचार करीत, सूत्रबद्ध बोलत आणि सूत्रबद्ध लिहीत. मात्र त्यांची सोपी, सुगम वाटणारी वाक्ये आशयधन असत. साने गुरुजींची भाषणशैली व लेखनशैलीही अतिशय सोपी, सुगम असे पण ती सूत्रबद्ध नव्हती, ती ओघवती होती.

गुरुजींच्या मनातील भावतरंग, विचारतरंग त्यांच्या साध्या, अनलंकृत, पण ओघवत्या भाषेतून अतीव सुंदरपणे प्रकट होत. साने गुरुजींनी भगवद्गीतेचा आशय उकलून दाखवणारे ‘गीताहृदय’ म्हणून जे पुस्तक लिहिले आहे त्यात गुरुजींची ही नेहमीची शैली प्रकट होते. साने गुरुजींचा स्वभाव आणि त्यांचे लेखन हे अविभाज्य होते. किंबहुना त्यांचे लिहिणे हे त्यांचे जगणेच होते. अशा स्वभावाच्या साने गुरुजींनी अगदी भिन्न स्वभावाच्या विनोबाजींनी दिलेली प्रवचने, विनोबांच्या शब्दांतच शब्दबद्ध केली. यावेळी साने गुरुजी विनोबामय झालेले होते. दैवताशी एकरूप होणे ही खऱ्या भक्ताची वृत्ती इथे प्रकटली होती. भगवद्गीता आणि विनोबाजी यांच्याशी साने गुरुजींचे जे तादात्म्य झाले होते त्यामधून ही प्रवचने लिहिली गेली. भवभूतीने उत्तरराम चरितात ‘वितरति गुरुः प्राज्ञे विद्या’ या श्लोकात प्रकाशकिरण हिऱ्यातूनच परावर्तित होतो हे जे वर्णन केले आहे त्याप्रमाणे आचार्य विनोबाजीचे शब्द साने गुरुजींच्या अंत:करणाच्या माध्यमातून कसे प्रकाशमान झाले ते गीता प्रवचनात दिसून येते.

महात्मा गांधींच्या समीप आल्यावर विनोबाजींचे जीवनच बदलून गेले. त्यांच्या जीवनातील सत्याच्या शोधाचे स्वरूपच पालटले. महात्माजींच्यामुळे साने गुरुजींच्या मेणाहून मृदू असणाऱ्या व्यक्तिमत्वाला कठीण वज्रास भेदून टाकण्याचे सामर्थ्य आले. विनोबाजींना महात्माजींबद्दल नितांत आदर असला तरी कोणाही अन्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात विलीन होणे हा विनोबांचा स्वभावच नव्हता. त्यांचे स्वतंत्र प्रखर व्यक्तिमत्त्व होते. निर्गुण निराकार असेच परमेश्वराचे स्वरूप त्यांना मान्य होते. साने गुरुजींचा स्वभाव यापेक्षा अगदी भिन्न होता. सगुणाची, साकाराची उपासनाच त्यांच्या स्वभावाशी जुळणारी होती. विनोबा ज्ञानमार्गी होते. तर साने गुरुजी भक्तिमार्गी होते. दोघांनीही आपापल्या मार्गाने म. गांधींचे मोठेपण समजून घेतले. विनोबाजी म. गांधींच्या सतत जवळ असल्यामुळे महात्मा गांधींनी त्यांचे मोठेपण जाणले. परंतु साने गुरुजींनी त्याच्या आत्मविलोपी स्वभावामुळे महात्माजींची भेट घेण्याचाही कधी प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे अखेरपर्यंत महात्मा गांधींना साने गुरुजी जवळजवळ अपरिचितच राहिले! साने गुरुजींच्या पंढरपूरच्या उपवासाच्या वेळी श्री. दादासाहेब मावळंकर यांनी महात्माजींच्या कानांवर जी थोडी माहिती घातली त्यामुळे त्यांचे मत साने गुरुजींना अनुकूल झाले.

मला असे वाटते की त्याकाळात देव, देवकीनंदन, दास्ताने आदीना साने गुरुजींचे मोठेपण पुरेसे कळलेच नव्हते आणि महाराष्ट्रातील गांधीजींच्या प्रभावळीत देव-देवकीनंदन दास्ताने याचेच महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्यांनी म. गांधींना गुरुजींच्या मोठेपणाबद्दल अंधारातच ठेवले. अन्यथा वैयक्तिक सत्याग्रहात विनोबाजींना ज्याप्रमाणे भारतात पहिले सत्याग्रही म्हणून गांधीजींनी निवडले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी साने गुरुजींचीच निवड केली असती. म. गांधीच्या मृत्यूनंतर आचार्य विनोबा भावे यांना दुःख झाले तरी त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे त्या दुःखाच्या तीव्रतेचे दुःखकुलतेत कधी रूपांतर झाले नाही. परंतु साने गुरुजींच्या मनाची अवस्था याहून भिन्न होती. गांधीजींच्या मृत्यूमुळे त्यांच्या जीवनाचा जणू आधारच हरपला. साने गुरुजींनी त्यांचे काम थांबवले नाही, परंतु भारतीय जीवनातील पावित्र्य व शुचिता निर्माण करणारी शक्ती अस्तंगत झाली, अशीच त्यांच्या मनाची भावना झाली. पुढील दोन अडीच वर्षात साने गुरुजींनी राष्ट्र सेवा दलात व साधनेत स्वतःला झोकून दिले. श्रमदानातून नवनिर्माण आणि आंतर भारती अशा भव्य कल्पना मांडल्या, परंतु म. गांधी हयात असताना कोणत्याही चळवळीला त्यांच्यामुळे जो चैतन्याचा स्पर्श होत असे तो यापुढे होऊ शकणार नाही अशी निराशा साने गुरुजींना वाटू लागली. त्यांच्या मनातील ही निराशा त्यांचे सहकारी व त्यांच्यावर प्रेम करणारे आम्ही अनेकजण दूर करू शकलो नाही.

साने गुरुजींच्या मृत्यूनंतर वर्षभरात आचार्य विनोबा भावे यांना भूदानाची कल्पना सुचली. ही कल्पना 1950 साली विनोबाजींना सुचली असती तर साने गुरुजीच्या जीवनाला चैतन्याच्या या नव्या साक्षात्कारामुळे नवा आधार सापडला असता. विनोबाजींनीच अशा अर्थाचे उद्गार काढले होते. विनोबाजीच्या भूदान यात्रेत साने गुरुजी सामील झाले असते तर त्या चळवळीतही नवे सामर्ध्य व तेज निर्माण झाले असते. भगवद्गीतेवरील विनोबाजींचे भाष्य अमर करणे हा पूर्वार्ध झाला असता आणि उत्तरार्धति या गुरु-शिष्यांनी भारतातील भूमिहीनांना भूमी मिळवून देताना विषमता व अन्याय या विरुद्ध जे धर्मयुद्ध सुरू केले असते त्यामुळे भारताच्या जीवनात एक नवी शक्ती निर्माण झाली असती. विनोबाजींनी साने गुरुजीचे हे सामर्थ्य ओळखूनच ‘साने गुरुजी हे अमृताचे पुत्र होते’ असे उद्गार काढले होते. अशा या असामान्य गुरु-शिष्यांच्या स्मृतीस शतशः प्रणाम!

Tags: Geetai Geetarudy Turung Satyagraha Bhagwatgeeta Chalval Mahtma Gandhi Vinoba Bhave Sane Guruji गीताई गीताहृदय तुरुंग सत्याग्रह भगवतगीता चळवळ महात्मा गांधी विनोबा भावे साने गुरुजी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान ( 383 लेख )

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके